एम्पायर सिटी इस्टेट मर्डर : भाग 1 (एस. एस. विर्क)

एम्पायर सिटी इस्टेट मर्डर : भाग 1 (एस. एस. विर्क)

शमिंदरनं अलीकडंच एका प्रकरणाची चौकशी करून डिझेलची मोठी चोरी उघडकीस आणली होती, अशी माहिती राझ्वी यांच्याकडून मिळाली. काही लाखांचं नुकसान झाल्यानं काही लोक शमिंदरवर चिडून होते. कंपनीनं गैरव्यवहार करणाऱ्या लोकांवर काही कारवाई केली होती का? पोलिसांकडं तक्रार केली होती का?...तर, कंपनीनं याबाबतीत काहीच केलं नव्हतं. 

मध्यरात्र उलटून गेली होती. अचानक घरातला फोन खणखणला : 'नमस्कार विर्कसाहेब. मी राकेश गुप्ता बोलतोय. उद्योग खात्याचा प्रधान सचिव. माफ करा, एवढ्या रात्री तुम्हाला त्रास देतो आहे; पण काही उद्योजकांसह मला तुम्हाला आत्ताच भेटायचं आहे. मोहालीतल्या एम्पायर सिटी इस्टेटचे वरिष्ठ अधिकारी शमिंदरसिंग यांचा रात्री साडेनऊच्या सुमाराला खून झालाय. जेवण झाल्यावर पत्नीबरोबर ते घराजवळच फेरफटका मारायला गेले असताना मोटारसायकलवरून दोनजण आले आणि त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. शमिंदरसिंग तिथंच कोसळले. त्यांच्या पत्नीनं खूप आरडाओरडा केला; पण थंडी खूप असल्यानं जवळपासही कुणी नव्हतं. शमिंदरसिंग यांच्या पत्नीनं स्वतःच्या मोबाईल फोनवरून पोलिस कंट्रोल रूमला कळवल्यावर पोलिसांनी लगेच येऊन गंभीर स्थितीतल्या शमिंदरसिंगना रुग्णालयात नेलं. त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबतच होत्या. डॉक्‍टरांनी खूप प्रयत्न केले; पण जवळपास दोन तासांनी शमिंदरसिंग यांचं निधन झालं. एम्पायर सिटी इस्टेट (ईसीई) आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक करणारी कंपनी आहे. तिचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर काही वरिष्ठ अधिकारी माझ्या घरी आले आहेत. ते खूप घाबरलेले आहेत. हा दहशतवादी हल्ला आहे, असं त्यांना वाटत आहे. आपण आता पंजाब दहशतवादापासून मुक्त असल्याची पब्लिसिटी करतो आहोत; पण या घटनेमुळे आपल्या सगळ्या प्रयत्नांना मोठा धक्का बसू शकेल. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्ता लगेचच तुम्हाला भेटायचं आहे...' 

* * *

घड्याळाकडं पाहिलं. रात्रीचा एक वाजत आला होता. एका विवाहसमारंभाला जाऊन येता येता उशीर झाला होता. काही फायलींवर काम करून त्या सकाळी लवकर ऑफिसला पाठवायच्या होत्या, त्यामुळे गुप्ता यांचा फोन आला तेव्हा मी जागाच होतो. बाहेर खूपच थंडी होती. 'आपण सकाळी लवकर भेटू या, तोपर्यंत मी माझ्या अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेऊन ठेवतो,' असं मी गुप्ता यांना सांगितलं. गुप्ता यांच्याकडूनही मला काही माहिती मिळाली होती. शिवाय, माझ्या काही माणसांना योग्य सूचना देणं आवश्‍यक होतं. त्या वेळी गुप्ता आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या मंडळींना भेटून काहीच साध्य झालं नसतं, म्हणून, 'ईसीईच्या अधिकाऱ्यांना सकाळी नऊ वाजता माझ्या कार्यालयात पाठवलंत तर अधिक चांगलं होईल,' अशी विनंती मी त्यांना केली. मी त्यांना म्हणालो : 'उद्या त्या अधिकाऱ्यांबरोबर तुम्ही आला नाहीत तरी चालेल. ईसीईचे अधिकारी आमच्या बैठकीबद्दल तुम्हाला नंतर सांगतीलच.' शिवाय, 'हे दहशतवादी कृत्य नसावं. आपण अशा काळात वावरत आहोत, जिथं तत्त्वाची, नैतिकतेची बंधनं नेहमी पाळली जातातच असं नाही, त्यामुळे या गुन्ह्यामागं काहीही असू शकतं,' असंही मी त्यांना सांगितलं. 

