वाचनाची माध्यमं बदलली...

वाचनाची माध्यमं बदलली...

बीड जिल्ह्यातल्या गेवराई गावात माझं बालपण गेलं. कुटुंबामध्ये सर्वजण सुशिक्षित. मी सर्वांत लहान, मोठे भाऊ, बहीण नेहमी स्वामी विवेकानंदांची पुस्तकं किंवा साहित्यविषयक पुस्तकं घरामध्ये वाचण्यासाठी आणायचे. त्यातली दोन-चार पानं मी वाचायचो. मला त्यात काहीतरी इंटरेस्टिंग वाटायचं. ही गोष्ट छान आहे, हा किस्सा वाचायला पाहिजे किंवा हा लेख वाचला पाहिजे... असं करताकरता माझ्यामध्ये वाचनाची आवड आपोआप निर्माण झाली. 

औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी आल्यावर आणखी खोलात जाऊन वाचनाची किंवा नाटक खोलात जाऊन जाणून घेण्याची संधी मिळाली. मला नाटकाबद्दल माहिती होती; पण पथनाट्यातून किंवा तेंडुलकर आणि एलकुंचवार यांच्या नाट्यसाहित्यातून त्याची खरी गोडी लागली. समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल मांडणी करणारी पुस्तकं ही समाजाला जास्त पूरक ठरतात, हे लक्षात येत गेलं. मग तशा पद्धतीने वाचन सुरू झालं. 

पाश्‍चिमात्य देशांमध्ये कुठल्या देशाकडं किती बंदुका आहेत, यापेक्षा त्यांच्याकडे किती कवी आहेत, किती नाटककार, कादंबरीकार आहेत यावरून आजही त्या देशाचं श्रेष्ठत्व मोजलं जातं. पाश्‍चिमात्य देशांमध्ये एखादा देश हा श्रेष्ठ याचं कारण त्यांच्याकडे महान कवी, लेखक, नाटककार आहेत. त्यांच्या देशांमध्ये आजही शिक्षकांना कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा जास्त मान दिला जातो. आजच्या घडीलाही शिक्षकाला महान समजले जाते; कारण त्यांनी वाचनाची सवय लावलेली असते. जीवनाची समज दिलेली असते; पण हे आपल्याकडं थोडं कमी आहे. 

जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दबलेल्या समाजाचा आवाज किंवा या समाजाला जर समृद्ध व्हायचं असेल किंवा मुख्य प्रवाहात यायचं असेल तर वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे अगदी ठासून सांगितलं होतं. त्यावेळी वाचाल तर वाचाल, वाचा, शिका व संघटित व्हा... यातून बाबासाहेबांनी वाचनाचं महत्त्व पटवून दिलं. 

आणखी एक उदाहरण म्हणजे बहिणाबाईंच्या कविता. मुळात बहिणाबाई या लिहू वा वाचू शकत नव्हत्या, त्या फक्त बोलायच्या. त्यांच्या कविता त्यावेळी लोकांनी लिहून ठेवल्या नसत्या तर आज आपल्याला त्या वाचता आल्या नसत्या. त्यातला अनुभव घेता आला नसता. बहिणाबाई आपल्या जीवनाबद्दल काय सांगू पाहत होत्या, हे आपल्याला कळलं नसतं. पण ते लोकांनी लिहून ठेवलं आणि आपण वाचलं. 

वाचनाने आपल्याला अनेक गोष्टी कळत जातात. लॉकडाऊनमध्ये मला अतिशय छान पुस्तकं वाचायला मिळाली. एक होतं, युवाल नोआ हरारीचं ‘सेपीयन्स’. दुसरं रंगनाथ पठारे यांचं ‘सातपाटील कुलवृत्तांत’ आणि तिसरं दीपक करंजीकरांचं ‘घातसूत्र’. ही तिन्ही फारच महत्त्वाची पुस्तकं आहेत. सध्या जागतिक स्तरावरचे जे काही वादविवाद सुरू आहेत, त्यातून पूर्ण वेगळे होतो अशी पुस्तके वाचल्यावर. जर लाखो वर्षांचा मानवी इतिहास आपल्याला माहीत असेल तर आपल्या आयुष्यातील पन्नास-साठ वर्ष, दीड दोन हजारांच्या शतकांमध्ये मोजली तर आपल्याला खरा इतिहास समजेल. आपण कोणत्याही इतिहासाबद्दल बोलतो, पण मुळात खरा इतिहास काय? आपलं मूळ काय आहे? या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत, हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग वाटलं. 

