चंद्रावरचं पाणी ! (मुक्ता मनोहर)

मुक्ता मनोहर
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

खुळा कावळा शहाण्याला म्हणाला ः ‘‘मित्रा, मला सगळे खुळा म्हणतात खरे; पण आता बघ, या कुंतिलाल यांची मी कशा मजा करतो ते!’’ मग खुळा कावळा शहाण्या कावळ्याला उद्देशून मोठ्या आवाजात म्हणाला ः ‘‘अरे शहाण्या मित्रा, तुला समजलं का? या तळ्याचे मालक जरी कुंतिलाल हे असले तरी, त्यांचा भाऊ शांतिलाल यांनीही एक मोठंच घबाड मिळवायचा बेत केला आहे.’’

खुळा कावळा शहाण्याला म्हणाला ः ‘‘मित्रा, मला सगळे खुळा म्हणतात खरे; पण आता बघ, या कुंतिलाल यांची मी कशा मजा करतो ते!’’ मग खुळा कावळा शहाण्या कावळ्याला उद्देशून मोठ्या आवाजात म्हणाला ः ‘‘अरे शहाण्या मित्रा, तुला समजलं का? या तळ्याचे मालक जरी कुंतिलाल हे असले तरी, त्यांचा भाऊ शांतिलाल यांनीही एक मोठंच घबाड मिळवायचा बेत केला आहे.’’

बं  दुकीच्या ठो ठो आवाजानं इसापाचं जंगल हादरून गेलं. पक्षी तर बिचारे भराभर उडून गेले. मोठ्या प्राण्यांची रवानगी प्राणिसंग्रहालयात करण्यात आली होतीच. एकूण जंगल तसं ओसच होतं. त्याला अपवाद होते दोन कावळे. एक खुळा कावळा आणि दुसरा त्याचा मित्र शहाणा कावळा. काहीही झालं तरी जंगल सोडायचंच नाही, असा त्या दोघांचा निश्‍चय होता. खुळा कावळा म्हणजे तोच ज्यानं दगडानं अंग घासून गोरं होण्याचा प्रयत्न केला होता आणि शहाणा कावळा तोच ज्यानं खुळ्याला त्यापासून वाचवलं होतं. इकडं-तिकडं लपत लपत जंगलातून फिरताना दोन्ही कावळ्यांना एका गोष्टीची चांगलीच माहिती समजली होती, की त्या जंगलातल्या भल्यामोठ्या तळ्याची मालकी आता एका मोठ्या कंपनीकडं गेली आहे. त्या कंपनीचे मूळ मालक हे नावाजलेले उद्योगपती होते. या सगळ्या जंगलाचा ताबा घेतल्यानंतर काही दिवसांतच त्या उद्योगपतीचा, म्हणजे शेठ लक्ष्मीनाथ यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अमाप संपत्तीची वाटणी त्यांच्या मुलांमध्ये झाली होती. कुंतिलाल आणि शांतिलाल ही ती मुलं. हे तळं आणि जंगल आता कुंतिलाल यांच्या वाटणीला आलं होतं.

कुंतिलाल यांनी तळं ताब्यात घेतलं तेव्हा त्या तळ्यावर आधीचाच एक प्रोसेस प्लॅंट केलेला होता आणि त्याचं पाणी शहरातल्या काही भागात मोफत पुरवण्यात येत होतं. मात्र, आता त्यांना तिथं वेगळ्या योजना करायच्या होत्या. त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणचे पूर्वीचे सगळे व्यवहार रद्द केले. कुंतिलाल यांच्या मनात एक सल होता. त्यामुळं ते रात्रंदिवस अस्वस्थ, बेचैन असत. त्यांना वाटले की, भाऊ शांतिलाल याला वडिलांनी सगळा इंधनउद्योग देऊन त्याचा जास्त लाभ होईल असं पाहिलं आहे. म्हणूनच जंगलाच्या माध्यमातून मोठी संपत्ती निर्माण करण्याचा ते सतत विचार करत असत. दुसरीकडं शांतिलाल यांनाही असं वाटायचं, की वडिलांनी संपत्तीची योग्य वाटणी केलेली नाही. यामुळं दोन्ही भावांमध्ये सतत धुसफूस सुरू असे. या धुसफुशीचं रूपांतर शत्रुत्वभावनेत झालं होतं.

कुंतिलाल त्या दिवशी तळ्याला भेट द्यायला आले होते. तळ्याच्या पाण्यात रिसॉर्ट व वॉटर क्‍लब सुरू करायचा त्यांचा विचार होता. ते ज्या झाडाखाली थांबले होते, त्याच झाडावर शहाणा कावळा आणि खुळा कावळा बसले होते. खुळा कावळा शहाण्याला म्हणाला ः ‘‘मित्रा, मला सगळे खुळा म्हणतात खरे; पण आता बघ, या कुंतिलाल यांची मी कशा मजा करतो ते!’’ खुळा कावळा शहाण्या कावळ्याला उद्देशून मोठ्या आवाजात म्हणाला ः ‘‘अरे शहाण्या मित्रा, तुला समजलं का? या तळ्याचे मालक जरी कुंतिलाल हे असले तरी, त्यांचा भाऊ शांतिलाल यांनी एक मोठंच घबाड मिळवायचा बेत केला आहे.’’

