

Contemporary Indian Art
esakal
हर्ष भटकळ
लहानपणी झाडे आणि प्राण्याशी संवाद साधणाऱ्या मिठू सेन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या. लॉर्ड्सवरून वडिलांशी दूरध्वनीवर बोलणाऱ्या मिठू सेन आयुष्यात प्रामाणिकपणाला महत्त्व देतात. ‘‘कलाकृती तर केवळ एक सहज प्राप्ती, खरी साधना तर तिच्या निर्मितीच्या प्रवासात असते," असं त्या मानतात.
तिच्या वडिलांची बदली झाली, की सारे कुटुंब एका गावावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे. दरवेळी छोटी मिठू सर्वांचा निरोप घ्यायची फक्त मित्रमंडळींचा नव्हे तर झाडांचा, परिसरातील कुत्र्यांचा आणि घराशेजारच्या बागेचा देखील. ‘मी कदाचित परत येईन सुद्धा,’ ती झाडांना सांगत असे. ‘पण तेव्हा सारं तसंच असेल असं नाही.’ अनेक वर्षांनंतर तीच छोटी मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांत अधिक मान्यता पावलेल्या भारतातील समकालीन कलावंतांपैकी एक ठरली. या तीसएक वर्षांत मिठू सेन या अशा विरळा भारतीय कलावंतांपैकी आहेत. ज्यांनी आधुनिक दृश्यकला कशी दिसते यालाच फक्त आव्हान दिलेले नाही तर ते कसे घडले जाते, पाहिले जाते आणि समजून घेतले जाते यातही त्यांची इन्स्टॉलेशन, त्यांचे सादरीकरण, ड्रॉइंग्ज आणि शिल्पे यांची जगभरातील म्युझियम, बिनाले आणि आर्ट गॅलरी इथे दाखवली गेली आहेत. असे असले तरी झाडांशी आणि प्राण्यांशी बातचीत करणारी मुलगी तशीच राहिली आहे. ‘माणसं झाडांशी काही बोलत नसतात हे मला तेव्हा माहीत नव्हतं,’ त्या मिस्कीलपणे म्हणतात. ‘मी नेहमीच खरं तेच बोलते. खोटं बोललेलं लक्षात ठेवावं लागतं. खऱ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागत नाहीत.’