पंख मायेचे (नागेश शेवाळकर)

पंख मायेचे (नागेश शेवाळकर)

काहीही झालं, तरी माधव आजीच्या हाती लागायचा नाही. आजीला त्याच्या कारसोबत कधी भरभर चालावं लागे, तर कधी पळावं लागायचं. त्यामुळं तिला दम लागायचा, श्‍वास वर व्हायचा. आजीला काही क्षण सोफ्यावर बसून पाण्याचा घोट घ्यावा लागे. ते पाहून माधवला खूप आनंद होई. तो टाळ्या वाजवून म्हणे ः 'हैश्‍शा! आजी हरली. हरली रे हरली, आजी हरली.' त्याचं खळाळून हसणं, त्याला झालेला आनंद आजीसाठी जणू प्राणवायूचं काम करत असे.

नेहमीच्या थांब्यावर शाळेची बस थांबली. त्यातून म्लान चेहरे झालेली, थकलेली चार-पाच ‘फुलपाखरं’ उतरली. बसजवळ उभ्या असलेल्या आपल्या व्यक्तीला पाहताच चिमुकल्यांचे चेहरे उजळले, एक हास्यलकेर उमटली; परंतु ते हसणंही त्यांची शारीरिक अवस्था, मानसिक स्थिती स्पष्ट करत होतं. माधवही बसमधून उतरत असताना त्याची आजी त्याला दिसली. दोघांनी एकमेकांना पाहिलं. माधव हसतच आजीजवळ जात असताना आजीनं दोन्ही हातांनी त्याला कवेत घेतलं आणि म्हणाली ः 'आला ग माय, माझा माधोराजा. किती सुकलास रे? डबा खाल्लास ना?'

मान होकारार्थी हलवत माधव आजीच्या कुशीत शिरताच आजीनं त्याच्या डोक्‍यावरून, पाठीवरून हात फिरवायला सुरवात करताच माधवला स्वतःच्या नकळत एक स्फूर्ती मिळत गेली. तो ताजातवाना होत गेला. दिवसभर उन्हामध्ये उभं राहून कोमेजलेल्या इवल्याशा रोपट्याला पाण्याचे दोन-चार घोट मिळाल्याप्रमाणं! माधवही आजीच्या प्रेमळ स्पर्शानं बराच टवटवीत झाला. आजीचं बोट धरून तो त्या भव्य इमारतीमधल्या त्याच्या सदनिकेजवळ आला. आजीनं कुलूप काढल्याबरोबर तिला ढकलून माधव घरात शिरला. विस्तीर्ण बैठकीतल्या सोफ्यावर त्यानं पाठीवरचं ‘ओझं’ उभ्या-उभ्याच फेकलं आणि कोपऱ्यात जणू त्याचीच वाट पाहत उभ्या असलेल्या खेळण्यातल्या कारकडं तो धावतच गेला. आनंदाच्या भरामध्ये त्यानं तिच्यात बसून ती पायानं पळवायला सुरवात केली. आता तो त्या बैठकीचा महाराजा होता.
एका तासानं म्हणजे बरोबर सहाच्या सुमारास त्याचे आई-बाबा कंपनीमधून येणार होते.

