अफाट कर्तृत्वाचं ‘अत्रेपर्व’

ज्येष्ठ साहित्यिक, ‘मराठा’ चे संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाला (१२५व्या) १३ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्तानं त्यांच्या बहुआयामी व्यतमत्त्वाचा वेध...
Pralhad Keshav Atre
Pralhad Keshav Atresakal

ज्येष्ठ साहित्यिक, ‘मराठा’ चे संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाला (१२५व्या) १३ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्तानं त्यांच्या बहुआयामी व्यतमत्त्वाचा वेध...

ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत श्री. म. माटे म्हणत ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते तितका काळ तो जिवंत असतो.’ ही उक्ती लागू पडते ती आचार्य अत्रे यांना. मराठी माणसांच्या बोलण्यात अत्र्यांविषयीचा उल्लेख निघाला नाही असा एकही दिवस जात नाही.

‘अफाट’ या एकाच शब्दात आचार्य अत्रे यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करावं लागेल. चतुरस्र आणि अष्टपैलू हे शब्द थिटे वाटावेत इतके त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण प्रतिभेने विविध साहित्यप्रकारात विपुल साहित्य निर्मिती करुन अत्रे यांनी आपली अमीट नाममुद्रा मराठी साहित्यात उमटवली.

शिक्षक, कवी, गीतकार, विनोदकार, पटकथाकार ,विडंबनकार, नाटककार, वक्ता आणि पत्रकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अजोड ठरली. त्यांनी साहित्याकडे लोकजागृतीचा पाया आणि विनोदाकडे जीवनाच्या युद्धात लढण्याचे प्रभावी शस्त्र म्हणून पाहिले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांनी समृद्ध केलेल्या मराठी विनोद परंपरेला आपल्या खेळकर विनोदातून अत्रेंनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निर्माण झालेली कऱ्हा नदी, पराक्रमाचा पुरुषार्थ सांगणारा पुरंदर किल्ला, सोपानदेवांची वीणा आणि जेजुरीचा खंडोबा अशा सासवड परिसरातील वातावरणात वाढलेल्या अत्र्यांच्या वाट्याला जो ‘भक्ती-शक्ती’ योग आला त्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टींवर मनापासून भक्ती करायची आणि सर्व वाईट गोष्टींचा सर्वशक्तीनिशी सामना करायचा हा संस्कार त्यांच्यावर बालवयातच झाला पाच वर्षाच्या वयातच आजोबांनी त्यांच्याकडून आर्या, दिंड्या भक्तिपदे पाठ करून घेतली.

आजीच्या माहेरी होणार्‍या दत्तजयंतीच्या सोहळ्यातील लळितादी कार्यक्रमातून त्यांच्या मनात काव्यबीज रुजले. मराठी चौथ्या इयत्तेपासून त्यांना वाचनाची आवड लागली ती बक्षीस म्हणून मिळालेल्या ‘बाळाजी विश्‍वनाथ पेशवे’ या चरित्रामुळे. गावाच्या बाहेर असणाऱ्या ख्रिस्ती वाचनालयातील मासिक मनोरंजनातील ‘जुलिया’ या कथेने त्यांना अक्षरशः भारावून टाकले. बालवयातच त्यांच्या मनात साहित्यप्रेम निर्माण झाले.

१९११ मध्ये अत्रे पुण्याला आले व त्यांचे पुढील शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झाले. पुण्यातील तत्कालीन वाङ्‍मय जगताने अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळेच वळण दिले. १९१२ मध्ये राम गणेश गडकरी यांच्याशी अत्र्यांची भेट झाली. या भेटीचा व त्यानंतर गडकर्‍यांशी आलेला संबंधांचा अत्रे यांच्या साहित्यावर बराच प्रभाव पडला.

गडकर्‍यांप्रमाणेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल, ना.वा. टिळक, बालकवी यांच्याशी त्यांचा परिचय झाला. केशवसुत, गोविंदाग्रज व बालकवी यांच्या कवितेने ते झपाटले गेले आणि त्यांच्या हातून काव्यरचना घडली.

