

Actor Milind Shinde Journey
esakal
डॉ. मिलिंद शिंदे
‘कसलं नशीब ओ...? तुम्हाला माहिती आहे का, या माणसानं किती कष्ट केलेत ते... हा काय खातो, कुठे राहतो तुम्हाला माहितेय का? याचा बाप याच्याशी बोलत नाही. नशीब असतं तर हे सगळं फार आधीच व्हायला पाहिजे होतं ना... एकदम सगळं सोप्पं सोप्पं... नशीब नाही... त्याचे कष्ट आहेत.
पुन्हा तेच वाक्य हॉलमध्ये घुमलं
म्हणजे मला म्हणायचंय की, मिलिंद शिंदे जो रोल करतोय दगडोबा साळुंकेचा, तो तो वाटत नाहीये. तो मिलिंद शिंदेच वाटतोय... अंतराय उभा राहिला, शांतता पांघरून...
मला सगळ्यांच्या हालचाली स्लो-मोशनमध्ये दिसू लागल्या. मागच्या दोन अडीच महिन्यांचा सगळा प्रवास मोन्टाजसारखा समोर सरकू लागला. सगळं एकदम थांबल्यासारखं वाटू लागलं.
‘चला उद्या भेटूया.’ तालीम संपल्याची घोषणा झाली. सगळे आपापल्या सॅक घेऊन निघू लागले. मला माझ्या सॅकसकट सगळंच रिकामं वाटू लागलं. शांतता अंगावर धावून येत होती. आता फक्त चपलांचे-बुटांचे आवाज. लिफ्ट आल्याचा, दार ओढल्याचा, दार बंद केल्याचा... सगळे आवाज मोठे वाटू लागले. ‘चला बाऽय, चला’ असे पुसटसे आवाज, कधी हवेत विरले समजलंच नाही. कुणीतरी आपल्या दोन्ही दंडांना धरावं आणि आपल्याला जोरजोरात हलवावं तसं वाटलं. खाड्कन बाहेर आलो, मार्ग काढला पाहिजे. प्रयोग दोन-तीन दिवसांतच आहे. आज बसनं जायचं नाही, असं ठरवलं आणि दादर स्टेशनवर गेलो. गाडी (लोकल) पकडायची काही इच्छा होईना.