कांचनजुंगाच्या निमित्तानं कमाल! (मुकुंद पोतदार)

mukund potdar
mukund potdar

"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती, त्यांचा मुख्य, त्याचे मोहरे, त्यांच्या कामगिरीचे व्यापक संदर्भ याविषयी.

Citius-Altius-Fortius अधिक वेगवान-अधिक उत्तुंग-अधिक भक्कम ही ऑलिंपिक चळवळीची मूल्यं रुजवण्याची आणि एकूण क्रीडासंस्कृती रुजवण्याची चर्चा नेहमीच होते. त्यासाठी प्रामुख्यानं क्रीडासंघटना आणि केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्या पुढाकारानं सुरू झालेला "खेलो इंडिया' उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. मात्र, अशा प्रयत्नांना क्‍लबची साथ मिळाली आणि क्‍लब संस्कृती (Club Culture) निर्माण झाली तर प्रसारास अन्‌ प्रचारास विलक्षण चालना मिळते. युरोपातील फुटबॉल लीगशिवाय इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट क्‍लबमुळे चेंडू-फळीचा खेळ अर्थात क्रिकेट, अमेरिकेतील एनबीएमुळे बास्केटबॉल, जपानमध्ये टेबल टेनिस अशा खेळांच्या प्रगतीची उदाहरणं देता येतील. याच्या जोडीला नागरी संस्थांचे योजनाबद्ध प्रयत्नही बहुमोल ठरतात. त्या संस्था "एक खेळ-एक ध्येय-एक दिशा' असा वसा आणि तो पूर्ण करत ठसा उमटवतात तेव्हा त्या खेळाच्या कक्षा रुंदावतात.

याच संदर्भात पुण्यातील "गिरिप्रेमी' संस्थेचा उल्लेख करावा लागेल. सन 2012 पासून आतापर्यंत सात अष्टहजारी शिखरांच्या मोहिमा तडीस नेत "गिरिप्रेमी'नं क्रीडासंस्कृतीनिर्मितीच्या प्रक्रियेला महाराष्ट्रात मोठी चालना दिली आहे. जगात 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची 14 शिखरं आहेत. त्यातील सर्वोच्च 8848 मीटर उंचीचं एव्हरेस्ट सर करून मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्या वर्षी तब्बल आठ जणांनी आणि पुढील वर्षी आणखी तिघांनी एव्हरेस्ट सर केलं. त्यामुळे जोरदार वातावरणनिर्मिती झाली.

कांचनजुंगानं निम्मं लक्ष्य साध्य
14 अष्टहजारी शिखरे (Fourteen 8 thousanders) म्हणून ही शिखरं ओळखली जातात. यातील एव्हरेस्ट वगळता इतर 13 शिखरांविषयी सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते. त्यामुळे एव्हरेस्टवरच भर देण्यात आला. यातील सातवं शिखर निवडताना कांचनजुंगा शिखराला पसंती देण्यात आली. याचं कारण हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे, तर भारतातील सर्वोच्च शिखर आहे. शंभर रुपयांच्या जुन्या नोटेच्या मागील भागावर जे पर्वताचं चित्र आहे ते कांचनजुंगाचं आहे. अशा पर्वताची चढाई तांत्रिक संदर्भात (Technical Climbing) आणि काठिण्यपातळी (Degree of Difficulty) एव्हरेस्टपेक्षा तीव्र आहे. एव्हरेस्टची अंतिम चढाई (Summit Attempt) 10 ते 12 तासांत होऊ शकते; पण कांचनजुंगासाठी हाच कालावधी 24 ते 26 तास असू शकतो. प्राणवायू विरळ असलेल्या इतक्‍या उंचीवर इतक्‍या प्रतिकूल परिस्थितीत चढाई करणं हेच मुळी आव्हानात्मक असतं. अशा वेळी तब्बल दहा जणांची मोहीम नेत "गिरिप्रेमी'ने कांचनजुंगा शिखरचढाईतही आगळा उच्चांक नोंदवला.

दुसऱ्या फळीची जडणघडण
सक्षम दुसऱ्या फळीची निर्मिती कोणत्याही खेळात आवश्‍यक असते. त्यादृष्टीनं आशिष माने, आनंद माळी, भूषण हर्षे, रूपेश खोपडे, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकळे या एव्हरेस्टवीरांच्या जोडीला विवेक शिवदे, डॉ. सुमीत मांदळे, किरण साळस्तेकर, जितेंद्र गवारे अशी दुसऱ्या फळीलाही संधी देण्यात आली. एव्हरेस्टसाठी भूषणसारख्यानं लग्न, तर रूपेश-आनंद यांच्याप्रमाणे कुणी पालकत्व लांबणीवर टाकलं होतं. अशा वेळी एव्हरेस्ट ते कांचनजुंगा या कालावधीत इतरांना संधी देण्यात आली. त्यातून सुमीत, विवेक, किरण अशा तिघांनी संधीचं सोनं केलं. मग कांचनजुंगासाठी नव्या-जुन्यांची मोट बांधण्यात आली. त्यामुळे भूषण, कृष्णा, रूपेश पुनरागमन करू शकले. आशिष, आनंद यांना आणखी एक संधी मिळाली, तर जितेंद्र, किरण, विवेक यांना कारकीर्दीत प्रथमच अष्टहजारी शिखर सर करता आलं. या मोहिमेची अशी वेगवेगळी वैशिष्ट्यं सांगता येतील.

