वेध दुर्लक्षित हवामानाचा

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंची गुंतागुंत गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे.
weather
weathersakal

- अभिजीत मोडक

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंची गुंतागुंत गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. पुढे सरकलेला ऋतू, हिवाळ्यात पडणारा पाऊस, उन्हाळ्यात अचानक जाणवणारा गारवा आणि पावसाळ्यात पडणारे कडक ऊन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणे. विकासाच्या नावावर मानवाने निसर्गावर केलेल्या अत्याचाराचा परिणाम... मात्र त्यात सर्वाधिक बदनाम कोण झाले असेल तर ते हवामान खाते. आता तंत्रज्ञान आणि अभ्यासामुळे हवामानाचा अंदाज अनेकदा अचूक ठरतो; तरीही नैसर्गिक हालचालींचा वेध घेणारा हवामान विभाग दुर्लक्षितच राहिला आहे. आज जागतिक हवामान दिन. त्यानिमित्त दुर्लक्षित हवामानाचा घेतलेला वेध.

भारतातील हवामानात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू पाहायला मिळतात. निसर्गचक्रात तिन्ही ऋतू आपापल्या वेळेत सुरू होतात. अर्थात थोडा अपवाद म्हणजेच पंधरा-एक दिवस पुढे-मागे होऊ शकतात. वर्षानुवर्षे ऋतूमागून ऋतू येतात आणि जातात. म्हणून आपल्याकडे मराठीत कविताही आहे...

वैशाखमासी प्रतिवर्षी येती... आकाशमार्गे नवमेघपंक्ती

नेमेचि येतो मग पावसाळा... हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

निसर्गाची किमया मनुष्याच्या कल्पनेच्या बाहेर आहे. वैशाख वणवा पेटलेला असताना सगळीकडे लाही लाही होत असते. सूर्य आग ओकत असतो आणि त्यातूनच रोहिणी नक्षत्र सुरू होते. आकाशात मेघांची धावपळ सुरू होते. आकाशात काळ्या ढगांची दाटी होऊ लागली, की पाऊस येणार असल्याची वर्दी मिळते. संवेदनशील मनात बालपणीचा पाऊस, कविता आणि गाणी फेर धरू लागतात.

कधी एकदा पाऊस येतो, हवाहवासा सुखद गारवा अन् मंद-धुंद मृद्‍गंध अनुभवायला मिळतो आणि कधी उन्हाळ्यातील चार महिन्यांची होरपळ थांबते, याची आतुरता लागते. मात्र, अशाच कवितांवरून आपल्याकडे खासगीत हवामान अभ्यासकांची खिल्ली उडवली जाते. दरवर्षी असेच चक्र असते. त्यात नवीन काय? नेहमीच उन्हाळ्यात पारा चाळिशीपार जाणार, पावसाळ्यात पाऊस होणार आणि थंडीत तापमान घटणार...

मग तुमचे त्यात काय योगदान, असे बोलले जाते. म्हणून क्रीडा, संगीत किंवा इतर छंदांपेक्षा हवामान खाते आपल्याकडे कायम दुर्लक्षित राहिले आहे. मात्र, आता नजीकच्या काळात थोडा सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. इंटरनेट युगात आणि सोशल नेटवर्किंग साईटमुळे हवामान जाणून घेण्याकडे कल वाढू लागल्याने जनजागृती दिसून येत आहे.

खरे तर हवामान म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग. कारण, दररोज आपण बाहेरील वातावरणात वावरत असतो आणि त्याचा थेट संबंध आपल्या रोजच्या कामाशी येत असतो. त्यात आपला देश शेतीप्रधान आहे. मान्सून म्हणजे देशाचा खरा अर्थतज्ज्ञ, असे आपण सांगत असतो; पण तरीही हवामानाकडे दुर्लक्ष करत राहतो.

म्हणून तेच ऋतुचक्र असले, तरीही त्यात स्थानिक पातळीवर दरवर्षी काही दिवस आपण अतितीव्र हवामानाची अनुभूती घेत असतो. त्याचा अभ्यास हवामान अभ्यासक व अधिकृत खाते करत असते. जसे की उन्हाळ्यात गरमी असणे स्वाभाविक असले, तरी उष्णतेची लाट अधूनमधून येत असते तेव्हा तापमान सरासरीच्या तुलनेत पाच ते सात सेल्सिअसने जास्त वाढते.

उष्णतेची लाट कधी येणार, तिचा प्रभाव किती दिवस राहणार, काय काळजी घ्यावी इत्यादी माहिती हवामान अभ्यासक सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. शेतीच्या नियोजनात आर्द्रता घटक खूप महत्त्वाचा असतो. पिकांना पाणी देणे किंवा कडक उन्हामुळे ते करपून जाऊ नये म्हणून तापमान आणि आर्द्रता घटक खूप गरजेचे असतात.

