जगी सर्वसुखी अन्‌ संपन्न चॅंपियन (मुकुंद पोतदार)

मुकुंद पोतदार balmukund11@yahoo.com
रविवार, 16 जून 2019

जोशपूर्ण अन्‌ जिगरबाज खेळाच्या जोरावर स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याची कामगिरी प्रेरणादायी ठरलीय. फ्रेंच ओपनशी तर त्याचं रक्ताचं नातं आङे. स्पेनच्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रीडापटूनं कारकीर्दीत 12 वं फ्रेंच, तर एकूण 18 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. कारकीर्दीत वेळोवेळी दुखापतींवर मात केलेले रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच अशा समकालीन प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना शह दिलेल्या नदालच्या कारकीर्दीच्या वैविध्यपूर्ण पैलूंविषयी...

जोशपूर्ण अन्‌ जिगरबाज खेळाच्या जोरावर स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याची कामगिरी प्रेरणादायी ठरलीय. फ्रेंच ओपनशी तर त्याचं रक्ताचं नातं आङे. स्पेनच्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रीडापटूनं कारकीर्दीत 12 वं फ्रेंच, तर एकूण 18 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. कारकीर्दीत वेळोवेळी दुखापतींवर मात केलेले रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच अशा समकालीन प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना शह दिलेल्या नदालच्या कारकीर्दीच्या वैविध्यपूर्ण पैलूंविषयी...

"शेजाऱ्याचा बंगला तुमच्यापेक्षा भव्य आहे...शेजाऱ्याची बाग तुमच्यापेक्षा प्रशस्त आहे...शेजाऱ्याकडील टीव्ही तुमच्यापेक्षा मोठा आहे...शेजाऱ्याची गर्लफ्रेंड जास्त सुंदर आहे...असा विचार करत कुढत बसून तुम्ही दिवसभर खिन्न राहू नये...'

हे उद्गार कुणी काढले आहेत, कोणत्या परिस्थितीत काढले आहेत, त्यामागचे संदर्भ काय आहेत असे मुद्दे क्षणभर बाजूला ठेवू या. कोणत्याही धर्मातल्या पारंपरिक गुरूंना किंवा आजकाल सोशल मीडियाचं माध्यम क्‍लिक करत यू ट्यूबवर अवतरणाऱ्या ई-गुरूंना "कलियुगात सुखी जीवनाचा मंत्र कोणता' असं विचारलं तर ते हेच सांगतील. त्यामुळे खरं तर हे उद्गार "वचन-विवेचन' या पातळीवरचे ठरतात. ज्यानं टेनिसच्या खेळात आपलं अनोखं "प्रारब्ध' घडवलं आहे, ज्यानं अतुलनीय पराक्रम गाजवला आहे त्याचं हे अद्वितीय "प्राक्तन' होय. "दासबोधा'तल्या स्वामी समर्थांच्या उक्तीप्रमाणे हा जगी-सर्व-सुखी टेनिसपटू म्हणजे रॅफेल नदाल. स्पेनच्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रीडापटूनं कारकीर्दीत 12 वं फ्रेंच, तर एकूण 18 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं. यंदा क्‍ले कोर्ट मोसम फारसा फलदायी ठरला नसतानाही त्यानं उपांत्य फेरीत त्याच्या पिढीतला स्वित्झर्लंडचा सुपरस्टार रॉजर फेडरर, तर अंतिम फेरीत नव्या पिढीतला ऑस्ट्रियाचा स्टार डॉमनिक थीमला हरवलं.

