हवी आंतरिक प्रेरणा (पोपटराव पवार)

Need self motivation to find solutions, writes Popatrao Pawar
Need self motivation to find solutions, writes Popatrao Pawar

देशापुढं आणि राज्यापुढं अनेक प्रश्‍न असले, तरी ते सोडवण्यासाठी आंतरिक प्रेरणा महत्त्वाची आहे. समाज आणि देशाला एक ठेवणाऱ्या नीतिमूल्यांवर आधारित आंतरिक प्रेमाचा झरा शाळा आणि महाविद्यालयांतल्या भावी पिढ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. 


दीपावलीचे फटाके आनंदानं उडवून झाले, तर पणतीच्या दिव्यांनी संपूर्ण अंधार दूर झाला. वेगवेगळी नाती दृढ झाली. सणांमधून दिसणारा हा आंतरिक प्रेमाचा ओलावा कुटुंबाला जोडून ठेवतो आणि याच धाग्यातून कुटुंब, गावसमूहाला जोडलं जातं. जाती-धर्म आणि भावकीच्या पलीकडं जाऊन हे नातं समाजाला जोडून ठेवतं. यातूनच मजबूत झालेली भारतातील लोकशाही व्यवस्था वेगवेगळ्या जातींनी बनलेली आहे आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेनं हा देश एकसंघ ठेवलेला आहे.

सोव्हिएत रशियामध्ये (यूएसएसआर) अनेक जाती होत्या; पण मजबूत लोकशाही नसल्यानं या देशाचे तुकडे झाले. दुसरीकडं युरोपियन देशांत किंवा आखाती देशांत एक एक धर्म असूनही खूप आंतरिक अस्थिरता पाहायला मिळते. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय लोकशाही जगात सर्वाधिक जाती असूनही केवळ आंतरिक प्रेरणेतून ही व्यवस्था आजही टिकून आहे. म्हणून आंतरिक जिव्हाळा अधिक प्रबळ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आपल्याला गरज आहे. हृदयपरिवर्तनातून सामाजिक शिस्त निर्माण होणं अधिक महत्त्वाचं आहे आणि हे कार्य राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतूनच निर्माण होऊ शकतं. तरच ही लोकशाही व्यवस्था सक्षम राहू शकते. अन्यथा या देशाचे अनेक तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.

आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या ‘प्रेमपंथ अहिंसेचा’ या जीवनकथेमध्ये ‘सुप्रीम सिमेंटिंग फॅक्‍टर’चा विचार मांडलेला आहे. त्यात ते म्हणतात ः ‘मी सुप्रीम सिमेंटिंग फॅक्‍टर’ आहे. कारण मी कोणत्याही पक्षात नाही. परंतु, हे तर माझं निगेटिव्ह वर्णन झालं. माझं पॉझिटिव्ह वर्णन तर हे आहे, की सर्व पक्षांमध्ये जे सज्जन आहेत, त्यांच्यावर माझं प्रेम आहे. म्हणून मी स्वतःला ‘सुप्रीम सिमेंटिंग फॅक्‍टर’ मानतो. हे माझं व्यक्तिगत वर्णन नाही. जी व्यक्ती हृदयपरिवर्तनाच्या प्रक्रियेनं क्रांती होईल, असं काम उचलेल ती एका देशाकरताच नव्हे, तर सगळ्याच देशांकरता ‘सिमेंटिंग फॅक्‍टर’ होईल. लुई पाश्‍चरचं एक चित्र मी पाहिलं होतं. त्या चित्राखाली एक लिहिलेलं होतं ः ‘‘तुमचा धर्म काय आहे हे मी जाणून घेऊ इच्छित नाही. तुमची मतं काय आहेत, तेही जाणून घेऊ इच्छित नाही. केवळ तुमची दुःखं काय आहेत, हेच जाणून घेऊ इच्छितो. ती दूर करण्याकरिता मदत करू इच्छितो.’’ माझ्या मते असं काम करणारेच मानवाचं कर्तव्य पार पाडतात.’

विनोबाजींच्या या ‘सिमेंटिंग फॅक्‍टर’चा संबंध थेट हृदयाच्या ओलावा, मानवता आणि भुकेशी आहे. म्हणून स्वातंत्र्य आंदोलन असो, किंवा गांधीजींचं ‘चले जाओ’ आंदोलन असो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ‘आझाद हिंद सेना’ असो, सरदार लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांचं संस्थान खालसा करून एकसंध भारत करण्याचा निर्णय असो किंवा माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये सर्वोच्च स्थानी पोचण्याचं राजीव गांधी याचं स्वप्न असो, महाराष्ट्राची सहकार चळवळ, रोजगार हमी योजना, यशवंतराव चव्हाण यांचा कृषी औद्योगीकीकरणातून सहकाराचा पाया मजबूत करण्याचं धोरण असो, वसंतदादा पाटील यांची जलसंधारणाची धोरणं असोत, रोजगार हमी योजनेतून फलोद्यानाचा शरद पवार यांचा निर्णय असो, किंवा खटाव व माणच्या दुष्काळी दौऱ्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाची बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली निर्मिती असो, रस्त्यांनी गाव आणि देश जोडण्याचा नितीन गडकरी यांनी घेतलेला निर्णय असो, किंवा आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियानाचा रचलेला पाया असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवारची हाती घेतलेली चळवळ असो. आमीर खान यांचं ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप असो, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचं ‘नाम फाऊंडेशन’ असो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून ‘स्वच्छ-भारत’ची दिलेली हाक असो. या सर्व घटना समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी हृदयातल्या आंतरिक प्रेरणेनं घडल्या आहेत. माझ्या मते, विनोबाजींनी सांगितलेला ‘सुप्रीम सिमेंटिंग फॅक्‍टर’ हाच आहे. 

