नवीन प्रवाहांचे कोकणीत वारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishwa Kokani kendra
नवीन प्रवाहांचे कोकणीत वारे

नवीन प्रवाहांचे कोकणीत वारे

- मुकेश थळी anushanti561963@gmail.com

कोकणी भाषा गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यांतील काही भागांत बोलली जाते. भाषेच्या अस्तित्वासाठी लढा देताना चळवळी, आंदोलनं यांत ऊर्जा, शक्ती खर्च करणारी एक पिढी आम्ही पाहिली. ‘फायटर’ आणि ‘रायटर’ या दोन्ही भूमिका काही लेखकांना कराव्या लागल्या.

कोकणीतून एक दैनिक, दोन मासिकं प्रसिद्ध होतात. मंगळूरला ‘विश्व कोकणी केंद्र’ आहे. भव्य असं हे भवन. अलीकडेच निवर्तलेले बस्ती वामन शणै यांचा मोलाटा वाटा हे भवन उभारण्यात आहे. दक्षिणेत कोकणीचा प्रचार-प्रसार करण्याचं नेतृत्वही त्यांनी केलं. केरळातही कोकणीतून साहित्यनिर्मिती व इतर कार्य सुरू आहे. शणै गोंयबाब अर्थात् वामन रघुनाथ वर्दे वालावलीकार हे कोकणी चळवळीचे जनक. त्यांची समग्र ग्रंथसंपदा चार खंडांत ‘गोवा कोकणी अकादमी’नं प्रकाशित केली आहे. गोंयबाबांचं साहित्य व प्रेरणादायी शब्द हे मंत्र समजून भारलेली युवा फळी हे कोकणीचं भूषण आहे.

‘कोकणी भाषामंडळा’ची समिती तर अशाच चैतन्यदायी युवकांची आहे. या तरुण सेवकांना अद्ययावत ज्ञान असल्यानं विविध उपक्रमांची, तंत्रज्ञानाची सांगड घालून ते पुढं नेण्याचं कार्य ते करत आहेत हे फार स्तुत्य आहे. कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात व नंतरच्याही काळात युवकांनी वेबिनार व इतर ऑनलाइन कार्यक्रम सुरू ठेवले. सोशल मीडियाचा पुरेपूर लाभ घेऊन कोकणी साहित्य सर्वांसाठी अद्ययावत ठेवण्याचं कार्य ही उमदी मंडळी करत आहेत.

उदय भेंब्रे हे कोकणीतले ज्येष्ठ साहित्यिक. ‘व्हडलें घर’ ही त्यांची कादंबरी गेल्या वर्षी प्रकाशित झाली. ‘इन्क्विझिशन’ या पोर्तुगीजकालीन धर्मच्छळाच्या विषयावर ती केंद्रित आहे. सध्या त्यांची ‘आबे फारीय’ ही कादंबरी पूर्णत्वाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आबे फारीय हे गोव्याच्या कांदोळी गावचे सुप्रसिद्ध संमोहनशास्त्रज्ञ. संमोहनाद्वारे त्यांनी विदेशांत उपचार करण्याचं मोलाचं कार्य केलं होतं. फारिया यांचं जीवन व कार्य या विषयावरील ही कादंबरी. कोकणी नाटकही नवनवीन आधुनिक वाटा चोखाळत चाललं आहे. पुंडलिक नायक यांनी त्याचा बळकट पाया घातला होता. प्रकाश वझरीकर, दत्ताराम कामत बांबोळकर, मुकेश थळी व इतरांनी मौलिक नाटकं लिहून कला अकादमीच्या दर्जेदार स्पर्धेत आशयघन नाटकं मंचावर आणली.

कोकणीतून इतर भाषांत व इतर भाषांतून कोकणीत असे भरघोस अनुवाद होत आहेत. बहुभाषाकोविद कवी डॉ. मनोहरराय सरदेसाय यांनी अनुवादाची पद्धत भक्कमपणे रुजवली. आज कोकणी कादंबऱ्या इंग्लिशमध्ये जात आहेत. हिंदीतही हे साहित्य जात आहे, तसंच हिंदीतूनही कोकणीत ते अनुवादित होत आहे. अनेक कथा कोकणीतून इंग्लिशमध्ये व अन्य भाषांत अनुवादित होत आहेत. चित्रपट, लघुपट यांचीही निर्मिती सुरू आहे.

