#MokaleVha : सासऱ्यांच्या आजारपणामुळे तणाव

Sucheta-Kadam
Sucheta-Kadam

सासऱ्यांच्या आजारपणामुळे तणाव
मी ३५ वर्षांची विवाहिता असून नवरा, ९ वर्षांचा मुलगा व सासू-सासरे यांच्यासमवेत राहते. सासरे ८० वर्षांचे असून, मागील तीन वर्षे सातत्याने त्यांचे आजारपण चालू आहे. माझ्या नवऱ्यावर सासूचा खूप दबाव आहे. सासूला घरात इतर कोणतेही काम करण्याची सवय नाही. फक्त सासऱ्यांना चहा-जेवण, औषधपाणी देणे एवढेच दिवसभर पाहतात. तेही नवरा कामावरून आल्यानंतर त्याच्याकडूनच करून घेतात. माझ्यासाठी व मुलासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. आईसमोर असताना माझ्याशी छोट्याछोट्या गोष्टींवरून भांडतात. मुलावर आरडाओरडा करतात. त्यामुळे मला त्या घरात राहण्याची अजिबात इच्छा नाही. सासऱ्यांना जेवायला दिले, तरी १-२ तासांत ते विसरतात व तुम्ही मला जेवायला दिले नाही म्हणून चिडतात. त्यांच्यावर दिवसभर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे सासूदेखील माझ्यावर राग काढतात. ज्या घरात आपल्याला काहीही किंमत नाही अशा घरात का राहावे, असा प्रश्‍न मला पडतो. कधीकधी तर आत्महत्या करावी, असेही विचार मनात येतात.

वृद्धावस्थेत २४ तास लक्ष ठेवून व्यक्तीची सेवा करावी लागत असेल, तर कुटुंबातील इतर सर्वांवर त्याचा अतिरिक्त ताण येतो. सासऱ्यांचे आजारपण, त्यांच्या स्मरणशक्तीची समस्या हे ‘डोमेनशिया’ या आजाराचे लक्षण असण्याची शक्‍यता आहे.

सासूला घरातील इतर कामे नसली, तर आजारी व्यक्तीसोबत सातत्याने वावरणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवरही परिणाम होतोच. त्यामुळे नवरा व सासूमध्ये चिडचिडेपणा वाढला असावा. या सर्वांना सांभाळून घेण्याची कसरत यातून अत्यंत टोकाचा आत्महत्येचा विचार तुम्ही केलात. मानसिक तणावातून येणारे हे विचार आहेत.

जवळच्या विश्‍वासातील नातेवाईक, मैत्रिणीशी याबाबत चर्चा करूनही सहकार्य मिळू शकते. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक ताकद वाढविण्यासाठी व आजारी व्यक्तीची देखभाल करताना स्वतःचे स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे, याची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. पुण्यात ‘तपस’ ही संस्था ‘डोमेनशिया’ या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे काम करते. कुटुंबातील व्यक्तींचा ताण कमी करण्यासाठी दिवसभर रुग्णांना सांभाळणे अथवा १/२ महिने संस्थेतच राहून उपचारात्मक कामही करते. २४ तास लक्ष ठेवण्याची गरज असलेल्या कुटुंबातील रुग्णांची तेथील कार्यकर्ते देखभाल करतात, त्यातून कुटुंबावरील अतिरिक्त ताण कमी होतो. योग्य मार्गदर्शनाने इतरांचे स्वास्थ्य टिकून राहते व रुग्णालाही योग्य उपचार मिळतात. तपस ही संस्था ‘कृष्णानगर’, सोमेश्‍वरवाडी, पुणे-८ येथे कार्यरत आहे. 

बायकोचा दुसऱ्या अपत्यासाठी हट्ट
माझे वय ४२ असून, मी व माझी पत्नी दोघेही सरकारी नोकरीत आहोत. मला १० वर्षांचा मुलगा आहे. तो शाळेत हुशार मुलगा म्हणून नावाजला जावा, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी विशेष प्रयत्न करतो. कामावरून आल्यानंतर त्याच्यासोबत चर्चा करणे, मैदानावर खेळायला नेणे, त्याच्या प्रगतीबाबत चौकशी करणे. त्याने कोणाशी मैत्री करावी, याबाबतही मी दक्षता घेतो. परंतु, माझ्या पत्नीच्या मते एकच मुलगा असल्यामुळे मी खूप जास्त काळजी करतो. यातून मुलगा वैतागून जाईल, असे तिचे मत आहे. याला पर्याय म्हणून ती अजून एक मूल होऊ द्यावे, यासाठी माझ्याकडे वाद घालते. मला हे मान्य नाही. आजकालच्या स्पर्धेच्या युगात अजून एका मुलाला घडविण्यासाठी पैसा व वेळ खर्च करणे परवडण्यासारखे नाही. यावरून आमच्यात टोकाचे मतभेद आहेत. नोकरी करणारी स्त्री असून, तिला दुसऱ्या मुलाची अपेक्षा का आहे? यावरून तिला मानोसोपचारतज्ज्ञाकडे न्यावे का, असा प्रश्‍न पडतो.

