राजवंश भारती : गौड राजवंश

Marathi Article : महाभारतात नकारात्मक भूमिका असलेला ‘ज्येष्ठ पांडव’ म्हणून महारथी कर्ण आपल्याला माहिती आहे.
Remains of King Shashanka's capital - Karnasuvarnanagari - discovered in excavations near Behrampur.
Remains of King Shashanka's capital - Karnasuvarnanagari - discovered in excavations near Behrampur.esakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

महाभारतात नकारात्मक भूमिका असलेला ‘ज्येष्ठ पांडव’ म्हणून महारथी कर्ण आपल्याला माहिती आहे. ‘मृत्युंजय’ आणि ‘राधेय’ यांसारख्या अमर साहित्यकृतींचा तो नायक आहे. कर्णाला युवराज दुर्योधनाने ‘अंगदेशा’चे राज्य मैत्रीखातर दिले होते. त्या काळात अंग-वंग-कलिंग हे जोडप्रदेश होते. कर्णाची राजधानी होती ‘चंपानगरी’. तेव्हापासून ‘वंग’ प्रदेश राजकीय पटलावर आहे. महाजनपद काळातही वंग हे एक छोटे जनपद होते. साधारणत: गंगा व ब्रह्मपुत्रेच्या दरम्यानचा प्रदेश वंग प्रदेश म्हटला जातो. (nashik Saptarang latest article on Gauda Dynasty)

महाभारत काळानंतर इ. स. ५५०-५५ च्या सुमारास ‘जयनाग’ या नावाच्या वंग प्रदेशाच्या एका सामंताने, उत्तर गुप्तांच्या परिस्थितीचा फायदा घेत आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. ‘गौड’ हा त्याचा वंश होता. या ‘गौड’ नावाची निश्चित व्युत्पत्ती कळत नाही. पण, ते एक प्राचीन घराणे होते. जयनागानंतर त्याचा मुलगा शशांक सिंहासनावर बसला.

त्याने आपल्या पराक्रमाने गौड वंशाचे नाव सर्वत्र गाजविले आणि बापाने स्थापन केलेले छोटेसे राज्य बरेच विस्तारले. वंग प्रदेशाला एका स्वतंत्र राज्याचा दर्जा त्याने दिला. त्याच्या काळातील दिग्गज अशा उत्तर गुप्त, मौखरी, कामरूप (आसाम) आणि मुख्य म्हणजे पुष्यभूती अशा सगळ्या राजवटींशी तो लढला होता.

आवश्यकता वाटली, तेव्हा त्याने आधी शत्रू असलेल्या उत्तर गुप्तांशी मैत्री करून देवगुप्ताबरोबर युती केली. शशांक राजाचे सगळ्यात मोठे धाडस म्हणजे त्याने देवगुप्तासह मौखरींवरती स्वारी केली आणि राजा ग्रहवर्मनाला ठार करून हर्षाच्या बहिणीला- राज्यश्रीला कान्यकुब्जातच कैद केले. नंतर देवगुप्तावर चालून आलेल्या बलाढ्य राज्यवर्धनाला कपटाने भुलवून तहासाठी निमंत्रण दिले आणि त्याचीही हत्या केली.

यामुळे हर्षवर्धनाने संतप्त होऊन त्याचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. त्याने शशांकला पूर्णपणे देशोधडीला लावले. कान्यकुब्ज- कन्नोजनगर ताब्यात घेतले. एवढेच नव्हे, तर गौडांची राजधानी ‘कर्णसुवर्ण’ही ताब्यात घेतली. ही नगरी म्हणजेच महाभारतकालीन चंपानगरी होय, असे एक मत आहे आणि शशांक गौड हा महारथी कर्णाचा वंशज होता, असेही एक मत आहे. आज या कर्णसुवर्णनगराचे अवशेष पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात बेहरामपूरजवळ आहेत.

रोहतस किल्ल्यात सापडलेली शशांकाची कोरीव राजमुद्रा.
रोहतस किल्ल्यात सापडलेली शशांकाची कोरीव राजमुद्रा.esakal
Remains of King Shashanka's capital - Karnasuvarnanagari - discovered in excavations near Behrampur.
राजवंश भारती : मौखरी राजवंश

तिथे पुरातत्त्व खाते १९६२ पासून उत्खनन करते आहे. हर्षाने युद्धात पाडाव केल्यावर राजा शशांक कुठे परागंदा झाला, याचा उल्लेख सापडत नाही. तो नंतर परागंदा होऊन बरीच वर्षे जिवंत होता, असे दिसते. त्याचा मुलगा ‘मानव’ अवघे काही महिने गादीवर नामधारी राजा होता. नंतर सन ६४२ च्या आसपास गौड साम्राज्य कामरूपचा राजा भास्करवर्मनाने बळकावले. पुढे हर्षाचा मृत्यू झाल्यावर सर्वत्र अराजक माजले.

