- दिलीप कुंभोजकर, kumbhojkar.dilip@gmail.com
कवी गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (१९१८-२०१०) यांच्या या कवितेचे शीर्षक आहे - ‘घेता’; पण या कवितेच्या पहिल्या आणि शेवटच्या पुढील पंक्ती इतक्या प्रसिद्ध आहेत, की वाचकांच्या मनात ‘विंदा’ म्हटले की ही कविता डोळ्यासमोर येते.
‘देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्यांनी घेत जावे
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्याचे हात घ्यावे॥ ’’
इ.स. २०१० ला पुण्यात सर परशुराम महाविद्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्या संमेलनाचे उद्घाटन करणार होते कवी विंदा करंदीकर! पण दुर्दैवाने संमेलना अगोदर दोन आठवडे म्हणजेच १४ मार्च २०१० ला विंदांची जीवनज्योत मालवली.
मग उद्घाटनासाठी कवी ना. धों. महानोर आले आणि आपल्या भाषणात सुरुवातीलाच म्हणाले, ‘आज मी इथे असलो तरी ही जागा 'विंदां'ची आहे हे मला माहीत आहे. दीप प्रज्वलित करताना शरीर जरी माझे असले, तरी ‘हात’ विंदांचे आहेत...’ आपल्या गुरुतुल्य कवीला वाहिलेली ही श्रद्धांजली ऐकून सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरारलं.
मराठीत ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकर, वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे हे चार साहित्यिक आहेत. त्यापैकी कुसुमाग्रज आणि विंदा हे कवी होत. केशवसुत, कुसुमाग्रज, केशवकुमार, मर्ढेकर, विंदा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक विषमता अनुभवली आहे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांच्या कविता गंभीर वळणाच्या आणि अभिव्यक्ती मौलिक वाटतात.
कवितांचे विषय डाव्या विचारसरणीत आणि सडेतोड मांडणीत आहेत. काव्यशास्त्राचा विचार केला तर या सर्व कविता रसरशीत आणि कल्पकतापूर्ण आहेत. विंदाचे ध्रुपद, मृद्गंध, जातक, स्वेदगंगा, विरुपिका, अष्टदर्शने इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत तर त्यांची बालगीते, शिशुगीतेही वेगळी वाट चोखळणारी आहे.
विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवींनी देश-परदेशात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून आपल्या कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले.
देणार्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एका जीवनकवीची ही कविता मला निसर्गकविता, तत्त्वज्ञानी आणि आध्यात्मिकही भासते. देणे... ‘दान’ ही कल्पनाच मुळी आपल्या संस्कृतीत पापपुण्याशी निगडित आहे, मग ते अन्नदान असो, द्रव्यदान असो, मरणोत्तर देहदान असो.
गरजूला मदत करणे या विचारातून ‘दान सत्पात्री करावे’ ही कल्पना पुढे आली आहे. विंदांच्या विचारसरणीत पंचमहाभूते युक्त निसर्ग हा देव असू शकेल. निसर्गाने देत जावे आणि मानवाने घेत जावे असे तर विंदा म्हणतात का ? कारण पुढे विंदा म्हणतात -
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
हिरवी पिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी ॥१॥
निसर्गाकडून काय काय घ्यावे? जीवनात रंग भरण्यासाठी आपला नैसर्गिक हिरवा आणि पिवळा रंग घेऊन, त्या रंगाची मानसिक ऊब असलेली शाल पांघरावी. आपण शाल छातीवर लपेटतो हे लक्षात घेऊन पुढे ते म्हणतात, ‘सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी॥’. आपण स्वतः कणखर व्हायचे असेल, सह्याद्री पर्वताप्रमाणे छातीचा कोट करावयाचा असेल, तर शारिरीक तंदुरुस्ती कशी पाहिजे ?
सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे मर्दानी छाती पाहिजे. मग या मर्दानी छातीवर युद्धप्रसंगी सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे चिलखत घालावे. निसर्गातून आदर्श घेऊन कणखर शरीर आणि विचारी संवेदनशील आणि आकर्षक हिरवे पिवळे, माणुसकीने भारलेले मन पाहिजे. अनेक वेळा मनात प्रसंगानुरूप निराशा पसरते पण या वेळी आपण न खचता, निसर्ग हाच देव मानून, ‘हेही दिवस जातील’ हा कानमंत्र लक्षात घेतला पाहिजे, मग निराशाची जागा आशा घेते.
