#MokaleVha : मुलाने घरातून हाकलून दिले

Mokale-Vha
Mokale-Vha

मुलाने घरातून हाकलून दिले
माझे वय ७५ वर्षे व पत्नीचे वय ७२ वर्षे आहे. २०११ मध्ये आम्ही गावावरून पत्नीच्या ऑपरेशनकरिता मुलाकडे आलो. परंतु, ऑपरेशन होताच मुलगा व सुनेने भांडण करून आम्हाला घरातून हाकलून दिले. त्यानंतर वारंवार समुपदेशक व मध्यस्थ यांची मदत घेऊन त्यांना समजावूनही ते आम्हाला सांभाळायला तयार नाहीत. वयोमानाने औषधपाणी व दैनंदिन खर्च वाढले आहेत. आमच्या मुलीच्या थोड्याफार आर्थिक मदतीवर आम्ही मरणाची वाट बघत कसेबसे जगत आहोत.

- तुम्ही बऱ्याच वर्षांपासून मुलाने तुम्हाला सांभाळावे म्हणून समझोत्याने मार्ग काढायचा प्रयत्न केला. परंतु बरेचदा त्यातून मार्ग निघत नसेल तर स्वतःच्या अधिकारासाठी कायद्याची मदत घ्यावीच लागते. मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी टाळणे ही सध्याची ज्वलंत समस्या झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात शांततामय, सर्वसामान्य जीवन व्यतीत करता यावे म्हणून त्यांच्या कल्याणाकरिता  केंद्र सरकारने ‘आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा २००७’ अस्तित्वात आणला आहे. या कायद्याअंतर्गत सज्ञान मुले, नातवंडे, नातेवाईक यांना ज्येष्ठांची जबाबदारी घेणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात विशेष ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाची स्थापना झाली आहे. तुम्ही सदर न्यायाधिकरणाकडे अर्ज करून तुमच्या मुलाकडून तुमचा व तुमच्या पत्नीचा औषधपाणी व दैनंदिन खर्च देण्याचा आदेश मिळवू शकता. अर्जावर सुनावणीच्या आधी न्यायाधिकरण समुपदेशाने तुमच्या समस्येवर तोडगा निघतो का हे बघेल. त्यातून काही निष्पन्न न झाल्यास अर्ज चालवून तुम्हाला निर्वाह खर्च देण्याचा आदेश मुलाला करेल. सदर आदेशाचा भंग केल्यास शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे. तुमच्या मुलाच्या वागण्याने तुमची आयुष्य जगण्याची उमेद संपली आहे. या मानसिक नैराश्‍यातून बाहेर येण्याकरिता व आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करण्याकरिता तुम्ही समुपदेशकाची मदत घ्या.

पुरुष सहकाऱ्याकडून फसवणूक
मी एक ४५ वर्षांची शिक्षिका आहे. कामाच्या ठिकाणी बरेच पुरुष सहकारी मला त्रास देत असत. मी मानसिक त्रास होत असूनही त्याकडे दुर्लक्ष करत असे. ७ वर्षांपूर्वीपासून त्यातीलच एक सहकारी शालेय उपक्रमानिमित्त माझ्या सहवासात आले. सुरुवातीला मी कामापुरतेच संबंध ठेवले. परंतु त्यांनी माझे काम, हुशारी व सुंदरता याचे सतत केलेल्या कौतुकाने मी त्यांच्याकडे ओढले जाऊन आमच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. परंतु, लवकरच माझी फसवणूक झाल्याचे मला कळले व मी तीन वेळा आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. पश्‍चात्ताप झाल्याने मी पतीला स्वतः सर्व सांगितले. त्यामुळे पती व माझ्यात रोज भांडणे होऊन पती आजारी पडले आहेत. मला त्या शिक्षकावर पोलिस केस करून बदला घायचा आहे व माझा संसार वाचवायचा आहे.

