#MokaleVhaa : मुलगी लग्न करायला तयार नाही

Mokale-Vya
Mokale-Vya

मी सरकारी अधिकारी असून, पत्नी शिक्षिका आहे. आम्हाला एकच मुलगी असल्याकारणाने अत्यंत लाडात कौतुकाने मुलीला वाढवले. तिच्या मनाविरुद्ध कधीही कोणता निर्णय घेतला नाही. शिक्षण, नोकरी हे सर्व तिने स्वतःचे निर्णय घेऊन उत्तमप्रकारे प्रगती केली. त्याबाबत आम्हाला तिचा अभिमान आहे. परंतु, आता तिचे वय २९ आहे. गेली दोन-तीन वर्षे आम्ही तिच्याशी लग्नाबाबत चर्चा करीत आहोत. परंतु ती ‘लग्न करायचे नाही’ असे ठामपणे सांगत आहे. नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांच्या माध्यमाने मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला. परंतु, तिला लग्न का करायचे नाही हेही आम्हाला कळाले नाही. आमच्यानंतर मुलगी एकटी पडेल ही भीती मनात आहेच. परंतु, तिने असे एकाकी आयुष्य का जगावे, असाही विचार येतो. तिला कसे समजावून सांगावे हेच कळत नाही.

मुलीविषयी असलेली आपुलकी, प्रेम यातून तिच्या भविष्याविषयी तुम्हाला काळजी वाटते. परंतु, तुम्ही मुलीला स्वतःचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीने घेण्याचे व ती जबाबदारी योग्यप्रकारे पूर्ण करण्याचे संस्कार दिलेले आहेत, ते वाया जाणार नाहीत यावर विश्‍वास ठेवल्यास मुलीच्या निर्णयामागील कारणे शोधा. तिच्याशी चर्चा करा. तिचे काही विचार चुकीच्या दिशेने आहेत, असे लक्षात आल्यास योग्य दिशा देता येईल. ‘लग्न केलेच पाहिजे’ याच विचारांतून आईवडील आपल्याशी बोलतील, या भीतीने ती तुम्हाला निर्णयामागील कारणे सांगत नसावी. तुझा कोणताही निर्णय कायम राहिला तरी, आम्ही तुझ्या त्या निर्णयाबरोबर आहोत हा विश्‍वास तिच्याच निर्माण करण्याचा प्रयत्न करा. ठराविक वयोमर्यादेतच लग्न होतात, लग्नाचा हा काळ संपला आहे, त्यामुळे तिचे लग्नच होणार नाही, ही भीतीही अनाठायी आहे. मुलीला वैवाहिक समुपदेशकाकडे पाठवून तज्ज्ञ व्यक्तीच्या मध्यस्थीने प्रयत्न केल्यास नेमकी कारणे समजण्यास मदत होऊ शकते. 

पतीला मी गृहिणी असणे आवडत नाही
मी ३५ वर्षांची विवाहिता असून, ७ व १० वर्षांच्या मला दोन मुली आहेत. माझे पती प्राध्यापक आहेत. त्यांचा छोटा व्यवसायही आहे. लग्नानंतर मी गरज म्हणून तीन-चार वर्षे नोकरी केली. परंतु, मुली झाल्यानंतर सोडून दिली.

माहेरी कोणत्याच कामाची सवय नव्हती. त्यामुळे लग्नानंतर स्वयंपाक करणे, घरातील इतर कामे तसेच नोकरीवर जाणे हे सर्व करताना मला खूप त्रास होत असे. वडिलांनी मला होणारा त्रास पाहून दुकान माझ्या नावे करून दिले. त्याचे मला तीस हजार भाडे मिळते. त्यामुळे मला नोकरीची गरज वाटत नाही. परंतु, माझ्या नवऱ्यास व त्याच्या नातेवाइकांना माझे घरात असणे आवडत नाही. काही कारणाने भांडणे झाल्यास सासू म्हणते, ‘हिला नोकरीला लाव म्हणजे मिजास करणार नाही’ माझा नवरा दिवसरात्र कामानिमित्त बाहेर असतो. घरातील कोणत्याच कामाची जबाबदारी घेत नाही. त्याचा स्वभाव रागीट आहे. मला फिरायला नेणे, शॉपिंग यासाठी तो स्वतःचे पैसे खर्च करत नाही. खरेतर मला त्याच्यासोबत राहायला आवडत नाही. आपण का या माणसासोबत राहतो, हेच कळत नाही. परंतु, मुली आहेत व जग काय म्हणेल या भीतीने दिवस ढकलते. काय केल्यास नवऱ्याच्या वागण्यात फरक पडेल?