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे ॥२॥
मानसिक आंदोलनातील चढउतार आकाशातील ढगांप्रमाणे आपले स्वरूप बदलणारे असतात. हे वेडेवाकडे चढउतार स्वीकारले पाहिजेत. अनेक वेळा माणसाच्या सुप्तमनातील विचार स्वप्नात भयानक रूप घेऊन येतात, घाबरलेल्या क्षणी जाग येऊन आपण वास्तवात येतो. ते स्वप्न होते हे जाणून सुखावतो. दैनंदिन जीवनातील अडीअडचणी सोडविण्यासाठी निसर्ग देवाकडे उघड्या डोळ्यांनी आणि शांतचित्ताने पाहिले पाहिजे.
अनेक वेळा आकाशातील वीज, सोसाट्याचा वारा आणि पावसाने भरलेले ढग जीवनात गंभीर वादळ घेऊन येतात. अंगणातील वृक्ष कोलमडून पडतात, घरावरील छप्पर उडते पण थोड्याच वेळात वादळ शमते. परिस्थितीची जाणीव होते. वृक्ष कोलमडले तरी लव्हाळीसारखी आशेची छोटी झाडे जिवंत असतात. हाच पृथ्वीकडून होकार आहे, प्रेरणा आहे, मान्यता आहे. अडचणी तर आहेतच पण अडचणींवर मात कशी करावयाची हे निसर्गाकडून समजून घ्या.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी ॥३॥
खवळलेल्या समुद्रातील लाटांप्रमाणे वीरश्रीयुक्त शक्ती घ्यावी. उसळलेला दर्या, त्याच्या किनाऱ्यावरील डोंगरावर आदळणाऱ्या लाटा या चैतन्याचे प्रतीक आहेत. सिंहाची आयाळ हे पराक्रमाचे संकेत आहेत. तलवार, बंदूक ही आपोआप चालत नाही, गोळ्या सोडत नाही तर त्यामागे मनात ध्येय लागते आणि मनगटात जोर लागतो. वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम आठवा.
आपला स्वामी, छत्रपति शिवाजीमहाराज विशाल गडावर पोचल्याचे समजत नाही, तोफांचे आवाज कानी पडत नाही, तोपर्यंत लढत राहायचंय हे एकच ध्येय बाजीप्रभू यांचे मनगट ओळखत होते.
असं असामान्य ध्येय भक्तीच्या मळ्यात उगवते, गवताची पाती पण तलवारी होतात. ओसंडून वाहणाऱ्या नदीकडून तुकोबांची माळ घ्यावी.
या कवितेला अस्सल मराठी वास आहे, मराठी मनाची धार्मिक पार्श्वभूमी आहे. ज्ञानोबा तुकोबांचा गजर ऐकू येत आहे. पालखीप्रमाणे विशाल जनसमुदायाची ही भीमा नदी आहे आणि या नदीत तुकोबांची गाथा तरून वर येण्याची शक्ती आहे. सत्तावीस नक्षत्रांच्या चार चरणांवर आधारलेल्या १०८ मण्यांची ही जपमाळ आहे. समृद्ध निसर्ग आणि संपन्न आध्यात्मिक वारसा हा जीवन जगायला शिकवत आहे.
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे ॥४॥
पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांनी युक्त ह्या शरीराने निसर्गाकडून जे मिळेल ते, पाहिजे ते घ्यावे. आपण जीवनभर निसर्गाकडून घेत असतो. ती वृत्ती अंगी बाणावी, गरजूंना दान देत जावे. जीवन कसे जगावे हा कानमंत्र ही कविता देते. त्यामुळेच ही कविता मला निसर्ग कवितेप्रमाणे आध्यात्मिक कवितापण भासते. पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर अखेर पंचमहाभूतात विलीन होत असते. म्हणून कवी अखेर म्हणतो -
‘घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.