आज फिर जिने की तमन्ना है!

राजभवन जगातल्या सर्वाधिक देखण्या वास्तूत शोभणारे. खानदानी कुलीनत्वाचा दिमाख मिरवणाऱ्या या परिसरात समुद्रही शालीन, घरंदाज, संयत आग्रही पण धीरगंभीर.
waheeda rehman
waheeda rehmansakal

६० ते ८० या दोन दशकात पुरुषी जोखड झुगारून महिला व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारल्या त्या वहिदा रेहमान यांनीच. रेश्मा और शेरासारखे अनवट सिनेमेही त्यांनी केले. लम्हें या अगदी अलिकडच्या चित्रपटात त्यांनी श्रीदेवी-अनिल कपूर यांच्या प्रेमनात्याला समजून आकार देणारी गव्हर्नेस साकारली, ती कमालीच्या ताकदीने. परवा त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला अन्‌ वहिदा आठवल्या फ्लॅशबॅकप्रमाणे...

राजभवन जगातल्या सर्वाधिक देखण्या वास्तूत शोभणारे. खानदानी कुलीनत्वाचा दिमाख मिरवणाऱ्या या परिसरात समुद्रही शालीन, घरंदाज, संयत आग्रही पण धीरगंभीर. या पार्श्वभूमीवर कितीतरी ऐवजदार माणसे भेटत एकेकाळी. पुढच्या मागच्या विस्तीर्ण हिरवळींवर नित्यनेमाने स्वागतसमारंभ होत. दिमाखात भर घालणारी माणसे आवर्जून हजेरी लावत.

एस. एम. कृष्णा राज्यपालपद सांभाळत असताना कलाकारांच्या तारकादळांना आग्रहाचे आमंत्रण देत असत. पृथ्वीला सुरलोकसाम्य देऊ शकणाऱ्या अशा निमंत्रितांची रेलचेल असे तेथे त्या काळी. एक दिवस अचानक अवतरल्या वहिदा रेहमान. सौंदर्याचे मूर्तिमंत प्रतीक. नितांत खानदानी व्यक्तिमत्त्व. फिल्मी थिल्लरपणाचा किंचितही वास नाही, सवंग लोकप्रियतेचा ध्यास नाही, हिरॉईन आली असल्याचा कुठेही आभास नाही.

लिव्हिंग दिवा अवतरल्याचा माज नाही, पेज थ्री पर्सनॅलिटीचा साज नाही. व्यक्तिमत्त्वाला अलौकिक बाज सहजसुलभतेने स्वीकारलेल्या वहिदाजी त्या दिवशी पाकिस्तानी चित्रकारांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या चहापानाला आवर्जून हजर झाल्या होत्या. चित्रकार बव्हंशी तरुणवर्गातले; पण अवचित अवतीर्ण झालेल्या वहिदाजींबद्दल कमालीचे औत्सुक्य असलेले.

बहुतेकांना रोजी आठवली. ‘काटों से छीन के ये आचल’ हे शब्द हजर असलेल्या बहुतेकांना अवचित स्मरले. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमा हिंदी चित्रपटांचा विषय उपस्थित होताच गळून पडतात जणू. सहजसाध्या, शांत, धीरगंभीर खानदानी अदबीच्या वहिदाजींच्या दोन-तीन ऋजू वाक्यांनी ती संध्याकाळ उपस्थितांसाठी अविस्मरणीय झाली.

वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके या चित्रपटसृष्टीसाठी भारतात देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला; अन्‌ त्या संध्याकाळच्या स्मृतींचा पट फ्लॅशबॅकप्रमाणे उलगडला. हा त्यांच्या कामाचा उचित गौरव आहे. तो त्यांचा हक्कच होता म्हणा ना!

प्रत्येक क्षेत्राप्रमाणे आजवरच्या फाळके पुरस्कार सन्मानार्थींमध्ये तशा महिला कमीच. ३३ टक्केही नाहीत. देवीकाराणी, आशा भोसले, रुबी मायर्स म्हणजे आपल्या सुलोचनादीदी अशा फार थोड्या जणींच्या वाट्याला आलाय हा पुरस्कार. बॉलीवूडची नायिका गुंगी गुडिया, ग्लॅमगर्ल, डान्सिंग डॉल एवढ्यापुरती मर्यादित नव्हती कधीच.

तिने ‘आज फिर जिने की तमन्ना है’ म्हणत पुरुषी जोखड केव्हाच झुगारून दिले होते. जगण्यात नाही तर पार मरण्यातही कवी सहचराला साथ दिली होती. ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ असा प्रश्न करत ‘तुम्हारी है तुमही संभालो ये दुनिया’ म्हणत जगाला ठोकरणाऱ्या कवी नायकाला ‘प्यासा’त जलसमाधी घेताना साथ दिली होती.

