musical drama Played light and light moods Pandit Jitendra Abhishek | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंडित जितेंद्र

संगीत नाटकाची नांदी...

पंडित जितेंद्र अभिषेकींमुळे मला पहिलं नाटक ‘आटपाटची राजकन्या’ मिळालं. त्यानंतर छोटी छोटी हलकीफुलकी नाटके असली, की ते सरळ निर्मात्यांना माझे नाव सुचवायचे. मी आनंदाने ती कामे करीत गेलो. कधी एखादे गाणे असायचे, तर कधी पार्श्वसंगीत असायचे. ‘दिसतं तसं नसतं’, ‘श्री तशी सौ’, ‘बिऱ्हाड बांधलं’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘लग्नबंबाळ’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘संध्या छाया’, ‘अखेरचा सवाल’ अशी अनेक नाटके मी केली.

गोवा हिंदूबरोबरच चंद्रलेखाचे मोहन वाघ यांच्याबरोबर पंचवीसेक नाटके केली; तसेच कलावैभवचे मोहन तोंडवळकर यांची दहा ते बारा नाटके केली. त्याच्यानंतर प्रभाकर पणशीकर, कुमार सोहनी, चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर नाटके केली. म्हणजे बहुतेक नाटक कंपन्यांबरोबर मी काम केले आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यानंतर पुढे पुढे लोक मला विचारू लागले, की अरे, तू अभिषेकी बुवांचा सहायक होतास. मग तुझे एकही संगीत नाटक नाही. सगळी हलकीफुलकी आणि लाईट मुड्सची नाटके केली आहेस. संगीत नाटक का करीत नाहीस? त्यांच्या या प्रश्नाला उत्तर लगेच मला देवाकडून मिळाले. देवाने माझी ती हाक ऐकली. एके दिवशी ललिता बापट यांचा मला फोन आला आणि फोनवर त्या मला म्हणाल्या, की ‘अशोक, मी एक संगीत नाटक करीत आहे. त्यामध्ये आठ-दहा गाणी आहेत. तू करशील का?’ मी त्यांना म्हणालो, की ‘करशील का, असे का विचारत आहात. अहो, मी नक्की करणार.’ त्यानंतर त्या मला म्हणाल्या, की ‘यातील गाणी मी काही लिहिलेली नाहीत. ती शांताराम नांदगावकर यांनी लिहिली आहेत. ते तुला चार-पाच दिवसांमध्ये पाठवून देतील.’

त्यानंतर चार-पाच दिवसांनी शांताराम नांदगावकर यांच्याकडून मला एक पाकीट आले आणि त्यामध्ये दहा गाणी लिहिलेली होती. ती गाणी मी दोन-चार वेळा वाचून घेतली. त्यानंतर नमके काय करायचे ते मनाशी ठरविले आणि त्या दिवशी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी उठून पेटी घेऊन बसलो आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सगळ्या गाण्यांना चाली लावून झाल्या होत्या. या चाली उत्तम होत्या आणि त्याची प्रचीती मला मागाहून आली. या गाण्याची रेकॉर्ड आली आणि ती गोवा-कोकण वगैरे भागात चांगलीच गाजली.

मी कोणत्याही नाटकातील गाण्यांना संगीत दिले की ती गाणी पहिल्यांदा अभिषेकी बुवा यांना ऐकवायचो. त्यांचा काही तरी सल्ला घ्यायचो. ही माझी पद्धतच होती. त्यामुळे या संगीत नाटकातील गाणी अभिषेकी बुवांना ऐकविली. त्यांनाही ती आवडली. ती गाणी ऐकून विद्याताई मला म्हणाल्या, की ‘अशोक, तू अभिषेकी बुवांचा शिष्य शोभतोस. छान चाली लावल्या आहेस.’ तेथून बाहेर पडताना मला रडू आले. मी पुन्हा आत आलो आणि अभिषेकी बुवांचे पाय धरले. रडता रडता त्यांना म्हणालो, की ‘अहो, माझे शास्त्रीय संगीतावर शिक्षण नाही. त्यामुळे तुम्ही ताना वगैरे करता ते मला जमत नाही. मग कसं जमणार?’ त्यावर ते म्हणाले, की ‘जो कलाकार गाणे गाणार आहे, त्याला आपण सांगायचे की तो स्वतः करतो. तू फक्त त्याला त्या त्या जागा दाखवून दे. आपोआप ते होत जाईल. चाली चांगल्या लागलेल्या आहेत. मस्त राहा. आनंदी राहा...’ त्यानंतर दोन दिवसांनी मला दिग्दर्शकाचा फोन आला आणि त्यांनी विचारले की गाणी व चाली तयार असतील, तर आमच्या कलाकारांना शिकवायला या. मी तेथे गेलो आणि रामाला दोन गाणी आहेत. सीतेला तीन गाणी आहेत, असे सांगितले. त्यांनी समोर यावे आणि मला गाणे ऐकवावे. त्याप्रमाणे रामाची भूमिका करणारा कलाकार माझ्या समोर आला आणि म्हणाला, की मला गाता येत नाही.