दोन दशकं दहशतवादाचा सामना केल्यानंतर, अशा घटनांमागं दहशतवादीच असणार असाच पंजाबमधल्या सर्वसामान्य लोकांचा समज असायचा. आमच्या कार्यालयीन बैठकांमध्येही काही वेळा 'नेहमी होणारे' गुन्हे कमी झाले आहेत का, अशा विषयावर चर्चा व्हायची. दहशतवाद पसरण्याच्या आधीसुद्धा खुनाच्या घटना घडत होत्याच. कधी रागाच्या भरात, कधी जमिनीवरून किंवा बायकांवरून होणारी भांडणं यातून खून व्हायचेच. का कोण जाणे; पण मधल्या काळात अशा प्रकरणांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्याची कारणं शोधायला हवी होती. अर्थात आमच्यासमोरचं दहशतवादाचं आव्हान एवढं मोठं होतं की त्याबद्दल विचार करायला कधी वेळच मिळाला नाही. असो. आत्ताच्या क्षणी ईसीईच्या अधिकाऱ्याचा खून हा माझ्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा होता. सकाळी नऊ वाजता माझ्या कार्यालयात भेटायचं, असं ठरवून मी मोहालीचे पोलिस अधीक्षक अशोक बन्सल यांना फोन केला. ते रुग्णालयातच होते आणि याच गुन्ह्याच्या तपासात होते. गुप्ता यांनी सांगितलेली सगळी कहाणी त्यांनी मला परत सांगितली. बन्सल आणि त्यांचे सहकारी गुन्ह्याच्या ठिकाणीही जाऊन आले होते. तिथं त्यांना .765 कॅलिबरच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांच्या सहा रिकाम्या पुंगळ्या सापडल्या होत्या. बन्सल यांच्या अंदाजानुसार, हल्लेखोरांनी तेवढं एकच शस्त्र वापरलं असावं. त्यांनीही ह्या गुन्ह्याचा दहशतवाद्यांशी काही संबंध असण्याची शक्‍यता फेटाळून लावली. 'मग दुसरं काय कारण असेल?' मी त्यांना विचारलं. 'काहीही असू शकेल...वैयक्तिक किंवा कार्यालयीन शत्रुत्व, एखादा कौटुंबिक वाद किंवा अगदी एखादं प्रेमप्रकरणदेखील. मात्र, सर, आपल्याला कोणतंही अनुमान न काढता सगळ्या बाजू तपासाव्या लागतील. रिकामी काडतुसं सापडल्यानं आता आधी आपल्याला पिस्तुलाचा मालक शोधावा लागेल,' बन्सल म्हणाले. हा मुद्दा अतिशय योग्य होता. हा तरुण अधिकारी तपासातल्या खाचाखोचा उत्तम रीतीनं आत्मसात करत होता. मी बन्सल यांनाही सकाळच्या बैठकीला उपस्थित राहायला सांगितलं आणि शमिंदरसिंगना झालेल्या जखमा, ज्या वेळी खून झाला त्या वेळची तापमानाची स्थिती, शमिंदरसिंग आणि त्यांच्या पत्नीचे आपापसातले संबंध, त्या दोन्ही कुटुंबांची पार्श्वभूमी, मालमत्तेवरून असणारे काही कौटुंबिक वाद, याआधी काही हिंसक स्वरूपाच्या घटना घडल्या होत्या का, शमिंदरसिंग यांच्या सवयी, त्यांची आर्थिक स्थिती, मित्रमंडळी, विवाहबाह्य संबंधाच्या शक्‍यता... थोडक्‍यात त्यांची शक्‍य तेवढी सगळी वैयक्तिक, कौटुंबिक माहिती आम्हाला देण्याबद्दलही सूचना दिल्या. गुन्हे आणि गुप्त वार्ता विभागातल्याही काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मी सकाळी बैठकीला येण्याविषयी सांगितलं. या बैठकीचं इतिवृत्त 