हे ऐकून कुंतिलाल एकदम सावध झाले. ते अगदी कान देऊन कावळ्याचं बोलणं ऐकायला लागले. शहाणा कावळा म्हणाला ः ‘‘ अरे खुळ्या, मला तर माहीतच आहे. आणखी एक गोष्ट ऐक. आता म्हणे चंद्रावरही पाणी आढळलं आहे आणि त्या पाण्यावर शांतिलाल यांनी मालकीही मिळवली आहे!’’
हे ऐकल्यावर कुंतिलाल खूपच अस्वस्थ होऊन गेले. आपण जे ऐकत आहोत, ते खरं आहे की खोटं, हे ताडून पाहण्याचंही भान त्यांना राहिलं नाही. त्यांनी पीएला तिथूनच मोबाईल लावला.

त्यांनी पीएला रागारागातच विचारलं ः ‘‘ ‘चंद्रावर पाणी’, ही काय भानगड आहे?’’
पीए म्हणाला ः ‘‘होय. आपल्या देशानं चंद्रावर जे यान पाठवलं आहे, त्यात अलीकडं असं पहिल्यांदाच स्पष्ट झालं आहे की, चंद्रावर ऑक्‍सिजन आणि हायड्रोजन हे दोन्ही रेणू आहेत. याचाच अर्थ चंद्रावर पाणी असू शकतं. आणि ही माहिती आपल्याच देशाला सगळ्यात आधी समजल्यामुळं चंद्रावरच्या पाण्यावर किंवा त्या दोन्ही रेणूंपासून पाणी बनवण्यावर आपल्याच देशाचा अधिकार राहणार.’’

हे ऐकून कांतिलाल सुखावले. आता याबाबतचे सर्वाधिकार आपण सरकारकडून सहजच मिळवू शकू, असं विचार त्यांच्या मनात येऊन गेला. कारण, पाण्याबाबतच्या सगळ्या स्रोतांवर त्यांचाच अधिकार होता. आपण आता आपल्या भावापेक्षा, म्हणजेच शांतिलालपेक्षा, वरचढ होणार, या नुसत्या विचारानंच त्यांना कोण आनंद झाला!
बघता बघता ही बातमी शांतिलाल यांनाही समजली. ‘सरकारच्या यानात इंधन म्हणून जे वापरलं गेलं आहे, ते प्रामुख्यानं आपलंच इंधन आहे, तेव्हा या मुद्द्यावरून आपण कांतिलालला सहज बाजूला सारू शकतो,’ अशी खात्रीच शांतिलाल यांना वाटत होती!
त्यांच्या पीएनंही त्यांना खूपच प्रोत्साहित केलं. त्या क्षणापासून शांतिलाल यांनी तर मोठीच धमाल उडवून दिली. चंद्रावरच्या पाण्याचं पेटंटच काय; पण गुंतवणुकीसाठी शेअर्सही काढायचा प्लॅन त्यांनी केला. टीव्हीच्या वाहिन्यांवर मुलाखती आणि संशोधनाच्या चर्चा धूमधडाक्‍यानं सुरू झाल्या. सगळ्या जगातल्या पाण्याचे मालकी हक्क मिळवण्यासाठीचा प्लॅन शांतिलाल यांनी सुरू केली. ‘जे चंद्रयान अंतराळात गेलं होतं, त्याचं इंधन आपलंच असल्यामुळं या विकासाच्या कामी खरा आपला आणि आपलाच हक्क आहे,’ असा दावा शांतिलाल करू लागले. मात्र, त्याच वेळी कांतिलाल यांनीही स्वतःच्या टीव्ही वाहिनीवर नवी चर्चा सुरू केली. चांद्रयानाच्या बांधणीसाठीचं सगळंच काम आपल्या संशोधन संस्थेत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
‘दोन बलाढ्य उद्योगपती भाऊ असे भांडत आहेत, म्हणजे चंद्रावरच्या पाणीप्रकल्पासाठी आपण आपला पैसा शेअर्समध्ये गुंतवायला हवा,’ असं अनेक होतकरू मध्यमवर्गीयांना वाटू लागलं आणि खरोखरच शेअरबाजारात एक नवा फुगा आकाराला यायला लागला...

शहाणा कावळा खुळ्या कावळ्याला म्हणाला ः ‘‘कोणे एके काळी एका कावळ्यानं दगडाला अंग घासून गोरं होण्यासाठी स्वतःला रक्तबंबाळ करून घेतलं होतं. तूही तेच करायला निघाला होतास... अगदी ही सगळीच माणसं चंद्रावरच्या पाण्यासाठी तुझ्यासारखीच खुळी झाली आहेत की रे...!’’
खुळा कावळा त्यावर हसला आणि म्हणाला ः  ‘‘तूही सावध राहा....शहाण्यांना खुळं करून सोडण्याचाच आजचा हा जमाना आहे!’’

Web Title: mukta manohar's saptarang article