#MokaleVha : असमाधानी पत्नीपासून हवाय घटस्फोट

ॲड. सुनीता एन. जंगम
Sunday, 20 September 2020

तुमच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. याचाच अर्थ तुम्ही तिच्या सवयी, स्वभाव जाणून आहात. ती आताच अशी वागते की, पूर्वीपासून अशीच आहे, हे बघणे आवश्‍यक आहे. तिला सामान्यांसारखे वागता येत नाही, उदास असते याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. तिला काही अनामिक भीती, ताण आहे का, काही शारीरिक त्रास आहेत का हे तपासून बघा. तिला तुम्ही समजून घेणे आवश्‍यक आहे.

पुणे असमाधानी पत्नीपासून हवाय घटस्फोट
प्रश्न - माझ्या लग्नाला १२ वर्षे झाली असून दोन मुले आहेत. परंतु, माझी पत्नी इतरांसारखी नाही. ती नेहमी उदास, असमाधानी असते. मला विभक्त व्हायचे आहे.

तुमच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. याचाच अर्थ तुम्ही तिच्या सवयी, स्वभाव जाणून आहात. ती आताच अशी वागते की, पूर्वीपासून अशीच आहे, हे बघणे आवश्‍यक आहे. तिला सामान्यांसारखे वागता येत नाही, उदास असते याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. तिला काही अनामिक भीती, ताण आहे का, काही शारीरिक त्रास आहेत का हे तपासून बघा. तिला तुम्ही समजून घेणे आवश्‍यक आहे. दोघांमधील संवाद कसा आहे, हे ही लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी त्यांचे तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेणे, आवश्‍यक आहे. ते योग्य ती उपाययोजना करण्यास सांगतील. तिच्या वागण्याचे मूळ कारण शोधतील.

कधी-कधी काही व्यक्तींना स्पष्टपणे आपली मते मांडता येत नाहीत. मग त्यांच्या वर्तनातून ते जाणवते. त्यामुळे समोरच्याला ती व्यक्ती असामान्य वाटते. यामधून जोडीदाराला बाहेर काढणे गरजेचे आहे. तसेच कोणताही निर्णय घेण्याआधी मुलांचादेखील विचार करा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरखर्चात पतीचा हातभार नाही
प्रश्न - मी २७ वर्षांची असून लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. मी कमवत असून घरातील सर्व खर्च भागवते. पती मात्र स्वतःची कमाई अनैतिक संबंधांवर उधळतात. मला त्यांच्यासोबत राहायचे नाही.

तुम्ही लग्न झाल्यापासून स्वतः काही अंशी आर्थिक जबाबदारी स्वीकारली असणार. त्यामुळे तुमचे पती असे बिनधास्त वागत आहेत. त्यांना स्पष्टपणे त्यांच्या जबाबदाऱ्या सांगा. आर्थिक जबाबदारी त्यांनी घेतलीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका ठेवा. हळूहळू त्यांच्या ते अंगवळणी पडेल. मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून एकाची कमाई खर्च तर दुसऱ्याच्या कमाईमधून ठरावीक बचत करता येईल, हे ही समजावून सांगा. त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दल तुम्ही प्रत्यक्षात काही पाहिले आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. अनेकदा बाहेरचे लोक नात्यात गैरविश्वास निर्माण करण्यासाठी असे सांगतात. या सर्वांची सत्यता पडताळून पहा. कधीकधी गैरसमजातून चांगले संसार मोडतात. ऐकीव गोष्टींना महत्त्व देऊ नका. थेट जाब विचारा आणि जमल्यास कायद्याची मदत घ्या.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokale Vha article issue solution by sunita jangam

Tags
टॉपिकस
Topic Tags: