‘तमाशाशिरोंमणी’ भाऊ फक्कड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamasha
‘तमाशाशिरोंमणी’ भाऊ फक्कड

‘तमाशाशिरोंमणी’ भाऊ फक्कड

- नंदेश उमप saptrang@esakal.com

‘‘बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा’’

आपला महाराष्ट्र अनेक तऱ्हेने नटलेला आहे तसाच तो त्याचबरोबर लोकसांस्कृतिक वारसा लाभलेला संपन्न असा आहे ... रसिकहो म्हणतात की लेखणीत धार असावी, शब्दात सामर्थ्य असावं... आणि आवाजात गोडवा असावा....मंडळी मी बोलतोय आपल्या महाराष्ट्राच्या तमाशाबद्दल.. ज्याने तमाशा कलाविश्वात आपला स्वतंत्र असा ठसा उमटविला, तमाशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, या प्रांतात दबदबा निर्माण केला तो शाहिरांचा शाहीर एक उत्तम नाच्या, वगसम्राट, तमाशाला आगळंवेगळं अधिष्ठान मिळवून देणारा तमाशा शिरोमणी म्हणजे ‘भाऊ मालोजी भंडारे’ उर्फ ‘भाऊ फक्कड’.

भाऊंचा जन्म पाटण तालुक्यातील हुंबरणे गावी.अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या गाण्यान, कवनांनं अदाकारीनं वेड लावणाऱ्या भाऊनं वडील मालोजी व आई मायडी हिच्या पोटी जन्म घेतला. भाऊंचं शिक्षण इंटरपर्यंत झालं असं काही साहित्यिक म्हणतात तर काही साहित्यिकांच्या मते, संशोधकांच्या मते ते पाचवी पर्यंत शिकले असावेत. भाऊ फक्कड हा शाहीर त्या काळच्या सर्व तमासगीर कलावंतांमधला एक उच्चशिक्षित संस्कृतीची आणि संस्कृत भाषेची उत्तम जाण असलेला, इंग्लिश बोलणारा असा पहिला शाहीर होता..

वडील गायक तमासगीर असल्यामुळे घरातच कलेचा वारसा लाभला. आईची इच्छा मात्र मुलांनी खूप शिकावं हे होतं, पण मंडळी म्हणतात ना ओढ्याचे पाणी नदीला, नदीचे पाणी सागराला जाऊनच मिळत. तसं भाऊराव फक्कडांचं झालं. त्याचं झालं असं की एक दिवस ढेबेवाडी खोऱ्यातील मंद्रुळकोळे या गावी हिरा/ सातू कवलापूरकर यांचा तमाशा होणार होता. भाऊला ते समजताच त्यांनी तमाशाकडे आपला मोर्चा वळवला पण मंडळी त्यांच्याजवळ पैसा नसल्या कारणानं त्यानी अख्खी रात्र एका झाडावर बसून हिरा सातूचा तमाशा पाहिला, आणि ते पाहून ते मंत्रमुग्ध झाले आणि तेव्हाच त्यानी मनात ठरवलं आपण व्हायचं तर तमासगीरच व्हायचं,

नाहीतर काहीच नाही. असं म्हणतात की दुसऱ्याच दिवशी भाऊ हिरा/सातू यांच्या तमाशात जाऊन सामील सुद्धा झाले. त्यावेळी त्यांचं वय चौदा होतं. रुपानं देखणा,गोरापान, उंचापुरा तरणाबांड, असल्यामुळे त्यांना त्यात नाच्याची भूमिका मिळाली. त्याकाळच्या शंकर नाच्या यांच्याकडनं त्यांनी नाचाचे धडे घेतले, एवढेच नव्हे तर नाच्याची भूमिका करता करता या पठ्ठ्यानं बुधगावच्या राम कृष्ण बुवा गुरव यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे देखील गिरवायला सुरुवात केली. मंडळी हा तमाशापंढरीतला पहिला वहिला तमासगीर असेल ज्यानं शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला होता. अनेक तराणे रचले आहेत, त्यांना तालाची उत्तम जाण होती, सुरांच्या लयीची पकड होती, शब्दांचं वजन अचूक पेलणारा हा एक अवलिया शाहीर होता.

काही काळानंतर हिरा/ सातू यांनी आपली मुलं शिवा/संभा व भाऊ फक्कड यांच्यावर तमाशाची जबाबदारी सोपवली आणि तिथून तमाशाचा नवा खेळ सुरू झाला. तो म्हणजे शिवा/ संभा कवलापूरकरसह भाऊ फक्कड या नावानं. भाऊनं अनेक गवळणी या तमाशात गायल्या, त्यांच्या हाळीची, गवळण, होळीची, व विनवणीची अशा अनेक पद्धतीच्या गौळणी आढळतात.

उदाहरणार्थ हाळीची गवळण...

"आग जाऊ चला बाजारी"

मिळून गवळ्याच्या नारी"

"चला कि ग उठा करा तयारी

बहुत दूर आहे मथुरा पुरी." .....

...आत्ता विणवणीची गवळण....

"सोड रस्ता हरी जाऊदे बाजारी"

माठ गोरसाचे शिरी,

आडवा आला तू गिरिधारी

त्रास देतो छळतो भारी

सोसू मी कुठेवरी..

शिवा /संभा आणि भाऊ फक्कड यांचा तमाशा गाजू लागला होता त्यांच्या लावण्या गवळणी, गण प्रसिद्ध होत होत्या. भाऊच्या गोड गळ्याची स्तुती सर्वत्र होऊ लागली होती, लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं त्यांच्या तमाशाला लोकांच्या अक्षरशः उड्या पडत होत्या.

अल्पावधीतच त्यांनी तमाशाला प्रसिद्धी मिळवून दिली. आता भाऊ फक्कड हे नाव कसं पडलं याची एक रंजक कथा आहे. एकदा एका तमाशाला शिवा /संभा यांचे वडील म्हणजे हिरा/ सातू जे आता वार्धक्याला लागले होते त्यांनी या तिघांचा खेळ पाहिला आणि खेळ संपल्यावर ते रंगमंचावर आले आणि आपल्या मुलांना कवेत घेऊन ते म्हणाले शिवा /संभा आणि भाऊ तुम्ही आज रसिकांची मनं जिंकली त्यांनी या तिघांचं तोंड भरून कौतुक केलं त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.

त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता सगळ्या लोकांदेखत भाऊला जवळ बोलावलं आणि म्हणाले ‘‘ भाऊ तुझा नाच फक्कड, तुझं गाणं फक्कड, तुझी कवनं फक्कड, आज पासून तुझं नाव भाऊ भंडारे बदलून मी भाऊ फक्कड हे नाव ठेवतोय आणि आजपासून यापुढं तू भाऊ फक्कड या नावाने ओळखला जाशील. तेव्हा पासून भाऊ फक्कड हे तमाशातले एक अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव. भाऊंची ख्याती गाजत होती तमाशाचे सामने जिंकत होती त्यांच्या लावण्या गण, गवळणी बहरत होत्या. त्यांना लोकमान्यता मिळू लागली होती.

(सदराचे लेखक स्वतः शाहीर आणि लोककलावंत आहेत.)

(क्रमश:)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tamashasaptarang
loading image
go to top