#MokaleVha पुढच्यास ठेच...

अलका काकडे, मानसोपचारतज्ज्ञ
रविवार, 2 ऑगस्ट 2020

बावीस वर्षांच्या रितेशला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यापासून त्याचे आई-वडील आणि त्याची अठरा वर्षांची बहीण एकदम हादरून गेले होते, हताश झाले होते. तीन दिवसांपूर्वी रात्री रितेश तापाने फणफणला होता. सकाळी त्याचा घसा दुखायला लागून श्‍वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून डॉक्टरांना संपर्क केला तर त्यांनी त्याची कोरोना चाचणी करायला सांगितली. त्यात तो कोरोना पॉझिटिव आला.

बावीस वर्षांच्या रितेशला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यापासून त्याचे आई-वडील आणि त्याची अठरा वर्षांची बहीण एकदम हादरून गेले होते, हताश झाले होते. तीन दिवसांपूर्वी रात्री रितेश तापाने फणफणला होता. सकाळी त्याचा घसा दुखायला लागून श्‍वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून डॉक्टरांना संपर्क केला तर त्यांनी त्याची कोरोना चाचणी करायला सांगितली. त्यात तो कोरोना पॉझिटिव आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता घरातल्या इतरांचीही तपासणी होणार होती. covid-19 ची लक्षणे कुणालाच नव्हती. पण तरीही चाचणी आवश्यक होती. त्यांना सगळ्यांनाच ‘स्वतःमध्ये काही बदल जाणवतात का’ यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले होते. ऑक्सिजनची पातळी वरचेवर मोजायला सांगितली होती. ‘आपणही पॉझिटिव निघालो तर काय?’ ही भीतीने त्या सगळ्यांना अस्‍वस्‍थ केले होते. त्यांच्या डोळ्यांसमोर संस्थात्मक क्वारंटाईनच्या सगळ्या गोष्टी येत होत्या.

एकीकडे त्यांना रितेशची काळजी वाटत होती, तर दुसरीकडे त्याचा रागही येत होता. त्यांनी इतक्या तळमळीने सांगूनही त्यानं दररोज मित्रांबरोबरचा चौकातला गप्पांचा अड्डा सोडला नव्हता. ‘काही होत नाही मला’, या बेफिकीर वृत्तीने तो वागत राहिला. इकडे रितेशलाही पश्चात्ताप होत होता पण आता त्याचा उपयोग नव्हता. डॉक्टर सांगतील ती सर्व पथ्य पाळणे. तो पाळत होता.

रितेशच्या घराप्रमाणेच अजून इतरही, हट्टीपणाने नियम न पाळणाऱ्यांची, काही घरे होती. ज्यांच्याकडे कुणी एकजण, कुठे दोन, तीन, किंवा संपूर्ण घरच बाधित झाले होते. या घरांवर जरा नजर टाकली तर लक्षात येते की, ज्या व्यक्तीला स्वतःला  covid-19 ची बाधा होते तिची मन:स्थिती तर अतिशय नाजूक झालेली असतेच, पण ज्यांना बाधा झालेली नाही त्यांनाही घाबरल्यासारखे होते. छातीत धडधड होत राहते, घशाला कोरड पडल्यासारखी होते, हातपाय थरथरतात, घाम येत राहतो, ॲसिडिटी वाढते, झोपेवर परिणाम होतो, गरज असो वा नसो वारंवार हात धुवावेसे वाटतात.

यावर उपाय म्हणून औषधे, व्यायाम, प्राणायाम, आहारविहार अशा अनेक गोष्टींचा आधार घेतला जातो. ते साहजिकही आहे. पण अशा परिस्थितीत समाजातील आणखी एका महत्त्वाच्या घटकाची मदत होऊ शकतो. तो घटक म्हणजे समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ. ‘कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक प्रश्नाचे नेमके स्वरूप त्या व्यक्तीला समजावून देऊन त्या समस्येवर कसा तोडगा काढायचा व मानसिक स्वास्थ्य कसे परत मिळवायचे,’ याबद्दल योग्य ती वाट दाखवण्याचे काम हे समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ व स्पा सारख्या संस्था करीत असतात. त्यांची मदत जरूर घ्यावी. तणावपूर्ण परिस्थितीतल्या प्रत्येकानेच एक गोष्ट लक्षात ठेवावी की संकटाला तोंड देण्याचे आणि त्यावर मात करण्याचं प्रचंड सामर्थ्य माणसामध्ये असते. या सामर्थ्याच्या जोरावरच, सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सारासार विचार करून, रितेश आणि इतरांना लागलेली ठेच पाहून, बाकीच्यांनी शहाणे व्हावे आणि परिस्थिती चिघळू नये याची खबरदारी घ्यावी, एवढे केले तरी पुरे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vha Article Alka Kakade