व्यवस्थित नोंदवलं जाईल, याचीही व्यवस्था केली. अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन चर्चेची तयारी करण्यासाठी मी अर्धा तास अगोदरच कार्यालयात पोचलो. बन्सल आलेलेच होते. रेंज डीआयजी प्रमोद जैनही आले होते. माझ्यासमोर आलेल्या माहितीनुसार, शमिंदरसिंग ईसीई कॉर्पोरेशनमध्ये बऱ्यापैकी वरिष्ठ पातळीवर काम करत होते. मूळचे पश्‍चिम आशियातले; पण आता अमेरिकी नागरिक असणारे राझ्वी यांची ती कंपनी होती. आयटी क्षेत्रातल्या अन्य काही अमेरिकी कंपन्यांसाठी ते काम करत असत. दुबई, इराण, सिंगापूर, चीन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर व दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशांमध्ये या कंपनीचं जाळं पसरलेलं होतं.

इथंही त्यांनी आयटी आणि वित्तीय सेवा देणारं जवळजवळ एक शहरच उभारलं होतं. कंपनीचे अध्यक्ष राझ्वी आणि त्यांचे काही अतिवरिष्ठ सहकारी एक-दोघा स्थानिक जनसंपर्क अधिकाऱ्यांबरोबर मीटिंगसाठी येणार होते. ते येण्याआधी मी काही माहिती घेऊन ठेवली होती. शमिंदर आणि त्यांची पत्नी मनी या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. दोघांचेही आधी घटस्फोट झालेले होते. बत्तीस वर्षांच्या शमिंदर यांचं व्यक्तिमत्त्व, वागणूक उत्तम होती. मनीही कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली, सुस्वरूप होती. तिला उत्तम कपड्यांची आवड होती. कॉर्पोरेट जगतातल्या पार्ट्यांनाही जायला तिला आवडत असे. निदान त्यांच्या आसपासच्या लोकांच्या मते, शमिंदर आणि मनी हे एक आदर्श जोडपं होतं. अनेक सामाजिक कामांमध्येही त्यांचा सहभाग असायचा. कंपनीही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पार्ट्या, समारंभ, परदेशप्रवासाच्या संधी देत असे. काल रात्री आपण जेव्हा गोळीबाराच्या ठिकाणी गेलो तेव्हा मनीनं पोलिस ठाण्यात आणि रुग्णालयात ड्यूटीवर असणारे एएसआय गुरदितसिंग यांच्याविषयी गैरवर्तणुकीची तक्रार केल्याचं डीआयजींनी मला सांगितलं. ''मी त्या एएसआयला निलंबित केलं आहे,'' अशीही माहिती त्यांनी दिली. मी त्या एएसआयलाही बोलावून घ्यायला सांगितलं. दरम्यान, हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला झाला तेव्हा बाहेरचं तापमान 3 अंश फॅरनहाईट होतं. रात्रीच्या जेवणानंतर बाहेर फेरफटका मारायला जाण्याच्या दृष्टीनं 3 अंश हे काही फारसं आल्हाददायक नव्हतं. राझ्वी आणि त्यांचे सहकारी आले तेव्हा माझ्याकडं बरीच माहिती जमा झाली होती. त्यांनी एक चांगला सहकारी गमावला होता, त्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शमिंदरला दहशतवाद्यांनीच मारलं असणार अशी त्यांची भावना होती; पण माझ्यासमोर मात्र, या हत्येमागं काही विशेष उद्देश असावा का, हत्या ठरवून झाली असावी की शमिंदरला विनाकारणच मारलं असावं असे प्रश्न होते. ही हत्या पूर्वनियोजित असावी, असं मला वाटत होतं. हा दहशतवादी हल्ला असेल तर त्यांनी मनीला का सोडलं? दहशतवादी गोळीबार करण्यासाठी गर्दीच्या जागा निवडत असत. इथं निवासी भागात गोळीबार झाला होता. एकाच