निर्सगाचं रक्षण कृतीतून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गाचा समतोल

निर्सगाचं रक्षण कृतीतून...

मला हॉस्टेलमध्यं राहणं खूप आवडतं. भारतात हॉस्टेल म्हणजे शाळा-कॉलेजचं मुली-मुलांचं राहण्याचं ठिकाण, त्यालाच आपण वसतिगृह असं म्हणतो. पण प्रवासी लोकांसाठी थोडी स्वस्तात तात्पुरती राहण्याची व्यवस्था असते, त्याला जगभरात ‘ हॉस्टेल’ असंच म्हणतात. या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी कमी खर्च लागतो, साधारण दोनशे रुपयांपासून ते पंधराशे रुपये प्रतिदिन असा खर्च येतो. मी अशा हॉस्टेलमध्ये राहिलो, याचा खर्च अमेरिकत पंधराशे रुपये होता, जो मला सगळ्यात महाग वाटला, तर मध्य आणि दक्षिण अमेरिकेत हाच खर्च दोनशे ते आठशे रुपये असा थोडासा परवडणारा होता.

हॉस्टेलमध्ये सहसा तरुण मुलं-मुली एकत्र राहतात. एकाच खोलीमध्ये ६-८, तर कधी १२ लोकांची व्यवस्था मी पाहिली आणि यामध्ये राहण्यासाठी येणारे लोक त्यांच्या कर्तृत्वाने अचंबित करणारे आणि मनमिळावू असल्याचंही मी पाहिलं. प्रत्येकाची एक अद्वितीय कहाणी होती. काही शोध घेणारे, काही साहसी, तर काही माझ्यासारखे भटके लोक मला भेटले. ती माणसं जगाच्या कानाकोपऱ्यांतून इथं आलेली होती. माझ्या या प्रवासात मी खूप वेळ काढला आहे आणि यामध्ये मला खूप नवीन मित्र मिळाले. अशाच एका हॉस्टेलमध्ये मला एक स्पॅनिश मित्र जावी भेटला, तो खूप शांत आणि ज्ञानी होता.

त्याने मला एका आध्यात्मिक मेळाव्याबद्दल सांगितलं आणि मी त्याच्यासोबत बोगोटा या शहरापासून चाळीस किलोमीटर दूर, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कोटा या गावी गेलो. तिथं काही लोक एका बर्नाडो या शमनच्या घरी जमलो. शमन, जो की एक हिलर (मानसिक आणि शारीरिक आजार निसर्गाच्या मदतीने बरे करणारा) आणि आध्यात्मिक पण धर्माचा काही संबंध नसलेला व्यक्ती होता. या मेळाव्यात विवा आणि इतर जमातीचे लोक होते, जे खूप दूरवरून आले होते. सोबत भारत, फ्रान्स, स्पेन, चिली, अमेरिका आणि कोलंबियामधील लोक एकत्र जमले होते. मी सायकल घेऊन कोटा या ठिकाणी पोहोचलो.

विवा ही जमात उत्तर कोलंबियाच्या सिएरा नेवाडा पर्वत येथे दोन हजार वर्षांहून अधिक काळापासून वास्तव्यास आहे. पाच हजार मीटर सरासरी उंचीवर ते राहतात व यांची लोकसंख्या साधारण सात हजार आहे. विवा एक साधं, समुदायचालित जीवन जगतात, ते स्वतःला ‘दमण’ म्हणवून घेतात. दमण म्हणजे, निसर्गमातेचे रक्षक.

निसर्गाचा समतोल हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्या वस्तूंची गरज आहे त्याच ते घेतात, जेणेकरून निसर्गाला जास्त इजा न होवो. या जमातीचा एक मुखिया, याला मोमोस म्हणतात. ते आध्यात्मिक असतात. समाजात सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मोमोसकडे असते. तसंच ध्यान, गाणं आणि विधी यांच्याद्वारे भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा नैसर्गिक संतुलन राखण्याची जबाबदारी मोमोसकडे असते. एक मोमोस आमच्यासोबत होता, त्याचे केस खूप लांब, कपडे पांढरे, उंची साधारण पाच फूट, सडपातळ व त्याच्या हातात एक लांब वाळलेला भोपळा, त्यामध्ये एक छोटी काठी; एका पांढऱ्या पिशवीमध्ये कोका झाडाची वाळलेली पानं. त्याच्याकडे पाहिलं की वाटे, ही स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे. जेव्हा माझी त्याच्याशी भेट झाली, तेव्हा त्याने मला त्याच्या पिशवीतून ती वाळलेली कोकाची पानं दिली आणि मी ती खाल्ली. याच्या आधीही मी ही पानं खाल्ली होती. जेव्हा आपल्याला उंच डोंगरावर जायचं असेल, तेव्हा ही पानं खावीत. कारण तिथे ऑक्सिजन कमी असतं, त्यावेळेस कोकाची पानं तोंडात असली की खूप ऊर्जा येते. याची चव तुरट असते. मोमोस जेव्हा लोकांना भेटतात, तेव्हा ही पानं देतात. ही खूप चांगली प्रथा वाटली. यामुळे लोक एकत्र येतात आणि नाती तयार होतात. दुसऱ्यांसोबत वस्तू वाटणं, ही प्रथा मी जगभर पाहिली. कोका पानांचा उपयोग हे लोक चेतना वाढवण्यासाठी करतात. निसर्गात अशा खूप साऱ्या हर्ब्स आहेत, त्यांचा उपयोग साउथ अमेरिकेमध्ये मी पाहिला आहे.