'माधवा, झालं का तुझं सुरू? आधी हात-पाय धुवून घे. काय खायचं ते सांग आणि मग कार पळव.'
'थांब ना ग, आजी. दिवसभर मी कारमध्ये बसलो का?'
'मी तुला कारमध्ये बसायला कधी तरी नाही म्हणते का?'
'बरे बाप्पा...' असं म्हणून तणतणत माधव न्हाणीघरात गेला. कसेबसे हात-पाय धुतले, तिथंच असणारा टॉवेल घेऊन चेहऱ्यावर खसाखसा पुसून पुन्हा बैठकीत आला. तितक्‍यात आजी स्वयंपाकघरातून दूध-बिस्किटं घेऊन आली.
'धुतले हातपाय? चल पटकन हे...'
'आऽजी, भूक नाही गं मला...' असं म्हणत माधवनं कार बैठकीच्या दुसऱ्या टोकापर्यंत पळवत नेली. आजी हातातल्या प्लेटसह त्याच्या दिशेनं निघाल्याचं पाहताच माधवनं पुन्हा तिच्याकडं कार न्यायला सुरवात करताच आजीला वाटलं, की इथंच थांबून त्याची कार अडवावी. त्याला काही खायला घालावं. परंतु कसचं काय, माधवनं आजीच्या जवळ येताच कारला असं काही वळवलं, की डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याची कार आजीच्या मागे असलेल्या कोपऱ्यात जाऊन थांबली. आजी आश्‍चर्यानं मागं वळून पाहत असताना तिच्या कानावर माधवचं खळाळून हसणं पडलं. चेहऱ्यावर ‘कसं फसवलं?’ असे मिश्‍कील भाव होते. तसा त्या दोघांचा शिवाशिवीचा खेळ रोजच्याप्रमाणं रंगला. काहीही झालं, तरी माधव आजीच्या हाती लागयचा नाही. आजीला त्याच्या कारसोबत कधी भरभर चालावं लागे, तर कधी पळावं लागायचं. त्यामुळं तिला दम लागायचा, श्‍वास वर व्हायचा. आजीला काही क्षण सोफ्यावर बसून पाण्याचा घोट घ्यावा लागे. ते पाहून माधवला खूप आनंद होई. तो टाळ्या वाजवून म्हणे ः 'हैश्‍शा! आजी हरली. हरली रे हरली, आजी हरली.' त्याचं खळाळून हसणं, त्याला झालेला आनंद आजीसाठी जणू प्राणवायूचं काम करत असे. माधवच्या मागं पळताना झालेला त्रास ती क्षणभरात विसरून जाई. ताजीतवानी होऊन पुन्हा त्याच्या मागंमागं जात असे.