‘झेंडूची फुले’ हा अत्रे यांचा अजरामर ठरलेला विडंबन कवितासंग्रह म्हणजे रविकिरण मंडळाची कवितेच्या अंगाने काव्यभाषेत केलेली समीक्षाच आहे. आपल्या असामान्य लेखनकर्तृत्वाने अत्रे यांनी नाटक, काव्य, पाठ्यपुस्तक निर्मिती, व्यक्तिप्रधान लेखन, विनोदी लेखन, विनोदी कथा, कादंबरी, आत्मचरित्र, चरित्र, प्रवासवर्णन, समीक्षा, स्फुटलेखन, संपादन अशा साहित्याच्या सर्वक्षेत्रात अस्सल मराठी वळणाचे सुंदर, प्रासादिक व खुमासदार लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून मान्यता मिळवलीच शिवाय आपल्या निर्मितीने नाटकांत व विनोदात अपूर्व असे मानदंड निर्माण केले.

लेखन करताना अत्रे यांनी काही वेळा मकरंद, केशवकुमार, आनंदकुमार, आत्रेय, घारुअण्णा घोडनदीकर, सत्यहृदय, प्रभाकर, साहित्य फौजदार, वायुपुत्र, काकाकुवा, अस्सल धुळेकर, निकटवर्ती, जमदग्नी, महाराष्ट्र सेवक इत्यादी टोपण नावे वापरली. आधुनिक महाराष्ट्रात इतके विविधांगी कर्तृत्व दाखविणारा दुसरा लेखक सांगणे अतिशय अवघड आहे.

विनोदी लेखक आणि वक्ता म्हणून अत्र्यांना महाराष्ट्रात जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी दुसर्‍या कोणाच्याही वाट्याला आली नाही. ‘विनोद’ हा जसा अत्रे यांच्या लेखणीचा प्राणभूत घटक होता तसाच तो त्यांच्या वाणीचाही होता. त्यांचा विनोद हा पंडिती वा कोटीबाज नाही.मानवी वर्तनातील व स्वभावातील विसंगती टिपणारा, काही वेळा बोचकारणारा, खट्याळ व क्वचित शिवराळही आहे.

परंतु त्यातील ताजेपणा आणि उस्फूर्तता मराठीतील दुसऱ्या कुठल्याच विनोदकारात आढळत नाही. अत्रेंच्या व्यक्तिमत्त्वातील धाडस आणि आक्रमकता यांचा त्यांच्या साहित्यातही आविष्कार घडतो आणि तोच त्यांच्या साहित्याला वेगळेपणा बहाल करतो.

आचार्य अत्रे वीस वर्षे शिक्षणक्षेत्रात रमले. कॅम्प एज्युकेशन सोसायटीला त्यांनी नावारुपाला आणले. ही संस्था अत्र्यांच्या वक्तृत्वाची, नाट्य लेखनाची आणि समाजसेवेची प्रयोगशाळा होती. प्राथमिक शाळेसाठी ‘नवयुग वाचनमाला’ आणि माध्यमिक शाळेसाठी ‘अरुण वाचनमाला’ या दोन मराठी क्रमिक पुस्तकांच्या माला त्यांनी वि.द. घाटे आणि कवी गिरीश यांच्या सहकार्याने लिहिल्या.

महाराष्ट्रातील लक्षावधी मुलांची मराठी भाषा या पुस्तकांनी घडविली. १९३७ मध्ये काँग्रेसचे सभासद झाल्यानंतर पुण्याच्या पूर्व भागातून नगरपालिकेत निवडून गेलेले अत्रे जेव्हा स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा पुण्यातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, जिजामाता बाग, संभाजी पार्क, बस सेवा या सुधारणा त्यांच्या कार्यकाळात झाल्या. रे मार्केटला ‘महात्मा फुले मार्केट’ आणि भांबुर्ड्याला शिवाजीनगर ही नावे त्यांनीच दिले. प्राथमिक शिक्षकांसाठी नगरपालिकेतर्फे त्यांनी ‘गांधी ट्रेनिंग कॉलेज’ काढले.

