Veerappan : वीरप्पन

श्रीनिवास यांच्या या शांतताप्रिय धोरणावर या पथकातील अनेक पोलीस अधिकारी नाखूश असत. वीरप्पनबाबत हा अधिकारी इतके मवाळ धोरण का स्वीकारत आहे असा प्रश्न त्यांना पडत असे
national veerappan sandalwood smuggler forest officer story
national veerappan sandalwood smuggler forest officer storyesakal

- वेल्ली थेवर

Veerappan : श्रीनिवास यांच्या या शांतताप्रिय धोरणावर या पथकातील अनेक पोलीस अधिकारी नाखूश असत. वीरप्पनबाबत हा अधिकारी इतके मवाळ धोरण का स्वीकारत आहे असा प्रश्न त्यांना पडत असे. अखेरीस आपल्या मवाळपणाची जबरदस्त किंमत श्रीनिवास यांना चुकती करावी लागली. कावेबाज गुन्हेगारांच्या बाबतीत मुत्सद्देगिरी किंवा चातुर्याचं काही चालत नाही.

सन १९८३ मध्ये आलेला ‘मलयूर मम्बिटियन’ नावाचा एक तमिळ चित्रपट दक्षिण भारतात भलताच गाजला होता. एका डाकूच्या जीवनाच्या सत्यकथेवर तो आधारित होता. हा डाकू ‘मलयूरचा फावडू’ म्हणून ओळखला जाई.

चित्रपटात दाखवल्यानुसार त्याचा कथानायक मुळात एक साधासुधा लोहार असतो. गावच्या जमीनदारानं त्याच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याच्या रागातून तो खुनी खलनायक बनतो. या जमीनदाराची आणि त्याच्या गुंड साथीदारांची हत्या करून तो पळून जातो आणि मलयूर या काल्पनिक नावाच्या डोंगराळ प्रदेशातील जंगलात आसरा घेऊन सरळ सरळ डाकू बनतो.

मात्र, असा तसा डाकू नव्हे. रॉबिनहूडचा तामिळ अवतार बनतो तो. श्रीमंतांना लुटू लागतो आणि मिळालेली संपत्ती गरिबांना वाटू लागतो. ज्याच्या जीवनावरून ही कथा बेतली गेली त्या डाकूचं खरं नाव अय्यादुराई असं होतं.

तो सालेम जिल्ह्यात राहायचा आणि मोलमजुरी करून आपली उपजीविका करायचा. त्याला दोन बायका होत्या आणि दोघींपासूनही त्याला मुलं झाली होती. त्याच्या हातात नेहमी फावडं असे आणि त्याचा चेहराही त्या फावड्यासारखा दिसे. त्यामुळे त्याला ‘मम्बिटियन’ म्हणजे ‘फावड्यासारखा दिसणारा’ असं टोपणनाव पडलं होतं.

प्रत्यक्षात तो गावातील एका जमीनदाराचा आज्ञाधारक गुंड होता. या जमीनदाराचा दुसऱ्या एका जमीनदाराशी संघर्ष होता. अशाच एका संघर्षात मम्बिटियनचे वडील मारले गेले होते. त्यामुळे बेभान होऊन मम्बिटियननं प्रतिस्पर्धी गुंडांच्या प्रमुखाला तर मारलंच; पण त्याच्या सगळ्या कुटुंबाची आणि साथीदारांचीही हत्या केली.

त्यानंतर तो जंगलात पळून गेला. बराच काळ पोलीस काही त्याला अटक करू शकले नाहीत; पण हा मम्बिटियन गरिबांचा कैवारी रॉबिनहूड बनल्याची मात्र प्रत्यक्षात मुळीच नोंद नाही. उलट, एकदा जंगलात आसरा घेतल्यानंतर मम्बिटियन पक्का डाकू बनला. त्या जंगलाच्या अवतीभोवती राहणाऱ्या कितीतरी जणांना त्यानं लुटलं आणि अनेकांचे मुडदे पाडले. तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या परिसरात या मम्बिटियनचं दैवतीकरण करणारी लोकगीतं गायिली जातात.

गुरं चारणारा कूसे मुन्नास्वामी वीरप्पन तामिळनाडूतील जवळच्या जिल्ह्यातच राहायचा. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी हा वीरप्पन शिकारी तस्कर बनला तेव्हा मम्बिटियनची कथा त्याच्या मनात असेलही; पण मम्बिटियनप्रमाणे वीरप्पन काही रॉबिनहूड वगैरे नव्हता.

