सामना भाऊ आणि बापूंचा!

संपूर्ण महाराष्ट्रभर भाऊच्या तमाशाची चर्चा सुरू असायची ज्या काळात भाऊ फक्कड पठ्ठे बापूराव, शिवा/ संभा यांचा तमाशा रंग भरत होता.
Tamasha
TamashaSakal
Summary

संपूर्ण महाराष्ट्रभर भाऊच्या तमाशाची चर्चा सुरू असायची ज्या काळात भाऊ फक्कड पठ्ठे बापूराव, शिवा/ संभा यांचा तमाशा रंग भरत होता.

- नंदेश उमप saptrang@esakal.com

संपूर्ण महाराष्ट्रभर भाऊच्या तमाशाची चर्चा सुरू असायची ज्या काळात भाऊ फक्कड पठ्ठे बापूराव, शिवा/ संभा यांचा तमाशा रंग भरत होता अगदी त्याच काळात एकीकडे संगीत नाटकाच्या माध्यमातून मास्टर दीनानाथ, बालगंधर्व ही मंडळी संगीत नाटकाच्या माध्यमातून रंगभूमी गाजवीत होते. एकदा झालं असं की पुण्यात एके ठिकाणी भाऊंचा तमाशाचा तंबू पडला होता त्याच ठिकाणी बाजूला बालगंधर्व मुक्कामी होते ...

‘वाजे घुंगरू छुम छुम

वाजे घुंगरू छुम छुम

नवरस गायन चौरंगी जलसा

सा रे ग म प ध नी सा

सा नि ध प म ग रे सा ’

‘ढोल, पडघम आणि करताल जैसा छाना नाना छुम, छुम छाननन’’ हे जवळच असलेल्या गंधर्वांच्या कानी भाऊंच्या गाण्याचे स्वर ऐकू आले ते ताडकन जागे झाले आणि आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. पाहतात तर काय, समोर तमाशा सुरू होता त्यांनी तो तमाशा पूर्ण पाहिला ते भारावून गेले होते. तमाशा संपताच त्यांनी रंगमंचावर जाऊन भाऊंना अक्षरशः मिठी मारली, एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराचं कौतुक म्हणजे लोककलेची आणि शास्त्रीय संगीताची झालेली ती गळाभेटच होती... जी या आधी रसिकांनी कधीही अनुभवली नसेल...

बालगंधर्वांनी भाऊंच्या आवाजाची, त्यांच्या सादरीकरणाची, त्यांच्या कवनाची प्रचंड स्तुती केली. बालगंधर्व भाऊंच्या गाण्यावर बेहद्द खुश झाले आणि त्यांनी आपल्याकडची बाजाची पेटी, भरजरी अलंकार ,शेला, मखमली पडदे अशा काही गोष्टी भाऊंना भेट स्वरूपात दिले. दोन प्रख्यात कलावंत जे आपआपल्या क्षेत्रात, गाजत असलेले असे कलावंत होते. ते भेटतात, एकमेकांचे कौतुक करतात असं फार क्वचितच पाहायला मिळतं .

एक सच्चा कलावंतच, दुसऱ्या थोर कलावंताचा आदर- सत्कार करू शकतो. भाऊंच्या आयुष्यात आणखी एक महत्वाचा प्रसंग घडला, तो काळ म्हणजे १८९० ते १९२० चा तमाशाच्या भरभराटीचा. त्या काळात भाऊंसोबत अनेक मातब्बर शाहीर उदयाला येत होते. त्याकाळी बरेच जण हे स्वतःच तमासगीर - शाहीर होते. स्वरचित कवने गात. उदाहरणार्थ शाहीर अर्जुना वाघोलीकर, दगडू साळी, तांबे शिरोलीकर, हरिभाऊ वडगावकर, इत्यादी. त्यांच्यात सवाल-जवाब शह-काटशह चाले. त्याकाळी या सर्वांमध्ये एक अव्वल शाहीर होते आणि ते म्हणजे शाहीर पठ्ठे बापूराव. मराठी इंग्लिश व संस्कृतचे ते जाणकार होते. गण, गवळण व लावण्या या सगळ्यात त्यांची महारथी होती, तेवढीच आपल्या तरबेज लेखणीने घायाळ करणारे भाऊ फक्कड. त्यांची आणि बापुंची विजयी घोडदौड सर्वत्र चालूच होती. या दोघांनीही अनेक सामने जिंकले होते. आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा दोघांनी निर्माण केला होता. एकदा बाबुशेठ व कस्तुरी शेठ यांनी भाऊराव व पठ्ठे बापूराव यांचा अटीतटीचा सामना ठेवला होता. सामना पाहायला ही तोबा गर्दी जमली होती. मुंबईच्या ‘पिला हाऊस’मध्ये सामना रंगला होता. दोन्ही प्रख्यात शाहिरांना बघायला प्रचंड गर्दी गोळा झाली होती, एकदम हाउसफुल. बापूराव आणि पवळा यांना हरवणं सोपं नव्हतं. भाऊराव हे सर्व जाणून होते, पण भाऊंकडेहि विद्ववत्ता ठासून भरलेली होती. सामना सुरू झाला. कलगी पक्षाच्या शाहिराने संवाद करायचा आणि त्याला तूरेवल्याने जवाब द्यायचा. जर प्रश्न गणातून असेल तर गणामधनच उत्तर द्यायचं. लावणीतून असेल तर लावणीमधूनच. पठ्ठे बापूरावांनी गण सुरू केला आणि गणातून सवाल टाकला सवाल

"शुभ मंगल चरणी गण नाचला

नाचला कसा तरी पाहू चला गं

शुभ मंगल चरणी गण नाचला ...

साऱ्या अंगान, रसाची आचीवला

छतीस रागिण्या, बसल्या उशाला..

जन साऱ्या तालासुरावर

वर खरखर जमवाचीवला...

हा गण पठ्ठे बापूरावानी म्हटला आणि या गणाला उत्तर भाऊराव फक्कड न दिल ते असं

"आज पुजूया आधी गणरंगना

रंगलं कसा भव भंगणा

आज पुजूया आधी गणरंगना

उत्तम असा सवाल भाऊरावने दिला आणि मग काय टाळ्या शिट्यानी हॉल दणाणून गेला. सामना रंगत होता सवाल-जवाब ची सरबत्ती चालू होती अखेर एका सवालाचा जबाब पठ्ठे बापूरावना देता आला नाही आणि लागलेली पैज पट्टे बापूराव हरले. हरलेल्या शाहीराने पंधरा दिवस डोक्यावर मंदिल घालायचा नाही असं ठरलं होतं.

भाऊ हा जंगी सामना जिंकले आणि एका मातब्बर शाहिराला पराभव पत्करावा लागला. पण त्यानं पंधरा दिवस आपल्या डोक्यावर मंदिल न घालता दिलेला शब्द पाळला. पठ्ठे बापूराव यांच्या आयुष्यातला पहिला सामना भाऊ फक्कड सोबत ते हरले होते. अशा शाहिरांची ही कर्तबगारी उभ्या महाराष्ट्राने पाहिली ऐकली अनुभवली अशा या शाहिरांना अशा या मनस्वी कलावंताला या भाऊ फक्कडला, फक्कड असा मानाचा मुजरा करतो...

(सदराचे लेखक स्वतः शाहीर आणि लोककलावंत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com