कोणत्याही समस्येबाबत सल्लामसलत करण्यासाठी प्रत्येक वेळेस मानसशास्त्राचे ज्ञान असावेच, अशी अट नाही. अनुभवी, व्यवहारी शहाणपण असलेली व्यक्ती अनुभव व हुशारी या जोरावर सल्ला देऊ शकते. परंतु, मानसोपचार हे सल्लामसलतीपेक्षा अधिक सखोल असतात. मूल होऊ द्यावे की नाही? आजच्या काळात २ मुलांची जबाबदारी घेण्यास पालक म्हणून तुम्ही दोघेही सक्षम आहात का? ही व्यावहारिक समस्या सोडविणे, यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची गरज नाही. परंतु, तुमच्या प्रश्‍नाभोवती निर्माण झालेले भावनिक ताणतणाव दूर करणे समस्येकडे तटस्थपणे पाहून शांतचित्ताने अधिक चांगल्या पर्यायांचा विचार करणे, हे मानोपचारतज्ज्ञ तुम्हा दोघांना समजावून सांगू शकतो. मुलांना शिस्त लावणे, त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. परंतु, हे करीत असताना काळजीचे रूपांतर अवास्तव भीती, चिंता यातून मुलांवर ताण येईल इतकी बंधने लादली जात नाहीत ना? हे तपासून पाहणे आवश्‍यक असते. तुम्हा पती-पत्नींमधील टोकाचे मतभेद मुलाच्या विकासामध्ये त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून कौटुंबिक अडचणी सोडविण्यास काहीच हरकत नाही. 

‘आई, तू पुन्हा लग्न करून चूक केली’
मी पुनर्विवाह केलेली महिला असून, पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. घटस्फोट घेताना मुलगी लहान असल्याकारणाने माझ्याकडे जबाबदारी घेतली. पहिला नवरा व्यसनी तसेच कोणताही कामधंदा करीत नसे. दुसरे लग्न केले तेव्हा नवऱ्याने मुलीचीही जबाबदारी घेतो, असे कबूल केले होते. आता मुलगी १५ वर्षांची असून, या लग्नातून मुलगा झाला तो ७ वर्षांचा आहे. मुलगा झाल्यानंतर नवऱ्याचे वागणे बदलले. तो मुलीचा सतत रागराग करतो. तिच्या शिक्षणाचा खर्च मी करणार नाही, यावरून आमच्यात भांड णे झालेली मुलीने प्रत्यक्ष पाहिली आहेत. त्यामुळे तीही या नवऱ्याला वडील मानत नाही. त्या दोघांच्या वादात मी कोणाचीच बाजू घेऊ शकत नाही. परंतु, यावरूनही माझी मुलगी माझ्यावर चिडते. सध्या तिचे वागणे खूप बिघडलेले आहे. अभ्यास करीत नाही. मैत्रिणींच्या घरी न सांगता राहते. मी दुसरे लग्न करून चूक केली आहे, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तुझेही काही ऐकणार नाही, असे म्हणते. मुलीच्या भविष्याबाबत खूप काळजी वाटते. आर्थिकदृष्ट्या मी नवऱ्यावर अवलंबून असल्याकारणाने त्याला बोलू शकत नाही. मी काय करावे? 

१५/१६ वर्षांतील मुला-मुलींमध्ये ‘बंडखोरपणे वागणे’ हे वयाचे वैशिष्ट्यच आहे. वाढत्या वयातील शारीरिक व मानसिक बदलाचे हे परिणाम आहेत. तुमची मुलगी याच वयोगटातील असल्याकारणाने तिला वडील आपला रागराग करतात, हे स्पष्टपणे कळले आहे. तिला आपण मोठे झालो आहोत, आपले निर्णय आपणच घ्यावे, असेही वाटत असेल. परंतु, अनुभवाच्या अभावातून विचारात तीव्रता असली, तरी ते परिपक्व व समंजस विचार नसतात. तुमच्याबाबतीत ती जे बोलते हे तुम्ही मनावर न घेता तिच्याशी वारंवार संवाद साधून तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही, याचा प्रयत्न सातत्याने करा. तिच्या बोलण्याकडे काही वेळा दुर्लक्ष करून वाद टाळा. परंतु, तिच्या मैत्रिणी कोण आहेत? कोठे राहतात? याविषयी माहिती घ्या. त्या मैत्रिणींशीही संवाद ठेवा, यातून मुलीची सुरक्षिततेची काळजी घेऊ शकाल. मुलीची आर्थिक जबाबदारी तिचा शैक्षणिक खर्च याकरिता तुम्हाला स्वतः आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे साधन शोधता येऊ शकते का? छोटीशी नोकरी करणे किंवा उत्पन्न मिळू शकेल असा व्यवसाय करणे जे तुम्हाला जमू शकेल, याबाबत प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नात या समस्येची तीव्रता कमी होण्याची शक्‍यता अधिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com