

Women in Stand-Up Comedy
esakal
सारिका चाटुफळे-कुलकर्णी - sarikachatuphale.kulkarni@gmail.com
हिमगौरी नावाची एक सुंदर राजकन्या सावत्र आईच्या छळाला कंटाळून पळून जाते. सात बुटके तिला सांभाळतात. तिची सावत्र आई एका म्हातारीच्या रूपात येऊन तिला विषारी फळ खायला घालते आणि एक राजकुमार तिला त्यातून वाचवतो. अशी मूळ कथा जर आताच्या काळात घडली तर कशी असेल ते आजच्या कथेत वाचूया.
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेली हिमगौरी अतिशय हुशार आणि आनंदी मुलगी होती. तिच्या केवळ असण्याने आजूबाजूचे वातावरण उत्साहवर्धक आणि आनंदी होत असे. हिमगौरी दिसायला देखणी होती. कॉलेजच्या संमेलनात तिने स्टँडअप कॉमेडी सादर केली होती. परीक्षक म्हणून आलेल्या बाईंना हा प्रवेश अत्यंत आवडला. हिमगौरीला जर तयार केले तर तिच्यात एक चांगली स्टँडअप कॉमेडियन होण्याच्या सगळ्या शक्यता बाईंना दिसत होत्या. हल्लीच्या काळात अशा विनोदी सादरीकरणाला किती मागणी आहे हे बाई जाणून होत्या. खरे तर हल्ली राजकारणी लोकांची विनोदाची पचनशक्ती कमी झालेली होती. कधीकधी राजकारणावर केलेले विनोद सहन न होऊन या विनोदवीरांवर हल्ले केले जात. स्टॅन्ड अप शो जिथे होत त्या हॉटेलची नासधूस केली जाई. पण तरीही या स्टँडअप कॉमेडीची मागणी वाढतच होती. एका तासाचे दहा पंधरा लाख इथवर कमाई होत असे. शिवाय या क्षेत्रात स्त्रियांची मोठी कमतरता होती. हे क्षेत्र अजूनही पुरुषप्रधानच समजले जात होते. मुळातच बायकांना विनोदाचे वावडे आहे असा एक समज सर्वत्र होता.