त्या दिवशीही माधवनं नेहमीप्रमाणं आजीला पळवलं, दमवलं. ती रडवेली झाली. आजीला खूप दम लागलेला असताना दारावरची घंटा वाजली. ती ऐकताच माधवची कार कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. दम लागलेल्या अवस्थेत आजीला बोलता येत नव्हतं. ती दाराकडं निघाली. तिनं जाताजाता हाताच्या बोटाच्या इशाऱ्यानं माधवला खुणावलं ः ‘थांब जरा. आई-बाबांना तुझं नाव सांगते...’ आजीचा इशारा ओळखून माधवनं स्वतःचे दोन्ही कान धरून ‘सॉरी, सांगू नको ना...’ असं उलट खुणावले. माधवची ती कृती पाहून आजीला हसू आलं. तिनं दार उघडलं. आजीची ती अवस्था पाहताच माधवच्या आईनं घाबरून विचारलं ः 'आई, काय झालं? तब्येत बरी नाही का? खूप दम लागलाय.'
'दवाखान्यात जायचं का?' माधवच्या बाबानं विचारलं.
काही प्रमाणात दम व्यवस्थित होताच आजी म्हणाली ः 'नको...दवाखाना नको. हा...हा काय माझा डॉक्‍टर...'
'अच्छा! म्हणजे आजही लाडक्‍या नातवानं त्रास दिला!'
'आई, काहीही बोलू नको ग. मी कशाला आजीला त्रास देऊ? आजीच मला त्रास देते. आपल्याबरोबर हात-पाय धू, हे खा, ते खा, हे पी, ते पी. नुसती बोअर करते मला,' माधव.
'माधव, उगाच काही तरी बडबडू नकोस. अहो, याला काही तरी सांगा बरं. उर्मटपणे बोलतोय.'
'अग, असा त्रागा करू नको. त्याचं वयच ते काय? हे बघ त्याचाही विचार आपण करायला हवा. सकाळी गाढ, शांत झोपेत असताना त्याला उठावं लागतं. तयार होऊन पहाटेच घराबाहरे पडावं लागतं. लेकरू दिवसभर घराबाहेर असतं गं! बसमधून उतरताना त्याचा चेहरा बघितला ना, तर डोळे भरून येतात ंगं. त्यामुळे त्याचीही किरकिर होत असेल गं.'
'आई, अहो पण...'
'तुझंही बरोबरच आहे. तुम्हालाही सकाळी लवकरच घराबाहेर पडावं लागतं. तिथंही काय आराम नसतोच. तुम्हीसुद्धा थकूनभागून घरी येता. तुमचीही चिडचिड होते...पण जरा सांभाळून घ्या. आल्याबरोबर त्याचा आणि तुमचा मूड जायला नको. दोघंही फ्रेश व्हा बरं. मी मस्त आल्याचा चहा करते. आलेच हं...'
आजी स्वयंपाकघरामध्ये जाताच माधव टुणकन्‌ उडी मारून सोफ्यावर आई-बाबांच्या मध्ये बसला. दोघांचेही हात तत्परतेनं त्याच्या डोक्‍यावरून, पाठीवरून फिरत असताना त्या स्पर्शानं तिघांच्याही शरीरामध्ये एका वेगळ्याच संवेदनेनं प्रवेश केला. काही क्षणामध्ये आजी एका ट्रेमध्ये चहा आणि बिस्किटं घेऊन आली. बैठकीतला प्रेमाचा तो आविष्कार पाहून तिचे डोळे पाणावले.
'चला. चला. घ्या. गरमागरम चहा आणि बिस्किटं.'
प्रत्येकानं चहाचा कप आणि बिस्कीट उचललं. एक-दोन घास खाऊन होत नाहीत तोच माधव म्हणाला ः 'आजी, बघ. आई-बाबांनी हातपाय न धुता चहा...'
'अरे, विसरलोच की आम्ही...' बाबा असं म्हणताच आजी म्हणाली ः 'ठीक आहे. होतं एखादे दिवशी.'
'नाही. हे चीटिंग आहे. आजी, तू मला शाळेतून आल्याबरोबर साबण लावून हात-पाय धुवायला लावतेस. एखादे दिवशी नाही धुतले, तर धपाटा देतेस.'
'आजी, तुला मारते? खोटं बोलू नकोस हं...'
'मारते! मारते!! मारते!!! जा. मी कुणाशीच बोलत नाही. तुम्ही सगळे वाईट आहात...' म्हणत माधवनं रागारागानं हातातलं बिस्कीट खाली फेकलं आणि तो तणतणत आत निघून गेला.
'थांबा. उठू नका. तुम्ही चहा घ्या. दोन मिनिटांत येईल तो.'
'अहो, माधवचा हट्टीपणा वाढत चाललाय हो.'
'बरोबर आहे तुझं. त्याच्या वयाच्या मानानं त्याची दगदग जास्त होतेय. या बदललेल्या जीवनशैलीची सवय झाली ना, की होईल तो नॉर्मल. मुळात खूप हुशार आहे तो. एकपाठी आहे...' आजी बोलत असताना तिथं आलेला माधव म्हणाला ः 'बाबा, आईस्क्रीम खायला कधी जायचं? जाऊ... जाऊ असंच म्हणत आहात तुम्ही.'
त्यावर बाबा काही बोलण्यापूर्वीच आजी म्हणाली ः 'माधोराजांचे बाबा, आज त्यांना आईस्क्रीम...'
'पण आता आधी होमवर्क पूर्ण करायचा,' आईनं बजावलं.

'ओके. थॅंक्‍यू आजी,' असं म्हणत माधव आनंदानं उड्या मारत आत पळाला...
काही महिन्यांपूर्वी माधवला शाळा-कम-पाळणाघरामध्ये टाकलं होतं. त्यामुळं त्याची जीवनशैली बदलली होती. सकाळी त्याला लवकरच उठून घड्याळाकडे पाहतपाहत सारी कामं आटोपावी लागत. डोळ्यांत झोप असलेल्या अवस्थेत तो शाळेच्या बसची वाट पाहत उभा राहत असे. दिवसभर तिथंच राहायचं. ठरलेल्या वेळी सगळ्या कसरती करतकरत सायंकाळी चार वाजता तिथून पुन्हा बसनं घरी परत यायचं. अशा चक्रव्यूहात अडकल्यामुळं त्याचं बालवयातलं स्वातंत्र्य हिरावलं जात होतं. त्यामुळं त्याचा स्वभाव काहीसा चिडचिडा झाला होता. विशेषतः आजीवर तो छोट्या-छोट्या कारणांवरून चिडू लागला. त्या दिवशीही साध्या कारणानं आजीवर चिडला आणि मग त्याच्या आईनं त्याच्या कानशिलात लगावली. मग काय? गळा काढून रडणारा माधव त्याच्या खोलीमध्ये जाऊन पलंगावर पडला. थकलेल्या, दमलेल्या माधवला काही क्षणातच झोप लागली. अधूनमधून हुंदके देणं सुरूच होतं. बैठकीतलं वातावरणही गंभीर झालं. थोडा वेळ वाट पाहून आजी उठली. तिनं आत डोकावलं आणि म्हणाली ः 'झोपला वाटतं.. पण अशांत आहे. हुंदके देतोय...' ते ऐकून माधवची आई आतमध्ये गेली. माधवला पाहताच तिचं मन भरून आलं. माधवजवळ बसून ती त्याच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, छातीवर हात फिरवत राहिली. काही क्षणांत माधव शांत झोपला. थोडा वेळ त्याच्याजवळ थांबून आई बाहेर येऊन म्हणाली ः 'आत्ता शांत झोपलाय. जेवलाही नाही.'