गेल्या महिन्यामध्ये औरंगाबाद इथं मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन एक बैठक घेतली. त्यात त्यांनी असा ठराव केला, की नाशिक आणि नगर जिल्ह्यानं जायकवाडीत पाणी सोडलं नाही, तर आंदोलन हाती घेऊ. विदर्भाच्या अनुशेषावरून पुढं आलेली स्वतंत्र विदर्भाची मागणीदेखील सर्वज्ञात आहे. असंच २०१२ च्या दुष्काळातही ‘उजनी धरणात पाणी सोडलं नाही, तर आम्ही पक्ष सोडू’ अशा स्वरूपाच्या बातम्या पश्‍चिम महाराष्ट्रातही ऐकायला मिळाल्या. या घटनांकडं लक्ष दिलं, तर तर मतपेटीपुढं राष्ट्रीय ऐक्‍य आणि राज्याची अस्मिता दुय्यम ठरत आहे. आपल्यासमोर असलेल्या समस्या या तत्कालीन उपायांमुळं सुटणार नाहीत, तर त्यासाठी अभ्यासपूर्ण निर्णय आणि दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे आणि यासाठी लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण मत मांडत चर्चा करण्याची गरज आहे. 

कविवर्य ना. धों. महानोर यांनी महाराष्ट्रातला दुष्काळ आणि त्यात भरडला जाणारा शेतकरी यावर केलेली प्रभावी मांडणी आणि कवितेतला हृदयाला पाझर फोडणारा विचार वसंतदादा पाटील यांच्या अंतर्मनाला भिडला आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या दुष्काळनिवारणासाठी स्वतंत्र जलसंधारण मंत्रालयाची निर्मिती झाली. विकासकामांना विकासातूनच उत्तर देण्याची गरज आहे. विकासकामांतून चुका शोधून सत्तेच्या मार्गानं जाणारा विचार हा ‘सुप्रीम सिमेंटिंग फॅक्‍टर’ ठरू शकत नाही. तो केवळ समाजाला विघटनाकडं घेऊन जाणार विचार ठरेल. त्यासाठीच आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत हृदयपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा विचार राज्यकर्त्यांमध्ये रुजण्याची गरज आहे. 

महाराष्ट्रातलं पाणी आणि त्यावरच्या उपाययोजना यावर पुनर्विचार करण्याची योग्य वेळ हीच आहे. महाराष्ट्रात पाणी, बांधलेली धरणं, त्या धरणाचा कागदावर ठरवलेला पाणीसाठा, त्याचं गाळानं भरणारं आयुष्यमान, आज असलेली प्रत्यक्ष परिस्थिती आणि त्याखाली भिजणारी शेती, तर दुसरीकडं महाराष्ट्रात वेगान होतं असलेलं औद्योगीकरण, त्यासाठी लागणारं पाणी, बाहेरून येणारे मजुरांचे लोंढे, त्यातून वाढणारं शहरीकरण आणि त्याचा जलस्रोतांवर पडणारा अतिरिक्त ताण आणि गेल्या तीस वर्षांत राज्यामध्ये प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत झालेल्या पाणलोट विकासाच्या यशोगाथांचा अभ्यास करण्याची आता गरज आहे. निव्वळ भ्रष्टाचाराचे आरोप करून काहीही सिद्ध होत नाही, हे आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळं समाजहिताचा प्रत्येक निर्णय आता न्यायव्यवस्थेकडं जात आहे. त्यामुळं भविष्यकाळात गावच्या सरपंचापासून राज्याचा मुख्यमंत्रीही न्यायव्यवस्थेकडूनच ठरवला जाईल की काय, असा प्रश्‍न मनात आल्याशिवाय राहत नाही.

म्हणूनच आपल्या सर्वांना हृदयपरिवर्तनातून मतपेटीचं परिवर्तन हा समाज आणि शब्दाला एक करणारा विचार निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दारू आणि पैशातून मिळणारी सत्ता समाज आणि राष्ट्र उभं करू शकत नाही- कारण तिथं नीती आणि मूल्यांचं बीजारोपण होत नाही, तर तिथं फक्त वतनं आणि जहागिऱ्या निर्माण होऊ शकतात. ज्या राष्ट्राला विघटित करतात. म्हणून आपण आता समाज आणि देशाला एक ठेवणाऱ्या नीतिमूल्यांवर आधारित आंतरिक प्रेमाचा झरा शाळा आणि महाविद्यालयांतल्या भावी पिढ्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com