कलाविष्काराबरोबर शास्त्रही बदलायला हवं! (मीनाक्षी गुरव)

minakshi gurav
minakshi gurav

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यानिमित्त भारतीय अभिजात संगीताविषयी आणि स्वतःच्या संगीतप्रवासाविषयी त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत...

"काळानुसार संगीतसुद्धा झपाट्यानं बदलत आहे. संगीताचं प्रस्तुतीकरण बदलत आहे; परंतु शास्त्र तिथंच आहे. प्राचीन ग्रंथांमधलंच शास्त्र आम्ही शिकवतो. प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचा मिलाफ हवा, तो दिसत नाही. कलाकार एकाच ठिकाणी स्थिर राहिला तर त्याची कला टिकणार नाही. काळानुरूप येणारे आघात पचवूनच कलाकारानं पुढं गेलं पाहिजे. शास्त्रानं बांध घालून कलेला अडवू नये, तर शास्त्रानं कलेबरोबर वाहत गेलं पाहिजे. शास्त्रानं मार्ग दाखवण्याचं काम करावं. अभिजात संगीत, शास्त्रीय संगीत हे राग आणि ताल या संकल्पनेवर आधारलेलं आहे. या संकल्पना जगातल्या कोणत्याही संगीतात नाहीत. धून विकसित होऊन राग हाती आला आणि लयीचं तालात रूपांतर झालं. त्यामुळे आपल्याकडचं कोणतंही संगीत घेतलं तरी त्यात राग-ताल डोकावतोच. संगीत हे वैश्‍विक असलं तरीही ते संस्कृतिनिष्ठ आहे. भारतीय संगीतातून आपली संस्कृती व्यक्त होत असते. रागाचं सौंदर्य, त्याचा सांगीतिक अर्थ हे शास्त्रीय संगीतात सांगायचं असतं. चित्रपटसंगीतात रागाचं अस्तित्व असलंच पाहिजे, असं नाही. तिथं शब्द, धून, प्रसंग महत्त्वाचा असतो. त्याचा परिणाम वेगळा असतो; पण शास्त्रीय संगीत हे अमूर्त आहे. त्या अमूर्ताला मूर्त करताना तो कलाकार काय काय करत असतो, ते फक्त त्या कलाकारालाच माहीत असतं...''

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे भारतीय अभिजात संगीताविषयीचं त्यांचं चिंतन-मंथन उलगडत होत्या...
निमित्त होतं प्रभाताईंना नुकत्याच जाहीर झालेल्या पुण्यभूषण पुरस्काराचं. "पुण्यभूषण फाउंडेशन'तर्फे हा पुरस्कार येत्या 19 एप्रिल रोजी त्यांना प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.
प्रभाताईंच्या घरी संगीताचं कसलंच वातावरण नव्हतं की त्यांना कुठलाही सांगीतिक वारसाही नव्हता. गुरुवर्य सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांचा अवघ्या सहा-सात वर्षांचा सांगीतिक सहवास त्यांना लाभला. त्यानंतर त्यांनी एकलव्याच्या निष्ठेनं संगीतसाधना सुरू ठेवली आणि याच शिदोरीवर भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात त्यांनी पदार्पण केलं. विज्ञानाच्या आणि कायद्याच्या पदवीधर असलेल्या प्रभाताईंनी संगीतात "डॉक्‍टरेट' केली.
सांगीतिक अमूर्ततेचा अनोखा परिणाम...संगीतसौंदर्याचा परमोच्च बिंदू...संगीतकलेचा नावीन्यपूर्ण आविष्कार, भावनेनं ओथंबलेली अभिनव सरगम...हे सगळं म्हटलं की आपसूकच प्रभाताईंचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक मंडळींच्या पश्‍चात किराणा घराण्याची परंपरा तितक्‍याच समर्थपणे सांभाळत ती पुढं नेण्याची जबाबदारी प्रभाताई पार पाडत आहेत.