भव्य नागरी मोहीम
नागरी गिर्यारोहणात युरोप-अमेरिकेत "एकला चालो रे'च्या धर्तीवर Solo Climbing ला पसंती दिली जाते. ती योग्य की अयोग्य याविषयी चर्चा करण्याची गरज नाही. सांगण्याचा मुद्दा असा की "गिरिप्रेमी'नं 11 चढाईवीरांची (Climbing members) भव्य मोहीम आखत 2012 मध्ये एव्हरेस्टच्या नागरी गिर्यारोहणात महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या आणि जगाच्याही नागरी गिर्यारोहणाच्या इतिहासात वेगळा पायंडा निर्माण केला. यासाठी या मोहिमांचा लीडर उमेश झिरपे याला श्रेय द्यावं लागेल. अमेरिकेचा डेव्हिड ब्रेशर्स, स्वित्झर्लंडचा उली स्टेक, इटलीचा रेनॉल्ड मेस्नर अशा गिर्यारोहणातल्या दिग्गजांनी "गिरिप्रेमी'ला सलाम ठोकला आहे. नेपाळसारख्या देशात आपल्या शेजारीदेशातून गिर्यारोहणासाठी इतक्‍या सातत्यानं इतक्‍या मोठ्या मोहिमा निघणं कौतुकास्पद ठरलं आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकमधील विविध मुक्कामांच्या ठिकाणचे हॉटेलव्यावसायिकही त्यामुळे चकित होऊ लागले.

मूळ उद्देश प्रसाराचा
"गिर्यारोहण म्हणजे फक्त आणि फक्त एव्हरेस्ट' असा संदेश जात असताना उमेशनं व्यापक दृष्टिकोन ठेवला. Adventure for All (सर्वांसाठी साहस) असं त्याचं घोषवाक्‍य (Slogan) आहे. त्यामुळे आधी ट्रेकिंग; मग गिर्यारोहण असे टप्पे पार करण्यासाठी त्यानं योजनाबद्ध प्रयत्न सुरू केले. गिर्यारोहणाचं कुठं थेट प्रक्षेपण होत नाही. इतर खेळांप्रमाणे ते टीव्हीवर दिसत नाही. अशा वेळी लोकांनी पर्वतात यावं, त्याचं साक्षीदार बनावं, याचि देही याचि डोळा निसर्गात जावं-साहस करावं हा यामागील उद्देश होता.

"चलो बेस कॅम्प' नारा ठरला प्यारा
एव्हरेस्ट हे गिर्यारोहकांचं ऑलिंपिक मानलं जातं. त्याच धर्तीवर एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक (EBC) हा ट्रेकर्सचं ऑलिंपिक असतं. याशिवाय अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेकही (ABC) लोकप्रिय मानला जातो. आपल्या मोहिमांच्या निमित्तानं असे ट्रेक आयोजित करण्याची संकल्पना लोकप्रिय ठरते आहे.

इतरत्रही उपक्रम
एव्हरेस्टच्या निमित्तानं मुंबई, अमरावती, सातारा, कोल्हापूर, नागपूर, सांगली अशा विविध ठिकाणी काही उपक्रम राबवले जातात. तिथं उमेश व इतर गिर्यारोहक सादरीकरणासह व्याख्यानं देतात. या उपक्रमांतून गिर्यारोहणाला चालना मिळते.

संशोधनाचा पैलू
कांचनजुंगा हे शिखर दुर्लक्षित असल्यामुळे व सिक्कीममधील नागरिकांच्या श्रद्धेमुळे भारतातून चढाई करणं शक्‍य नसल्यामुळे ही मोहीम महत्त्वाची ठरली. त्यानिमित्तानं इथल्या जैववैविध्यानं समृद्ध परिसरातील दगड, माती, पशू-पक्ष्यांची विष्ठा आदींचे नमुने गोळा करून त्यांचं संशोधन करण्याचा उद्देशही होता. त्यासाठी ही मोहीम "इको' म्हणजे पर्यावरणपूरक होती याचाही उल्लेख करावा लागेल.

तयारी शारीरिक, पैलू भावनिक
अष्टहजारी शिखर मोहिमांसाठी कठोर शारीरिक तयारी करावी लागते. ही तयारी मानसिक कसोटी बघणारी असते. अशा वेळी त्यास भावनिक किनार देण्याची "गिरिप्रेमी'ची पद्धत "रोलमॉडेल' मानावी लागेल. प्रत्यक्ष शिखर चढताना गिर्यारोहकाच्या पाठीवर सुमारे चार ते साडेचार किलो वजनाचा ऑक्‍सिजन सिलिंडर असतो. त्यासह व बॅगेचं वजन मिळून सुमारे दहा किलोचा भार तो पेलत असतो. समुद्रसपाटीपासून इतक्‍या उंचीवर जाऊन चढाई करण्याची क्षमता विकसित व वृद्धिंगत करणं खडतर असतं. त्यासाठी एव्हरेस्ट मोहिमेपूर्वी गिर्यारोहकांनी एकमेकांना पाठीवर घेऊन पर्वती चढण्याचा सराव केला. "एव्हरेस्टवीर' गणेश मोरे याच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक तंदुरुस्ती व दमसास कमाल पातळीवर उंचावण्यासाठी या मोहिमेपूर्वी झालेले ते प्रयत्न - ज्यात तब्बल 27 तासांच्या अथक ट्रेकचा समावेश होता - संघभावना वृद्धिंगत करणारे होते.

"गिरिप्रेमी'ची आजवरची कामगिरी बघता एका देशातील, एका शहरातील एका संस्थेतल्या गिर्यारोहकांनी केलेली कामगिरी म्हणजे कमाल ठरते. कांचनजुंगाच्या निमित्तानं या कामगिरीला सलाम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com