कोकणी कथेत प्रकाश पर्येंकर व इतर लेखक नवीन प्रवाह, शैली आणताना दिसतात. विशेषकरून ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या, संघर्ष व प्रादेशिक शब्दसंपदा यांचं विलक्षण चित्रण त्यांत दिसतं. बालसाहित्यात बालकविता, गीतं, एकांकिका, संगीतिका व व्हिडिओ यांचीही निर्मिती होत आहे. रमेश वेळुस्कर यांची ‘एक आशिल्लें नुस्तें, सामकें मस्तें’ (एक होती मासोळी, अगदी खट्याळ) ही कविता मुलांच्या ओठी आहे. डिजिटलविश्वातही इंटरनेटवर मुलांचं साहित्य, शास्त्रज्ञांची चरित्रं उपलब्ध होत आहेत.

मुंबईत स्थायिक झालेले गोवेकरही साहित्यनिर्मितीचं कार्य सातत्यानं करत आहेत. मुलुंडस्थित कथाकार शीला कोळंबकर नियमितपणे कथा, निबंध, व्यक्तिचित्रं, बालसाहित्य लिहितात. डोंबिवलीला राहणाऱ्या जयमाला दणायत या कथा, निबंध लिहितात. मुंबईत राहणारे मनोहर पै धुंगट अलीकडेच निवर्तले. त्यांचा म्हणींचा संग्रह फार लोकप्रिय आहे. लेखक, विद्यार्थी, अभ्यासक संदर्भग्रंथ म्हणून त्याचा वापर करतात.

मडगावचे कवी-समीक्षक सखाराम बोरकर हे म्हणींचा ‘चालता-बोलता ज्ञानकोश’ आहेत. धुंगट यांच्या कोशांत सुमारे २१०० म्हणी आहेत. बोरकर यांच्या येऊ घातलेल्या म्हणींच्या संकलनात दहा हजार म्हणी आहेत. कोकणीत सौंदर्यपूर्ण वाक्प्रचार व म्हणी आहेत. त्यांच्या वापरानं भाषेला एक तजेला येतो.

कवी शंकर रामाणी यांची जन्मशताब्दी सध्या सुरू आहे. त्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. ता. २६ जूनला दिवसभराचे कार्यक्रम होणार आहेत. आयोजन समिती झटत आहे. पुस्तकंही प्रकाशित होतील. त्यात रामाणींच्या अप्रकाशित कविता, तसंच त्यांचा लेखकांशी झालेला पत्रव्यवहार यांचा समावेश आहे. रामाणी यांनी कोकणी, मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये कविता लिहिल्या. कोकणीत त्यांचे ललित निबंधही आहेत.

रवींद्र केळेकार यांनी कोकणी निबंधांचा पाया घातला. वैचारिक व ललित दोन्ही प्रकारचे निबंध त्यांनी लिहिले. दत्ता दामोदर नायक हे विद्वान-व्यासंगी-बहुश्रुत निबंधकार. ‘जाय काय जूय’ हा त्यांचा निबंधसंग्रह गाजला. त्यांनी प्रवासवर्णनंही लिहिली आहेत.

कोकणीत विविध शब्दकोश आहेत. येत आहेत. मराठी-कोकणी शब्दकोशाचं प्रकाशन अलीकडेच झालं. गोवा विद्यापीठानं चारखंडी कोकणी विश्वकोशाची निर्मिती केली आहे.

शणै गोंयबाब यांनी तरुणांना एक सल्ला दिला होता : ‘संपूर्ण जगाची जबाबदारी तुमच्या एकट्याच्या खांद्यावर आहे असं समजून कामाला लागा. ध्यास घेऊन. तुमच्या हातून अल्प का होईना; पण थोर सेवा होऊन जाईल.’ ही समज नवीन पिढीला आहे. सृजन, संशोधन, संघटन, आयोजन, संयोजन या विविध स्तरांवर परिश्रमपूर्वक आघाडीवर असलेली युवा फळी हा खचितच कोकणीचा आशेचा किरण आहे.

(लेखक गोवास्थित कोकणी साहित्यिक, अनुवादक व कोशकार आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kokan
loading image
go to top