संगीतविषयक चिंतनाचा धागा पुढं नेत प्रभाताई म्हणाल्या ः ""एखादा राग विशिष्ट वेळीच गायला हवा, विशिष्ट प्रहरीच गायला हवा, अशी पूर्वापार रूढी आहे. या संकल्पनेला "रागसमय' असं म्हटलं जातं. मात्र, "वेळे'तून रागाची सुटका करायला हवी. त्या दिशेनं प्रयत्न व्हायला हवेत. रागाचं सौंदर्य चांगल्या पद्धतीनं खुलवलं जात आहे की नाही, तसंच राग चांगल्या प्रकारे मांडला जात आहे की नाही, हाच मुख्य निकष असायला हवा. राग ही संकल्पना अमूर्त असल्यामुळे त्याला मूर्त करण्याचे प्रयत्न झाले. "रागसमय', "रागरस', "ध्यान', "देवता', "रंग' या संकल्पना कलाकाराला आधार मिळावा म्हणून अस्तित्वात आल्या. रागरस ही संकल्पना मान्य केली, तर मी एखादा राग श्रोत्यांसमोर मांडला, तर सगळ्या श्रोत्यांना त्या एकाच रसाची अनुभूती व्हायला हवी ना! पण प्रत्यक्षात तसं होत नाही. राग बागेश्री म्हटलं की सगळ्यांना विरह जाणवायला हवा; पण तो विरह जाणवतो का? मग "रागरस' ही कल्पना कशाला ठेवायची? भाव असल्याशिवाय कोणतीही कला असू शकत नाही हे मान्य; परंतु रागातून, सादरीकरणातून विशिष्ट भावाच्या अनुभूतीचा आग्रह धरू नये. संगीत म्हणजे आनंदरस आहे. हा आनंदरस श्रोत्यापर्यंत पोचला तर तो कलाकार यशस्वी झाला असं समजावं.''

प्रभाताई म्हणाल्या ः ""संगीतक्षेत्रात गुरू शोधणं, आपल्याला हवा तसा गुरू मिळणं हे फार कठीण असतं. माझ्या वडिलांचे मित्र वैद्य देशपांडे आमच्या घरी यायचे. त्यांनी माझं गाणं कधीतरी ऐकलं. "ही चांगली गाते. हिला चांगल्या गुरूंकडं पाठवा,' असं त्यांनी वडिलांना सुचवलं आणि सुरेशबाबू माने यांच्याकडं माझी संगीतसाधना सुरू झाली. सुरेशबाबूंचा अवघ्या सहा वर्षांचा सांगीतिक सहवास मला लाभला. त्यानंतर केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या निमित्तानं हिराबाई बडोदेकर यांच्याकडं शिकण्याची संधी मिळाली. त्या दोन वर्षांच्या कालावधीत हिराबाईंसमवेत मला भारतभर दौरे करण्याची संधी मिळाली. सुरेशबाबू यांच्यासमोर बसून, तर हिराबाईंच्या पाठीमागं बसून (मैफलीत त्यांना स्वरसाथ करताना) खूप काही शिकायला मिळालं...''

"आमच्या घरात शिक्षणाची मोठी परंपरा आहे. संगीतात मात्र तशी कुणालाच रुची नव्हती. अगदी अपघातानंच संगीत आमच्या घरात आलं. माझं गायन श्रोत्यांना आवडायला लागलं आणि त्यांची वाहवा मिळत गेली, म्हणूनच माझं गाणं पुढं सुरू राहिलं. जोपर्यंत श्रोता कलाकाराला स्वीकारत नाही, तोपर्यंत कलाकार पुढं जाऊ शकत नाही. मग ते गाणं असो की अन्य कुठली कला. श्रोत्यांची साथ मिळाल्यानंच मी इथपर्यंत येऊन पोचले,'' गानरसिकांविषयी, श्रोत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून प्रभाताई म्हणाल्या ः "" मात्र, आता काळानुरूप मैफलींचं स्वरूप बदलत चाललं आहे. गायक-कलाकार आणि श्रोत्यांमधला संवाद यांत काहीसं अंतर पडत चाललं आहे. पूर्वीच्या काळी एकाच कलाकाराची मैफल रंगायची. दोन-तीन तासच नव्हे, तर रात्रभर ही स्वरमैफल सुरू असायची. संगीताची पार्श्‍वभूमी असणारे, संगीताचं ज्ञान असणारे जाणकार श्रोते त्या काळी होते. आता जीवनशैलीत, विचारसरणीत बदल झाला आहे. आज मैफलीत हजारो श्रोते समोर असतात. टाळ्या कानावर पडल्या की त्यांचं अस्तित्व जाणवतं! कलाविष्कार सादर करताना कलाकार आणि श्रोते यांच्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद आवश्‍यक असतो. मात्र, आता तसं शक्‍य होत नाही. या संवादाला भारतीय संगीतात विशेष महत्त्व आहे. श्रोता हा कलाकाराला प्रोत्साहित करत असतो, त्यातूनच चांगल्या कलाकृतीची निर्मिती होते.''

