#MokaleVha : जोडीदार निवडताना...

When choosing a spouse
When choosing a spouse

विशाखा अतिशय हुशार मुलगी. शाळेपासून ते एम. कॉम.पर्यंत सतत प्रथम क्रमांक मिळवत आलेली. लवकरच आपण सीए (सनदी लेखापाल) होणार, हा तिच्यासह सगळ्यांनाच विश्वास होता. सतत अभ्यास करणारी कष्टाळू मुलगी, हीच विशाखाची ओळख होती. तिच्या आई-वडिलांना आता विशाखाचे लग्न करावे, असा विचार मनात आला. विशाखानेसुद्धा यासाठी अनुकूलता दर्शविली. दोन वर्षांत अनेक स्थळे त्यांनी बघितली. परंतु, प्रत्येक स्थळामध्ये काहीतरी उणीव काढून विशाखा ते स्थळ नाकारत असे. आई-वडील अगदी हवालदिल झाले. त्यांनी विशाखाला माझ्याकडे समुपदेशनासाठी आणले.

विशाखाशी चर्चा करून तिच्या मनातील जोडीदाराची व्याख्या काय, निकष काय, हे सगळे मी समजून घेतले. आपण हुशार असल्यामुळे आपला भावी नवरा आपल्यापेक्षा जास्त शिकलेला असावा, तसेच तो माझ्यापेक्षा जास्त नावाजलेला असावा, त्याला उत्तम पगाराची नोकरी असावी किंवा त्याचा व्यवस्थित जम बसलेला व्यवसाय असावा, ही तिची मागणी होती. स्वतःचे घर, स्वतःची चारचाकी गाडी असलीच पाहिजे, ही धारणा विशाखाची होती. परंतु, तो माझ्यापेक्षा वयाने जास्तीत जास्त दोन ते तीन वर्षांनीच मोठा असावा, हे तिच्या मनात पक्के होते.

वरवर पाहता या सर्व मागण्या सगळ्यांनाच अतिशय रास्त वाटत होत्या. आपण लग्नाच्या अनेक जाहिराती बघतो; ज्यामध्ये उच्चशिक्षित, लठ्ठ पगाराची नोकरी किंवा व्यवसाय असलेला, स्वतःचे घर, चारचाकी गाडी, इस्टेट, जमीन असलेलाच नवरा पाहिजे, अशी मागणी केलेली असते.

आपल्या भावी जोडीदाराकडे ही सर्व भौतिक सुखे असावीत, ही मागणी करणे चुकीचे नाही. परंतु, अशी मागणी करताना आपण स्वतःच्या वयामध्ये या सर्व मागण्या पूर्ण करू शकतो का, याचा सारासार विचार करावा. आपल्यापेक्षा उच्चशिक्षित जोडीदार पाहिजे असल्यास त्याचे वय आपल्यापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. भौतिक सुखे कमवायला वेळ लागतो. त्यामुळे असा श्रीमंत जोडीदार आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठाच असणार आहे. हे स्वीकारायला आपण तयार आहोत का, हा प्रश्न स्वतःलाच विचारायला पाहिजे.

विशाखाची इथेच चूक होत होती. तिला तिच्यापेक्षा उच्चशिक्षित व श्रीमंत नवरा पाहिजे होता. परंतु, एकमेकांच्या वयामध्ये जास्तीत जास्त दोन ते तीन वर्षांचेच अंतर पाहिजे होते. जी गोष्ट आपल्याला जमलेली नाही ती दुसऱ्याला कशी जमेल, हा विचारच केलेला नव्हता. त्यामुळेच लग्नामध्ये आडकाठी येत होती.

जोडीदार निवडताना त्यांची शैक्षणिक पात्रता बघितलीच पाहिजे. परंतु, शैक्षणिक पात्रता ही केवळ डिग्रीच्या कागदाने ठरत नाही. तो कागद महत्त्वाचा असतोच; पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तीची आकलनशक्ती, पुढे जाण्याची जिद्द, काम करण्याची चिकाटी हे गुण जास्त महत्त्वाचे आहेत. भावी जोडीदाराकडे हे गुण असतील तर नक्कीच त्या व्यक्तीचा भविष्यकाळ चांगलाच असेल. ती व्यक्ती पुढे जाऊन आपल्या आयुष्यात नक्कीच चांगलं काम करू शकेल, हा विश्वास येतो. मग सद्य परिस्थितीत ती व्यक्ती खूप श्रीमंत नसली, तरी आपली साथ त्याला मिळाल्यास नक्कीच पुढील आयुष्यात तो आपल्याला सुखी ठेवू शकेल.