फेडररच्या खात्यात 20 ग्रॅंड स्लॅम करंडक आहेत, तर नदालची हीच संख्या आहे 18. या दोघांनी सर्वोच्च पातळीवर संपादन केलेल्या सुयशातला फरक प्रथमच दोनपर्यंत कमी झाला होता. एरवी फेडररनं नदालच्या तुलनेत किमान तीन किंवा जास्त ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकले होते. या पार्श्वभूमीवर फेडररला गाठण्याची आणि मागं टाकण्याची कितपत संधी आहे असं वाटतं असा प्रश्न नदालला विचारण्यात आला होता.
त्यावर आपल्या कारकीर्दीकडं किंवा टेनिसच्या खेळाकडेच नव्हे तर एकूणच जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे याविषयी नदालनं वरील (लेखाच्या सुरवातीला दिलेलं) भाष्य केलं.
तो म्हणाला : ""माझ्याबाबतीत घडणाऱ्या सर्व घटना पाहून मी सुदैवी असल्याची माझी भावना आहे. मी सर्वांत शेवटी कोणत्या गोष्टीचा विचार करत असेन तर ती म्हणजे फेडररला गाठणं! त्याची कामगिरी माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. मात्र, त्याची बरोबरी करण्याच्या इराद्यानं मला पछाडलेलं नाही. या घडीला मी प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटतो आहे. भविष्यात जे काही घडेल ते आपण पाहूच.''

पर्याय दोन मार्गांचा
जीवनात कोणत्याही क्षणी प्रत्येकासमोर दोन मार्ग असतात. एक असतो वळणावळणांचा आणि लांब, तर दुसरा झटपट म्हणजे शॉर्टकट असतो. नदालला यंदा यश हुलकावणी देत होतं. त्यातच दुखापती उचल खात होत्या. त्या वेळी आपण किती हताश झालो होतो हे तो सांगतो :
""एकाच वेळी बऱ्याच प्रतिकूल गोष्टी घडतात तेव्हा मोठी कठीण वेळ येते. तुम्हाला सतत धक्के बसत राहतात, अखेरीस तुम्ही कोलमडता. दोन महिन्यांपूर्वी असंच झालं. मी एनर्जीच गमावली होती. माझ्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे, खेळणं अचानक थांबवायचं किंवा दृष्टिकोन बदलायचा. मी दुसरा पर्याय निवडून तो अमलात आणू शकलो. त्यासाठी अगदी छोटीशी गोष्ट लागते अन्‌ ती म्हणजे टेनिसवरची निष्ठा. तीच पुढं जाण्यास प्रेरित करत असते.''

नदालचे बोल
- ""मी कधीच कुणालाही खूश करण्यासाठी खेळलो नाही.''
- ""जेव्हा बॅड पॅचला सामोरं जावं लागतं तेव्हा विजयाचं मोल जास्त कळून येतं.''
- ""कोणताही करंडक पटकावण्यापेक्षाही चांगली व्यक्ती असणं हे जास्त मोलाचं असतं.''
-"" एखादा खेळाडू रोज कोर्टवर उतरतो तेव्हा तो प्रत्येक वेळी संकटात असतो. तो जिंकतो किंवा हरतो. ते त्याच्या प्रयत्नांवर अवलंबून असतं.''
- ""दरवेळी मी कोर्टवर उतरतो तेव्हा प्रतिस्पर्ध्याविषयी परमोच्च आदर बाळगतो, कारण निकाल काहीही लागू शकतो.''

आधीचे विक्रम महिलांचे
नदालनं एका विक्रमाची बरोबरी केली, तर दुसरा मोडला. हे दोन्ही विक्रम महिलांचे आहेत हे विशेष. एकच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा आधीचा उच्चांक ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर होता. हौशी आणि व्यावसायिक कालावधी मिळून त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 11 वेळा जिंकली. कोणत्याही पातळीवरची स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा उच्चांक मार्टिना नवरातिलोवाच्या नावावर आहे. तिनं शिकागोतली स्पर्धा 12 वेळा जिंकली.

पुरुषांना केव्हाच मागं टाकलं
स्वीडनच्या बियॉं बोर्ग यांनी सलग चार व एकूण सहा वेळा फ्रेंच जेतेपद मिळवलं. नदालनं दुप्पट म्हणजे 12 वेळा यश मिळवलं. क्‍ले कोर्टवर सर्वाधिक 49 जेतेपदांचा उच्चांक अर्जेंटिनाच्या गुलेर्मो विलास यांच्या नावावर होता. यात ते एकदाच फ्रेंच जेतेपद मिळवू शकले, तर अमेरिकन स्पर्धा क्‍ले कोर्टवर झाली तेव्हा ते जिंकले. नदालनं आतापर्यंत 59 वेळा क्‍ले कोर्टवरच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. कोणत्याही खेळात विक्रम मोडले जातात असं इतिहास सांगतो. क्‍ले कोर्टवरच्या आधीच्या दिग्गजांना केव्हाच मागं टाकलेल्या नदालचा उच्चांक कुणी मोडू शकेल का असा प्रश्‍न तज्ञांना पडला आहे.