चित्रपटक्षेत्रातील त्यांची वाटचालही थक्क करणारीच आहे. ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन टॉकिजमध्ये तब्बल बावन्न आठवडे हाऊसफुल्ल चालला. ‘श्यामची आई’ या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक तर '' महात्मा फुले'' या चित्रपटाला रौप्यपदक मिळाले. अत्र्यांनी सतरा मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

किर्लोस्कर देवलांपासून उगम पावलेल्या आणि गडकरी खाडीलकरांच्या काळात शिखरावर पोचलेल्या मराठी रंगभूमीला मूकपट आणि बोलपटाच्या काळात जेव्हा वाईट दिवस आले तेव्हा नट बेकार झाले होते. नाटक कंपन्या बंद पडत होत्या. रसिक नाटकांपासून दूर गेले होते अशा काळात नाटककार अत्रेंनी चोवीस दर्जेदार नाटके लिहून मराठी रंगभूमीला सावरत नवे चैतन्य निर्माण केले.

अच्युतराव कोल्हटकरांना आदर्श मानून पत्रकारिता करताना ‘वाङ्‍मयाच्या मधुर पाकात राजकारण तळून ते वाचकांना द्यावयाचे’ हे अच्युतरावांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य अत्रेंनीही त्यांच्या पत्रकारितेत जपले. ‘नवयुग’ साप्ताहिक व दैनिक ‘मराठा’तील पत्रकारितेमुळे त्यांच्यावर अनेक प्राणांतिक संकटे ओढवली तरीही त्यांनी आपला बाणा सोडला नाही.

साहित्य, राजकारण आणि समाजकारणाच्या ज्या ज्या प्रवाहात अत्रे शिरले, तो तो प्रवाह अत्र्यांनी केवळ गतिमान केला नाही तर त्यांच्या कर्तृत्वाचे असंख्य तरंग त्यांनी त्या प्रवाहात निर्माण केले. एखादा मोठा जलप्रवाह जसा खळाळत अनेक पात्रांतून वाहत राहावा तसे त्यांचे कर्तृत्व समाजजीवनाच्या अनेक पात्रातून खळाळत राहिले. वाहत्या प्रवाहांच्या मार्गात जसे अडथळे येतात तसेच त्यांच्याही मार्गात आले पण ते आपल्या वाक्चातुर्याने, विनोदबुद्धीने आणि धैर्याने दूर करत अत्रे पुढे जात राहिले.

आचार्य अत्रे यांच्यातल्या योद्धा पत्रकाराचे, साहित्यिकाचे आणि वक्त्याचे खरे सामर्थ्य महाराष्ट्राला दिसले ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी गर्जना त्यांनी केली. या काळात त्यांची लेखणी आणि वाणी तलवारीच्या पात्यासारखी धारदार झाली होती.

त्या बळावर १९५५ ते १९६० अशी पाच वर्षे ते दिल्ली सरकारला हादरे देत होते. त्यांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला. त्या काळात अत्र्यांच्या वाग्बाणांनी भले भले पुढारी जखमी झाले. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा विजय जितका महाराष्ट्राचा तितकाच अत्रे नावाच्या झंझावाताचाही होता.

अत्रे पर्वात गाजलेले अत्रे-फडके, अत्रे-माटे आणि अत्रे-भावे वाद यांची चर्चा साहित्य विश्‍वात नेहमीच होत असते. एखाद्याने टीका केली तर त्याकडे दुर्लक्ष करणे हा अत्र्यांचा स्वभाव नव्हता. सामान्य वकुबांच्या माणसांना अत्रेंनी जिथे सोडले नाही तिथे फडके, माटे आणि भावे यांच्या सारख्या त्या काळातल्या दिग्गज प्रतिभावंतांना ते सहजासहजी सोडून देण्याची शक्यताच नव्हती. अत्र्यांच्या वाट्याला त्या काळात रोज येणारे व्यासपीठ या वादाला नवे निमित्त देत होते. या वादातून खिलाडूपणापेक्षाही विडंबनाचेच दर्शन घडले.

