मराठा मोर्चा परिणाम: राष्ट्रवादीची 'टिकटिक'

जगदीश पानसरे
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

9 नगराध्यक्षांसह 253 नगरसेवक निवडून आणत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नगरसेवक निवडून येण्यामध्ये 163 नगरसेवकांसह शिवसेना दुसऱ्या, भाजप 117 सह तिसऱ्या तर 70 नगरसेवकांसह कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.

मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीने भाजपसाठी राज्यातील 147 नगरपालिकामध्ये मतांची कवाडे उघडून दिली. 52 नगराध्यक्ष आणि 890 नगरसेवक निवडून देत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंधारात मारलेला नंबर वनचा बाण निशाण्यावर लागला. जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्याचा फंडा कमालीचा यशस्वी ठरला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रा खालोखाल भाजपला मराठवाड्यात काही ठिकाणी यश मिळाले असले तरी ते तुलनेने कमी आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर हे दोन कॅबीनेट तर मित्रपक्ष शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सारख्या दिग्गजांची फौज असूनही मराठवाड्यात राष्ट्रवादीचा जोर राहिला.

9 नगराध्यक्षांसह 253 नगरसेवक निवडून आणत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नगरसेवक निवडून येण्यामध्ये 163 नगरसेवकांसह शिवसेना दुसऱ्या, भाजप 117 सह तिसऱ्या तर 70 नगरसेवकांसह कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.

मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 28 नगरपालिकांचा सोमवारी निकाल लागला. केंद्र व राज्यातील सत्तेला दोन-अडीच वर्ष पुर्ण झाल्यानंतर लागलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने सत्तधाऱ्यांच्या बाजूने कौल दिला. नोटाबंदीमुळे सुरु असलेल्या आक्रोशानंतरही हे घडले.

मराठवाड्यात मात्र याच्या नेमके उलटे घडले. मराठा क्रांतीमोर्चाची पहिली मशाल मराठवाड्यात पेटल्यानंतर ती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली. त्यानंतर घडलेले कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी व त्यावरुन समर्थन व विरोधात निघणाऱ्या मोर्चांचे उगमस्थान देखील मराठवाडाच होते. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लाखोंच्या मोर्चांनंतरही हा प्रश्‍न जैसे थे आहे. त्यामुळे सरकार विरोधातील राग मराठवाड्यातील जनतेने मतपेटीतून व्यक्त केल्याचे दिसते. परिणामी राज्यात नंबर एकवर असलेला भाजप मराठवाड्यात तिसऱ्या क्रमांकावर गेला. मित्रपक्ष शिवसेनाही सोबतीला राहिला. 29 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी 9, कॉंग्रेस 8, भाजप 5, शिवसेना 5 तर इतर आघाडीचा 1 नगराध्यक्ष निवडून आला. उस्मानाबादची नगरपालिका शिवसेनेने राष्ट्रवादीकडून हिसकावली असली तर त्याची भरपाई इतर ठिकाणी विजय मिळवत करण्यात आली. त्यामुळे भाजपचा विजयी अश्‍वमेध मराठवाड्यात रोखण्याचे काम राष्ट्रवादीने केले असे म्हणावे लागेल.