"कलाकाराला आपला व्यवसाय सुरू ठेवायचा असतो, त्यामुळे त्याला काही तडजोडीही कराव्या लागतात. अर्थात, सगळेच कलाकार ही तडजोड करतात असंही नाही. आता मैफलीत येणाऱ्या श्रोत्यांच्या कानावर अनेक प्रकारचं संगीत पडलेलं असतं; विशेषत: चित्रपटसंगीतानं श्रोत्यांचे कान तयार झालेले असतात. शब्द, ठेका, आवाज या बाबी श्रोते अपेक्षित धरत असतात आणि हे शास्त्रीय संगीतात होत नाही. शास्त्रीय संगीत ही अत्यंत संयमानं ऐकण्याची, अनुभूती घेत घेत ऐकण्याची कला आहे. अलीकडच्या श्रोत्यांमध्ये असा संयम नाहीच असं नाही; पण तो फरक कुठंतरी मनातल्या मनात त्यांच्याही नकळत त्यांच्याकडून केला जात असतो.
अलीकडच्या काळात संगीत हे "व्हिज्युअल आर्ट' झालं आहे. एकेकाळी संगीत हे केवळ कानांनी ऐकलं जायचं; मग तो कलाकार दिसायला कसाही असला तरी चालायचं. मात्र, आता तो कलाकार दिसायलाही चांगला असला पाहिजे! आजच्या मैफलीत "केवळ गाणं' राहिलेलं नाही, इतरही अनेक गोष्टी तीत शिरल्या आहेत,'' अलीकडच्या संगीतमैफलींविषयी, संगीतसादरीकरणाच्या बदललेल्या शैलींविषयी, परिस्थितीविषयी प्रभाताईंनी त्यांची निरीक्षणं नोंदवली.

""संगीतक्षेत्रातलं कोणतंही शोधकार्य हे संगीताचं प्रकटीकरण, प्रस्तुतीकरण समृद्ध करणारं हवं,''
असं आग्रहपूर्वक प्रतिपादन करून प्रभाताई म्हणाल्या ः ""आजचा श्रोता संगीतापासून तुटलेला नाही; पण
पूर्वीच्या इतकी लांब पल्ल्याची त्याची वाटचाल आता होऊ शकते का? वेगवेगळ्या "रिऍलिटी शोज्‌'मध्ये आज खूप चांगली मुलं येत आहेत. या मुलांमध्ये खूप "टॅलेंट' दडलेलं आहे. अशी मुलं अभिजात संगीताकडं वळली तर किती चांगलं होईल. इतक्‍या लहान वयातही ही मुलं अतिशय समजुतीनं गातात. त्यांच्या त्या "समजुतीनं गाण्याचं' कौतुक वाटतं. मात्र, त्या "रिऍलिटी शोज्‌'नंतर त्यातली बहुतांश मुलं पुढं कुठं दिसत नाहीत. हे असं व्हायला नको. अपेक्षित असलेलं काही मिळालं नाही तरी या मुलांनी संगीताची साधना करताना संयम ठेवायला हवा, त्यागाची तयारी ठेवायला हवी. आजकाल कलासाधकांसमोर अनेक प्रकारची प्रलोभनं आहेत. त्यातून पुढं कसं जाता येईल, हे या नव्या कलाकारांनी पाहायला हवं. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातल्या उपलब्ध सुविधांचा आधार घेत आजच्या कलाकारांनी कला पुढं नेली पाहिजे. आपली वेगळी "आयडेंटिटी' निर्माण करणं महत्त्वाचं आहे. स्वतःच्या कलेचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं आणि ते टिकवणं हे महत्त्वाचं आहे.'' नव्या कलाविष्कारांविषयीच्या कालसुसंगत अपेक्षा प्रभाताईंनी व्यक्त केल्या.

