सासू असली तरी शेवटी 'ती' असते आईच

mother-in-law is the mother
mother-in-law is the mother

मीनाताईंच्या घरी आम्ही दर मंगळवारी जातो. आमचा 18-20 जणींचा ग्रुप आहे. पण, आज क्‍लासला 3-4 जणीच आलो. बाकीच्या कदाचित श्रावण महिना असल्यानं घरी वा नातेवाइकांकडं कोणाची तरी मंगळागौर असेल म्हणून गैरहजर असतील. चारच जणी असल्यानं आम्ही बाईंशी गप्पा मारत बसलो. एरवी क्‍लासला आलं, की बाईंनी शिकवलेलं आत्मसात करायचं. गप्पा, बोलणं, अवांतर विषयावर चर्चा वगैरे काहीच नसतं. सप्तशती, विष्णू सहस्रनाम, शिवमहिमा स्तोत्र, श्रीसूक्त, अथर्वशीर्ष वगैरे बरंच काही शिकवतात. बाईंनी शैलाताईंना विचारल्यावर त्या म्हणाल्या, 'बाई माझ्या सुनेच्या लग्नाची बैठक होती. त्यामुळे गेला महिनाभर निर्णय घेण्यातच वेळ गेला. ते ऐकून आमच्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ते पाहून त्या म्हणाल्या, 'सांगतेच तुम्हाला सगळं.' 

" मिहिर माझा एकुलता एक मुलगा. चार-पाच वर्षांपूर्वी त्याचं नेहाशी ठरवून लग्न झालं. दोघंही एकमेकांना अनुरूप असेच. नेहा स्वभावानं खूप प्रेमळ आणि लाघवी. आमच्या दोघींचं मैत्रिणीसारखं नातं. काही समजावून सांगितलं, की समंजसपणे वागणारी. घरात आम्ही तिघंच. यांच्या अपघाती अकाली जाण्यानं संसार विस्कटलेला होता. पण, मी दुःख बाजूला सारून मिहिरकडं बघून स्वतःला सावरलं. त्याला शिकवलं, इंजिनिअर केलं. त्याला घवघवीत यश मिळालं आणि कंपनी कॅम्पसमधून त्याला चांगल्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी लागली. नेहालाही बँकेचा जॉब होता. सगळं कसं छान चाललं होतं. नेहालाही बँकेतील जॉब होता. दोनच वर्षांत नीरजा परीचं आमच्या कुटुंबात आगमन झालं. नीरजा सहा-सात महिन्यांची झाली अन्‌ नेहा नोकरीला जाऊ लागली. गुडघेदुखीनं परीला सांभाळणं मला अवघड झालं. पण, ती सामंजस्यानं निरजाला घरगुती पाळणाघरात ठेवू लागली. सगळं व्यवस्थित चाललं असताना 'पण' मध्ये आला. एक दिवस खूप डोकं दुखतंय म्हणून घरी आलेला मिहिर तापानं फणफणला. ताबडतोब त्याला दवाखान्यात अॅडमिट केलं. डॉक्‍टरांनी त्याला तपासलं. ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल म्हणून सांगितलं. लगेच त्याला ऑपरेशनला टेबलवर घेतलं. पण, ऑपरेशननंतर मिहिर शुद्धीवर आलाच नाही. सर्वांना सोडून तो गेला. होत्याचं नव्हतं झालं. दोघींमध्ये समजूत तरी कशी काढायची. पण, काही दिवसांतच मी स्वतःला सावरलं. सुनेची व नातीची केविलवाणी अवस्था पाहून माझी घालमेल झाली. आपण नेहाच्या मागं खंबीरपणे उभं राहायला हवं, हे उमगलं. मी दुःखाचं गाठोडं करून समुद्रात फेकलं. धैर्यानं तोंड दिलं. काही दिवसांत नेहा नोकरीला जाऊ लागली. दोनेक वर्षंमध्ये गेली. 

एक दिवस बोलता बोलता आमच्या शेजारच्या देशपांडे काकू सांगत होत्या की, अहो, शैलाताई माझ्या भावाच्या मुलानं त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सरिताशी लग्न केलं. ती दहा महिन्यांच्या मुलाला घरी ठेवून तिच्या आईच्या घरी गेली, ती परत आलीच नाही. त्या बाळाला त्याची आजी म्हणजे माझी वहिनी सांभाळते. ते ऐकून माझ्या एकदम लक्षात आलं, त्यांना नेहाविषयी विचारू का? 'शुभस्य शीघ्रम'प्रमाणं मी त्यांच्याशी याविषयी बोलले. त्यांनी भावाच्या भाच्याच्या कानावर घातलं. तोपर्यंत त्यांचा घटस्फोटही झाला होता. बोलणं, विचारणं, परस्परपरिचय व दोघांना भेटून वेळ देणं झालं. दोघांच्या संमतीनं नेहाचं व नितीनचं रजिस्टर लग्न झालं. एका मोठ्या जबाबदारीतून सुटले. पण, नेहाला बजावलं हे घर म्हणजे आयुष्यभर तुझं माहेरच असेल. 
पोटचा मुलगा गेल्यावर ते दुःख उराशी बाळगून सुनेला नवीन संसार थाटण्यासाठी पहाडासारखं उभ्या राहणाऱ्या शैलाला धन्यवाद देत आम्ही क्‍लासमधून घरी परतण्यास निघालो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com