
मराठीत प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक हे दिवाळीच्या उत्सवी वातावरणात प्रसिद्ध होत असले तरी, अधिक गंभीरपणे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, ती एका स्वायत्त, नागरी समाजाची स्वयंस्फूर्त अभिव्यक्ती आहे.
दिवाळी अंकांचं सामाजिक स्थान
मराठीत प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक हे दिवाळीच्या उत्सवी वातावरणात प्रसिद्ध होत असले तरी, अधिक गंभीरपणे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, ती एका स्वायत्त, नागरी समाजाची स्वयंस्फूर्त अभिव्यक्ती आहे. स्वायत्त नागरी समाज म्हणजे समाजाचं असं अंग किंवा अशी संस्थात्मक व्यवस्था, जी राज्यसंस्था, अर्थव्यवस्था आणि धर्मसंस्था यांच्यापेक्षा भिन्न आणि यांच्याहून स्वतंत्र असते. आपण जर असं मानलं की, समाज ही सगळ्यांची मातृशक्ती आहे, तर या समाजामधून राज्य, अर्थ आणि धर्मसंस्था उदयास येत असतात आणि नंतर त्या समाजावर परिणाम करत असतात. राज्यसंस्थेचं कार्य हे कायदा व सुव्यवस्था राखण्याचं असतं, तर अर्थव्यवस्थेचं म्हणजे बाजार किंवा ‘मार्केट’चं कार्य हे आर्थिक देवाण-घेवाण सुलभ करण्याचं असतं. धर्मसुद्धा नियमनाचं कार्य करतो, मात्र ते व्यक्तिकेंद्रित नीती-नियमनाचं असतं.
राज्यसंस्था, बाजाराची अर्थव्यवस्था आणि धर्म ह्या अतिशय बलदंड व्यवस्था आहेत. त्यांनी जर त्यांच्या मूळ, शुद्ध, आणि प्रामाणिक रूपामध्ये कार्य केलं, तर त्या समाजाला हितकारी होतात; परंतु आपण रोज पाहतो की, प्रत्यक्षात ह्या संस्था लोककल्याणाचं काम करतच नाहीत. सध्याची राज्यसंस्था ही लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेतून तयार झालेली आहे, ती काही राजेशाही नव्हे; परंतु प्रतिनिधीशाही किंवा पक्षशाही असल्याने निव्वळ पक्षाचा आणि पुढाऱ्यांचा स्वार्थ पाहते.
अर्थव्यवस्था खुली आणि सचोटीची असायला पाहिजे; पण प्रत्यक्षात कारखानदार, व्यापारी आणि उद्योगपती देशाला लुटायलाच निघालेले आहेत, लुटीचे आकडे कमी-जास्त होतात एवढंच. धर्माची व्याख्या ‘धारयति इति धर्माः’ अशी आहे. म्हणजे जो लोकांना धारण करतो, तो धर्म. पण, प्रत्यक्षात धर्म लोकांनाच खायला निघाला आहे. ह्या तीन व्यवस्थांचे जे विघातक परिणाम होतात, ते कोण रोखणार? त्यासाठी चौथी शक्ती लागते. ती म्हणजे स्वायत्त नागरी समाज. अशी लोकशक्ती; जी राज्यशक्ती, अर्थशक्ती आणि धर्मशक्ती यांच्या अन्यायकारी परिणामांशी मुकाबला करू शकते.
स्वायत्त समाजाचा आणि साहित्याचा काय संबंध आहे? तर, साहित्य हेच अशा सामाजिक शक्तींचा प्रमुख आविष्कार आहे. साहित्य हे मुळातच एक सार्वभौम, स्वायत्त आणि स्वतंत्र असं क्षेत्र आहे.
ते राज्यसत्तेवर अवलंबून असत नाही, मार्केटची पर्वा करत नाही आणि धर्मातीत किंवा धर्मनिरपेक्ष असं असतं. मला जेव्हा एखादी कथा सुचते, तेव्हा मुख्यमंत्रिपदी कोण आहे ह्याच्याशी तिचा संबंध नसतो किंवा त्यापोटी मला मानधन किती मिळणार ह्याची फिकीर नसते किंवा धर्ममार्तंडांना ती रुचेल की नाही, हा विचारही माझ्या मनात येत नाही. साहित्याची निर्मिती आणि त्याचं रसग्रहण ह्या खरोखरीच अलौकिक आणि म्हणून स्वायत्त प्रक्रिया आहेत; आणि मराठीत तरी दिवाळी अंकांनी साहित्याची ही सर्जनशीलता जपलेली आहे. मराठीतील बहुतांश लेखक हे दिवाळी अंकांतूनच पुढे आलेले आहेत.
