पराक्रम थॉमस करंडकाचा

बॅडमिंटनबरोबरील माझं नातं प्रेमाबरोबरच द्वेषाचंही आहे. माझं सारं जीवन बॅडमिंटनभोवती केंद्रित आहे. जीवनाचा आनंद लुटण्यात मला मर्यादा आल्या.
Badminton Thomas Karandak
Badminton Thomas Karandaksakal
Summary

बॅडमिंटनबरोबरील माझं नातं प्रेमाबरोबरच द्वेषाचंही आहे. माझं सारं जीवन बॅडमिंटनभोवती केंद्रित आहे. जीवनाचा आनंद लुटण्यात मला मर्यादा आल्या.

बॅडमिंटनबरोबरील माझं नातं प्रेमाबरोबरच द्वेषाचंही आहे. माझं सारं जीवन बॅडमिंटनभोवती केंद्रित आहे. जीवनाचा आनंद लुटण्यात मला मर्यादा आल्या. कामगिरीत कशी सुधारणा करायची, याचाच विचार तुम्ही सतत करीत असता. तुम्ही आत्मपरीक्षण करून, चुका हेरून स्वतःवर टीका करता. पराभवानंतर रसातळाला गेल्यानंतरचा काळ सतत तुमचा पाठलाग करीत असतो. पराभवानंतर तुम्ही हृदयावर जाणूनबुजून ओरखडे ओढता.

- मथायस बो, डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू

भारताला थॉमस करंडक जिंकून दिलेल्या संघातील दुहेरीच्या प्रशिक्षकांचं हे विवेचन आहे. दुहेरीच्या महत्त्वपूर्ण लढतीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या महंमद एहसान-केव्हिन संजया सुकामुल्जो यांना पराभवाच्या खाईतून तीन गेममध्ये हरविलं आणि भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय जोडीने २०१८ मध्ये या जोडीला गारद केलं होतं, त्यामुळे मिळालेलं मानसिक वर्चस्व त्यांनी कोर्टवर कायम राखलं.

पाच लढतींच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेननेही एका गेमच्या पिछाडीनंतर अँथनी गिन्टिंग याच्याविरुद्ध बाजी मारली होती. त्यामुळे ०-२ अशा पिछाडीनंतर इंडोनेशियाला उरलेल्या तिन्ही लढती जिंकणं अनिवार्य होतं. प्रत्यक्षात किदांबी श्रीकांत याने जोनाथन ख्रिस्तीला दोन गेममध्येच हरवून ऐतिहासिक जेतेपद साकार केलं. या यशातील दुहेरीतील विजय अनमोल ठरला.

भारतीय बॅडमिंटन प्रामुख्याने वैयक्तिक यशासाठी, म्हणजे एकेरीसाठी ओळखलं जातं. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी अभूतपूर्व यश मिळवलं. अशावेळी सात्त्विक साईराज-चिराग यांच्यात विजिगीषू वृत्ती निर्माण केलेल्या बो यांच्याविषयी आधी एक खेळाडू म्हणून जाणून घ्यावं लागेल. दुहेरीत २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्य, जागतिक स्पर्धेत २०१३ मध्ये रौप्य, तर २०१४ मध्ये ब्राँझ, अशी त्यांची कामगिरी आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, २०१६ मध्ये थॉमस करंडक जिंकलेल्या संघाच्या यशात त्यांचा बहुमोल वाटा होता. दुसरीकडे त्यांना अपयशही पचवावं लागलं होतं. ऑलिंपिकमध्ये त्यांचं सुवर्णपदक हुकलं होतं. २०१० च्या ऑल इंग्लंड स्पर्धेत कर्स्टेन मॉजेन्सन याच्या साथीत त्यांनी अंतिम फेरीत लार्स पास्के-योनास रासमुसेन यांच्याविरुद्ध चार मॅच पॉइंट गमावले होते. त्यानंतर पुढच्याच, तसेच २०१५ मध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकली.

यावरून पराभवानंतर बोध घेत आत्मपरीक्षण करणं, चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर परिश्रम करणं, सरावातील मेहनतीचं कोर्टवर कामगिरीत रूपांतर करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचं दिसून येतं. बॅडमिंटनमध्ये इंडोनेशिया, मलेशिया, चीन या महासत्ता आहेत.

