love
Esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
रखरखतं ऊन पडलं होतं. असह्य उकडत होतं. जून सुरू होऊन अर्ध्यावर आला होता, तरी पावसाची लक्षणं काही दिसत नव्हती. समस्त प्राणिमात्रांचे डोळे आकाशाकडे लागले होते. मी मात्र माझ्या चिनी बनावटीच्या हलक्या दर्जाच्या वॉकमनवर लावलेल्या कॅसेटमुळे चिंब झालो होतो...
ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं
भर उन्हात पाऊस येऊन आभाळ मनात दाटतं
तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही
घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो...
कवी सौमित्र याचा खर्जातला, खोल, गंभीर आवाज त्यांनीच लिहिलेली कविता म्हणू लागला आणि अंगावर घामाचे ओघळ वाहत असले, तरी मी मात्र पावसात भिजायला निघून गेलो... सौमित्रसह!
कविता संपली. थोडा पॉज. मग संथ पावसाच्या लयीसारखं प्रसन्न करणारं गाणं सुरू झालं.... गारवा.... मिलिंद इंगळे यांचा मधाळ, खोल स्वर आणि धुंद करणारे शब्द... ‘प्रियेSS तुझा जसा गोडवा, नवा नवा...’