पुस्तकं जगण्याचा भागच...

पुस्तकं जगण्याचा भागच...

पुस्तक वाचण्याची आवड मला खरं तर सातवीपासून लागली. तेव्हा शालेय वयात मी पुस्तकांकडं ओढला गेलो, याचं कारण माझे वडील. त्यांचा स्वतःचा असा मोठा पुस्तक संग्रह होता. जवळपास पंधराशे पुस्तक त्यांच्याजवळ होती.

अर्थात त्यात कथा, कादंबऱ्या याचं प्रमाण अल्प होतं. आत्मकथनं आणि चळवळीवरची किंवा गंभीर, चिंतनात्मक अशा पुस्तकाचा भाग जास्त होता. मात्र त्यामुळं माझी त्यावेळीच उपरा, उचल्या, अक्करमाशी ही पुस्तक वाचून झाली होती. मी नंतरही वाचत होतो. 

पुढं मी जेव्हा महाविद्यालयीन पातळीवर नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो तेव्हा आम्ही तिघा मित्रांनी असं पक्कं ठरवलं होतं की दुसरं कुठलंही नाटक किंवा एकांकिका आपण करायची नाही, तर आपण स्वतः लिहिलेली एकांकिका किंवा नाटकच सादर करायची. त्यामुळं माझे दोन मित्र आणि मी असे आम्ही तिघंही खूप वाचन करायला लागलो त्याच काळात मला जी. ए. कुलकर्णी, अरविंद गोखले, शं. ना. नवरे आणि राजन खान यांच्या साहित्यानं प्रभावित केलं. त्यातही जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्यानं माझ्यावर प्रभाव टाकला त्यांच्या लेखनाची ताकदच अशी होती की मी जेव्हा जेव्हा ते वाचत असे त्यावेळी मला त्यातला नवा, नवा अर्थ गवसत असे. राजन खान हे माझे असेच अत्यंत आवडते लेखक आहेत. राजन खान यांच्या ‘रस- अनौरस कादंबरीनं मला अक्षरशः झपाटून टाकलं होतं. मला मृत्युंजयनंदेखील प्रभावित केलं. रमेश इंगळे-उत्राळकर यांच्या ‘निशाणी डावा अंगठा’ या पुस्तकाचा माझ्यावर अनेक दिवस प्रभाव होता. 

नाटक आपणच लिहायचं या उर्मीनं आम्ही ‘एनबीटी’ची पुस्तकं जास्त बघायला लागलो. ‘एनबीटी’च्या म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकांमुळं देशातील विविध भाषांतलं चांगलं साहित्य मराठीत येत असतं. ती पुस्तक वाचून आम्ही नाटक लिहायचो किंवा एकांकिका सादर करायचो. आसामी, उर्दू भाषेतील चांगलं साहित्य या पुस्तकामुळं माझ्या वाचनात आलं.  पुढं मी ‘एनएसडी’ म्हणजे ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेत प्रवेश घेतल्यावर इंग्लिश आणि हिंदी पुस्तकांचं वाचन वाढलं. त्याआधी मी इंग्लिश पुस्तक वाचत नव्हतो असं नाही. माझे वडील ‘एमए’ इंग्लिश असल्यानं त्यांच्यामुळं मला इंग्लिश साहित्याची गोडी त्याआधीच लागली होती. पण ‘एनएसडी’ मुळं हिंदी पुस्तकाचंही माझं वाचन वाढलं. हिंदीतले भवानीप्रसाद मिश्र आणि सुरेद्र वर्मा हे साहित्यिक माझे आवडते आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुस्तकं आपल्याला प्रभावित करतात यात शंका नाही. आपला कुणीही अपमान केला तर आपण लगेच प्रत्युत्तर देतो माझ्याबाबतीत असा कोणी अपमान केला तर हल्ली मी लगेच प्रतिक्रिया देत नाही, ही जी शांतता माझ्यात आलीय ती केवळ पुस्तकांमुळं. माझं वाचन वाढलं तसंतसं माझी सहनशक्ती वाढली आणि जीवनाकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलला. 

वाचन किंवा पुस्तकांचं माझ्या आयुष्यातलं स्थानं सांगायचं झालं तर मी इतकंच सांगेन की ती माझ्या जगण्याचा भाग आहेत. त्यांच्याशिवाय माझं आयुष्य हा विचारच मी करू शकत नाही. मी कामाच्या निमित्तानं मुंबईत असतो त्यामुळं तिथलं घर, माझं मूळ घर नगरमध्ये आहे आणि गावाकडं घर आहे अशा तिन्ही घरात माझ्याकडं पुस्तक आहेत. माझी संपत्ती तीच आहे. 

माझ्या गाडीतही पुस्तक असतात, मी जेव्हा शुटींग नसतं, तेव्हा मुंबईत असलो तर मॅजेस्टिकच ग्रंथदालन आणि ‘क्रॉसवर्ड’ या इंग्लिश पुस्तकांच्या दुकानात आवर्जून जातो. तिथं जाऊन बरीच पुस्तक चाळणं हा माझा ठरलेला कार्यक्रम असतो, काहीवेळा माझं तिथंच एखादं पुस्तक वाचून होतं. मग बाहेर पडताना पुस्तकांची खरेदी ठरलेली असते. 

मध्यंतरी लॉकडाऊनच्या कालावधीत मी बरीच पुस्तक वाचून काढली, बऱ्याचवेळा पुस्तक खरेदी केली जातात, पण ती फुरसतीनं वाचली जात नाहीत, मात्र लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक इंग्लिश पुस्तक मी वाचून काढली. त्याचबरोबर ऋषिकेश गुप्ते यांचं ‘दंशकाल’ वाचलं ते मला फारच आवडलं. मी जरी मालिकांमध्ये काम करत असलो तरी माझ्या घरात दूरचित्रवाणीसंच नाही. त्यामुळं घरातला माझा वेळ, माझी माणसं आणि पुस्तक वाचन यासाठीच राखून ठेवलेला असतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com