पुन्हा संगीतविषयक चिंतनाकडं वळत प्रभाताई म्हणाल्या ः ""आंब्याचं झाड लावलं की ते कसं वाढेल, हे ते लावणाऱ्याला माहीत नसतं. वाढणाऱ्या आंब्याच्या झाडाचं प्रत्येक पानं हे वेगळं असतं, तसंच संगीताचंही आहे. यमन रागाचं उदाहरण घेतलं, तर तो राग मी गायला किंवा आणखी कुणी गायला तर त्यातलं सौंदर्य त्या त्या व्यक्तीनुरूप खुलत किंवा बदलत जातं. राग तोच असतो; पण प्रत्येक कलाकार त्याच्या क्षमतेनुसार, त्यातून नवीन मार्ग शोधत असतो. संगीत समजून ऐकणं हीसुद्धा एक कला आहे. जाणकार श्रोत्यांची संख्या कमी आहे, याचं वाईट वाटतं. जाणकार श्रोते घडवण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न केले पाहिजेत. मुख्य म्हणजे शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवर संगीतसाक्षरता होणं आवश्‍यक आहे. कला पुढं नेण्याचं काम कलाकार एकटा करू शकत नाही. सांस्कृतिक धोरण आखताना कलाकारांना आवर्जून बोलावलं जातं. त्यांच्याकडून सूचना मागवल्या जातात; परंतु पुढं काहीच होताना दिसत नाही. चित्रपटसंगीताप्रमाणे अभिजात संगीतालाही "एक्‍स्पोजर' मिळायला हवं. शास्त्रीय संगीताचा अभ्यासक्रम आखायला हवा. त्यातून केवळ कलाकाराच नव्हे, तर चांगले श्रोतेही घडतील.''

आपल्या संगीतविषयक आवडींबाबत प्रभाताई म्हणाल्या ः ""मी सर्व प्रकारचं संगीत ऐकते. भारतातलं आणि भारताबाहरेचंसुद्धा. सगळ्यांचं गाणं ऐकते. प्रत्येकात काही ना काही चांगलं असतंच. मी ते शोधण्याचा सातत्यानं प्रयत्न करते. कर्नाटक, पर्शियन संगीतही मला खूप आवडतं. चांगला श्रोता असणं महत्त्वाचं. उत्तम श्रोता हाच उत्तम कलाकारही होऊ शकतो. सुरांची कट्यार श्रोत्यांच्या काळजात घुसायला हवी...!''

हा पुरस्कार म्हणजे "माहेरचा आहेर' !
"आपल्या कामाची दखल घेतली गेली की, कामाचं कौतुक झालं की छानच वाटतं ना! आणि ते आवश्‍यकही असतं. कलाकार साधना करत असतो आणि ती लोकांपर्यंत पोचवत असतो. हा पुरस्कार मला माझ्या जन्मगावी मिळतोय. हा माझ्या "माहेरचा आहेर' आहे. बाहेर कितीही कौतुक झालं, तरी घरच्या लोकांनी कौतुक करावं, असं नेहमीच वाटतं असतं...''
पुण्यभूषण पुरस्काराबद्दलचा आनंद प्रभाताई अत्रे यांनी या शब्दांत व्यक्त केला.

..."असे' क्षण अगदी मोजकेच!
""कलाकार नेहमी अतृप्त, असमाधानीच असायला हवा. संगीतशिक्षणावर आणि साधनेवर आधारित असं स्वरलयीचं आम्ही कलाकार मैफलीत करत असतो. अशा वेळी चिंतन, संयम कामाला येतो. कधी कधी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं सादर होतं अन्‌ "वाह...वाह...अहाहा' अशी उत्स्फूर्त दाद मनातून स्वत:साठीच निघते! तो क्षण काही औरच असतो. कलाकाराला त्यानं केलेल्या कलेच्या सादरीकरणाचं समाधान खऱ्या अर्थानं अशा वेळीच मिळतं असतं; पण स्वतःच्या गाण्याला स्वतःचीच दाद मिळण्याचे असे क्षण अगदी मोजकेच असतात...'' प्रभाताईंनी अथांग स्वरसागरातला एक मोती असा हळूच समोर ठेवला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com