
निखिल सूर्यवंशी
धार्मिक आणि व्यापाराचे अधिष्ठान लाभलेले नरडाणा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) आता औद्योगिक विकासाच्या परीसस्पर्शामुळे प्रगतीकडे उड्डाण घेऊ लागले आहे. त्यावर शुभ वर्तमानातील आणखी विकासाचा कळस चढविला आहे तो खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. यात नियोजित मनमाड-इंदूर रेल्वे मार्गातील पहिला टप्पा बोरविहीर ते नरडाणा, असा ५१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग गतीने तयार केला जात आहे. त्यामुळे नरडाणा आणि पर्यायाने धुळे जिल्हा हा उत्तर आणि दक्षिण भारताला अर्थात संपूर्ण देशाला जोडला जाणार आहे. सहा राष्ट्रीय महामार्गांचा नरडाण्याला लाभ आहे. या गावाजवळ पंचवीसशे कोटींच्या निधीतील तापी नदीवरील सुलवाडे-जामफळ या उपसा जलसिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्याकडे आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या गावात उद्योग, व्यवसायासाठी एक इको सिस्टीम तयार झाली आहे. ‘देशात नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेले ‘नेक्स्ट इंडस्ट्री डेस्टिनेशन नरडाणा’ असेल, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीद्वारे या गावाचे उज्ज्वल भविष्य चितारले आहे. साहजिकच देशाच्या औद्योगिक नकाशावर नरडाणा अधिक चमकू लागले आहे.