असं सांगितलं जातं की, वीरप्पननं वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी आपला पहिला हत्ती मारला होता आणि सतराव्या वर्षी पहिला खून केला होता. त्याची शिकारी-टोळी चंदन आणि हस्तिदंत यांची तस्करी, खून आणि अपहरण अशा गुन्ह्यात गुंतलेली असे.

तामिळनाडूमधील सत्यमंगलम् अरण्यात आणि कर्नाटकातील महाडेश्वर टेकड्यांच्या परिसरात त्यानं आयुष्याची वीस वर्षं काढली. या काळात हस्तिदंत मिळवण्यासाठी त्यानं तब्बल हजारावर हत्ती ठार केले असं म्हणतात.

भरीला आपल्या ५२ वर्षांच्या आयुष्यात वीरपन्ननं किमान १२० माणसं मारली असावीत. त्यात पोलिसांप्रमाणेच निरपराध खेडूतही त्यानं ठार केलेत. ते खबरे असल्याचा नुसता संशय येणंही त्याला पुरेसं असे.

अलीकडेच वीरप्पनच्या पाठलागावर काढलेल्या माहितीपटाची एक मालिका मी नेटफ्लिक्सवर पाहिली. त्यामुळे काही आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. माझे आई-वडील निवृत्तीनंतर दक्षिण भारतात राहायला गेले होते. वर्षातून दोनदा मुलांना घेऊन मी त्यांना भेटायला जायची, त्या वेळी याच जंगलातून आमचा प्रवास व्हायचा. सत्यमंगलमच्या जंगलातून ‘सो जाओ...नही तो गब्बर आ जाएगा’

या ‘शोले’तील डायलॉगच्या थाटात, सूं सूं करत आमची ट्रेन जायची त्या वेळी मी मुलांना ते घनदाट जंगल दाखवत असे आणि आपण आता प्रत्यक्ष वीरप्पनच्या प्रदेशातून चाललो असल्याचं त्यांना सांगत असे.

वीरप्पनसंबंधीच्या कथा अगणित आहेत; पण त्यातील एक कथा त्याच्यातला पशू पुरेपूर अधोरेखित करते. त्याला सुधारून माणसात आणू पाहणाऱ्या एका संवेदनशील फॉरेस्ट अधिकाऱ्याशी ती कथा निगडित आहे.

पी. श्रीनिवास हे कर्नाटक राज्याचे उप-वनसंरक्षक (डेप्युटी कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट्स) होते. वीरप्पनचा प्रश्न सोडवण्यासाठी एक अभिनव मार्ग अवलंबावा असं त्यांच्या मनानं घेतलं. एम. एम. टेकड्यांच्या परिसरात खूप आत आत असलेल्या गोपीनाथम् या वीरप्पन्नच्या जन्मगावी जाऊन ते तिथंच राहू लागले.

तिथं त्यांनी विकासकामं आरंभली. लोकांसाठी सोई-सुविधा आणल्या आणि तिथल्या गोरगरिबांना ते खूप मदत करू लागले. आजवर तिथं स्त्रियांची प्रसूती घरातच होत असे. श्रीनिवास आल्यावर स्त्रियांना प्रसूतीसाठी दवाखान्यात नेलं जाऊ लागलं.

थोडक्यात पी. श्रीनिवास यांच्यामुळे वीरप्पनच्या गावाची प्रगती होऊ लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, खुद्द वीरप्पनची सख्खी बहीण या विकासकामात श्रीनिवास यांना साथ देऊ लागली. हे सारं वीरप्पनच्या डोळ्यात खुपू लागलं. कुणीतरी आपल्याच गावात येऊन आपल्यापेक्षा वरचढ होतोय हे पाहून तो मत्सरानं पेटला.

सन १९९१ मध्ये एका स्थानिक खबऱ्याच्या मदतीनं त्यानं श्रीनिवास जंगलात यावेत म्हणून गळ टाकला. ‘श्रीनिवास नि:शस्त्र होऊन आपल्या भेटीला आले तर आपण शरण यायला तयार आहोत,’ असा निरोप त्यानं दिला.

वीरप्पन आपल्यासाठी सापळा रचत आहे अशी पुसटशीही शंका श्रीनिवास यांच्या मनाला शिवली नाही. हस्तिदंत मिळवण्यासाठी सापळा रचून वीरप्पन हत्तींना ठार करत असे. अगदी तसाच सापळा त्यानं या वेळी आपल्या या मानवी बळीसाठी रचला होता.