ग्रॅंड स्लॅम उच्चांक
ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचा निकष लावला तर व्यावसायिक युगात (Open Era) एक स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम नवरातिलोवाच्या नावावर होता. तिनं 1978 मध्ये पहिलं, तर 1990 मध्ये नववं विंबल्डन विजेतेपद मिळवलं. 1990 च्या दशकानंतर अनेक दिग्गज पुरुष खेळाडूंना अशी मक्तेदारी निर्माण करता आली नाही. त्यातही पुरुष टेनिसमधील चुरस पाहता असा पराक्रम गाजवणं सोपंसुद्धा नव्हतं. नदालनं 2017 मध्ये दहाव्या फ्रेंच जेतेपदासह हा उच्चांक मागं टाकणं महत्त्वाचं ठरतं.

नंबर वन चॅम्पच्या रूपानं प्रशिक्षक
21 व्या शतकात टेनिसमध्ये सुपर कोचचा उदय झाला. आज घडीच्या प्रमुख खेळाडूंनी आधीचा एक काळ गाजवलेल्या दिग्गज खेळाडूचं मार्गदर्शन घेण्याची प्रथा सुरू झाली. यात ब्रिटनच्या अँडी मरे यांन तत्कालीन झेकोस्लोव्हाकियाच्या इव्हान लेंडलला, सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं जर्मनीचा दिग्गज बोरीस बेकरला, तर फेडररनं स्वीडनच्या स्टीफन एडबर्गला आमंत्रित केलं. प्रशिक्षक म्हणजे कोच किंवा सुपर कोचपेक्षाही मेंटॉरची भूमिका या मातब्बरांनी पार पाडली. नदाल याबाबतीत मागं होता. अंकल टोनी यांचं मार्गदर्शन परिणामकारक ठरत नसल्याचं आणि इतरांप्रमाणे सुपर कोच केव्हा नेमणार असं नदालला अनेक वेळा उघडपणे विचारण्यात आलं होतं. मात्र, नदालचा काही निर्णय होत नव्हता. अखेर 2016 च्या मोसमाअखेर त्यानं कार्लोस मोया नामक देशबांधवाला पाचारण केलं. अर्थात, त्यानं अंकल टोनी यांना बाजूला केलं नव्हतं. अंकल टोनी यांनीच मोयाला फोन लावून प्रस्ताव दिला.

प्रशिक्षक नव्हे; सखा
नदालनं 2016 मध्ये मोया याला प्रशिक्षक म्हणून नेमलं. त्यानं नदालसाठी पार पाडलेली भूमिका मात्र सख्याची होती. मोया म्हणतो : "राफाला प्रतिकूल काळाला सामोरं जावं लागलं. अशा वेळी मला ट्रेनरपेक्षा ज्याच्याशी राफा बोलू शकेल आणि ज्याचं ऐकू शकेल असा मित्र बनणं आवश्‍यक होतं. अशा वेळी तांत्रिक भूमिका बाजूला ठेवायची असते.''