'झोपू दे. रात्री उठला तर देईन त्याला खायला. कसं आहे, त्याच्या पाठीवर दप्तराचं आणि तुमच्या मनावर कामाचं ओझं. तिघंही मनानं, शरीरानं थकून जाता गं. त्याच्याच परिणाम आहे हा. वय असतं- त्याला उमलू द्यायचं, खेळू द्यायचं. अर्थात
पूर्ण दुर्लक्ष करायचं नाही. सांभाळून घ्यायचं...' आजी बोलत असताना माधवचे बाबा मध्येच म्हणाले ः 'आई, तुझं बरोबर आहे; पण मला काय वाटतं, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी... म्हणजे त्याचा हट्टीपणा अधिक वाढण्यापूर्वी आपण एक साधा प्रयोग करून पाहू या. कदाचित फायदाही होईल...' त्यांनी मग अगदी हळू आवाजात स्वतःची योजना त्या दोघींपुढं ठेवली....

दुसऱ्या दिवशी सकाळी माधवला त्याच्या आईनं उठवताच तो म्हणाला ः 'आई तू का उठवलंस? आजी...' 'आजी खोलीत आहे. उठ लवकर. बस येईल. दप्तर आवरून घे...'
'मी का घेऊ? आजी...ए...आजी...थांब,' असं ओरडत माधव खोलीबाहेर पडला. सरळ आजीच्या खोलीत गेला. पाहतो तर काय, आजी तिच्या सगळ्या साड्या नि इतर वस्तू एका बॅगमध्ये भरत होती. ते पाहून माधवनं विचारलं ः 'आजी, हे काय करतेस? आपण कुठं गावाला चाललो का?'
'तू नाही. आजी जातेय...' त्याच्या पाठोपाठ आलेले बाबा म्हणाले.
'कुठं? का जातेय? मला का नेत नाही? मी पण जाणार...'
'तुझी शाळा आहे. परीक्षा जवळ आलीय ना?'
'मग माझी परीक्षा झाल्यावर आम्ही जातो...'
'आजी कुठंही गावाला वगैरे जात नाही. तू तिला त्रास देतोस ना, म्हणून ती वृद्धाश्रमात राहायला जातेय...'
'म्हणजे माझ्या शाळेतल्या अजितचे आजी-आजोबा राहतात तिकडंच ना? अमित त्याच्या आई-बाबांसोबत त्यांना भेटायला रविवारी जातो...'
'आपणही आजीला भेटायला जाऊ या...'
'नाऽऽही. नाही. मी पण आजीसोबत जातो तिकडं. मग तुम्हीच आम्हाला भेटायला या,' असं म्हणणाऱ्या माधवचा आवाज रडवेला झाला असल्याचं सर्वांनाच जाणवलं.
'तिथं मुलांना राहू देत नाहीत,' बाबा म्हणाले.
'नाऽऽही. मग मी आजीलाच जाऊ देणार नाही...' यावेळी माधवचा बांध फुटला. तो लगेच आजीच्या कमरेला घट्ट मिठी मारून रडतरडत म्हणाला ः 'आ...जी, तू न..को ना जाऊ. मी...मी तुला त्रास देणार नाही. हे दोघं कंपनीत गेल्यावर, तू नसशील तर माझं ग कसं?...'
'नाही रे बाळा. मी तुला सोडून कशी जाईन बरं...'
बोलता बोलता आजीच्याही अश्रूंचा बांध फुटला. एका कृतीनं किमया केली. दूर जाण्याच्या भीतीनं माधव शांत झाला. त्याला आजी मिळाली...आजीला शहाणा झालेला माधव मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com