दोन वेगवेगळ्या कुटुंबात वाढलेल्या व्यक्ती विवाहानंतर एकत्र राहायला लागल्या की, ज्या कुटुंबात वाढल्या आहेत, तेथील संस्कार, नातेसंबंध, नवीन नात्यावर प्रभाव टाकतात. तुम्हाला होणारा त्रास पाहून वडिलांनी नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले. त्यामुळे तुमच्या सासरच्या लोकांच्या याबाबत भावना काय झाल्या हे समजून घ्या. पैसा कसा मिळवावा किंवा किती असावा, याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या धारणा असतात. तुमच्या नवऱ्याचे दिवसरात्र काम करणे, तुम्हाला वेळ न देणे यामागे त्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, स्वप्ने काय आहेत, कुटुंबात वेळ, पैसा देऊ शकत नसल्यास आम्ही तुमच्याकडून नेमक्‍या कोणत्या अपेक्षा ठेवायच्या, याबाबत संवाद साधा. माहेरची स्थिती सासरपेक्षा चांगली असल्याने त्यांच्या मनात द्वेष निर्माण झाला का? हे पहा. तुमच्या कोणत्या वागण्यामुळे ते नाराज आहेत? हे समजून घ्या. मुलींची जबाबदारी तुम्हाला एकटेपणाने पेलवणे सद्यपरिस्थितीत अवघड जाते आहे. मुलींना वडिलांच्या आधाराची निश्‍चितच गरज आहे. त्यामुळे नवऱ्याबाबतचे विचार वेगळ्या दृष्टिकोनातून तपासून पाहणे गरजेचे आहे. 

पतीला मारल्यापासून तो बोलतच नाही
माझे वय ३८ वर्षे असून, शिक्षण खेडेगावात झाले. नोकरीनिमित्त पुण्यात आले. पुण्यात नोकरी करताना प्रेमसंबंध झाले. आईवडिलांचा लग्नाला विरोध होता. परंतु, सासरच्यांनी स्वतः लग्न करून घेतले. लग्नाला १२ वर्षे झाली. खासगी कंपनीत नोकरीस असल्याने सकाळी आठ वाजता घराबाहेर पडते. घरी यायला रात्रीचे नऊ वाजतात. नवराही नोकरी करतो. त्याने जागेचे काही व्यवहार चुकीच्या माणसांसोबत केल्यामुळे, त्याचे खूप पैसे अडकून पडलेत.

त्यामुळे आमच्यावर कर्ज झाले. परिणामी, त्याचे घरात लक्ष नसते. आठ वर्षांचा मुलगा आहे. त्याची शाळा, अभ्यास मीच पाहते. तरीही सासू व नणंद मलाच नावे ठेवतात. घरातील कामे नीट करत नाही, बाहेरचे खाणे मागवते. यावरून नवऱ्याचे माझ्याविषयीचे मत दूषित केले आहे. त्यामुळे तो माझ्यावर राग काढतो. नोकरीचा ताण, घरातील वाद, कोणाचाही सपोर्ट नाही. खूप चीड आल्याने मी नवऱ्याला मारले. तेव्हापासून तो माझ्याशी बोलतच नाही. तुमची मुलगी वेडी झाली आहे, तिला घेऊन जा, असे त्यांनी माझ्या वडिलांना फोन करून सांगितले. मी काय करू?

आयुष्यात सर्व सुरळीत चालले असताना माणसांच्या स्वभावाचा नेमका अंदाज आपल्याला येत नाही. आपल्यावर आलेल्या संकट, संघर्षाच्या काळात तो आपल्याला समजतो. अशा वेळी स्वतःला खंबीरपणे सांभाळणे व परिस्थितीला हाताबाहेर जाऊ न देणे, हे कौशल्य असते. सध्या तुम्ही पती-पत्नी दोघेही अत्यंत ताणतणावात आहात. अशा काळात एकमेकांना आधार नाही देऊ शकलो, तरी त्रास द्यायचा नाही, असे वर्तन ठेवल्यास एकमेकांविषयी द्वेष निर्माण होणार नाहीत. तुमचा नवरा आर्थिक अडचणीत आहे, तो तणावात झाल्यामुळे तुम्ही व मुलांकडे दुर्लक्ष करीत असण्याची शक्‍यता आहे. तुमच्यावरही नोकरीची वेळ, प्रवास तसेच घरातील कामे यामुळे ताण वाढला आहे. त्यातूनच हिंसा करण्यापर्यंत तुमचे वर्तन घडले.

आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. इतरांनी पतीला आपल्याबद्दल सांगितल्यानेच त्याचे आपल्याविषयीचे मत दूषित झाले असेल, ही भीती काढून टाका. कामाचे व वेळेचे योग्य नियोजन केल्यास दैनंदिन ताणाचे प्रमाण कमी होईल. तुमच्या अडचणींविषयी मैत्रीण किंवा विश्‍वासातल्या व्यक्तींशी मोकळेपणाने चर्चा करा. सहकार्य घ्या. मेडिटेशन, योगा, फिरायला जाणे यातून मानसिक शांतता मिळविता येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com