#MokaleVha ‘बंड्या, काळजी घे’

MokaleVha
MokaleVha

‘बंड्या, तू तिकडे एकटा असलास तरी काळजी घे बाळा..’’ 
दाटलेल्या कंठातून आलं, ‘‘हो आई...’’
‘‘बाहेरचं काही खाऊ नकोस. व्यायाम कर, वेळेत झोप.’’ 
व्यवसायासाठी आपलं घर सोडून पुण्यामध्ये आलेल्या बंड्याने थरथरत्या हाताने आईचा फोन ठेवला आणि पत्र न लिहिताच झोपी गेला. कायमचा...
आत्महत्या - जी गोष्ट करण्यासाठी सगळ्यात जास्त शौर्य लागतं ती गोष्ट करून देखील बंड्या सगळ्यांच्या नजरेत पळपुटा ठरला. बंड्यानं असं पाऊल का उचललं असावं? त्याला हे टाळता आलं असतं का? त्याच्या घरच्यांना हे टाळता आलं असतं का? आपल्याला हे टाळता आलं असतं का? बंड्यांच्या पश्चात सगळ्यांनाच अनेक प्रश्न पडले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरं म्हणजे बंड्यानं स्वतःहून २-३ वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा देऊन व्यवसाय सुरू केला होता. लग्नानंतर त्याची बायको दुसऱ्या मुलाबरोबर पळून जाऊन देखील आता वर्ष उलटलं होतं. बंड्या त्या धक्क्यातून बाहेरसुद्धा आला होता. त्याचे कोणाशी वाद नव्हते, उधाऱ्या नव्हत्या आणि वैरही नव्हतं. निदान असं वाटत तरी होतं. घरच्यांचा खंबीर पाठिंबा असतानादेखील बंड्यानं असं पाऊल का उचलावं?  

एखाद्या सणावाराला दुपारी पंचपक्वान्नांचं तड लागेपर्यंत जेवण झाल्यावर रात्री आपल्याला कमी भूक लागते! मात्र आपले काही मित्र रात्री पुन्हा तड लागेपर्यंत ताव मारतात. मग आपण म्हणतो, ‘‘कमाल आहे! हा एवढं खाऊनही बारीकच राहतो आणि मी थोडंसं खाल्लं तरी लगेच जाड होतो!’’ जशी आपल्या प्रत्येकाच्या पोटाची वेगवेगळी क्षमता असते अगदी तशीच आपल्या प्रत्येकाच्या मनाची पण वेगवेगळी क्षमता असते. 

काही लोकांना आनंद, दुःख, भय, क्रोध, तणाव, इत्यादी भावनिक पंचपक्वान्न अगदी सहज पचवता येतात. पण तेच काही लोकांना पचवायला जरा जड जातं. कधी कधी तर भावनिक अपचनही होतं! अपचन झालं तरी आयुष्याचा मात्र आपल्या अनुभवांच्या पानात आग्रह सुरूच असतो. एक क्षण येतो जेव्हा आपली मानसिक पचनशक्ती संपते. पण आपण काहीच करू शकत नाही कारण आपलं ‘डाएट’ आपल्या नव्हे, नियतीच्या हातात असतं! अशा वेळी सुरू होतात आजारपणं - शारीरिक आणि मानसिक!

गेल्या काही महिन्यात सगळ्यांनाच कळलं की, आजार होऊ द्यायचे नसतील तर ‘प्रतिकारशक्ती’ सगळ्यात महत्त्वाची आहे. मग जो नियम शरीराला, तोच मनाला. कोणतेही डॉक्टर सांगतील की पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती एका नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणजेच पचनशक्ती वाढली तर प्रतिकारशक्ती वाढते आणि प्रतिकारशक्ती वाढली तर पचनशक्ती वाढते. 

बंड्यांच्या आईने सांगितलं होतं, ‘‘बाहेरचं खाऊ नकोस, व्यायाम कर, वेळेत झोप!’’ त्याच नियमाने आपल्या ताटात बाहेरचे कितीही गोड कटू अनुभव वाढण्यात आले तरी त्यांच्या ‘आहारी’ आपण जायचं की नाही हे आपणच ठरवू शकतो. ध्यान, मैत्र, स्व-संवाद, वाचन, कला, प्राणायाम, योग अशा अनेक गोष्टी या मनाचा व्यायाम नाहीत तर काय आहेत? त्याची काळजी आपण वेळोवेळी घेतलीच पाहिजे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com