तीन दिवसांच्या आमच्या या मेळाव्यामध्ये खूप सारे विधी होते. आम्हाला राहण्यासाठी एक जमीन दिली होती, तिथे मी तंबू उभारून राहत होतो. अग्नीला खूप महत्त्व तिथं होतं. आम्ही वर्तुळ आकारात दिवस-रात्र बसायचो आणि जे आध्यात्मिक गुरू आणि मोमोस आहेत, ते आम्हाला गोष्टी सांगायचे. आम्ही सर्व विविध संगीत वाद्यं वाजवायचो, ज्यामुळे आपल्या अंतर्मनातील भावना प्रकट होत आणि आम्ही सर्व एकमेकांशी जोडले जात असू. यामध्ये सोबत डान्ससुद्धा करायचो. स्त्री-पुरुष अशी काही बंधनं इथं नव्हती, इथं पूर्ण स्वातंत्र्य होतं, इथं फक्त होती ती म्हणजे एक ऊर्जा.

या तीन दिवसांनंतर आम्ही १५-२० लोक सेररओ देल माजुइ या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. हा डोंगर बोगोटा कोलंबिया इथे होता. याची सुंदरता एवढी मोहक होती की, मी लगेच चढाई सुरू केली. त्याचक्षणी मागून आवाज आला, ‘‘Wait, We Need to Take Permission from Mountain - थांबा आपल्याला डोंगराची परवानगी घ्यायची आहे.’’ मी विचार करत होतो की, आपण मानवाने आतापर्यंत अशी निसर्गाची परवानगी मागितलेली कधी पाहिली नाही, काही ठिकाणी प्राण्यांची परवानगी घेतली; पण डोंगराची परवानगी? याची हे लोक परवानगी मागत आहेत, हे माझ्यासाठी नवीन होतं. एका व्यक्तीने गाणं गायलं, एकाने केस, नखं आणि काही वस्तू अर्पण केल्या.

आम्ही जेव्हा डोंगरावर चालत होतो, तेव्हा विवा जमातीची एक वयस्कर माउली फागु कॅम्बित आम्हाला एकेका झाडाची माहिती देत होती व त्यांचे फायदे सांगत होती. त्यासोबत ती एक प्रकारच्या प्रजातीची पानं तोडत होती; पण प्रत्येक झाडाची दोन किंवा तीन पानं, जेणेकरून त्या झाडाला जास्त इजा होणार नाही. तिला पाहताना मला गांधीजींची एक गोष्ट आठवली, कापूस पिंजण्याची तार कोमल आणि लवचिक होण्यासाठी त्यांना लिंबाची दोन-तीन पानं तंतूंवर घासणं आवश्यक होतं. त्यांचे जवळचे शिष्य आणि सहकारी काका कालेलकर यांना कडुलिंबाच्या चार-पाच पानांसाठी संपूर्ण डहाळी तोडण्याची सवय होती, ते पाहून गांधीजी म्हणाले : ‘‘ही हिंसा आहे. तसं करण्यासाठी आधी झाडाची माफी मागितल्यानंतर आपणास आवश्यक प्रमाणातच पानं तोडली पाहिजेत; पण तू पूर्ण डहाळी तोडून टाकलीस, जे चुकीचं आहे.’’

या सर्व लोकांच्या गरजा खूप कमी होत्या. भोगवादापासून दूर, सत्याच्या जवळ जाण्याचा त्यांचा मार्ग हा आध्यात्मिक होता, नैसर्गिक होता. उपभोगवादाकडे जे जग चालू लागलं आहे, यावर काही चर्चा होत्या, त्यामधले खूप लोक हे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढा देत होते. मी जेव्हा त्यांना सांगितलं की, गांधीजींचा विचार घेऊन मी यात्रा करत आहे, तेव्हा माझ्याप्रती त्यांचा आदर वाढला. सर्व लोकांना गांधीजी आदरणीय होते; अहिंसक सत्याग्रह आणि कमीत कमी वस्तूंमध्ये कसं जीवन जगावं, हे गांधीजींचे विचार त्यांना भावले होते, ही भावना जगभरात मी पाहिली आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक लोक हे गांधीजींचा खूप आदर करतात आणि गांधीजींबद्दल अभ्यासही करतात.

‘सोमोस उनो’ म्हणजे आपण एक आहोत, हा त्यांचा महत्त्वाचा संदेश होता, जो मला खूपच भावला. जाती, धर्म, देश, वर्ण यामध्ये घुसमटत न राहता, आपण जगाच्या चेतनेचा एक भाग आहोत आणि तिला जोडण्यासाठी हा जीवनाचा प्रपंच आहे असं ते जगतात. सर्व प्राणी, मानव, झाडं, पक्षी, पाणी, हवा, डोंगर, सूर्य, तारे हे सर्व एक आहे. हे फक्त बोलणं नसून, हे प्रत्यक्ष अनुभवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.

‘सोमोस उनो’ या विचारानं जर मनुष्यजातीनं काम केलं, तर हवामानबदल, युद्ध, जाती-पाती, धर्मांतील भांडणं, वर्णभेद, निसर्गाची हिंसा या गोष्टींवर लगेच उत्तर मिळेल आणि शांतीच्या दिशेनं खऱ्या अर्थांनं प्रवास सुरू होईल, असं मला वाटतं.

( सदराचे लेखक जगभर सायकलने भ्रमंती करतात तसेच महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)