केदार : स्वप्नाळू नव्हे कष्टाळू (मुकुंद पोतदार)

kedar jadav
kedar jadav

केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी...

तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013. पूना क्‍लबवर "विजय हजारे करंडक राष्ट्रीय वन-डे क्रिकेट स्पर्धे'त महाराष्ट्र आणि बडोदा यांच्यात लढत सुरू होती. महाराष्ट्राचा डाव 49 षटकांत 177 धावांत आटोपला होता. आव्हान माफक असलं तरी महाराष्ट्रानं आक्रमक पवित्रा घेत कसून प्रयत्न केले. त्याला थोडं फळ मिळालं. बडोद्याची 3 बाद 34 आणि 4 बाद 103 अशी अवस्था झाली होती. प्रतिस्पर्धी कर्णधार युसूफ पठाण याचाच मोठा अडथळा होता. त्याच्याविरुद्ध आणखी आक्रमक पवित्रा घेण्यात आला; पण युसूफनं 55 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 86 धावा फटकावल्या. बडोद्यानं 4 विकेट आणि 124 चेंडू राखून बाजी मारली. युसूफची खेळी पठाणी हिसका दाखवणारी होतीच. शिवाय, विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यानं असभ्य हावभाव करत महाराष्ट्राला डिवचलं. तेव्हा मोजकेच स्थानिक पत्रकार उपस्थित होते. त्यांच्याशी बोलतानासुद्धा युसूफ रागातच होता. तेव्हा तो म्हणाला होता ः "महाराष्ट्राचा संघ बाद फेरी गाठण्याच्या पात्रतेचा नाही. आक्रमकतेचा अतिरेक करण्याच्या प्रयत्नात त्यांनी फोकस गमावला. त्यांनी स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करावं. मैदानावर आक्रमकता दाखवावी; पण त्या नादात खेळ भरकटता कामा नये.''

युसूफनं टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली असली तरी तीत तथ्य होतं. तेव्हा आयपीएल सुरू होऊन पाच वर्षं उलटली होती. लहान लहान राज्यांतील छोट्या छोट्या गावांतील खेळाडू आयपीएलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मजल मारत असताना महाराष्ट्राची मात्र पीछेहाट होत होती. प्रा. दि. ब. देवधर यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचं क्रिकेट कुंपण पार करत नव्हते. वास्तविक तेव्हाच्या संघाकडून बऱ्याच आशा होत्या; पण युसूफनं हिसका दाखवत मोहिमेचा विचका केलाच होता, त्याचवेळी पत्रकारांशी बोलत असताना तेव्हाचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी मैदानावरच खेळाडूंची मीटिंग घेतली. सगळ्या खेळाडूंचे चेहरे पडले होते. त्या वेळी पेटून उठलेल्या खेळाडूंत आघाडीवर होता तो केदार जाधव.

त्याच महाराष्ट्राच्या संघानं याच केदार जाधवच्या झुंजार कामगिरीच्या जोरावर पुढील मोसमात रणजी करंडक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्या मोसमात मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर उपांत्यपूर्व फेरीत, बंगालविरुद्ध इंदूरमधील होळकर स्टेडियमविरुद्ध उपांत्य फेरीत आणि कर्नाटकविरुद्ध हैदराबादमधील उप्पल स्टेडियमवर अंतिम फेरीत महाराष्ट्रानं आपली पात्रता दाखवून दिली. कर्नाटकचा कर्णधार आर. विनयकुमार यानं गोलंदाजांचे स्पाईक्‍स (लोखंडी खिळे) असलेले बूट घालून फलंदाजी केली. त्याच्याविरुद्ध पंचांनी बोटचेपं धोरण पत्करलं. त्यानंतरही महाराष्ट्राची फलंदाजी सुरू असताना कर्नाटकचे रडीचे डावपेच कायम होते. त्या सामन्यात केदारनं झुंजार शतक काढून शर्थीची झुंज दिली; पण अखेरीस महाराष्ट्राचा पराभव झाला. ऐतिहासिक कामगिरीची महाराष्ट्राची संधी हुकली. त्यानंतर महाराष्ट्राचे क्रिकेट अपेक्षित भरारी घेऊ शकलं नाही; पण केदारनं गरुडझेप घेतली ती थेट विश्वकरंडक संघात स्थान मिळवण्यापर्यंत.

केदारच्या या भरारीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या निवडीविषयी शंका नव्हती. त्यानं संघात हक्काचं स्थान निर्माण केलं. सन 2013-14 च्या मोसमात त्यानं रणजी स्पर्धेत सर्वाधिक 1223 धावा काढताना सहा शतकं ठोकली. भारतीय संघाचे दरवाजे त्यानं या कामगिरीसह स्वतःसाठी खुले केले. पुढं झिंबाब्वेविरुद्ध हरारेमध्ये केदारनं चौथ्याच सामन्यात नाबाद 105 धावा केल्या. त्या वेळी त्यानं महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला होता. धोनीनं कारकीर्दीतील पाचव्या सामन्यात पहिलं शतक ठोकलं होतं. केदारनं चौथ्या सामन्यात ही कामगिरी केली.

क्रिकेटमधले असे विक्रम संदर्भासाठी फार काळजीपूर्वक वापरावे लागतात. त्यातून टोकाचा अर्थ काढायचा नसतो; पण केदारनं आपल्या क्षमतेची सिद्धता केली होती. सन 2013-14 च्या मोसमात पुण्यातील सामन्यांचं वार्तांकन, तसेच हैदराबाद आणि इंदूर येथील सामन्यांना उपस्थित राहिल्यामुळे केदारशी चांगली मैत्री झाली होती. "महाराष्ट्राच्या खेळाडूंना कोणत्याच पातळ्यांवर पुरेसा पाठिंबा मिळत नाही, प्रसारमाध्यमंसुद्धा याला अपवाद नाहीत,' अशी खंत तो व्यक्त करायचा. झिंबाब्वेतील शतकी खेळीनंतर, तसेच मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या केदारनं दोन वार्तालाप कार्यक्रम आयोजित केले होते. त्या वेळी पुण्यातील प्रसारमाध्यमांनी इतका पाठिंबा दिल्याबद्दल केदारनं, तसेच त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला होता.