मोयामुळे मास्टरस्ट्रोक
मोया प्रशिक्षक बनल्यापासून नदालच्या खेळात "धूर्त' बदल झाले. ते असे :
- वाढत्या वयामुळे एनर्जी वाचवण्यासाठी आक्रमक खेळाचं तंत्र आत्मसात केलं
- फेडररचा कित्ता गिरवत गुण शक्‍य तेवढ्या कमी शॉटमध्ये जिंकण्याचा प्रयत्न, त्यादृष्टीनं डावपेचांची आखणी
- एरवी नदालला लय गवसण्यासाठी वेळ लागायचा, त्यातून दुखापत असताना खेळणं जिकिरीचं ठरायचं
- फर्स्ट सर्व्हमधली अचूकता आणि परिणामकारकता वाढली.
- सर्व्हिस यशस्वीरीत्या परतवली जाण्याचं प्रमाण घटलं.
- रॅलींचे प्रमाण कमी होऊन लीलया गुण मिळण्याचं (Free Points) प्रमाण वाढलं.
- पाच शॉटपर्यंतच रॅली होऊन गुण जिंकण्याचं प्रमाण वाढलं.
- फर्स्ट सर्व्हनंतर पहिला शॉट म्हणून बॅकहॅंडचा वापर भेदक ठरला.
- पूर्वी बेसलाइनवरून धावाधाव करणारा नदाल आता कोर्टच्या मध्यभागी पाय रोवून उभा राहतो आणि बॅकहॅंडच्या जोडीला फोरहॅंडही मारतो. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांसाठी कोणताही भाग सुरक्षित ठरत नाही
... रॅली संपवण्याचा म्हणजे गुण जिंकून देणारा शॉट म्हणून बॅकहॅंड विनर्स मारण्याचं प्रमाण वाढलं

कार्लोस मोयाविषयी...
...स्पेनचा असण्याबरोबरच नदालप्रमाणेच बॅलेरिक बेटांवरील मायोर्काचा रहिवासी.
...एकदा फ्रेंच जेतेपद (1998).
...1999 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल.
...नदाल आणि मोया आठ वेळा आमनेसामने, त्यात नदालची सहा वेळा सरशी.
...2004 मध्ये स्पेनला डेव्हिस कप जिंकून देण्यात दोघांचा वाटा.
... प्रशिक्षक म्हणून मोयाचं नदालपूर्वी कॅनडाच्या मिलॉस राओनिच याला मार्गदर्शन. मिलॉसची जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल.

नदालविषयी मोया
राफा हा स्पेशल खेळाडू आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे तो माणूस आणि मित्र म्हणून ग्रेट आहे. त्याच्याविषयी मला पूर्ण भरवसा वाटतो. तो आणि अंकल टोनी यांच्या साथीत आम्ही महत्त्वाचे करंडक जिंकण्याचा क्रम कायम ठेवू असा मला विश्वास वाटतो.

दिग्गजांची प्रतिक्रिया :
दहा फ्रेंच ओपन करंडक? नाही, ते कदापि शक्‍य नाही, मला एकदाच जिंकण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला की काही विचारूच नका आणि यानं तर दहा वेळा इथं यश मिळवलं आहे. हे केवळ थक्क करणारं आहे. क्‍ले कोर्टवरच्या खेळाचा दर्जा त्यानं सर्वस्वी नव्या पातळीवर नेऊन ठेवला आहे. तो जगभरातल्या अनेकांसाठी मोठं प्रेरणास्थान आहे.
- आंद्रे अगासी, अमेरिकेचा माजी टेनिसपटू
(अगासी 1990 व 91 अशी सलग दोन वर्षं फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरी हरला. अखेर 1999 मध्ये तो विजेता ठरला.)

क्‍ले कोर्टवर बियॉं बोर्गपेक्षा सरस यश कुणी मिळवू शकेल आणि जिमी कॉनर्सपेक्षा जास्त प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकेल असे मला मुळीच वाटलं नव्हतं. नदालनं दोन्ही बाबतींत सरस प्रदर्शन केलं आहे.
- जॉन मॅकेन्रो, अमेरिकेचे माजी टेनिसपटू

प्रत्येक चेंडू नदालसाठी जणू काही मॅचपॉइंटच असतो. तो 110 टक्के प्रयत्न करणार आणि एकही चेंडू सोडणार नाही हे प्रतिस्पर्ध्यालासुद्धा ठाऊक असतं. वयाची तिशी पार केली तरी नदाल बॅकहॅंडमध्ये सुधारणा करतो आहे. हे किती अवघड असतं याची मला कल्पना आहे. त्यासाठी दिवसाला सात-आठ तास सराव करावा लागतो.
- बियॉं बोर्ग, स्वीडनचे माजी टेनिसपटू

नदालच्या 12 फ्रेंच विजेतेपदांविषयी पुढील 200 वर्षं लोक चर्चा करत राहतील.
- ग्रेग रुसेड्‌स्की, ब्रिटनचे माजी टेनिसपटू