मंत्री ठरले प्रभावहीन
महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे मंत्री आपल्याच मतदारसंघात तोंडघशी पडले. भगवानगडाचा वाद, त्यानंतर पंकजा यांनी केलेले भावनिक आवाहन या सर्वांचा राजकीय फायदा त्यांना परळीच्या निवडणुकीत कामी आला नाही. या उलट धनंजय मुंडे यांनी राजकीय परिपक्वता दाखवत नगरपालिका निवडणुकीत भाजपला सुरुंग लावण्याचे काम सुरु केले. कै. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक सोमनाथ हलगे यांना राष्ट्रवादीत आणले आणि त्यांच्या पत्नी सरोजनी यांना नगराध्यपदाची उमेदवारी दिली तेव्हाच त्यांनी अर्धा डाव जिंकला होता. उरलेले काम मतदारांच्या थेट भेटीने केले. 33 पैकी 27 नगरसेवक निवडून आणत धनंजय मुंडे यांनी परळीत माझाच आवाज चालणार हे पुन्हा एकदा सिध्द केले. वडीलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून प्रचाराला लागलेल्या धनंजय यांच्यापुढे पंकजा, प्रतिमा या बहिणी कच्च्या ठरल्या. तिकडे परतूरमध्ये बबनराव लोणीकर यांच्या पत्नीचा पराभव झाला. इच्छा नसतांना लोणीकर यांना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पत्नी मंदा लोणीकरांना नगराध्यपदाची उमेदवारी द्यावी लागली अशी चर्चा आता बाहेर येऊ लागली आहे. यावर विश्‍वास ठेवला तरी शहराशी नसलेला जनसंपर्क, पुढच्या विधानसभा निवडणुकीत मुलाला उमेदवारी द्यायची म्हणून ग्रामीण भागाकडे असलेला ओढा ही त्यांच्या पराभवाची कारणे आहेत. सुरेश जेथलिया यांची शहराशी असलेली नाळ, 25 वर्षात केलेली विकासकामे यापुढे मंत्री लोणीकर निष्भ्रम ठरले. जालन्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवडणुकी आधीच शस्त्रे मॅन केली होती. मित्र धर्म, भविष्यातील राजकीय व व्यायवसायिक गणित जुळवण्यासाठी दानवे खोतकर यांनी नगराध्यपदासाठी उमेदवार न देता कॉंग्रेसच्या गोरंट्याल यांना मदत केली. शंकुतला कदम यांना केवळ नावाला पाठिंबा दिला. नेत्यांनीच नांग्या टाकल्यावर कार्यकर्त्यांनीही हात झटकले. कॉंग्रेसच्या संगीता गोरंट्याल या पन्नास हजार मतांनी विजयी झाल्या.

बीडमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला, गेवराई, माजलगाव भाजपने राखले असले तरी बीड शहरात जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व अबाधित राहिले, पुतण्याने केलेले बंडही त्यांच्या पथ्यावर पडले असेच म्हणावे लागेल. कारण 50 पैकी 38 जागा या काकू-नाना विकास आघाडी व राष्ट्रवादीकडे पर्यायाने क्षीरसागंराकडेच गेल्या. बीडमध्ये अपेक्षितपणे एमआयएमने मुसंडी मारत 9 नगरसेवक निवडून आणले. नगराध्यपदासाठी देखील एमआयएमने राष्ट्रवादीला जोरदार टक्कर दिली. मुस्लीमांच्या या एकजुटीचा आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. परभणी, हिंगोलीत शिवसेनेचा जोर दिसला. पाथरी नगरपालिकेतील नगराध्यक्षपदासह सर्व 20 जागा जिंकत बाबाजानी दुर्राणी यांनी र्निविवाद वर्चस्व सिध्द केले. तर परभणीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या जनशक्तीने यश संपादन केले.

दानवेंचे पानिपत
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे त्यांच्याच भोकरदनमध्ये पानिपत झाले. 18 पैकी केवळ 4 जांगावर भाजपला विजय मिळाला. मुलगा आमदार, स्वःत खासदार असतांना त्यांना नगरपालिका ताब्यात घेता आली नाही. लोकांमध्ये असलेली नाराजी, विकासकामांचा अभाव, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सतत हीन वागणूक सत्तेसाठी विरोधकांशी हातमिळवणी याचा उबग आल्यामुळे भोकरदनमधून दानवे यांना नेहमीच विरोध राहीला आहे. विधानसभा निवडणूकीत पत्नीला उमेदवारी दिली तेव्हा त्यांना पराभूत व्हावे लागले. शिवाय लोकसभा, विधानसभा निवडणूकीत दानवे पिता-पूत्र भोकरदनमधून पिछाडीवर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp gets good results of maratha morcha