

Marathi Literature
esakal
प्रणव सखदेव
एका मित्राचा २७ फेब्रुवारीला म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाला फोन आला. म्हणाला, ‘पुण्यात तो पुस्तक महोत्सव चांगला जोरदार झाला म्हणे. तुझे आणि इतरांचे भरपूर फोटो पाहिले.’
मी म्हणालो, ‘‘अरे, चांगला प्रतिसाद होता लोकांचा आणि दरवर्षी तो वाढतानाच दिसतोय.’’
त्याने खोचकपणे विचारलं, ‘‘पण लोक नुसते फोटो काढत होते की खरेदीही करत होते?’’
मला जरा रागच आला. त्याच्या तोंडावर विक्रीचे आकडे फेकून मारावेसे वाटत होते, पण मी शांतपणे म्हणालो, ‘‘अरे बाबा, सारखं विक्रीकडे पाहायचं नसतं, असं तूच तर म्हणतोस ना! आणि फोटोंचंच म्हणशील तर टूथपेस्ट किंवा बिस्किटं असं कोणतंही उत्पादन घे... तुला ते जाहिरातीमधून कितीदा दिसत राहतं. त्या तुलनेत पुस्तक हे उत्पादन कितीदा दिसतं? शून्य वेळा! त्यामुळे समजा लोक नुसते फोटो काढून पोस्ट करत असतील, तरी चांगलंच आहे की. पुस्तक हॅमर तर होतंय त्याने.’’
थोडं थांबून त्याने विचारलं, ‘‘एक सांग, पण खरंच लोक नव्या लेखकांचं साहित्य वाचतात का रे? की तेच जुनं – व. पु. काळे, पु.ल., खांडेकर-देसाई-सावंत, शिरवळकर इत्यादी. गेलाबाजार नेमाडे.’’
मी म्हणालो, ‘‘डेटा कुणाकडेच नसल्यामुळे ठोस काही सांगता येणार नाही. पण पुस्तकविक्रीचे साधारण आकडे पाहिले तर वाचकांचा कल अजूनही जुन्या लेखकांकडे जास्त आहे हे खरं, पण गेल्या काही वर्षांत नवे लेखक तयार झाले आहेत. ते आपापल्या परीने काम करत आहेत.’’