कोरोनाचे महाआख्यान...

लशीचे दोन डोस घेऊनही आम्हाला कोरोनाने गाठल्याचे लक्षणांनंतर दोन दिवसांनी निदर्शनाला आले. तथापि, त्यावर हुकमी इलाज करणारी ठरली ती मोनोक्लोनल ॲन्टिबॉडी कॉकटेल थेरपी. त्यामुळेच आम्ही लवकर घरी परतूही शकलो.
Monoclonal Antibodies for Treatment
Monoclonal Antibodies for Treatmentsakal media
Summary

- डॉ. अरुण साळुंखे

लशीचे दोन डोस घेऊनही आम्हाला कोरोनाने गाठल्याचे लक्षणांनंतर दोन दिवसांनी निदर्शनाला आले. तथापि, त्यावर हुकमी इलाज करणारी ठरली ती मोनोक्लोनल ॲन्टिबॉडी कॉकटेल थेरपी. त्यामुळेच आम्ही लवकर घरी परतूही शकलो.

Summary

नमस्कार मित्रांनो, आम्हाला नुकताच आलेला अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे. मी २५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूरला काही काळ थांबून परतत असताना मला खूप थकवा जाणवू लागला. हा प्रवासादरम्यानचा त्रास असेल, असं वाटून त्याकडं दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशीही तसाच थकवा जाणवला, मात्र मी माझ्या ‘ओपीडी’मध्ये काम करीत राहिलो. त्याच सायंकाळी माझी पत्नी संध्याला थोडी थंडी वाजून आली, तिचा ताप ९९ अंश फॅरेनाइट होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला प्रचंड दमल्यासारखं जाणवू लागलं, थकवा आला आणि शरीरात सर्वत्र वेदना होऊ लागल्या. माझ्या शरीरातील सर्व ऊर्जा बाहेर पडल्यासारखं वाटू लागलं. संध्यालाही थोडा ताप होता. इतर लक्षणं माझ्यासारखीच होती. त्याच आठवड्याच्या शेवटी मित्रांबरोबर आम्ही ट्रीपचं आयोजन केले होते. त्यामुळं इतरांना धोका नको म्हणून संध्यानं ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा आग्रह धरला. घशात आणि नाकात त्या काड्या घालण्याचा अनुभव भयंकरच होता. त्या दिवशी सायंकाळी स्पाइक्स असलेल्या त्या कोरोनाच्या विषाणूनं आमच्या शरीरात चांगल्या प्रकारे आश्रय घेतल्याचं आणि गावच वसवायला घातल्याचं आम्हाला समजलं. आमची नोंद ‘कोरोना पॉझिटिव्ह’ म्हणून झाली.

आमचं लसीकरण झालेलं असूनही तो विषाणू आम्हाला लाखो लोक जाऊन आलेल्या आणि नरकयातना भोगलेल्या घळीमध्ये ढकलायचा प्रयत्न करीत होता. या परिस्थितीत तुम्ही स्वतःला एखाद्या सक्षम व्यक्तीच्या हाती सोपवणं, हा चांगला निर्णय असतो. त्यामुळं मी मंगेशकर हॉस्पिटलमधील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग यांना फोन केला. आमचे वय जास्त होतंच, शिवाय सहव्याधीही होत्या. आमच्या लक्षणांबद्दल ऐकल्यानंतर डॉ. प्रयाग यांनी सल्ला दिला की, मोनोक्लोनल ॲन्टिबॉडी कॉकटेल थेरपी घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ही थेरपी वृद्ध व सहव्याधी असलेल्या आणि सौम्य व मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना सुचविली जाते. ही थेरपी घेण्याचा सर्वांत चांगला कालावधी लक्षणं दिसू लागल्यापासून २ ते ५ दिवसांचा असतो. त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसत नाहीत. आम्ही तातडीनं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. डॉ. मनीषा देशमुख या आणखी एका तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले. माझा विद्यार्थी व हॉस्पिटलमधील वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रणजित देशमुख यानं ही प्रक्रिया सोपी करण्यात मदत केली. माझी मुलगी डॉ. मनालीनं हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. कागदपत्रांचे सोपस्कर पूर्ण केले. रक्ताचे सर्व नमुने सामान्य होते, मात्र काही इन्फ्लेमेटरी मार्कर्स दिसून आले. त्याच रात्री आम्हाला दोघांनाही ती कॉकटेल ॲन्टिबॉडी थेपरी शिरेमधून दिली गेली.

