#MokaleVha पौगंडावस्थेतील नैराश्य!

Adolescence
Adolescence

मुले वाढत असताना फक्त त्यांचे शरीर वाढत नाही, मनही फुलते, व्यक्तिमत्त्व उमलते. पौगंडावस्थेत त्याला अनेक पैलू पडतात. उत्साह खळाळून वाहत असतो. पण, तरीही मुलांना गोंधळात टाकणारे प्रश्न पडतात, ‘मी कोण आहे?’, ‘माझ्या शरीरात हे बदल का होतायत’, ‘माझ्या आसपासचे जग बदलल्यासारखे का वाटते?’ ‘प्रत्येक गोष्टीत माझ्यावर पालकांचा दबाव का?’, ‘स्त्री-पुरुष संबंध म्हणजे काय’ व इतरही लैंगिक प्रश्‍नांनी तो हादरून गेलेला असतो. याच काळात मुलांना सांभाळायला हवे. त्यांचा काही कारणाने नुसताच मूड गेला आहे, की हा अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे, यातील फरक ओळखायला हवा. हे फक्त तज्ज्ञ व्यक्तीच करू शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुःखी दिसतीलच असेही नसते. त्यामुळे त्यांच्या नैराश्याच्या आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकते. बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणाही दिसू शकतो. ही मुलांची महत्त्वाची पायाभरणीची वर्षे असतात. पण, याच काळात अभ्यासातली एकाग्रता व ऊर्जापातळी कमी होण्याची भीती असते. मग गुणांची घसरण, आत्मविश्वास कमी होऊ लागतो. याचे पर्यवसान म्हणून अस्वस्थपणा व चिडचिड वाढते.  

एकाग्रतेचा अभाव, अति हळवे होणे, लहानसहान गोष्टींवरून रडणे, विलक्षण कंटाळा, आक्रमक होणे सुरू होते. जेवण्याच्या, झोपण्याच्या सवयींमध्ये बदल होतो. घरापासून लांब-लांब राहण्याची प्रवृत्ती वाढते. अति टीव्ही बघणे, गेम खेळणे वाढलेले असते. टीका सहन होत नाही. शारीरिक तपासण्यांमध्ये काहीही दोष न आढळूनही डोकेदुखी, पोटदुखी सुरू होते. या काळात स्वतःला इजा करून घेण्याचा किंवा आत्महत्येचा विचार मुलांच्या मनात कित्येकदा येत राहतो. या काळात त्यांना सांभाळायला हवे. 

मुलांमध्ये ही लक्षणे किती काळ व किती तीव्रतेने जाणवत आहेत, यावर पालकांनी, शिक्षकांनी लक्ष ठेवायला हवे. ज्याला ‘वाढत्या वयातील वेदना’ (Growing pains) म्हणतात. पण, ती तशी आहेत, की आजाराचा भाग आहेत, हे तज्ज्ञच ठरवू शकतात. बऱ्याचदा अति उत्साही वागणे किंवा बंडखोर वृत्ती ही आजाराची लक्षणे असू शकतात. या वयातील मुले निराश किंवा दुःखी दिसतीलच, असेही नाही. त्यामुळे आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकते. 

या वयात अस्वस्थता निर्माण करणारे किंवा नैराश्य वाढविणारे मुख्य कारण मेंदूतील रासायनिक बदलात असते. आनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश, आई-वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का, एकतर्फी प्रेमातले अपयश, दहशतवाद इत्यादींची नीट न होणारी उकल, स्व-प्रतिमा क्षीण असणे, गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी, लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग, यांपैकी काहीही या आजाराला या वयात निमंत्रण देणारे ठरते.  

पौगंडावस्थेतील अस्वस्थता तसेच नैराश्य दुर्लक्ष करण्यासारखे नक्कीच नाही. सर्वप्रथम विश्वासात घेऊन प्रेमाने आपल्या पाल्याशी बोला. आवश्यक वाटल्यास तत्काळ तज्ज्ञांची मदत घ्या. पाल्याच्या वर्तनातले बदल हे नैराश्याच्या आजारापोटी आहेत किंवा कसे, हे तज्ज्ञाला ठरवू द्या. बदल कशाहीमुळे असले, तरी पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीने ते दुरुस्त व्हायला हवेत.

यामुळे काय होते?
1) आजाराचे मूळ कारण कळते.
2) ज्या घटना व प्रसंगांमुळे आजाराला चालना मिळाली, त्यांना त्या वेळी कसे सामोरे गेलो व कसे जायला हवे, हे जाणून घेणे. 
3) भावनांवरचा ताबा, आनंद कसा मिळवावा आणि टिकवावा, याचे शिक्षण.
4) परिस्थितीशी जुळवून घेण्याची व समस्येतून मार्ग काढण्याची कला.
5) तणावाचा उगम / स्रोत शोधणे. 
6) सकारात्मक दृष्टिकोनाची  जोपासना  करण्यास शिकविले जाते.
7) आयुष्यातील  प्राथमिकता  ठरवणे/बदलणे  शिकवले जाते.
8) योजनाबद्ध पद्धतीने, विचार व कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकणे.  
9) Relaxation Therapies, Positive Regeneration imageries, Clinical Trance तसेच तणाव नियोजनाच्या विविध पद्धती शिकविल्या जातात.
10) MBCT मध्ये वर्तमानात स्वस्थ  कसे राहावे,  तटस्थपणे  स्वतःकडे  व  परिस्थितीकडे  कसे पाहावे , हे  शिकवले  जाते. काही  ध्यानाच्या  पद्धती  शिकवल्या जातात; ज्यायोगे  चित्त  शांत  होईल.

या सगळ्याबरोबर चलपद्धतीचा व्यायाम महत्त्वाचा आहे; ज्यायोगे सेरोटोनीनसारखी आवश्यक neurotransmitters स्रवतील. याबरोबरच अतिशय महत्त्वाचे म्हणजे मुलाला पालकांकडून व शिक्षकांकडून मिळणारा भावनिक आधार. वेळेवर काळजी घेतली, तर आपण कोमेजणाऱ्या कळ्यांना पुन्हा फुलवू शकतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com