वनवासी ते भाग्यवान

मीरा-भाईंदरला सचिन जाधव या मित्राच्या लग्नाला मी गेलो होतो. लग्न लागले, आम्हा सर्वांची जेवणं आटोपली.
mira bhayandar story forest dwellers are lucky
mira bhayandar story forest dwellers are luckySakal

मीरा-भाईंदरला सचिन जाधव या मित्राच्या लग्नाला मी गेलो होतो. लग्न लागले, आम्हा सर्वांची जेवणं आटोपली. लग्नमंडपाच्या सुरुवातीला दोन वृद्ध जोडपी आम्हाला आत सोडा म्हणून आग्रह धरत होती. त्यांच्याकडं बघून वाटत नव्हतं की, ते भिकारी असतील म्हणून. मी त्या वॉचमनला विचारलं, ‘‘काय झालं ?’’ तो म्हणाला, ‘‘काही नाही.

हे आजी- आजोबा दरवेळी इथं लग्न असलं की उरलेलं अन्न द्या... जेवायला द्या... असं म्हणत इथं येतात.’’ मग मी म्हणालो, ‘‘सोडा ना मग त्यांना आतमध्ये, काय झालं.’’ तो वॉचमन म्हणाला, ‘‘सोडायला काही नाही, आतमध्ये व्यवस्थापक ओरडतो.’’ मी त्या वॉचमनला म्हणालो, ‘‘अरे हो बाजूला. माझ्या घरचं लग्न आहे. म्हाताऱ्या माणसांना अशी वागणूक देतोस का?’’ मी त्या चारही जणांना घेऊन आतमध्ये गेलो. त्यांना जेवू घातलं.

जेवण झाल्यावर हे चौघे जण शांतपणे खुर्चीवर बसले. मी त्या दोन आजोबांपैकी एकाला विचारलं, ‘‘तुम्ही कुठं राहता?’’ ते म्हणाले, ‘‘इथं जवळच वनवासी चाळ आहे तिथं राहतो.’’ मीही एका खुर्चीवर त्या आजोबांच्या बाजूला बसलो. मी प्रश्न विचारत होतो, ते दोन्ही आजोबा उत्तरे देत होते. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही आजी बोलायला लागल्या आणि त्यानंतर दोन्ही आजोबा एकदम शांत होते.

ती माणसं इतकी सज्जन आणि चांगली होती की विचारू नका; पण परिस्थितीनं या माणसांवर दारोदारी भटकण्याची वेळ आणली होती. लहानपणी लेकरांना लळा लावला. त्यांना लहानाचं मोठं केलं. होती नव्हती सगळी पुंजी त्यांना दिली. आता लग्नाच्या वेळी मुलाच्या बायकोनं अटच टाकली - ‘‘आई-बाबा सोबत राहणार असतील, तर मी लग्न करू शकत नाही.’’ या सगळ्यांची कहाणी अजब होती.

महिन्यातून एकदा नातवाचं तोंड पाहण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. मला प्रश्न पडला होता, त्या आजी-आजोबांनी का लेकरं जन्माला घातली? त्या आजोबांची करुण कहाणी ऐकून माझ्या अंगाची लाही लाही होत होती.

मी ज्या आजी-आजोबांशी बोलत होतो, त्यांचं नाव मनोज आणि अंजली, विकास आणि दामिनी. मनोज हे उत्तर प्रदेशचे आणि विकास हे मध्य प्रदेशचे होते. दोघेही मित्राच्या सोबतीनं मुंबईला कामकाज करण्याच्या निमित्तानं आले.

सुरुवातीला मनोज डान्सबारमध्ये वेटर होते आणि विकास वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये ट्रक एका रांगेत लावण्याचे काम करायचे. या दोघांनीही छोटी-छोटी कामं करत उच्च शिक्षण घेतले. मनोज हे एमबीए झाले. विकासने एम.कॉम. केले.

दोघेही अंधेरीतल्या चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते. मनोजने साताऱ्याच्या अंजली यांच्याशी विवाह केला. विकास यांनी अंधेरीमधल्याच दामिनीशी विवाह केला. लहानपणापासून कष्ट करण्याची सवय असल्यामुळे तारुण्यात कधी पैशाची चणचण भासली नाही. अंजली आणि दामिनी या दोन्ही नोकरी करायच्या.