अशा सर्जनशीलतेचा आविष्कार जे दिवाळी अंक करतात, त्यांना म्हणूनच आपल्या केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वाचं स्थान आणि भूमिका आहे. सध्याच्या काळात तर हे महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. कारण सध्या राज्यशक्ती, अर्थशक्ती आणि धर्मशक्ती यांची अभद्र युती होते आहे आणि त्यामुळे आपल्या स्वतंत्र आणि लोकशाही जीवनाचा अवकाश संकुचित होतो आहे. आपण पाहतो की, राजकीय नेते उद्योगपतींच्या विमानातून फिरतात, उद्योगपती सरकारी बॅंकांचे म्हणजे पर्यायाने जनतेचे हजारो कोटी रुपये राजकीय नेत्यांशी संगनमत करून बुडवतात. एखादा योगशिक्षकच उद्योगपती बनतो आणि राज्यसंस्थेशी संधान बांधून दुय्यम दर्जाची उत्पादनं बाजारपेठेत आणतो. अशी असंख्य उदाहरणं देता येतील.
अशा परिस्थितीत जनतेच्या हातात काय राहतं? जनतेने ह्या संकटाचा मुकाबला कसा करायचा? तर जनतेने आपल्या लोकशक्तीचा सामर्थ्यपूर्ण, विकेंद्रित आणि मानवतावादी आविष्कार करण्यासाठी माध्यमं आणि यंत्रणा निर्माण करायच्या आणि त्या निरंतर वाढवायच्या. दिवाळी अंक ही अशा तऱ्हेची घडामोड किंवा चळवळ आहे. दिवाळी अंक हे राज्यसंस्थेच्या साहाय्यावर अवलंबून नसतात, ते स्वतःची अशी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करतात.
जाहिरातींच्या माध्यमातून त्यांचा अर्थव्यवस्थेशी संबंध असतो आणि त्यांचं अर्थशास्त्र जाहिरातींवर अवलंबून असतं; परंतु जाहिरातदारांची इच्छा किंवा मागणीप्रमाणे कोणी दिवाळी अंक काढत नाही. शिवाय, अनेक दिवाळी अंक तर जाहिरातींचा आधार नसतानाही काढले जातात. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हे धर्मनिरपेक्ष असतात. काही अंक हे धार्मिक वा आध्यात्मिक विषयांना वाहिलेले असतात; परंतु बहुसंख्य दिवाळी अंक हे धर्माशी संबंध नसलेले किंवा धर्मातीत असतात. काही अंक राशिभविष्य छापतात; पण ते किती गांभीर्याने घ्यायचं, ते सगळ्यांना माहीत असतं. दिवाळी अंक वर्षातून एकदाच निघतात, ही एकादृष्टीने त्यांच्या स्वायत्ततेची खूण आहे.
मराठी साहित्याचा जो इतर संस्थात्मक व्यवहार आहे, त्याच्याशी तुलना केल्यास दिवाळी अंकांचं महत्त्व नजरेस भरतं.
उदाहरणार्थ - साहित्य संमेलनं. आपण पाहतो की, मराठीतील अखिल भारतीय साहित्य संमेलन हे दिवसेंदिवस अधिकाधिक लाचार आणि शासनावलंबी होत चाललेलं आहे; आणि तसं करत असताना साहित्याचं ब्रीद आणि वाङ्मयाच्या खऱ्या स्वरूपाशी द्रोह करू लागलेलं आहे. यंदाच्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांना ‘स्टेट गेस्ट’ म्हणजे सरकारी पाहुणा ही मान्यता मिळावी, अशी मागणी केली गेली आणि सरकारनेही हसत हसत ती मंजूर केली.
प्रथमदर्शनी ही गोष्ट सुखावणारी वाटली, तरी प्रत्यक्षात ती शोभनीय किंवा सन्मानजनक नाही, ती परावलंबी हितसंबंध वाढवणारी आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्यात जी मौज आणि सामर्थ्य असतं ते ‘व्हीआयपी’ म्हणून जगण्यात नाही. लेखकाने ‘सर्किट हाउस’ला जाऊन तिथल्या खानसाम्याचा सलाम स्वीकारण्यात धन्यता मानायची, की आपल्या वाचकाच्या घरात जाऊन त्याने किंवा तिने प्रेमाने दिलेली भाजी-भाकरी वा शिकरण-पोळी खाण्यात सार्थक मानायचं? लेखकाने वाचकांच्या गळ्यातील ताईत व्हायचं असतं, सरकारी पाहुणा नव्हे! ही मागणी ज्यांनी केली, त्यांना लेखकाचं ब्रीद काय, त्याचं कर्तव्य कोणतं, साहित्याचं अंगभूत स्वरूप काय किंवा साहित्याची स्वायत्तता काय असते याची सुतरामदेखील कल्पना नाही; आणि हीच मागणी शासन कशी मंजूर करतं? कारण शासनाची कृपाश्रयी राजनीती!