थेरपी लागू पडली!

ही थेरपी देऊन एक मिनिटही झाला नव्हता, मला फार्मसी डिपार्टमेंटमधून या ‘कॉकटेल’ची किंमत सांगणारा फोन आला. त्यानंतर मला लक्षात आलं की, विषाणूविरुद्धचा हा लढा माझा खिसाही रिकामा करणार. मी माझ्या इन्शुरन्स कंपनीला फोन केला. कंपनीनंही आपण या लढ्याचा आर्थिक भार उचलू, असं आश्‍वासन दिलं. मात्र, इन्शुरन्स ऑफिसला पॉलिसीची प्रत, पॅन कार्ड, आधार कार्ड हे सर्व प्रूफ हवे होते. सुदैवानं, मी ते सर्व माझ्या फोनमध्ये सेव्ह केलेले होते. त्यामुळं हा प्रश्‍न चुटकीसरशी सुटला. हे आमच्या दृष्टीनं एक प्रकारचे सांत्वनच होतं. दुसरा दिवसही काही फार आरामदायी नव्हता. आमच्यातील कोरोनाची लक्षणं कायम होती. या थेरपीच्या अस्त्रानं काम केलं अथवा नाही, अशी काळजी आम्हाला वाटू लागली. मात्र, दोन्ही तज्ज्ञ डॉ. प्रयाग आणि डॉ. देशमुख यांनी ही थेरपी काम करायला एक-दोन दिवसांचा कालावधी लागतो, असे सांगून आश्‍वस्त केलं. त्यानंतर पुढचा दिवस, शुक्रवार उजाडला. हा आमच्यासाठी खरोखरच ‘गुड फ्रायडे’ होता.

आम्ही पाच दिवसांच्या जागरणानंतर प्रथमच चांगली झोप घेऊन उठलो होतो. नाट्यमयरीत्या, आमचा ताप, अंगदुखी हे सर्व आमच्यापासून खूप दूर पळालं होतं. आम्हाला इतर दिवसांप्रमाणंच फ्रेश वाटत होतं. हे अस्त्र काम करून गेलं होतं. दोन्ही तज्ज्ञ डॉक्टर्स आले आणि आम्हाला तपासल्यानंतर तुम्ही एकदम फिट आहात. घरी जाऊ शकता, असं आनंदानं जाहीर केलं. अर्थात, घरामध्ये दहा दिवस आयसोलेसनमध्ये राहण्याची अट होतीच. पुढील महिन्यासाठी दररोज ॲस्परिनच्या गोळीशिवाय इतर कोणतीही औषधे सांगितली नव्हती. आता आम्ही आमच्या घरी आयसोलेशनमध्ये आहोत. सर्व कामं व्यवस्थित करीत आहोत. पुढील दहा दिवस आम्ही आमचे वादविवाद, ऐक्य आणि मतभेद यांचा छानपैकी आनंद घेणार आहोत. ऑफिसचं कोणतंही काम नाही, किराणा सामान आणणं नाही, मित्र आणि कुटुंबीयांच्या भेटीही नाहीत. मी मंगेशकर हॉस्पिटलमधील सर्व सल्लागार, त्यांची टीम, माझा सहकारी डॉ. रणजित, डॉ. महेश कुलकर्णी यांचे आभार मानतो.

मित्रांनो, हे सर्व सांगण्यामागचा माझा उद्देश कोरोना महासाथ अद्याप संपलेली नाही, याची जाणीव तुम्हाला करून देण्याचा आहे. लशीचे दोन्ही डोस घेतले तरी या नटखट विषाणूपासून तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळत नाही. तुम्ही उपलब्ध असल्यास तिसरा डोसही घेणं आवश्‍यक आहे. तुम्हाला दिसणारी लक्षणं कितीही किरकोळ असली, तरी त्याकडं अजिबात दुर्लक्ष करू नका!

(लेखक ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com