प्रशिक्षणासाठी एक सिस्टीम म्हणून डेन्मार्क हा देश ओळखला जातो. अशा देशाचा आणि त्या देशाला थॉमस करंडक जिंकून दिलेले बो मार्गदर्शक म्हणून लाभणं भारतीय जोडीसाठी महत्त्वाचं ठरलं. मुख्य म्हणजे बो यांनी २०२० च्या टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय जोडीला मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांना या पदावर कायम राहायचं होतं; मात्र भारतीय बॅडमिंटन महासंघाने मलेशियाच्या टॅन किम हेर यांना करारबद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. २०१५ ते २०१९ असा दीर्घकाळ ते प्रशिक्षक होते. या वेळी त्यांची नियुक्ती जवळपास नक्की झाली होती; मात्र त्यांनी काही कारणास्तव नकार दिला, त्यामुळे बो यांना संधी मिळाली.

बो यांची प्रशिक्षणाची पद्धत आगळी आहे. सकाळ-संध्याकाळ तीन तासांची सत्रं आखल्यानंतर जेमतेम निम्माच वेळ गांभीर्याने घालवता येतो असं त्यांचं मत आहे. त्यामुळे कमी कालावधीची; पण अत्यंत तीव्रतेची, तसंच चुरशीची सराव सत्रं आखण्याचं त्यांचं धोरण असतं. प्रथमदर्शनी अत्यंत शांत स्वभावाचे वाटणारे बो शिस्तीचे भोक्ते आहेत. कोर्टवर ३९ मिनिटं झुंज दिल्यानंतर ३०-४० सेकंद ढिलं पडल्यास तीन-चार गुणांसह सामना गमवावा लागतो. हे टाळायचं असेल तर सराव सत्रातील प्रत्येक मिनीट प्रयत्नांत शंभर टक्के सर्वस्व पणाला लावायचं यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे एखादा खेळाडू क्षणभर जरी ढिला पडला, तर ते त्याची खरडपट्टी काढण्यास मागे-पुढे बघायचे नाहीत.

कडवे व्यावसायिक असलेल्या बो यांच्या डेन्मार्कविरुद्ध भारताने उपांत्य फेरीत ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला होता. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत भारताने मलेशियाला याच फरकाने हरवून पदक नक्की केलं होते. भारताने थॉमस करंडक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूड तारका तापसी पन्नू हिने बॉयफ्रेंड बो यांचं अभिनंदन केलं. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

दुसरीकडे आयपीएलचा धमाका सुरू होता. यानंतरही थॉमस करंडक जिंकण्याचा पराक्रम केलेल्या भारतीय संघाला भरभरून दाद मिळाली.

थॉमस करंडक सर्वाधिक १४ वेळा जिंकलेला इंडोनेशिया बॅडमिंटनची महासत्ता आहे, त्यामुळे अशा प्रतिस्पर्ध्याला हरवून भारताने मिळविलेलं यश हा मोठाच पराक्रम आहे. ऑलिंपिकमधील पदक तक्त्यात प्रथम क्रमांक मिळविलेले देश मोजके आहेत. फुटबॉल, हॉकी अशा सांघिक खेळांचा इतिहास पाहिल्यास निवडक देश जगज्जेते असल्याचं दिसून येतं.

एकविसाव्या शतकात क्रिकेटवेड्या भारताने ऑलिंपिकसह विविध खेळांत न भूतो असं यश मिळविलं आहे. यात अगदी महिला क्रिकेट संघाच्या यशाचाही उल्लेख करावा लागेल. विशेष म्हणजे, एका खेळातील माइलस्टोन इतर खेळांसाठीच नव्हे, तर साऱ्या देशासाठी प्रेरणादायी ठरतात.

बॅडमिंटनच्या बाबतीत हिमंता बिस्व सरमा यांच्यासारख्या भाजपच्या धडाकेबाज नेत्याकडे संघटनेचं अध्यक्षपद आहे. गोपीचंद हे स्वतः मुख्य प्रशिक्षक म्हणून पाया रचल्यानंतर आता संघटनेत सक्रिय आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचं पाठबळ बहुमोल ठरलं आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडू पराक्रम करीत असताना, दुसरीकडे मायदेशात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे. आधी साईना आणि आता सिंधूमुळे युवा पिढी बॅडमिंटनकडे आकर्षित होत आहे. अशा वेळी थॉमस करंडक भारतीय बॅडमिंटनसाठी उत्फुल्ल प्रेरक ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com