श्रीनिवास सापळ्यात अडकताच वीरप्पननं कित्येक तास त्यांचा अतोनात छळ केला आणि नंतर कालीमंदिराजवळ नेऊन त्यांचं शिर त्यानं धडावेगळं केलं. एवढंच नव्हे तर, त्यांचे हात-पायसुद्धा त्यानं कापून टाकले. नंतर दिलेल्या एका मुलाखतीत वीरप्पननं सांगितलं होतं की ‘या हत्येनंतर कित्येक दिवस श्रीनिवास यांचं डोकं त्यानं आठवणीदाखल जपून ठेवलं होतं.’

श्रीनिवास हे देवमाणूस होते. इतके चांगले की, वीरप्पनला पकडण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्या संयुक्त कारवाई दलाचा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली तेव्हा, वीरप्पनला ठार न करता जिवंत पकडण्याच्या कडक सूचना त्यांनी आपल्या हाताखालील दलाला दिल्या होत्या.

एक नवा धडा घालून द्यायचा होता त्यांना. नवा पायंडा पाडायचा होता. ते जगाला दाखवू इच्छित होते की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी किंवा ठार करण्यासाठी प्रत्येक वेळी सशस्त्र कृतीची गरज असतेच असं नाही.

मुंबईतल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बोलताना नेहमी हा विषय निघतो. गुन्हेगाराला न्यायालयापुढे न नेता त्याची परस्पर हत्या करण्याच्या ठाम विरोधात मी स्वतः आहे; परंतु ‘निर्ढावलेल्या गुन्हेगारांना केवळ बंदुकीचीच भाषा कळते,’ या भूमिकेवर एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारीही ठाम असतात.

श्रीनिवास यांच्या या अमानुष हत्येनंतर वीरप्पन पकडला जायला आणखी तेरा वर्षं उलटावी लागली. काही अत्यंत चलाख अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे सापळे लावले; पण वीरप्पननंच त्या सर्वांच्या हत्या केल्या.

तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सरकारांनी मिळून १९९१ मध्ये एक संयुक्त कृतिदल तयार करून वीरप्पनला पकडण्याची मोहीम सुरू केली. भारताच्या इतिहासातील या स्वरूपाच्या अत्यंत खर्चिक मोहिमेपैकी ही एक मानली जाते.

एकूण १०० कोटी रुपये या मोहिमेवर खर्च झाले. केवळ वीरप्पनमुळेच अनेक अधिकारी गनिमी कावा शिकले, घनदाट जंगलात राहायला शिकले, तसंच वेश पालटून कारवाई करायचं तंत्रही शिकले. तब्बल वीस वर्षं दोन राज्यांच्या पोलिसांना गुंगारा देत राहणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे. शिवाय, मला तर अजूनही आश्चर्य वाटतं की, तऱ्हेतऱ्हेच्या किड्यांनी आणि पशूंनी भरलेल्या त्या जंगलात इतका प्रदीर्घ काळ वीरप्पन राहिला तरी कसा असेल?

शेवटच्या काही वर्षांत पैशाची चणचण भासू लागली तेव्हा, सिनेरसिकांचं दैवतच असलेले दाक्षिणात्य चित्रपट-अभिनेते राजकुमार यांचं त्यांच्या फार्महाऊसमध्ये जाऊन वीरप्पननं २००० मध्ये अपहरण केलं होतं.

तब्बल १०८ दिवस त्यानं राजकुमार यांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं. या कालावधीत खंडणी म्हणून वीरप्पनला कोट्यवधी रुपये मिळाल्याचं बोललं जातं. अधिकृतपणे मात्र कर्नाटक आणि तामिळनाडू अशा दोन्ही राज्य सरकारांनी त्याचा सपशेल इन्कार केला होता.

मात्र, राजकुमार यांची सुटका केल्यानंतर थोड्याच दिवसांत वीरप्पनकडे अत्याधुनिक हत्यारं आली. त्याला पैसे मिळाले असल्याचा हा सज्जड पुरावाच होय. राजकुमार यांच्या या अपहरणानंतर चार वर्षांनी ‘ऑपरेशन ककून’ असं सांकेतिक नाव दिल्या गेलेल्या एका मोहिमेत वीरप्पन शेवटी पोलिसांच्या हाती लागला.