 मला अनेक प्रश्‍न पडले होते की, लोक खऱ्याकडं का जात नाहीत? वास्तववादी नाटक का चालत नाही? कारण ती मेंदूची गरज आहे. माणूस गोष्ट तयार करतो आणि त्या गोष्टींमध्ये तो रमत असतो. रचित गोष्टी माणसाला खूप आवडतात.

पुस्तकं आपल्याला दिशा देत असतात, जगायला बळ देत असतात. तसेच ते पावलोपावली आपल्याला आणखीन समृद्ध करतात. माझ्यासाठी कोणताही एक लेखक आवडता नाही. जे समाजाभिमुख साहित्य आहे ते साहित्य मला आवडते. एक पाकिस्तानी कवी आहे. त्याची कविता अशी आहे की, ‘‘ या गल्लीमध्ये बॉम्ब फुटला तर इथल्या नेत्याला रस्त्यावर आणा आणि दहा चाबकाचे फटके द्या. या गल्लीमध्ये बॉम्ब फुटला तर इथल्या गल्लीतील पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर आणा, त्याला वीस फटके द्या. मग शेवटी तो असा म्हणतो की, या गल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला तर इथल्या नाटककाराला रस्त्यावर आणा आणि शंभर चाबकाचे फटके मारा. कारण या गल्लीमध्ये नाटककार राहत असताना बॉम्बस्फोट कसा झाला? मला वाटतं की साहित्यिकाची ही जबाबदारी आहे की समाज एकसंध ठेवणं, समाजातील असलेल्या गुण-दोषांची मांडणी करणं. ते लोकांना दाखवून देणं गरजेचे आहे. त्यामुळे मला एक साहित्य आवडत नाही. सगळंच मला वाचायला आवडतं; मग ते कोणत्याही देशातलं असु दे. त्यामुळे मी सगळंच वाचत गेलो. 

"कोसला'' हे पुस्तक आम्ही आमच्या किशोर वयात वाचायला घेतलं होतं. मी आणि माझा मित्र यावर नेहमी बोलत असायचो, चर्चा करत असायचो. या पुस्तकात आपलीच कथा लिहिली आहे. याचा लेखक कोण आहे? नंतर समजलं की हे भालचंद्र नेमाडे. ‘खूप चांगले प्रभावी लेखक आहेत म्हणे...’ असं त्यावेळी समजल्यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके आणली, त्यातूनही वाचनाची आवड निर्माण झाली. 

सध्या लोक म्हणतात की, तरुणांमध्ये वाचनाची आवड कमी झाली. मला असं अजिबात वाटत नाही. वाचनाची माध्यमं बदलली आहेत. कित्येक वर्षांपूर्वी थोडेच लोकं वाचत होते. आता या दोन-चारशे वर्षांमध्ये वाचनाची सवय आणि लिहिण्याची सवय लोकांना झाली आहे. त्या आधी कोणी काहीच लिहीत नव्हतं, वाचत नव्हतं. आता हे तंत्र जसजसं बदलत जातं तसतशा माणसांच्या जाणिवा किंवा विकासाच्या संदर्भरचना बदलत आहेत. वाचन, नाटक, गाणं यांची टेक्‍नॉलॉजीदेखील आता बदलत चालली आहे. आताच्या मुलांना वेगवेगळ्या जगातील गाणी, कविता माहिती असतात. कोणत्या देशात काय घडलं, कुठल्या देशांमध्ये कोणी बंद केला, कोणत्या बॅंडने त्यावेळेस काय केलं होतं, कोणी काय लिहिलं होतं, काय सादर केलं होतं, या सगळ्यांची माहिती ते सोशल साईटवरून घेत असतात आणि अपडेट राहत असतात. एवढेच साहित्य. एवढेच दिवाळी अंक वाचले पाहिजेत असं अजिबात नाही. तर या ऐवजी तुम्ही सोशल साईटवर काय बघत आहात, कोणती माहिती वाचत आहात हेही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जगाच्या बदलत्या रूपात येत जाल. माणूस हा सजग बनला पाहिजे. शेवटी असं वाटतं की वाचनापेक्षाही माणसाने सजग राहणं गरजेचं आहे.
 (शब्दांकन : संतोष भिंगार्डे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com