त्याचे हे बोलणे ऐकून मला शॉकच बसला. कारण संगीत नाटक आणि कलाकाराला गाता येत नाही, हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहात होतो; तरीही मी त्याला बाजूला बस म्हणून सांगितले. त्यानंतर सीतेची भूमिका करणारी कलाकार आली. ती म्हणाली, की माझे नाव ज्योत्स्ना हर्डीकर. मला क्लासिकल काही येत नाही; परंतु लाईट मूडस्‌ची गाणी असतील तर गाते. मी तिला गायला सांगितले. तिचा आवाज मला आवडला. त्यानंतर गाणाऱ्या अन्य कलाकारांचा शोध सुरू झाला. आठेक दिवसांनी दिग्दर्शक मला म्हणाले, की कुणीही गायक कलाकार मिळत नाही. आता काय करायचे? आमची पुन्हा एक बैठक झाली आणि त्या बैठकीला ललिता बापट यांचे जवळचे स्नेही म्हणून निर्माते मोहन वाघ उपस्थित होते.

ते मला म्हणाले, की चित्रपटात गाण्यांना जसा प्ले बॅक देतात तसा प्रकार आपण इथे केला तर? सुरुवातीला मी या गोष्टीला नकार दिला. कारण ते खूप अवघड काम होते. चित्रपट वेगळा आणि नाटक वेगळे असते म्हणून ते जमेल की नाही अशी शंका होती; तरीही मोहन वाघ तसेच निर्माते व दिग्दर्शक यांच्या आग्रहास्तव ती गाणी अजित कडकडे, राजा काळे, आशालता वाबगावकर यांच्याकडून गाऊन घेतली. यातील दशरथ राजा यांच्या आवाजातील गाणे दस्तुरखुद्द अभिषेकी बुवांनी गायले. सांग प्रिये तुज काय हवे... असे ते गाणे. सर्व गाणी रेकॉर्ड झाली आणि त्यानंतर कलाकारांना सांगितले, की तुम्ही स्टेजवर केवळ लिपसिंग करायची आहे. तुमच्या ओठांची हालचाल शब्दांप्रमाणे झाली पाहिजे. ट्रॅकप्रमाणे झाली पाहिजे, असे सांगितले. पण तेही त्यांना जमले नाही. त्यामुळे आता काय करायचे, हा पुन्हा प्रश्न उभा राहिला. त्यानंतर एकाने असे सुचविले, की गाणे सुरू झाले की स्टेजवर ब्लॅकआऊट करायचा आणि गाणे संपले की उर्वरित नाटक सुरू करायचे. संगीत नाटकात असं कधी झालेलं नव्हतं. हा एक नवीन प्रयोग होणार होता; परंतु चार-पाच प्रयोगनंतर ‘कैकेयी’ हे नाटक बंद झालं. त्यानंतर माझी भेट झाली निर्माते सुधीर भट यांच्याशी... त्यांविषयी सांगतो पुढच्या भागात...

बहुतेक नाटक कंपन्यांबरोबर काम केले. त्यानंतर पुढे पुढे लोक विचारू लागले, की अरे, तू अभिषेकी बुवांचा सहायक होतास. मग तुझे एकही संगीत नाटक नाही. सगळी हलकीफुलकी आणि लाईट मुड्सची नाटके केली आहेस. संगीत नाटक का करीत नाहीस? त्यांच्या या प्रश्नाला उत्तर लगेच मला मिळाले. एके दिवशी ललिता बापट यांचा फोन आला. म्हणाल्या, की ‘अशोक, मी एक संगीत नाटक करीत आहे. त्यामध्ये आठ-दहा गाणी आहेत. तू करशील का?’

(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत.)