भौतिक ऐश्वर्य हे कायमस्वरूपी नसते. बऱ्याच वेळेला ही श्रीमंती वडिलोपार्जित असते. आपली शैक्षणिक पात्रता मात्र आपल्याबरोबर कायमस्वरूपी टिकते. एखादी व्यक्ती पैशाने श्रीमंत नसली; परंतु तिच्यामध्ये अथक परिश्रम करायची तयारी असेल, तर नक्कीच ती व्यक्ती पुढे जाऊन मोठे नाव कमावते. त्यामुळे भावी जोडीदार निवडताना त्याच्यामध्ये हे गुण आहेत का? हे तपासून पाहावे. तसेच, आपली साथ मिळाल्यावर आपण यशाची उत्तुंग शिखरे गाठू, हा विश्वास एकमेकांना यायला पाहिजे. अशा समजुतींवर जडलेले नाते हे चिरकाल टिकते.

लग्न ठरवताना पैशाच्या श्रीमंतीबरोबरच भावी जोडीदाराच्या सामाजिक स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. सामाजिक निकषांमध्ये धर्म, जात, पोटजात, गोत्र, समाजामध्ये असलेला मानसन्मान, समाजामध्ये कुटुंबाची असलेली प्रतिमा, याबद्दल खूप जवळून पडताळणी केली जाते.

ही तपासणी जरूर करावी. परंतु, हे अवलोकन करताना पूर्वग्रहदूषित नजर नसावी. वेगळ्या धर्मातील, जातीतील जोडीदार चांगला नसणारच, हा गैरसमज बाळगू नये. प्रत्येक पंथामध्ये बहुतांश चांगले आणि काही वाईट लोक हे असणारच. पडताळणी करताना आपल्या भावी जोडीदाराची मानसिक जडणघडण, कुटुंबातील आपलेपणा, कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी असलेला सुसंवाद याला जवळून बघावे. 

समाजातील इतर लोक त्या कुटुंबाबद्दल काय प्रतिक्रिया देतात, हे डोळसपणे जाणून घ्यावे. एकाच धर्मात, जातीत लग्न झाले; तरीही आपल्याला लग्नानंतर काही तडजोडी करायलाच लागतात. वेगळ्या धर्मात किंवा जातीत लग्न झाले, तर या तडजोडींची संख्या वाढते. आपण या तडजोडी स्वीकारायला तयार आहोत का, हा प्रश्न प्रथम स्वतःला विचारावा तसेच आपला भावी जोडीदार आपल्याला यामध्ये १०० टक्के मदत करू शकेल का, हे जाणून घ्यावे. दोघेही एकमेकांना मदत करायला तयार असतील, तरच लग्नाची उडी घ्यावी.

लग्न जमविताना भावी जोडीदाराकडे जास्त लक्ष द्यावे. जोडीदाराचे शिक्षण, स्वभाव, वागण्याची व बोलण्याची शैली, समजूतदारपणा आणि आपल्याला सांभाळून मदत करायची वृत्ती, या गोष्टींना जास्त महत्त्व द्यावे. जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले नाते व समाजामध्ये वागण्याची रीत जाणून घ्यावी. असे केल्यास भावी आयुष्यात दोघेही एकमेकांना पूरक ठरतात व जीवनात सुख-समृद्धीचा पाऊस पडतो. होतकरू, महत्त्वाकांक्षी, कामसू आणि आपल्याला भक्कम साथ देणारा जोडीदारच आपले वैवाहिक आयुष्य सुखी करू शकतो. रूढी-परंपरांना व समाजातील गैरसमजुतींना फाटा देऊन चिरकाल आपली साथ निभावणारा जोडीदार आपल्या सगळ्यांना मिळो, हीच सदिच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com