६० ते ८० या दोन दशकातल्या या सर्व एलिमेंट असलेल्या महिला रुपेरी पडद्यावर साकारल्या होत्या, त्या वहिदा रेहमान यांनीच. कसला भारी योगायोग आहे हा. महिला हक्कांची पहाट अवतरेल, अशी शक्यता निर्माण करणारे महिला प्रतिनिधित्व विधेयक देशाच्या आशा-आकांक्षांशी नाते सांगणाऱ्या नव्या संसद भवनात पारित झाले. पाठोपाठ फाळके पुरस्काराने वहिदा रेहमान यांच्या दरवाजावर दस्तक देणे सार्थ, समर्पकच.

वहिदा रहेमान हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक स्वप्न. अर्थपूर्ण चैतन्याने रसरसलेले. शबाना आझमी, स्मिता पाटील या दोघींनी चित्रपटातल्या महिलांच्या रूढ प्रतिमेला जबरदस्त तडा दिला तो कित्येक वर्षांनी. त्याच्या कितीतरी आधी वहिदा रहेमान यांनी स्त्री वेगवेगळ्या दृष्टीने पडद्यावर उभी केली.

गुरुदत्त, देव आनंद, राज कपूर अशा तगड्या आणि लार्जर दॅन लाईफ असलेल्या नायकांसमोर ती समर्थपणे उभी राहिली. सुनील दत्तसारख्या शांत संयत सज्जन अभिनेत्यालाही नायिकेने ‘मुझे जिने दो’ सांगणे सोपे नसलेला तो पुरुषप्रधान काळ; पण वहिदा यांनी ते समर्थपणे केले.

पत्नीचा नृत्यध्यास कोठ्यावरच्या बायका नाचतात, चांगल्या घरातल्या बायका नाहीत, असे सांगत दाबून टाकणाऱ्या पतीला दूर लोटून घराबाहेर पडलेली, एका गाईडवर प्रेम करणारी अन्‌ त्याचा विकृत बाबा होतो आहे, हे लक्षात येताच दूर होणारी रोजी तिने साकारली तशीच ‘साहिब बीवी और गुलाम’ मधली साध्याशा भूतनाथची मम म्हणणारी घरगुती सहचारिणीही. वहिदा हे प्रकरण वेगळेच.

दक्षिणेतल्या एका चित्रपटगीतात गुरुदत्तने तिला पाहिले आणि त्या काळी जेव्हा टॉपच्या हिरॉईनला महिन्याला पाचशे-सहाशे रुपये मिळत, त्यावेळी मासिक तीन हजार रुपये दराने तब्बल तीन वर्षांसाठी बुक करून टाकले. वहिदाचे आयएएस अधिकारी असलेले नेकहुषार वडील ती १३ वर्षांची असतानाच परलोकवासी झाले होते. आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. अशा वेळी चार मुलींची जबाबदारी असलेल्या वहिदाच्या आईला ही आर्थिक संधी होती.

तिने प्रारंभी नाही नाही केले; पण सगळ्याच हिरॉईन्स तशा नसतात, असे इष्टमित्रांनी पटवून सांगितल्यावर अम्मीजानने संमती दिली. अर्थात जेमतेम १७ वर्षे वय असलेल्या वहिदाने नखरे करत अटीही टाकल्या. एखाद्या कुलीन स्त्रीला साजेसा बाणा होता तिचा. अंगप्रदर्शन करणार नाही ही ती विचित्र अट. मला पटेल तशीच वेषभूषा मान्य करेन, हे कलम त्या पठ्ठीने करारात टाकायला लावले अन्‌ ते अटीशर्तीत अंतर्भूत झाल्यानंतर मगच तिची आई सही करेल, हे मान्य करायला लावले.

सज्ञान नसल्यामुळे तिच्या आईची कागदपत्रांवर मोहोर उमटे. पदार्पणच झाले ते कमालीच्या गाजलेल्या सीआयडीतल्या गाण्याने. त्यातही ती झिरझिरीत कपडे घालणार नाही म्हणून अडून बसली होती. भानू अथय्या चित्रपटाचा वेषभूषाकार. आतून अस्तर लावायला किमान अर्धा दिवस लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. देव आनंदवर गाणे चित्रित होणार होते. तो परदेशात जाणार होता. अख्खे युनिट ही मुलगी चढेल आहे, असे टोमणे मारत असे. आहे त्या वेषात शूटिंग कर, असे बजावत.

हिने मात्र चित्रीकरण केले ते तोडगा म्हणून झिरझिरीत तुकड्यावर ओढणी घेण्यास मान्यता मिळाल्यावरच! कही पे निगाहे, कही पे निशाना हे ते प्रसिद्ध गीत. ‘सीआयडी’नंतर आला तो ‘प्यासा’. विजय या कवीची ती दर्दकरुण शोकांतिका. त्याचे नगमे कविता स्वत:च्या पुंजीतून शरीरविक्रय करणारी गुलाबो हा चित्रपटातला प्रेमाचा अत्युच्च क्षण. त्या आधी रेडलाईट एरियात विजयच्या रूपात गुरुदत्तवर अभिनित केलेले ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है’ हे साहिर लुधियानवीचे शब्द अवघी संवेदना चिरत गेले होतेच.