अर्थात केदारची ही वाटचाल सोपी नव्हती. त्याला भारतीय संघातील स्थान भक्कम करणं तेवढं सोपं नव्हतं. असं म्हणतात की भारतीय क्रिकेटमधील राजकारण हे प्रत्यक्षातील राजकारणापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे, फक्त ते कधी बाहेर येत नाही. अशा वेळी केदारनं हक्काचं स्थान निर्माण केलं ते केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या जोरावर. साडेपाच फूट उंची, नाजूक स्वर, छोटी चण असं फर्स्ट इम्प्रेशन प्रभावी वाटलं नाही तरी त्याचं मनोधैर्य खंबीर आहे. इतरांवर मात करण्यासाठी किंवा कुरघोडी करण्यासाठी नव्हे तर वैयक्तिक कामगिरी उंचावण्यासाठी त्यानं कसून सराव केला.
कारकीर्दीत दुखापतींचे अडथळे आल्यानंतर त्यानं तंदुरुस्ती उंचावण्यासाठी केलेले त्याग थक्क करणारे आहेत. केदारचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची निरीक्षणशक्ती सूक्ष्म आहे. दुसऱ्यात जे चांगले आहे ते आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्याने विराटकडून तंदुरुस्तीचा, तर महेंद्रसिंह धोनीकडून क्रिकेटच्या बुद्धीचा धडा घेतला. विराटला जिगरबाज लढवय्ये आवडतात आणि केदारची जिगर त्याला ठाऊक होती. विराट स्वतः वैयक्तिक कामगिरीचे मापदंड उंचावत नेतो आणि सहकाऱ्यांनीही तेच करावं अशी त्याची अपेक्षा असते.

यासंदर्भात केदारनं विराटचा विश्वास कमावला तो पुण्यातच. गहुंजे येथील मैदानावर 15 जानेवारी 2017 रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या लढतीत त्यानं 120 धावांची खेळी केली. विराटचा वाटा 122 धावांचा होता. केदारनं सामनावीर पुरस्कार स्वीकारण्याआधी विराटनं केदारविषयी भरभरून भाष्य करताना त्याच्या कुटुंबीयांचा आवर्जून उल्लेख केला. "याआधी केदार काही वेळा चांगल्या सुरवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नव्हता. आम्ही तेच करण्यावर भर दिला. त्यानं हे करून दाखवलं याचा आनंद आहे,' अशी विराटची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. त्या इनिंगमधील केदारचे काही शॉट पाहून विराटही चकित झाला होता.

त्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर धोनीनं कर्णधारपद सोडलं होतं. वन-डेसाठीसुद्धा विराटकडं नेतृत्व कायमस्वरूपी आलं होतं. विराटसाठी हा सामना महत्त्वाचा होता. त्यात चमकलेल्या केदारची उपयुक्तता विराटच्या लक्षात आली.
केदारनं तेवढ्यावरच समाधान मानलं नाही. त्यानं क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावला. बंगळूरला राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीत त्यानं कसून सराव केला. झटपट क्रिकेटसाठी निवडलेल्या खेळाडूंच्या साथीत केदारनं ही मेहनत केली.

केदारचं हक्काचं स्थान निर्माण झालं ते गोलंदाजीमुळे आणि याचं सर्वांनाच आश्‍चर्य वाटतं. याविषयी केदार श्रेय देतो ते धोनीला. धरमशालामधील सरावाच्या वेळी धोनीला काहीतरी क्‍लिक झालं आणि मग त्यानं केदारमधील गोलंदाज शोधून काढला. केदारचा चेंडू इतका फसवा असतो की तंत्रशुद्ध फलंदाज सुनील गावसकर हेसुद्धा Below See level असा शब्दप्रयोग करतात. कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा यांच्या नव्हे तर केदारच्या गोलंदाजीत यामुळेच एक्‍स फॅक्‍टर आहे. त्याचे चेंडू सुमारे पाच फुटांवरून घड्याळ्याच्या काट्यातील तीन-पावणे तीनच्या उंचीवरून येतात. केदार आणि यष्टिरक्षक धोनी यांच्यातील परफेक्‍ट ट्यूनिंगही महत्त्वाचं ठरतं. फलंदाजाचा पवित्रा, त्याची देहबोली, इतकंच नव्हे तर, पुढील कृतीविषयी धोनी सगळ्याच गोलंदाजांना टिप्स देत असतो. केदार याचा आवर्जून उल्लेख करतो.
"रणजीमध्ये चमकलेला तंत्रशुद्ध फलंदाज' इथपासून ते "झटपट क्रिकेटमधील युटिलिटी क्रिकेटपटू' अशी घोडदौड केदारनं केली. मुंबई, नागपूर आणि पुण्याला क्रिकेटच्या निकषांवर वेगळे संदर्भ आहेत. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे, तर विदर्भानं रणजी करंडक सलग दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विश्‍वकरंडक खेळणारा क्रिकेटपटू केदारमुळे आता पुण्यात उदयाला आला आहे. मुख्य म्हणजे नुसतं स्वप्न न पाहता त्यानं ते कष्टानं साकार केलं आहे. जाधवांच्या स्वप्नाळू नव्हे, तर कष्टाळू केदारचं कौतुक म्हणूनच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com