- कामावर होणाऱ्या छळाविरोधात तुमच्या सहकाऱ्यांविरुद्ध तुम्ही खंबीरपणे अंतर्गत (विशाखा) समिती अथवा जिल्हा स्थानिक समितीकडे तक्रार करायला हवी होती. तुम्ही छळाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमच्या सहकाऱ्याची भीड चेपली व त्याने तुम्हाला गृहीत धरले. तुमच्या सहकाऱ्याचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माहिती असूनही तुम्ही त्याच्या खोट्या वागण्याकडे आकर्षित झालात. बरेचदा पती- पत्नी आपापल्या कामात व्यग्र झाल्यामुळे त्यांच्यातील विसंवादामुळे त्यांच्यात नकळतपणे दुरावा निर्माण होतो, हेही तुमचे दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होण्याचे एक कारण असू शकते. तुम्हाला चूक कळली व तुम्ही पतीला ती सांगितली, ही तुमच्या नात्यातली सकारात्मक बाजू आहे. यापूर्वी तुमच्या संमतीने सगळे घडल्याने तुम्हाला कायदा मदत करू शकणार नाही; परंतु यापुढे त्याने त्रास दिल्यास तुम्ही त्याच्याविरुद्ध अंतर्गत समितीकडे तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला नैराश्‍यामुळे आत्महत्येचे प्रयत्न करणे, बदला घ्यावासा वाटणे या अतिटोकाच्या भावना निर्माण झाल्या आहेत. प्रथमतः वेळीच मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या. भावनेच्या भरात चुका होणे हा मानवी स्वभाव आहे. तुमच्याकडून झालेली चूक परत होणार नाही याचा पतीला भरवसा द्या. यासाठी मॅरेज कौन्सिलरची व जवळच्या व्यक्तींची मदत घ्या.

पत्नीला संसार करता येत नाही
माझे लग्न दोन वर्षांपूर्वी माझ्या मामेबहिणीशी झाले. लग्नानंतर सासूच्या आग्रहावरून मी माझ्या पत्नीच्या शिक्षणाकरिता त्यांच्याकडे राहू लागलो. त्या वेळी मला लग्नापूर्वी बायकोला जवळचा मित्र असल्याचे कळले. मी तिची चूक माफ करून त्याच्याशी मैत्री तोडण्यास सांगितले; परंतु पत्नी कॉलेजमध्ये त्याच्या संपर्कात आल्याने तिचे शिक्षण बंद करून मी तिला गावी नेले. तणावामुळे माझी नोकरी गेली. त्यानंतर बायको एक वर्षापासून बाळंतपणासाठी माहेरी आहे. तिच्या माहेरचे तिलाच साथ देतात. तिला संसार करता येत नाही. मला नैराश्‍य आले आहे.

- तुम्ही लग्नापूर्वीपासून पत्नीला व तिचा स्वभाव ओळखता व संमतीनेच तुम्ही लग्न केले आहे. तुम्ही बायकोला सुरुवातीला शिक्षणासाठी साथ देऊन तुम्ही चांगले जोडीदार आहात हे दाखवले. परंतु, तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्ही स्वतःच पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण केला व पत्नीशी मोकळेपणाने न बोलल्याने स्वतःही नैराश्‍यात गेलात. आजकाल शाळा, कॉलेज, नोकरी या ठिकाणी स्त्री-पुरुष एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, त्यांच्यात निखळ मैत्री असू शकते. तुम्ही पत्नीचे मत विचारात न घेता प्रत्येक वेळी तुमचे निर्णय त्यांच्यावर लादल्याचे दिसते. तुमची नोकरी जाण्यास तिलाच जबाबदार धरत आहात, त्यामुळे कदाचित पत्नीची तुमच्याबद्दल आत्मीयता कमी झाली असेल. पती-पत्नीचे नाते दृढ होण्यास एकमेकांवरचा विश्वास खूप मोठी भूमिका पार पाडतो. तुमच्या दोघांची आई-वडील म्हणूनही आता जबाबदारी वाढली आहे. तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन पत्नीशी बोला. तिची बाजूही समजून घ्या. तुमच्या बाळाच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही समजूतदारपणे एकमेकांतील समज- गैरसमज बाजूला ठेवून तुमच्यातील नाते बळकट होईल याचा प्रयत्न करा. नैराश्‍य दूर करण्यासाठी सकारात्मक विचार करा, गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com