सामाजिक हिताची जपणूक करण्याऐवजी लेखकांना वैयक्तिकरीत्या उपकृत करण्यात राज्यसंस्थेला रस असतो. ह्याच संमेलनाच्या व्यासपीठावरून सारखं निवेदन केलं जात होतं की, मंत्र्यांनी आता आम्हाला मार्गदर्शन करावं. आता मंत्री काय मार्गदर्शन करणार? त्यांनाच माहीत नाही कुठल्या मार्गाला जायचं, तर ते आपल्याला काय सांगणार? मुख्य म्हणजे, जनतेने मंत्र्यांना मार्गदर्शन करायचं की मंत्र्यांनी जनतेला? मराठीच्या बाकीच्या साहित्य व्यवहाराचा हा विवेक हरवलेला आहे आणि म्हणून त्या विवेकाची जपणूक करणारी पर्यायी माध्यमं आपल्याला सशक्त करावी लागतील.
दुसरी गोष्ट अशी की, हा जो बाकीचा साहित्य व्यवहार आहे, तो लेखकांना दुबळं आणि परावलंबी करणारा आहे. साहित्य संमेलनं तर दरवर्षी राजनीतीच्या वेदीवर गाडाभर अन्न आणि एका सज्जन व्यक्तीचा बळी देण्याची ठिकाणं झालेली आहेत. बळी कोणाचा दिला जातो? तर जो दुबळा असतो, त्याचा. अजापुत्रं बली दद्यात! काही संमेलनाध्यक्ष या व्यासपीठावरून प्रतिरोधाचा सूर लावायचा प्रयत्न करतात; पण संमेलनाध्यक्ष म्हणूनच जेव्हा आपण हितसंबंधांनी लडबडलेले असतो, तेव्हा त्या शब्दांना तेज किंवा ओजस्व प्राप्त होत नाही. लेखक जेव्हा निरिच्छ, निःस्पृह आणि निर्लोभी असतो, तेव्हाच त्याच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त होतं.
धर्माच्या बाबतीत बघायचं झालं तर, सध्या एका विशिष्ट धर्माचीच सक्ती जनतेवर केली जात आहे. मध्यंतरी पुण्यामध्ये एक आधुनिक गुरुदेव आले होते, त्यांनी इथं मोठमोठे कार्यक्रम केले. लाख-दीड लाख विद्यार्थी जमवून त्यांच्याशी हितगूज केलं, स्तोत्रपठणाचा जागतिक विक्रम केला, वगैरे. मला त्या वेळी गाडगे महाराजांची आठवण झाली. गाडगे महाराजांसमोर लाख-दीड लाख युवक-युवती जमले असते, तर त्यांनी काय केलं असतं? त्यांनी प्रत्येकाच्या हातात एकेक झाडू दिला असता आणि म्हणाले असते की, आधी तुमचं हे गलिच्छ झालेलं शहर झाडून काढा! तुम्हाला नाम घ्यायचंय ना, तर नाम घ्या; पण काम करता करता घ्या. ही मराठी समाजाची परंपरा आहे. किंवा तुकडोजी महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांनी ‘ग्रामगीता’ लिहिली. भगवद्गीता होतीच; पण तिचं उपयोजन त्यांनी गावसुधारणेसाठी केलं.
मराठी साहित्याचा धर्म आणि अध्यात्म यांच्याशी जुळणारा सांधा अशा प्रकारचा आहे. आपल्या समाजासमोर सध्या राजकीय एकाधिकारशाही, धार्मिक झोटिंगशाही, आर्थिक लूटमार आणि बौद्धिक बथ्थडशाही यांचं एकत्रित संकट उभं ठाकलेलं आहे. अशा परिस्थितीत खऱ्या अर्थाने लोकांचा अभिक्रम जपणारी, विकेंद्रित, बुद्धिप्रामाण्यवादी, कला आणि साहित्याला उत्तेजन देणारी, चर्चा आणि मतभिन्नतेचं संवर्धन करणारी आणि राजकीय शिक्षण व सामाजिक प्रबोधन करणारी जेवढी म्हणून माध्यमं असतील, त्यांची आपण जोपासना केली पाहिजे.
दिवाळी अंक हे असं सहजस्फूर्त, लोककेंद्री आणि दीर्घ वैचारिक परंपरा असणारं माध्यम आहे. त्यांच्यामध्ये लोकशक्ती जागृत ठेवण्याचं सामर्थ्य आणि संभावना आहे. म्हणून दिवाळी अंकांची भरभराट होईल, त्यांचा विस्तार आणि दर्जा वाढेल आणि कलात्मक आणि सामाजिक जाणीवजागृतीचं काम त्यांच्या हातून अग्रक्रमाने होईल असे प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केले पाहिजेत. त्यातच आपल्या स्वायत्त आणि स्वतंत्र नागरी जीवनाची सार्थकता आहे.
(‘पुण्यभूषण फाउंडेशन’च्या पुरस्कारवितरण कार्यक्रमप्रसंगी पुण्यात २६ फेब्रुवारी रोजी केलेलं भाषण.)