लहान वयात लग्न झाल्यामुळे लहान वयात मुलंही झाली. परिस्थिती चांगली असली तरी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पोटाला चिमटा द्यावाच लागला. जुनं होतं नव्हतं सगळं विकून मनोज यांनी त्यांच्या मुलाचा नंबर वैद्यकीय शिक्षणासाठी लावला. विकासने त्याच्या मुलाचा नंबर इंजिनीअरिंगसाठी लावला. दोघांनाही एकेकच मुलगा.

मनोज म्हणाले, ‘‘माझा मुलगा अजयसाठी आम्ही सात-आठ स्थळे पाहिली. त्या स्थळांमधल्या प्रत्येक मुलीचं किंवा तिच्या आईचं म्हणणं हेच होतं, की आमची मुलगी मुलाच्या आई-वडिलांबरोबर राहणार नाही. हे वातावरण पाहून मुलगा सारखा म्हणायचा, मला लग्नच करायचं नाही. मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही.

मुलाचं वय वाढत होतं. आम्ही एका डॉक्टर असणाऱ्या मुलीच्या होकाराला होकार दिला. मुलाचं लग्न करून दिलं. दोन महिन्यांनंतर माझ्या मुलालाच आमची अडचण वाटू लागली. तो बोलत नव्हता पण त्याच्या वागण्यातून-बोलण्यातून सगळं काही जाणवत होतं.’’ आम्ही मुलीच्या आई-वडिलांना सगळं सांगितलं तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन का राहत नाही.’’

चार महिन्यांनंतर मीच अजयला म्हणालो, ‘‘बाजूच्याच गल्लीमध्ये आम्ही एक भाड्यानं घर पाहतोय.’’ त्यावर अजय काहीही बोलला नाही. याचा अर्थ त्याला आम्ही जाणं अपेक्षित होते. आम्ही गेलो त्यानंतर वर्षभरात अजयने मला दवाखाना टाकायचा म्हणून माझं जुनं घर विकायला परवानगी द्या, असे एकदा विचारलं.

त्यासाठी तो माझ्या रूमवर आला होता. तिथे आल्यावर तुम्ही कसे राहता? तुम्हाला काही अडचण आहे का? अशी साधी विचारणाही अजयने केली नाही. त्याच्या आईने मला लागलीच सही करा, असे सांगितले.

विकास म्हणाले, ‘‘माझ्या मुलाच्या लग्नाच्या अगोदरच आम्हाला दुसरा फ्लॅट शोधावा लागला. तेव्हा कुठे लग्न जमलं. मुलगा आणि सून आनंदामध्ये आहेत. आता त्यांची मुलंबाळं मोठी झालीत. त्यांना भेटण्यासाठी भीक मागितलेले पैसे भरभरून द्यावे, अशी सुनेची इच्छा असते. आपलं काय पिकलं पान. आज आहे उद्या नाही, त्यांनी सुखात राहावे.’’ नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेले विकास आजोबा आसवांना वाट मोकळी करून देत होते.

मी दोन्ही महिलांना म्हणालो, ‘‘तुम्ही काही बोलत का नाहीत?’’ त्यावर विकास आणि मनोज म्हणाले, ‘‘प्रत्येक आईला आपली मुलं फार प्रिय असतात. त्यांनी किती चुका केल्या तर आई त्याच्यावर सतत पांघरूण घालत असते. आई लहानपणीच बोलली असती तर आज दुसऱ्याच्या लग्न समारंभामध्ये येऊन भीक मागायची वेळ आली नसती.’’ त्यांच्या एकदम बोलण्यानं आम्ही सारेच शांत झालो.

विकास म्हणाले, ‘‘चला आता आम्हाला निघावं लागेल.’’ मी त्यांना सोडण्यासाठी बाहेर आलो. ते चौघेही निघाले. चार पावलं पुढे गेल्यावर विकास मागे आले. माझ्या कानाजवळ येऊन म्हणाले, ‘‘दादा चार पुऱ्या आणि थोडीशी भाजी मिळेल का?

आज इकडे लग्न आहे. आम्ही लग्नामध्ये जेवायला आलोय. हे माझ्या मित्रांना माहिती आहे. ते रस्त्यात माझी देवासारखी वाट बघत बसले असतील. त्यांना मी येताना काहीतरी घेऊन येईन म्हणून मोठी अशा असेल.’’ ‘‘मी आतमध्ये पाहतो,’’ असे म्हणून आत गेलो. आतमध्ये काहीही नव्हते.

