#MokaleVha : परीक्षेचा अभ्यास अन् एकाग्रता

Exam-Study
Exam-Study

दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होतील. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता कशी साधावी हा मोठा प्रश्न असतो. त्याचा परिणाम आत्मविश्वासावर होऊ शकतो. आपण मागे पडू अशी भीती वाटू लागते. एकाग्रता म्हणजे सोप्या शब्दात सर्व ज्ञानेंद्रियांच्या साह्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. ज्ञानेंद्रियांद्वारे माहिती स्वीकारली जाणे, ती मेंदूत साठवली जाणे आणि आवश्‍यक तेव्हा आठवून ती चांगल्या पद्धतीने सादर करता येणे, या क्रिया चांगल्या होणे व त्यांच्यात समन्वय असणे, फार महत्त्वाचे आहे. 

अभ्यासात एकाग्रता न होण्याची कारणे : ध्येयासक्ती नसणे, योग्य ध्येयच डोळ्यासमोर नसणे, भावनिक समस्या असणे, अभ्यास करायची मनापासून तयारी नसणे, विषयामधे रस नसणे, विषय अवघड वाटणे, शारीरिक व मानसिक थकवा असणे. मुळात मन स्वस्थ, स्थिर नसेल तर एकाग्रता साधणे शक्‍य नाही. त्यासाठी मन अस्वस्थ असण्याची कारणे जी आपल्याला माहीत आहेत, त्यांची एक यादी करावी. घरातील विश्वासातील व्यक्ती किंवा तज्ज्ञ यांच्या मदतीने त्यांचे निराकरण करावे. भावनिक समस्या किंवा अस्वस्थता असेल तर त्यासाठीदेखील वेळ न दवडता उपचार घ्यावेत.

अभ्यासाला बसताना तो चांगला होईलच, हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सुरुवात करावी. त्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे. रोजच्या अभ्यास नियोजनात ठराविक मिनिटे झाल्यावर पाच-दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्यानंतर काही क्षण श्वासावर लक्ष ठेवून शांत बसावे. त्यानंतर पुढचा अभ्यास करावा. अभ्यास करताना मनात इतर विचार आल्यास स्वत:ला स्टॉप इट, रिलॅक्‍स, बी हिअर नाऊ इत्यादी स्वयं सूचना द्याव्यात. मन वर्तमान क्षणात ठेवण्यास त्याचा उपयोग होईल.

रोजच्या अभ्यासाची आखणी करताना साध्य होऊ शकेल इतपतच अभ्यासाची योजना आखावी. तो करताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. अभ्यासाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल; परंतु S3RQ अशी पद्धत वापरून पहावी. म्हणजे जो अभ्यास आत्ता करायचा आहे, प्रथम त्याचे सर्वसाधारण अवलोकन, काळजीपूर्वक वाचन, त्यातील महत्त्वाचा भाग लक्षात ठेवत उजळणी. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे जो अभ्यास केलाय, तो - समोर एक काल्पनिक व्यक्ती आहे असे मनात आणून तिला समजेल अशा पद्धतीने, पुस्तकात न बघता, मोठ्याने बोलून शिकवणे. ही गोष्ट महत्त्वाची का, तर आपला अभ्यास खरेच झालाय की नाही, आपल्याला समजलेय की नाही याची चाचणी त्यातून होते. या ‘शिकवण्यात’ अडले तर मधूनच पुस्तक/नोट्‌स पाहायला हरकत नाही. त्यानंतर स्वत: प्रश्न काढून उत्तरे लिहिण्याचा सराव करावा.

कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास रोज काही वेळ करावाच. काही विषय आवडत नसतील, तर त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलावा. माझ्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने अभ्यास आवश्‍यक आहे हे मनाला बजावावे. एकाग्रता कमी होतेय असे वाटले, की पुढचा अभ्यास करणे काही वेळ थांबवून, झालेला अभ्यास पुन्हा आठवावा. काही वेळ स्वत:चा श्वास पाहावा. मन अशा पद्धतीने डायव्हर्ट व रिलॅक्‍स होते. थोडा वेळ शारीरिक हालचाली कराव्यात, खोलीतल्या खोलीत चालावे. पुन्हा पुढच्या अभ्यासाला सुरुवात करावी. पूर्वी ज्या वेळी खूप छान एकाग्रतेने अभ्यास झाला होता, त्या वेळची मन:स्थिती वारंवार आठवावी व त्या धारणेने अभ्यासाला बसावे. रोज चल पद्धतीचा व्यायाम (धावणे, वेगात चालणे, पोहणे इ.) करणे आवश्‍यक आहे. ज्यायोगे मेंदूतील पेशींना मुबलक प्राणवायू मिळेल. चांगली संप्रेरके स्त्रवतील. ज्याचा एकाग्रतेवर चांगला परिणाम होईल.

चौरस, पौष्टिक आहार वेळेवर घ्यावा. भरपूर फळे, भाज्या, ओमेगायुक्त, व्हिटॅमिन बी, सी, ए, इ, लोहयुक्तपदार्थ यांचा समावेश त्यात असावा. रोज ‘ओम्‌कार’ करणे, थोडा वेळ शांत संगीत ऐकणे याचाही एकाग्रतेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो.

अभ्यास करण्याची जागा शक्‍यतो एकच असावी. तिथे मोबाईल, टी. व्ही. इत्यादींचा अडथळा नसावा. पाठीचा कणा ताठ राहील अशा पद्धतीने बसूनच अभ्यास करावा. पलंगावर लोळत अभ्यास करू नये. पलंग ही फक्त झोपण्याची, आराम करण्याची जागा आहे. ठरविलेला अभ्यास पूर्ण झाला तर आणि तरच स्वत:ला थोडा वेळ टी. व्ही. वा अन्य मनोरंजनासाठी परवानगी द्यावी. रोजचा अभ्यासाचाच दिवस आणि प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण, तणावरहित, एकाग्रतापूर्ण जाण्यासाठी ‘क्रिएटिव्ह इमेजरी तंत्र’ खूप उपयोगी आहे. ते आत्मसात करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. हे संपूर्ण कल्पनाचित्र एखादा चित्रपट पाहात असल्यासारखे वारंवार डोळ्यासमोर आणायचे आहे. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार व प्रेक्षक आपणच असणार आहोत. कल्पनाचित्रात फक्त आणि फक्त सकारात्मकताच असायला हवी. त्यात बुडून जाऊन, खरेच असे घडतेय असे मानून करायला हवे. अर्थात या तंत्राच्या जोडीला परीक्षेचा जोमाने व नेटाने केलेला खराखुरा अभ्यास हवाच. परीक्षा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न नसून, मेंदूसाठी, आपल्यासाठी, ठराविक वेळेत अभ्यास करून स्वत:ला सिद्ध करण्याची, ती एक संधी आहे हे लक्षात ठेवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com