लहान मुलांच्या आहाराबाबत "सकस' मार्गदर्शन

book review
book review

सकाळी शाळेत जायच्या गडबडीत दूधच कसंबसं पिणार, डब्यातही आवडीचं असेल तर खाणार, नाहीतर तो तसाच घरी परत, दुपारी घरी आल्यावर जेवणाचं ताट वाढलं की नाक मुरडणार, भूकच नाही असं सांगणार आणि थोड्या वेळानं चकचकीत पाकिटातलं काहीतरी चटपटीत मात्र आवडीनं खाणार, कशी होणार यांची नीट वाढ....? तमाम आयांची मुलांवषयीची ही सार्वत्रिक तक्रार!... तिला "आमची मुलं सगळंऽऽऽ खातात, तेही कोणतीही कटकट न करता,' असं कोणी सांगितलं तर...! नक्कीच तिचे डोळे विस्फारतील, तिचा विश्वासच बसणार नाही. पण ही गोष्ट सहज शक्‍य आहे, हे सांगितलंय प्रसिद्ध आहारतज्ज्ञ नीलंजना सिंग यांनी. त्यांच्या पुस्तकाचं नावच आहे "आमची मुलं सगळंऽऽऽ खातात.' पुस्तकाचा अनुवाद अरुंधती कुलकर्णी- जोशी यांनी केला आहे.

आपलं मूल निरोगी, सुदृढ राहावं, त्याची शारिरीक आणि बौद्धिक वाढ चांगली व्हावी, त्यासाठी त्याला सकस, पौष्टिक अन्न मिळावं, अशी प्रत्येक आईची धडपड असते. पूर्वी इतर काही पर्याय नसल्यानं मुलं घरातील नाष्टा, दोन्ही वेळचं जेवण व्यवस्थित करायची. आता चकचकीत पाकिटात अनेक चटपटीत पदार्थ मिळतात, त्यांच्या जाहिराती मुलांना आकर्षित करतात, जंक फूड हा तर नव्या पिढीचा वीक पॉइंट... घरातल्या पौष्टिक पदार्थाऐवजी मुलं हेच नि:सत्त्व पदार्थ आवडीनं खाऊ लागली, की आईची चिंता वाढते. यांना आवडेल असं काय खायला देऊ, असा प्रश्न तिला पडतो. नेमकं याच प्रश्नाचं उत्तर नीलंजनासिंग यांच्या पुस्तकात सापडतं.

मुलांसाठी पहिला घास हाच महत्त्वाचा असतो. विविध प्रकारच्या नैसर्गिक आणि ताज्या चवींची ओळख त्यांना लहानपणीच करून द्यायला हवी, असं लेखिका सांगते. अर्थात त्यासाठी पालकांची आवडही तशी असायला हवी. कारण मुलं त्यांचंच अनुकरण करत असतात. आहारात सर्व अन्नगटांचा समावेश योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं. हे सर्व अन्नगट आणि त्यांचं योग्य प्रमाण यांची माहिती पुस्तकात आहे. त्याचबरोबर अन्न कसं खावं, जेवताना घरातलं वातावरण कसं असावं, याबाबतही सूचना केल्या आहेत. काही पदार्थांबद्दल अनेक मतप्रवाह असतात. उदाहरणार्थ- दूध. मुलांना कोणतं दूध द्यावं, किती, केव्हा द्यावं, दुग्धजन्य पदार्थ किती द्यावेत, त्याचे नेमके फायदे काय, त्याचप्रमाणं मुलांना बेकरी उत्पादनं द्यावीत की नाहीत, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं शास्त्रीय कारणांसह लेखिकेनं दिली आहेत. मुलांना सर्व भाज्या खायला लावणं, हे प्रत्येक आईसाठी दिव्य असतं. ज्यातून स्वत: लेखिकाही गेली आहे. त्यामुळं भाज्यांचं वेशांतर करून कोणती पक्वान्नं बनवता येतात, हे तिनं स्वत:च्या अनुभवातून आणि प्रयोगांतून सांगितलं आहे.