त्यातच ‘जाने क्या तुने कही, जाने क्या मैने सुनी; बात कुछ बन ही गई’ म्हणत प्रेमात रंगून गेलेली गुलाबो विजयचा हात पकडून या क्रूर दुनियेचा निरोप घेत समुद्रात शिरायला राजी होते, तो ठरतो प्यासातला अन्‌ प्रेमातलाही परमोच्च क्षण. किती प्रेमिकांना या शब्दांनी जगाच्या गलबल्यात दिलासा देणारे स्वप्न दाखवले अन्‌ जिंदगी में ना सही मौत में एक हो जाये हे शब्द झंकारवले याची गणतीच नाही. कित्येक वर्षांनी ‘एक दुजे के लिये’मध्येही प्रेमीयुगुल समुद्रातच जीवन संपवते; पण त्या दक्षिणउत्तरेच्या राष्ट्रीय एकात्मतेला वेश्येला जीवनसंगिनी करण्याचा उदात्त सामाजिक आशय नाहीच.

कागज के फूल, चौदहवी का चांद असे एकापाठोपाठ एक काव्यात्म चित्रपट गुरुदत्तने वहिदाला घेऊन केले. गीता दत्त ही विलक्षण प्रतिभेची गायिकापत्नी या जोडगोळीमुळे दुखावली गेल्याची चर्चाही रंगली; पण याबद्दलच्या कोणत्याही प्रवादांना उत्तर देण्याच्या भानगडीत वहिदा पडलीच नाही. नसरीन मुन्नी कबीर यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘कन्व्हर्सेशन विथ वहिदा रेहमान’ या पुस्तकानिमित्ताने त्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा वहिदाने ठामपणे खासगी गोष्टींचे सार्वजनिक उल्लेख करणे योग्य नसल्याचे संयत उत्तर दिले.

गाईड हा वहिदाच्या जीवनातला सोनेरी अध्याय. गीता दत्त, आशा भोसले (भंवरा बडा नादान रे) यांचा आवाज वहिदाला मिळाला होता; पण गाईडमधली सर्वांगसुंदर गीते साक्षात लता मंगेशकरांच्या कंठातून बाहेर पडली. हिंदी गाइड गाजलाच; पण इंग्रजीत आर. के. नारायण यांच्या कादंबरीवरच्या या सिनेमाची पटकथा नोबेल पारितोषिकविजेत्या पर्ल बक यांनी लिहिली होती. इंग्रजीतल्या रोजीसाठी वहिदांना अमेरिकेत अभिनयासाठी गौरवले गेले. इंग्रजी भाषेत देव आनंद किंवा वहिदांनी डबिंगकलाकार वापरले नव्हते, हे विशेष.

त्यानंतर रेश्मा और शेरासारखे अनवट सिनेमेही त्यांनी केले. प्रदीर्घ काळानंतर त्या रूपेरी पडद्यावर आई म्हणून अवतरल्या. लम्हें या अगदी अलिकडच्या चित्रपटात त्यांनी श्रीदेवी-अनिल कपूर यांच्या प्रेमनात्याला समजून आकार देणारी गव्हर्नेस साकारली, ती कमालीच्या ताकदीने. लोभस अन्‌ प्रगल्भ अशी! तिसरी कसम हा त्यांनी राज कपूर यांच्यासमवेत केलेला चित्रपट तर पडद्यावरचे काव्य आहे. गाडीवान झालेला राज कपूर अन्‌ नाचणारी जलसेवाली वहिदा...

पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, काळ पार बदलला. चित्रपटसृष्टी वाहिन्यांवरील मालिकांच्या मार्गाने ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळली. या सगळ्या मन्वंतरात वहिदाजींनी त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या शशी रेखी ऊर्फ कमलजीत यांच्याशी लग्न केले. संसारात रमल्या. मुंबईची चकाचौंध सोडून बंगळूरच्या शांत वातावरणात फार्मवर राहू लागल्या.

सोहेल आणि काश्वी या मुलांना जन्म देऊन त्यांच्या वाढीत मनापासून रमल्या. राजभवनावर त्या दिवशी त्या आल्या होत्या तरुण काश्वीसह. तिला सिनेमात काम करण्यात रस नाही, हे त्या का कारण कुणास ठाऊक, पण खूष होऊन सांगत होत्या. हेलन, नंदा, आशा पारेख या जुन्या मैत्रिणींना भेटत राहिल्या.

सिनेमाच्या तंत्रात त्यांना भारी रस. करण जोहरचे, चोप्रा परिवाराच्या बॅनरचे चित्रीकरण सुरू असते तेव्हा नवतंत्र समजून घ्यायला त्या खास हजेरी लावतात म्हणे. भारतीय स्त्री उन्नत होत गेली. काटों से छीन के ये आचल, दिल ये (आगे) चला म्हणू लागली... हिंदू मुस्लिम धृवीकरण छुप्या पातळीवर सर्वत्र अदृश्य वावरत असतानाही वहिदांचे रेहमान असणे पुरस्काराच्या आड आले नाही, यातच त्यांचे मोठेपण दडलेले आहे. आज फिर जिने की तमन्ना है!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com