त्या काळात गौड राजांनी आपले राज्य पुन्हा सावरले; पण त्या राजांची नावे आढळत नाहीत. इ. स. ७२५ च्या आसपास कन्नोजच्या यशोवर्मनाने गौड घराणे जवळजवळ संपविले. ‘गौडवाहो ’या ग्रंथात ही युद्ध कहाणी दिलेली आहे, हे आपण याआधीच पाहिले आहे. तरीही, गौड राजवट सन ७५० पर्यंत कशीबशी तग धरून होती. त्यानंतर त्यांची जागा पाल राजवंशाने घेतली.

या संपूर्ण गौड वंशात स्वत: शशांक हा तसा एकच नामांकित राजा झाला; पण त्याने इतिहासात आपला ठळक ठसा उमटवला, यात शंकाच नाही. शशांकाचे तीन ताम्रपट पश्‍चिम बंगालमधील मिदनापूर आणि खडगपूर इथे सापडले आहेत. बिहारमधील रोहतसच्या किल्ल्यात दगडात कोरलेली शशांकाची एक राजमुद्रा सापडली आहे. हर्षाचा समकालीन असा प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यू एन् त्संग (आमच्या शाळकरी भाषेत- युवान श्वांग) याने त्याच्या इतिवृत्तात शशांकाचा उल्लेख ‘शे-सांग-किया’ असा केला आहे.

त्याने कर्णसुवर्ण राजधानीचेही अगदी सविस्तर वर्णन केले. ती अत्यंत श्रीमंत व सुविधापूर्ण नगरी असल्याचे ह्यू एन् त्संग लिहितो. याशिवाय, बाणाच्या ‘हर्षचरितात’ शशांकाचा उल्लेख येतो; पण तो ‘खलनायक’ म्हणूनच येतो. आणि ते अपेक्षितच आहे. बाणभट्ट शेवटी हर्षाच्या पदरी होता‌. तो शशांकाला शत्रू मानूनच लिहील, यात नवल कोणते? पण, हे सर्व नकारात्मक चित्रण विचारात घेऊनही एक गोष्ट निर्विवाद आहे- शशांकाने एकट्याने आपले ‘गौड’ घराणे अजरामर केले.

Remains of King Shashanka's capital - Karnasuvarnanagari - discovered in excavations near Behrampur.
राजवंश भारती : गुप्त वंश

इतके, की वंग राज्य पुढे अपभ्रंश होऊन जेव्हा बंग अथवा नंतर बंगाल या नावे ओळखले गेले, तेव्हापासून अगदी आजही गौड हा शब्द बंगालशी जोडला जातो. या वंग प्रांतातील लोक गूढविद्या, तंत्र-मंत्र या प्रकारांमध्ये फार नावाजले गेले आहेत. त्यामुळे एखाद्या गूढ, रहस्यमय गोष्टीला आपण आजही ‘गौडबंगाल’ म्हणतो! शशांकाने वंगभूमीला आणखी एक देणगी दिली आहे. त्याने वेगळी कालगणना रूढ केली. तिला ‘वंगाब्द’ किंवा ‘बंगाब्द’ म्हणतात. इ. स. ५९४ हे वंगाब्द १ आहे.

या हिशेबाने सन २०२४ म्हणजे वंगाब्द १४३०-३१ येते. हे पंचांग प. बंगालमध्ये आजही प्रचलित आहे. काही इतिहासकारांनी या बंगाब्दाचे श्रेय त्यांच्या लाडक्या अकबर बादशहाला दिलेय; पण बंगाली माणसे याला कडाडून विरोध करतात. ते म्हणतात, आमच्या शशांक राजाने कितीतरी पूर्वी सुरू केलेला बंगाब्द स्वत:च्या खाती जमा करणारा अकबर कोण? थोडक्यात सांगायचे तर, राजा शशांक हा बंगालचा मानबिंदू आहे आणि ‘गौड साम्राज्य’ हा शशांकाचा जणू ‘वन मॅन शो’ होता! 

Remains of King Shashanka's capital - Karnasuvarnanagari - discovered in excavations near Behrampur.
राजवंश भारती : नागवंश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com