अन्नगटांची माहिती देत असतानाच, ते कसं, किती आणि केव्हा खावं, शिजवावं कसं, त्यातून जीवनसत्त्वं, प्रथिनं किती मिळतात आणि त्यांचा आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो, याचं सविस्तर विवेचन पुस्तकात आहे. अशीच सगळी माहिती मांसाहार, वेगवेगळ्या तेलांबाबतही दिली आहे. एखादा पदार्थ मुलांना किती प्रमाणात द्यावा, याचा वयोगटानुसार तक्ता दिला आहे किंवा त्यासाठी मुलांना आवडणारा एखादा पर्याय (उदाहरणार्थ, चपातीऐवजी ब्रेड, पास्ता, बिस्किटं आदी) देणार असाल तर तो नेमका किती द्यावा, हेही सांगितलं आहे. वयानुसार पाणी किंवा अन्य पेयं किती द्यावी, हेही नेमक्‍या कारणांसह दिलं आहे. पौष्टिक आहाराच्या नियोजनाची सुरवात शॉपिंगपासून होते. अन्नघटकांची खरेदी कशी करावी, पॅकबंद पदार्थ घेताना कोणती काळजी घ्यावी, पदार्थांवरचं लेबल वाचताना नेमकं काय पाहावं, पदार्थ घेताना कुठं फसगत होऊ शकते, याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. अन्नघटकांचं आहारमूल्य टिकवून ठेवण्यासाठी ती किती आणि कशी शिजवावी, कोणती भांडी वापरावी, मायक्रोव्हेवसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर कसा आणि किती करावा, याबाबतच्या मौलिक सूचनाही लेखिकेनं केल्या आहेत.
सकाळची न्याहरी, दोन वेळचं जेवण, मधल्यावेळचा अल्पोपहार, जेवणाची डबा.... या प्रत्येक वेळी सर्व अन्नघटकांचा भडिमार न करता, त्या त्या वेळी शरीराला गरजेचे असणारे खाद्य आणि पेय पदार्थ देणं आवश्‍यक असतं. त्यासाठीही लेखिकेनं अनेक पर्याय सुचवले आहेत. एक ते एकोणीस वर्षं वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी आठवडाभराचा योग्य आहाराचा तक्ता पालकांसाठी निश्‍चितच मार्गदर्शक ठरणारा आहे.

एखादा नवीन पदार्थ मुलांना आवडावा, असं वाटत असेल, तर तो बनवण्याच्या प्रक्रियेत त्याला सहभागी करून घ्या. जी मुलं भाज्या, फळांच्या खरेदीमध्ये किंवा जेवण बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतात, ती व्यवस्थित जेवतात, असं निरीक्षण लेखिकेनं नोंदवलं आहे. त्यांच्यावर खाण्याची जबरदस्ती करू नका, खाण्यासाठी कोणतं आमिष दाखवू नका किंवा केवळ ती खात आहेत म्हणून हवं ते खाण्याची परवानगी देऊ नका, हे लेखिकेनं सांगितलं आहे. मुलांना जंकफूडपासून पौष्टिकतेकडे नेण्याच्या अत्यंत सोप्या युक्‍त्याही सांगितल्या आहेत. सरतेशेवटी लेखिकेने दिलेला वीस- वीस ऍक्‍शन प्लॅन अमलात आणला, तर तुमच्या मुलांची आहारशैली नक्कीच परिपूर्ण होईल.

कोणतीही गोष्ट सहज, सोपी वाटली तरी ती झटपट होणारी नसते. त्यासाठी छोट्या-छोट्या पायऱ्याच चढाव्या लागतात. अशा एकशे एक पायऱ्या लेखिकेनं दिल्या आहेत. त्या पार केल्या, तर तुम्हीही यशाच्या शिखरावर चढून म्हणाल : "आमची मुलं सगळंऽऽऽ खातात...'

आमची मुलं सगळंऽऽऽ खातात !
लेखिका : नीलंजना सिंग
अनुवाद : अरुंधती कुलकर्णी- जोशी
प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
किंमत : 375 रुपये, पाने : 304

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com