आचार्य अत्रे जीवनातील सौंदर्याचे पूजक होते. ‘मी कोण आहे’ या आत्मपर लेखात त्यांनी म्हटले आहे, ‘सद्‍गुणांच्या दाराशी मी जन्मभर माधुकरी मागितली. गुणांची पूजा करताना एक काळजी घ्यावी. विभूतीपूजक होऊ नये. माझ्यामध्ये तो दोष आहे. मी मूर्तिपूजक आहे आणि मूर्तिभंजकही आहे. सदैव ज्यांची पूजा करता येईल असे देव माणसांच्या जगात नसतात असे नाही पण थोडे असतात''.

पुलंची ‘बटाट्याची चाळ’ पाहून आणि शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’ वाचून अग्रलेखात त्यांचे तोंडभरून कौतुक करणारे अत्रे गुणग्राहक तर होतेच पण दुसर्‍यांच्या चांगल्या गुणांचे मुक्त कंठाने कौतुक करण्यासाठीचा मनाचा मोठेपणाही त्यांच्याकडे होता. त्यांच्या कौतुकाची थाप ज्यांच्या पाठीवर पडली त्यांच्या आयुष्याचे सोने झाले.

आचार्य अत्रे हे साहित्याच्या आणि वक्तृत्वाच्या नभांगणातील लखलखते नक्षत्र होते. वक्तृत्वाच्या रणांगणावर पराक्रम करण्यासाठीची सारी आयुधे त्यांच्याकडे होती. त्या आयुधांचा त्या त्या प्रसंगी वापर करण्यात ते वाकबगार होते. त्यांच्या विनोदाने आणि वक्तृत्वाने महाराष्ट्राला केवळ हसविले नाही तर रसरशीत जीवनदृष्टी आणि सौदर्यदृष्टी दिली.

मराठीच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. कोतेपणाच्या चौकटीतून बाहेर पडायला शिकविले. दुसर्‍याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करण्यासाठीची गुणग्राहकता आणि उदारमनस्कता दिली. जीवनाच्या लढाईत हेतुपुरस्सर अडथळ्यांचे डोंगर उभे करणार्‍यांशी दोन हात करण्याचे धारिष्ट्य दिले.

आपल्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन जर कोणी आपल्या प्रांतिक आणि भाषिक अस्मितेची विटंबना करणार असेल तर त्यांना धडा शिकविण्यासाठी रणशिंग कसे फुंकायचे याचा वस्तुपाठ अत्र्यांनी घालून दिला. जीवनाचे कोणतेही क्षेत्र माणसांनी त्याज्य मानता कामा नये हा संस्कार केला.

विसाव्या शतकातल्या पहिल्या पन्नास वर्षावर आपल्या विविधांगी अफाट कर्तृत्वाची मुद्रा उमटवीत ‘आचार्य अत्रे पर्व’ निर्माण करणारा हा महान साहित्यकार १३ जून १९६९ रोजी काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्राचे वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांनी लिहिले होते.

सर्वांगाने भोगी जीवन

परि ज्याच्या उरी विरक्ती

साधुत्वाचा गेला पूजक

कलली, खचली, श्री शिवशक्ती

एखाद्याचे तोंडभरून कौतुक करताना प्रसंगी अतिशयोक्तीचा वापर करून आचार्य अत्रे म्हणत ‘गेल्या दहा हजार वर्षात अशी गोष्ट झाली नाही.’ आचार्य अत्रे यांच्याबाबतीत प्रामाणिकपणे असेच म्हणावे लागेल,'' दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही.''

( लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com