व्यक्तीवर हल्ला झाला होता, हल्लेखोरांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला काहीही केलं नव्हतं. दहशतवादी असते तर त्यांच्या हातून कुणीच सुटलं नसतं. शमिंदरनं अलीकडंच एका प्रकरणाची चौकशी करून डिझेलची मोठी चोरी उघडकीस आणली होती, अशी माहिती राझ्वी यांच्याकडून मिळाली. काही लाखांचं नुकसान झाल्यानं काही लोक शमिंदरवर चिडून होते. कंपनीनं गैरव्यवहार करणाऱ्या लोकांवर काही कारवाई केली होती का? पोलिसांकडं तक्रार केली होती का? पण, कंपनीनं याबाबतीत काहीच केलं नव्हतं. शमिंदरवर राग असणाऱ्या लोकांनीच शमिंदरची हत्या केली असावी का? कदाचित नसेलही...पण आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आम्ही कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहूच; पण आम्हाला काही माहिती लागली तर त्यासाठी कंपनीनंही एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असं मी त्यांना सुचवलं. मला हे दहशतवादी कृत्य का वाटत नव्हतं, त्याचीही कारणं मी राझ्वी यांना सांगितली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेलं शस्त्र दहशतवादी नेहमी वापरायचे त्या तुलनेत खूपच लहान होतं. दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्याचं प्रमाणही खूप असायचं, तेही इथं नव्हतं. गरम चहा घेऊन राझ्वी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निरोप दिला. त्यानंतर, शमिंदरसिंग आणि मनीच्या आई-वडिलांना स्वतंत्रपणे भेटून त्यांच्या आपापसातल्या संबंधाविषयी आणखी काही माहिती मिळते का ते पाहावं, असं मी पोलिस अधीक्षकांना सांगितलं. शमिंदरसिंग यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी लवकरात लवकर करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना विनंती करून मृतदेह नातेवाकांच्या ताब्यात देण्याविषयीे, तसेच उत्तरीय तपासणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याविषयीही सांगितलं. मग मी काही अधिकाऱ्यांबरोबर काही नेहमीच्या मुद्द्यांवर विचारविनिमय केला. पती-पत्नीचे आपापसातले संबंध, विवाहबाह्य संबंध, कर्ज वगैरे आर्थिक प्रश्न किंवा असेच दुसरे प्रश्न... तपासावर लक्ष ठेवून वेळोवेळी मला माहिती द्यावी अशीही सूचना मी डीआयजींना दिली. सगळे अधिकारी बाहेर पडल्यावर एका सहायक अधिकाऱ्यानं मला, एएसआय गुरदितसिंग आले आहेत, असं सांगितलं. माझ्या सूचनेनुसार त्यांना माझ्या खोलीत पाठवण्यात आलं. निवृत्तीच्या वयाला आलेली एक व्यक्ती माझ्यासमोर आली. त्यांचं सर्व्हिस रेकॉर्डही माझ्यासमोर ठेवण्यात आलं. सर्व्हिस रेकॉर्डमधल्या नोंदींवरून गुरदितसिंग यांचं काम समाधानकारक दिसत होतं. माझ्या खोलीत ते आले तेव्हा गुरदितसिंग पूर्ण गणवेशात होते. फक्त कमरेला बेल्ट नव्हता. त्यांना निलंबित केल्याची ती खूण होती. ''गुरदितसिंग, तुम्ही त्या बाईंशी असे का वागलात?'' मी त्यांना विचारलं... 

(पूर्वार्ध) 
(या घटनेतली स्थळं, संस्था आणि व्यक्तींची नावं बदलण्यात आलेली आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com