#MokaleVha : ‘गे’ असल्याने माझी घुसमट होतेय

Mokale-Vya
Mokale-Vya
Updated on

प्रश्‍न - माझे वय २७ वर्षे आहे. मी अजून शिकत असून, कोणताही कामधंदा नाही. मी समलिंगी आहे. जेव्हापासून मला समजले तेव्हापासून माझी खूप घुसमट होते आहे. लहानपणी एका मुलाने मला लैंगिक शोषणाचा शिकार बनवले आणि नंतर मला याची सवय झाली. या सवयीमुळे माझा अभ्यास होत नाही. आई, वडील, कुटुंबाला  डावलून एखाद्या समलैंगिक मुलासोबत एकत्र राहावे, असे सतत वाटते आहे. त्यासाठी मी सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ॲप्सवरून जोडीदाराचा शोध घेत असतो. खरे तर हे माझे सगळे चुकतेय, हे मला समजते. पण, उमजत नाही. मी आजपर्यंत फक्त वासनेच्या विचारांनी गुरफटलोय. वयाच्या १४ व्या वर्षी माझ्यावर हा प्रसंग आला. त्या वेळी हे मी कोणाला सांगू शकत नव्हतो आणि त्यामुळेच हे सतत होत राहिले. बारावी झाल्यानंतर माझ्याकडे मोबाईल आला. पॉर्न बघून मी समाधान करून घेऊ लागलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की, मला मुले आवडतात. एखाद्या मुलासोबत आयुष्यभर राहावे असेही वाटतेय. कायद्यानेही आता अशा संबंधांना मान्यता दिली आहे. पण, समाजाने अजून दिलेली नाही. मला माझे अस्तित्व हवे आहे आणि मला माझं भविष्य चांगले करायचे आहे. हे सर्व विचार सोडून देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. मला काही मार्ग सुचवू शकाल का?

माझ्या मनात येणारे विचार चुकीचे आहेत आणि मला माझ्यात बदल घडवून आणायचा आहे, हे तू स्वतः ठरवले आहेस. त्यामुळे स्वतःमध्ये बदल करणे तुला अवघड असले तरी अशक्‍य नाही. समलैंगिक विचार मनात येणे, हा अपराध नाही. प्रथम तू स्वतःचा स्वीकार कर. हे नैसर्गिक आहे. अमेरिकन मानसशास्त्र संस्थेने वैद्यकीय संशोधन करून समलैंगिकतेची व्याख्या करताना लैंगिकतेच्या विविध आविष्कारांपैकी एक अशी केली आहे. समलैंगिकता ही विकृती नाही तर शरीराची आणि मनाची एक अवस्था आहे. अर्थात तुझ्या बाबतीत तू त्या प्रसंगाला बळी पडल्याने तुला समलैंगिक आकर्षण निर्माण झाले, की मुळातच तुझ्या नैसर्गिक भावना वेगळ्या आहेत हे शोधून काढणे महत्त्वाचे आहे. जरी तुझ्या नैसर्गिक भावना समलैंगिक असतील, तरीही करिअरवर परिणाम होऊ नये यासाठभ प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुला बाहेर पडण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर योग्य समुपदेशन आणि वैद्यकीय मदत, याआधारे तुला तुझ्या विचारांमध्ये बदल घडवून आणता येईल. स्वतःवरचा संयम ठेवण्यासाठी इतर विचारांत गुंतून राहणे, योगसाधना, ध्यानधारणेचाही आधार घ्यावा लागेल.
समुपदेशनासाठी संपर्क - समपथिक ट्रस्ट- ९७६३६४०४८०.

आम्हा पती-पत्नीमधील वाद संपवायचा आहे.
प्रश्‍न - माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली असून, एक वर्षाचा मुलगा आहे. आमचे पती-पत्नीचे अजिबात पटत नाही. वारंवार भांडणे होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात. घरातील वातावरण बिघडून जाते. माझे आई-वडील, भाऊ आणि आम्ही पती-पत्नी सर्व जण तणावाखाली जगत आहोत. मला यातून मार्ग काढायचा आहे. पाच वर्षांत काय चुका झाल्या, यापेक्षा पुढच्या आयुष्यात एकमेकांबरोबर हसतखेळत कसे जगायचे, हे मला पाहिजे. आमच्या भांडणाचा परिणाम आमच्या लहान मुलांवर नको आहे. याबाबत आपण मार्गदर्शन करावे.

कौटुंबिक वादामुळे कुटुंब तणावपूर्ण स्थितीत असते आणि घरातील प्रत्येक सदस्यावर त्याचा शारीरिक आणि मानसिक परिणाम होत राहतो. कौटुंबिक कलहाच्या कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये त्या घरातील सदस्य मधुमेह, रक्तदाब या आजारांचे बळी पडले असल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. म्हणूनच कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवणे खूप गरजेचे आहे. पती-पत्नी दोघेही भिन्न वातावरणात, भिन्न संस्कृतीमध्ये वाढलेले असतात. त्यामुळे एकत्र राहत असताना एकमेकांची मते न पटणे, वादविवाद होणे हे अगदी नैसर्गिक आहे. फक्त हे वाद वेळीच मिटविणे गरजेचे आहे. त्यासाठी कितीही राग असला तरी अबोला धरून बसण्यापेक्षा एकमेकांशी संवाद साधून, आपल्या भावना मोकळ्या करणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा भांडणे आणि वादविवाद नको म्हणून आपण गप्प बसतो. परंतु, त्याचा मानसिक परिणाम होतो. घुसमट होते. मनातील विचार जात नाहीत. त्यापेक्षा एकमेकांशी भांडून मोकळे होणे हेही गरजेचे असते. अर्थात हे विकोपाला जाऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागते.