मी बाहेर आलो. त्यांना आतमध्ये काही नाही, असे सांगितले. माझे एकूण त्यांचा चेहरा एकदम उतरला. मी गाडी काढली आणि चौघांनाही त्या गाडीमध्ये बसवलं. रस्त्याने जातानाही मुले, सुना, समाज याबद्दल ते भरभरून बोलत होते.

रस्त्यांत असणाऱ्या एका स्वीट मार्ट जवळ मी गाडी थांबवली. आजोबांच्या मित्रांसाठी खूप सारं गोडधोड बांधून घेतलं. मनोज आणि विकास आजोबा ज्या गल्लीमध्ये राहतात, त्या गल्लीमध्ये आम्ही एन्ट्री केली. आम्ही जसे त्या गल्लीमध्ये गेलो तसे एका गार्डनच्या कोपऱ्यावर असलेल्या बाकावरून चार-पाच जण उठून मोठ्या आशेने आमच्याकडे पाहत होते.

मी या दोन्हीही आजोबांच्या मित्रांसाठी घेतलेला खाऊ गाडीच्या डिकीत ठेवला होता. जसे हे दोन्ही आजोबा रिकाम्या हाताने उतरले तसे त्या सगळ्यांचा चेहरा पडला होता. मी गाडीमधल्या सगळ्या पिशव्या बाहेर काढल्या आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये दिल्या. त्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी त्या पिशव्यांमधला खाऊ वाटून खाल्ला.

ती सारी सत्तरी पार केलेली म्हातारी माणसे लहान मुलांसारखी होती. आम्ही सगळे जण तिथे खाली गप्पा मारत बसलो. पलीकडल्या बाजूला एक महिलांचा गट बसला होता. त्या महिलांच्या गटामध्ये आमच्यासोबत असणाऱ्या दोन्ही महिला जाऊन बसल्या.

मी ज्या आजोबांच्या गटामध्ये बसलो होतो, त्यांच्या गप्पा सगळ्या त्यांच्या मुलांना घेऊन कौतुक सांगणाऱ्या होत्या. तरीही प्रत्येकाच्या मनामध्ये एक खंत होती, आपल्या मुलांनी आपल्याला टाकून दिलं याची. अनेकांची मुले आपल्या आई-वडिलांचे घर विकून परदेशात होती. सगळ्यांची ओळख करून देताना विकास आजोबा म्हणाले, ‘‘हा आमच्या सगळ्या समदुःखी लोकांचा गट आहे.

आमच्यातल्या एकाने याला नाव दिलं होतं ‘वनवासी’ त्यातून आमच्या कॉलनीला वनवासी नाव मिळालं. पुन्हा आम्ही ते नाव बदलून ‘भाग्यवान’ ठेवले. मी म्हणालो, ‘‘भाग्यवान का?’’ ते म्हणाले, ‘‘कोणाच्या नशिबात लहानपणासारखे मित्र, छान राहणे, वाटेल तिकडे जाणे, वाटेल ते करणे, ते सगळे असते तो भाग्यवान म्हणून ‘भाग्यवान’. ते सगळे जण स्वतःची छानपणे समज घालत होते आणि मीही त्यांच्या होमध्ये हो घालत होतो.

मनोज यांनी मला त्यांच्या घरी नेलं. जाताना मनोज मला सांगत होते, ‘‘या आसपासच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये तुम्हाला टाकून दिलेले आई-बाबा पावलोपावली सापडतील. यातूनच या ‘श्रीराम’ चाळीचे नाव ‘वनवासी’ चाळ असे झाले आहे.

इथले बरे आहे; पण त्या मोठ्या घरामध्ये, त्या मोठ्या कुटुंबामध्ये टाकून दिलेल्या आई-वडिलांचे हाल काय असतील? इथे तर बोलता येते, वाटेल ते करता येते, मोकळेपण आहे, भीकही मागता येते. तिथे तर काहीच करणं शक्य नसते.’’ मलाही ते पटले.

मी मनोज यांच्या घरून निघालो. त्या सर्व म्हाताऱ्या आजी-आजोबांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. हल्ली वनवासी गल्लीमध्ये असणाऱ्या प्रत्येक घरातल्यासारखीच सुन्न करणारी कहाणी, अवस्था राज्यातल्या प्रत्येक घरात कोणत्या कोणत्या स्वरूपात आहे की काय, याची भीती वाटत आहे, बरोबर ना...?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com