सोशल मीडियापासून लांब राहणारी मैत्री
मारिया फ्रान्सिस्का ऊर्फ सिस्का पेरेल्लो ही नदालची मैत्रीण आहे. या दोघांत 2005 पासून रेशीमगाठी जुळल्या. सिस्का नदालच्या सामन्यांना शक्‍य तेवढं कमी उपस्थित राहते. ती सोशल मीडियापासूनही दूर राहते. ती विमातज्ज्ञ व्यावसायिक आहे. नदालच्या ऍकॅडमीत ती संचालिकाही आहे.
"मी नदालविषयी अगदी माझ्या माहेरच्यांशीही फार बोलत नाही,'' असं ती सांगते!

असाही एक सहकारी
- जिवलग मित्र बार्तोलोम ऊर्फ टॉमेयू साल्वा-विडाल याचा यंदा संघात समावेश.
- एकाच वर्षी, एकाच ठिकाणी जन्म.
- जीवश्‍चकंठश्‍च मित्र.
- ज्युनिअर डेव्हिस कपमध्ये एकत्र सहभाग.
- टॉमेयूला मर्यादित यश, वयाच्या 22 व्या वर्षी निवृत्ती.
- काही काळ महिला टेनिसपटू ऍना इव्हानोविच हिचा प्रॅक्‍टिस-पार्टनर.
- गेल्या वर्षी नदालच्या ऍकॅडमीत दाखल.
- नदालबरोबर काही महिने प्रवास करून त्यातून मिळणारा अनुभव ऍकॅडमीतील मुलांसह वाटून घेण्याची जबाबदारी.

दिल्लीतला दाखला
भारतात ऍकॅडमी सुरू करण्यासाठी नदाल 2016 मध्ये दिल्लीत आला होता. त्या वेळी ग्रॅंड स्लॅम जेतेपदाची प्रतीक्षा कधी संपुष्टात येईल, या प्रश्नावर तो म्हणाला होता : ""पुढील ग्रॅंड स्लॅम करंडक केव्हा जिंकेन हे मला माहीत नाही. तसं घडेल का हेसुद्धा मला ठाऊक नाही. मला जर कशाची गरज असेल तर ती फक्त चांगलं खेळण्याची.''

दुखापतींचं शुक्‍लकाष्ठ
2003 पासून नदालच्या कारकीर्दीत दुखापतींमुळे वेळोवेळी किमान 55 हून जास्त वेळा व्यत्यय आला. डावा खांदा, डावा घोटा, छाती, दोन्ही गुडघ्यांचे स्नायुबंध, डाव्या पायाला सूज, डाव्या हाताचं बोट, बरगड्या, उजव्या मांडीचा सांधा, कंबर, मांडीचे स्नायू, गुडघे, गुडघ्यांचे स्नायुबंध, पोट, माकडहाड, डावी टाच, उजवं मनगट...अशा असंख्य प्रकारच्या दुखापती त्याला झाल्या.

माघारीचं प्रमाण :
नदालला 2003 मध्ये ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, 2004 मध्ये फ्रेंच, विंबल्डन, 2006 मध्ये ऑस्ट्रेलियन, 2009 मध्ये विंबल्डन, 2012 मध्ये अमेरिकन, 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन, 2014 मध्ये अमेरिकन, 2016 मध्ये विंबल्डन अशा ग्रॅंड स्लॅम स्पर्धांना मुकावं लागलं. दुखापतींचा अडथळा न येता कारकीर्द सुरू राहिली असती तर नदाल याहून यशस्वी ठरला असता असं तज्ज्ञांना वाटतं.

"फ्रेंच ओपन'दरम्यान वाढदिवस
नदालचा जन्म ता. तीन जून 1986 रोजी झाला. फ्रेंच ओपन त्याच कालावधीत होत असते. पॅरिसमधल्या "रोलॉं गॅरो'वरच्या लाल मातीच्या कोर्टशी त्याचा गाढ ऋणानुबंध असल्याची त्याच्या चाहत्यांची भावना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukund potdar write tennis rafael nadal article in saptarang