तुम्ही तुमच्या घरात एकत्र चर्चा करून एकमेकांच्या कोणत्या गोष्टी आवडतात याबाबत कौतुक करून प्रोत्साहन देणे आणि कोणत्या गोष्टी खटकतात आणि त्यात कशा सुधारणा करता येतील याबाबत संवाद साधणे गरजेचे आहे. यासाठी एकदम काही गोष्टी जमत नसतील तर एकत्रित गेटटुगेदर, समारंभ आयोजित करा. घरातील प्रत्येक सदस्याचा सहभाग होईल असे काही करा. उदा. मुलाचा वाढदिवस सर्वांनी मिळून साजरा करणे इ. त्यामुळे एकमेकांबाबतचे कटू विचार हळूहळू निवळतील. सुरवातीला स्वयंसेवी संस्थांमधील समुपदेशनाची मदतही तुम्हाला घेता येईल.
संपर्कासाठी स्वाधार- ०२०-२५५११०६४.

पतीच्या कॉलेज मैत्रिणीमुळे मी अस्वस्थ आहे.
प्रश्‍न - मी ५५ वर्षांची विवाहिता आहे. माझ्या पतीचे वय ६२ वर्षे आहे. आमच्या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत. आमच्या लग्नाच्या वेळी माझ्या पतीचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. परंतु, इतर जबाबदाऱ्यांमुळे त्या मुलीशी लग्न करता आले नाही, हे त्यांनी मला प्राणामिकपणे सांगितले होते. तो सर्व विचार सोडून देऊन आम्ही आतापर्यंत खूप आनंदाचा संसार केला. पण, एक- दीड महिन्यापूर्वी त्या मैत्रिणीने त्यांना फेसबुकवर शोधून काढले आणि त्या दोघांचे बोलणे सुरू झाले. त्यांच्यामध्ये चॅटिंगद्वारे जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू झाले. हे समजल्यावर मी पूर्णपणे खचले. पतीने माझी माफी मागितली. परंतु, माझे मन दुखावले गेले आहे. मी त्या मैत्रिणीशी फेसबुकद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मैत्रीचा हात पुढे केला. पण, तिचा गैरसमज झाला असावा. त्यामुळे तिने मला डिलीट केले. तिला भेटून मला सर्व गैरसमज दूर करायचे आहेत. ती उच्चशिक्षित ६० वर्षांची आहे. आमच्याप्रमाणेच तिलाही सून, जावई, नातवंडे आहेत. या वयात पुन्हा दोघांनी बोलणे योग्य नव्हते. त्यामुळे माझ्या मनातून हे विचार जात नाहीत. मी सतत आजारी पडते आहे. मला मनःशांती हवी आहे. मी काय करावे?

३६ वर्षांच्या आनंदाच्या संसारानंतर हा प्रश्‍न निर्माण झाल्याने तुम्ही अस्वस्थ आहात. पतीची मैत्रीण भेटल्यानंतर अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. पण, आपल्या माणसावर विश्‍वास ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या पतीने त्यांचा भूतकाळ तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितला होता आणि संसारात त्या भूतकाळाचा काहीही परिणाम होऊ दिला नाही. दोन जुने मित्र भेटल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळणे, नैसर्गिक आहे. प्रत्यक्ष भेटले नसले तरी चॅटिंगद्वारे त्यांनी एकमेकांजवळ आपल्या जुन्या संबंधांबाबत चर्चा केली आणि त्याबाबत तुमच्या पतीने तुमची माफीही मागितली आहे. या वयात तुम्हाला ते सोडून जाणार नाहीत, याची तुम्हाला खात्री आहे. परंतु, त्या मैत्रिणीने तुम्हाला डिलीट केले, याचे दुःख तुम्हाला जास्त आहे. त्यामुळे तुमचा अहंकार दुखावला गेला आहे. तिने तुम्हाला डिलीट केले. सुंठेवाचून खोकला गेला, असे समजून मागील सर्व गोष्टी विसरून जा. त्याच त्याच विचाराने तुमच्या शरीरावर व मनावर परिणाम करून घेत आहात. ते विचार बाजूला सारण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जोडीदारावर विश्‍वास ठेवून आनंदाने राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या सहवासात, सोबतीत अधिक वेळ घालवा. त्यांनी चूक केली आहे, असे वारंवार बोलून त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण करू नका. तुम्ही मोठ्या मनाने त्यांची पत्नी आणि त्याबरोबर जिवाभावाची मैत्रीण होण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com