परिवर्तनाची पालखी मिरवणारी कविता

या देशानं मला ‘एक कायम पत्ता, पिनकोड नंबर दिलाय' देशाच्या कुठल्याही भागातून त्यावर टाकलेलं पत्र पोस्टमन मला आणून देतो'.
book mullyatrayichi kavita
book mullyatrayichi kavitasakal
Summary

या देशानं मला ‘एक कायम पत्ता, पिनकोड नंबर दिलाय' देशाच्या कुठल्याही भागातून त्यावर टाकलेलं पत्र पोस्टमन मला आणून देतो'.

या देशानं मला ‘एक कायम पत्ता, पिनकोड नंबर दिलाय' देशाच्या कुठल्याही भागातून त्यावर टाकलेलं पत्र पोस्टमन मला आणून देतो' या देशानं मला एक फोन नंबर, एसटीडी कोड दिलाय ‘देशाच्या कुठल्याही भागातून लावा माझ्या फोनची घंटा वाजते ’ या देशानं मला एक ‘सहनशीलता, सहिष्णुता'' एक भेकडपणा दिलाय कोणी कुणावर वा माझ्यावर 'कितीही जुलूम करा' मी भांडायला नाही उठत (पृ. १०६) ही कविता आहे विश्‍वास वसेकर यांच्या "मूल्यत्रयीच्या कविता'' या कविता संग्रहातली, आजच्या जळजळीत वास्तवावर बोट ठेवणारी, सामान्य माणसांचे अतिसामान्य झालेले जगणे अधोरेखित करणारी, भिजलेल्या संवेदनांचे दुःख मांडणारी, लोकशाहीचा विजय झाला असला तरी माणुसकीचा पराभव आहे हे बजावणारी !

१९८० नंतरच्या ठळकपणे पुढे येणाऱ्या मराठी कवींमध्ये विश्‍वास वसेकरांचे नाव आवर्जून घेतलं जातं. ललितगद्य, समीक्षा, कादंबरी, अनुवाद, संपादन, कोशवाङ्‌मय, बालसाहित्य अशा साहित्याच्या विविध प्रांतात त्यांची मुशाफिरी घडली असली तरी त्यांचं पहिलं प्रेम कवितेवरच आहे. कोरस, काळा गुलाब, पैगाम, शरसंधान, पोर्ट्रेट पोएम्स आणि अनवट हे त्यांचे कवितासंग्रह याआधी प्रसिद्ध झाले आहेत. हा त्यांचा नववा कवितासंग्रह आहे. जगण्यातल्या सत्याला थेट भिडणारी कविता या कवितासंग्रहात भेटते.

पुरोगामित्वाचा कितीही आव आणला तरी मनातली जात नावाची गोष्ट जात नाही. निधर्मीपणाच्या बुरख्याआड धर्माचीच सत्ता राजरोस पुन्हा सुरू असते. ज्या देशात हजार रुपयांत मत विकत घेता येते त्या देशातल्या राज्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून कोणती अपेक्षा बाळगायची ? अशी घालमेल कवीच्या मनात आहे. सत्तेवर येणारे पक्ष बदलले तरी सामान्य माणसाच्या जगण्यात काडीचाही फरक होणार नाही. रोजच्या जगण्यातले प्रश्‍नचिन्ह कायम राहणार आहे, असे ही कविता बजावते.

थेट राजकीय वास्तवाला सामोरी जाणारी कविता या कवितासंग्रहात जागोजागी सापडते. राजकीय वास्तवाचा सामाजिक आणि सांस्कृतिक आशय निर्भीडपणे व्यक्त करण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे. वसेकरांच्या कवितेला मखमली गालिच्यांच्या पायघडीची ओढ नाही. जगण्याच्या काट्याकुट्यातून आयुष्य बांधताना रक्ताळलेल्या, जखमाळलेल्या पायांना दिलासा देणाऱ्या जमिनीचेही त्यांना अप्रूप वाटते. तिच्याविषयीचा कृतज्ञभाव वसेकरांची कविता व्यक्त करते.

वसेकरांची कविता परिवर्तनाची पालखी दिमाखात मिरवणारी आहे. पण ज्या परिवर्तनाच्या अजान वृक्षाची मुळे ज्ञानेश्‍वर, बुद्ध, कबीर यांच्या विचारधारेतून प्रकटली आहेत त्यावर श्रद्धा ठेवणारी आणि त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीतील प्रत्येकाची जबाबदारी वाढती आहे, याची जाणीव करून देणारी ही कविता आहे. आदर्शांचे पुतळे उभे करून त्यांचे विचार विसरून जाण्याची सोयीस्कर मानसिकता स्वीकारलेल्या दांभिक समाजाविषयीची चीड त्यांच्या कवितेतून व्यक्त होते.

सडेतोड असणारी वसेकरांची कविता कुठेही शब्दबंबाळ नाही. ऊर बडवणारी नाही. पुरेशा अर्थगांभीर्यासह आशयाला प्राधान्य देणारी आहे. कधी कधी या कवितेला पोर्ट्रेटचा मोह पडतोय. दलाईलामा यांच्यापासून ते आशापर्यंत अनेकांचे पोर्ट्रेटही ती काढते. भाडेकरूपासून ते चिद्विलासापर्यंत, कलावादापासून ते पसायदानापर्यंत अनेक विषयांना कवेत घेणारी अशी ही कविता आहे. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांची विवेचक प्रस्तावना या संग्रहाला आहे.

पुस्तकाचं नाव : मूल्यत्रयीची कविता

कवी : विश्‍वास वसेकर

प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे, ०२० २४४९७३४३

पृष्ठं : १७६. मूल्य : २०० रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com