वीरप्पनचा जंगलात छडा लावणं म्हणजे एखाद्या विस्तीर्ण कुरणात गवताचं विशिष्ट पातं शोधू पाहण्यासारखं दुष्कर कार्य आहे याचं भान पोलिसांना येण्यासाठी बराच काळ जावा लागला. काहीही करून त्याला जंगलातून बाहेर काढणं जरुरीचं होतं आणि त्यासाठी विचारविनिमयपूर्वक काही मोठी योजना आखण्याची आवश्यकता होती. ‘ऑपरेशन ककून’साठी तब्बल दहा महिने नुसते नियोजनात घालवावे लागले होते.

एका स्थानिक फिरत्या विक्रेत्याच्या मदतीनं तामिळनाडू पोलिसांनी वीरप्पनच्या गुप्त जागेत शिरकाव केला. श्रीलंकेतील विशिष्ट लोकांशी आपला संपर्क असल्याचं त्यांनी भासवलं. वीरप्पनला त्या वेळी मोतीबिंदूचा त्रास होत होता.

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. आपण ते घडवून आणू असं सांगणाऱ्या माणसावर त्याचा विश्वास बसला. वीरप्पनबरोबरच्या अशा प्रत्येक भेटीत सहजतेचा आव आणताना या पोलिस अधिकाऱ्याची काय गत होत असेल कुणास ठाऊक. त्याच्या काळजाचं पाणी पाणी होत असेल आतल्या आत.

दरवेळी भीतीनं श्वास कोंडत असेल त्याचा. पोलिस दलात राहून राहून कुठल्याही पोलिसाची एक विशिष्ट देहबोली बनलेली असते. विशिष्ट लकबी त्याच्या अंगवळणी पडलेल्या असतात. त्या साऱ्या लपवणं मुळीच सोपं नसतं.

आश्चर्य म्हणजे, वीरप्पनला या अधिकाऱ्याचा कधीही संशय आला नाही. त्या दोघांच्या अनेक भेटी झाल्या. शेवटी वीरप्पनचा या अधिकाऱ्यावर पूर्ण विश्वास बसला. जंगलात आपल्याबरोबर बसलेला आणि सहज गप्पा मारणारा हा माणूस पोलिसातला असेल अशी काडीमात्र शंका वीरप्पनच्या मनाला कधीही शिवली नाही.

डोळ्यावरची शस्त्रक्रिया ही चांगली सबब हाताला लागली होती. पोलिसांचं नशीब या वेळी बलवत्तर होतं. वीरप्पननं आपल्या जवळच्या माणसांची संख्या नुकतीच कमी केली होती. या वेळी त्याच्याबरोबर फक्त चारच लोक होते.

शेवटी वीरप्पन आणि त्याचे चार सहकारी यांना यमसदनी पाठवायला पंचेचाळीस मिनिटांचा ॲम्ब्युलन्स-प्रवास करावा लागला. ॲम्ब्युलन्स चालवणारा ड्रायव्हर हाही एक पोलिसच होता. वीरप्पन जंगलातून बाहेर आला आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसला.

डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी आपल्याला तमिळनाडूतील दक्षिण अर्काट या ठिकाणी नेण्यात येत आहे अशी त्याची समजूत होती; पण खरं तर हा त्याचा शेवटचा प्रवास होता. अखेरीस वीरप्पनला यमसदनी धाडण्यात आलं. तारीख होती चार ऑक्टोबर २००४.

जंगल वीरप्पनमुक्त होताच खाणींचे मालक जंगलात घुसले. त्यांना खनिजं काढायची होती. शेवटी खाणमालक आणि तस्करी करणारे शिकारी या दोघांनाही हुसकावून लावून हे सुंदर जंगल मुक्त करायला आणखी दोन वर्षं लागली.

आज सत्यमंगलम् आणि एम. एम. टेकड्यांच्या जंगलात हत्तींची संख्या डोळ्यात भरावी इतकी वाढत आहे. तिथं वाघही दिसू लागले आहेत. मागं वळून पाहताना आता जाणवतं की, जगात रॉबिनहूड वगैरे मुळीच नसतात. वास्तव जीवनात असे खरेखुरे नायक नसतात. खलनायक मात्र दिसतील तुम्हाला. नशीब एवढंच की, वीरप्पनच्या दुष्कृत्यांवर अद्याप कुणी लोकगीतं वगैरे लिहिलेली नाहीत!

(लेखिका मुंबईतल्या ज्येष्ठ पत्रकार असून महानगरातल्या घडामोडींबद्दल व मुंबईतील गुन्हेगारीजगताबद्दल लेखन करतात.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)anant.ghotgalkar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com