#MokaleVha : बिनचेहऱ्याची आई

Mokale-Vha
Mokale-Vha

'हॅलो, आपण प्रतिभा देशपांडे बोलताय?”
“हो, आपलं नाव?”
“नाव नाही सांगितलं तर चालेल? मला तुम्हांला काहीतरी सांगायचंय आणि त्यावर तुमचं मत घ्यायचं आहे.”
“बोला ना.”
“माझं वय बहात्तर. मला दोन मुलं आहेत. मोठा चाळीस वर्षांचा आहे. त्याचं लग्न झालंय, त्याला दोन मुलं आहेत. धाकटा बत्तीस वर्षांचा आहे. माझे पती जाऊन आठ वर्ष झाली. मी आणि माझा धाकटा मुलगा एकत्र राहतो, आणि तो बहुविकलांग आहे. मला कॅन्सर झालाय. फार-फार तर माझं आयुष्य एक वर्षाचं आहे.”

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

“असं का म्हणता, आता सायन्स पुढे गेलंय, सगळ्यावर इलाज होऊ शकतात.”
“ते तर चालेलच आहेत. पण फारशी आशा नाहीये, आणि मला तुम्हांला वेगळं सांगायचंय. माझ्या नंतर या मुलाचं काय होईल ही चिंता मला सतावत आहे.”
“त्याचा मोठा भाऊ...”

“नाही हो. त्याने स्पष्ट सांगितलंय, या मुलाला एखाद्या संस्थेत भरती कर आणि माझ्याकडे राहायला ये. तो माझं सगळं व्यवस्थित करेल. मी काही संस्था बघितल्या. पण मला वाटत नाही की अशा संस्था माझ्या मुलाची चांगली काळजी घेतील. म्हणून गेले काही दिवस देवाला प्रार्थना करतेय, माझ्या आधी माझ्या मुलाला मरण येऊ दे.”
“...” काय बोलायचं? उत्तर नव्हतं माझ्याकडे! 
“दिवसभर माझा हाच जप असतो. तुमचं पुस्तक मी वाचलंय, ‘चला आयुष्य घडवूया’. त्यांत तुम्ही ‘auto suggestion’ या तंत्राबद्दल लिहिलंय, तेच तंत्र मी सुरू केलंय.”

“हे तंत्र मी ‘आयुष्य घडवायचं कसं?’ यासाठी लिहिलंय. तुम्ही तर एक आयुष्य संपवायला निघाला आहात.”
“दिवसभर मी या विश्वासावर हा जप करते की मला हवं ते मिळालं की मी सुखाने मरायला मोकळी! पण रात्र मात्र रडून काढते की, ‘किती वाईट आई आहे मी, माझ्या मुलाच्या मरणाची मी आशा करतेय.”
“शांत व्हा तुम्ही, रडू नका, मी समजू शकते तुम्हांला काय म्हणायचंय ते!”
“मला वाटलंच तुम्ही समजू शकाल ते. मला सांगा, मी हा जप करतेय तर असं करणं चूक आहे का?”

“मला खरंच कळत नाहीये की तुमचं सांत्वन मी कसं करू? प्लीज रडू नका, मी तुम्हांला येऊन भेटू का? मग आपल्याला शांतपणे बोलता येईल.”
“नको-नको, मला फक्त तुमच्याकडून हा दिलासा हवा आहे की मी वाईट आई नाहीये, मी माझ्या मुलाचं हितच चिंतत आहे.”
माझ्याकडे त्याच्या सांत्वनासाठी शब्द नव्हते. मला तिची व्यथा जाणवली. तरीही म्हणाले, “आई, तुम्ही योग्य करताय असं मी म्हणणार नाही. पण हे नक्की की, तुम्ही मुलाच्या मरणाची इच्छा त्याच्या चांगल्यासाठी करताय. स्व:तला दोष देऊ नका, त्यापेक्षा अजून काही मार्ग निघतो का याकडे बघा. कितीवेळा, आपण फक्त एका दिशेने विचार करतो आणि मग दुसरा मार्ग आपण आपल्याच हाताने बंद करतो. मला तुमचं नाव-गाव माहीत नाही. सांगितलंत तर मला काही प्रयत्न करता येतील. तुमच्या मोठ्या मुलाशी मी बोलू शकते, त्याच्या मदतीने आपण दुसरा काही मार्ग काढू शकतो.”

“thank you very much, मी विचार करेन आणि वाटलं तर परत फोन करेन. तुमचं तंत्र नक्की उपयोगी ठरतं ना? माझ्यासाठी प्रार्थना करा की या तंत्राचा मला लवकरात लवकर उपयोग होऊ दे. माझ्यानंतर माझा कोणावरही विश्वास नाही.”
मी उत्तर दिलं नाही. 
तथास्तु म्हणू का?
हेही माझं अजून ठरत नाहीये, पण असा वाचक सतत मनात घर करून राहतो हेही खरंच आहे.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com