समुद्रकिनारा भाग आणि अंतर्गत कोकणातील उन्हाळ्यात भिन्नता असते. त्याला ‘मायक्रो क्लायमेट वेदर’ असे संबोधले जाते. किनारी भागात चिकट घामाच्या धारा लागणारा उन्हाळा असतो आणि सहसा चाळिशीपार तापमान नोंदवले जात नाही. कारण समुद्रावरील खारा वारा तापमान नियंत्रणात ठेवतो. अंतर्गत भागातील तापमान उन्हाचे चटके बसवणारे असते. कारण तापलेल्या जमिनीवरील उत्तरेकडील कोरडे वारे तापमान ४० ते ४५ अंशांवर नेऊन ठेवतात. मग स्थानिक पातळीवर त्याचा अंदाज देणे आवश्यक होते आणि आम्ही खासगी हवामान अभ्यासक ते काम करत असतो.

भारतीय वेधशाळा किंवा हवामान विभाग आपल्याला फक्त मुख्य शहरी भागातील तापमान वा अंदाज देतात. आज नागरीकरण मुख्य शहरापासून सुमारे १०० किमी लांबपर्यंत पसरले आहे. उदाहरणार्थ, आपले मुंबई महानगर... इथे आपल्याला फक्त मुंबईचे तापमान किंवा पाऊस कळतो आणि मग आम्ही खासगी हवामान अभ्यासक त्याची त्रुटी भरून काढतो.

स्थानिक पातळीवर ठाणे, वाशी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, पनवेल इत्यादी ठिकाणचे तापमान आणि पावसाची आपण माहिती देतो. कारण हवामान विभागाची अधिकृत वेधशाळा फक्त समुद्रीकिनारी म्हणजे डहाणू, मुंबई, अलिबाग, हर्णे, रत्नागिरी, वेंगुर्ला, पणजी इत्यादी भागांत आहे. म्हणून त्यांच्याकडे रेकॉर्ड आणि जुने तापमान फक्त किनारी भागातील असते.

अंतर्गत कोकण समुद्रापासून २० ते ६० किमी लांब आहे. तिथे भौगोलिक रचना वेगळी आहे. डोंगराळ-खडकाळ भाग आणि कातळ जमीन अधिक तापते व समुद्राचा वारा उशिरा दुपारी दोन-तीननंतर पोचतो. म्हणून इथे चाळिशीपार तापमान सहज जाते. जे किनारी भागात नाही होत, कारण तिथे समुद्रवारा वाहतो.

मात्र, आपल्याकडे अधिकृत वेधशाळा नसल्याने आपल्याला डेटा उपलब्ध होत नाही आणि मग जगापुढे अशा तापमान नोंदी येत नाहीत. वास्तविक पाहता अंतर्गत कोकणात सरासरी कमाल तापमान अधिक असते आणि एप्रिल सर्वात गरम महिना असतो. उष्णतेच्या लाटा अधूनमधून येत असतात आणि तापमान ४५ अंशांपर्यंत जाते... पण त्याबाबतचा रेकॉर्ड अधिकृत ठेवला जात नाही, कारण वेधशाळेचा अभाव!

पाऊस देतो धडा

आता पावसाळ्याच्या बाबतीतली विविधता जाणून घेऊ या... दरवर्षी ऋतुचक्रानुसार येणारा प्रत्येक पावसाळा हवामान अभ्यासकांना एक नवीन धडा असतो. प्रत्येक पावसाळ्यात काही नावीन्यपूर्ण असते जे निसर्ग आपल्याला खुणावत असतो. म्हणून कितीही मोठे तज्ज्ञ, हवामान अभ्यासक असाल; पण शेवटी निसर्गापुढे काही चालू शकत नाही, हेच आपल्याला प्रत्येक वर्षी काही तरी नवीन शिकवून जाते. एकंदरीत पर्जन्यमान कसे असेल, याबाबत आपण आठवडाभर विश्लेषण करतो. खासगी ब्लॉग आणि ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना माहिती पोचवण्याचे काम करतो.

आधी सांगितल्याप्रमाणे फक्त जिथे वेधशाळा आहेत त्या भागाचे निरीक्षण आपल्याला मिळते; पण पाऊस प्रत्येक तीन-चार किलोमीटरवर बदलतो. म्हणून मुंबईतील पाऊस आजूबाजूच्या परिसराला लागू होत नाही. कारण समुद्रकिनाऱ्यापासून घाटमाथ्यापर्यंत पाऊस वाढत जातो. किनारपट्टीवर तो सरासरी २५०० मिमी असेल; तर ठाण्याकडे वाढून २८०० मिमी होतो. अजून आत बदलापूरमध्ये ३१०० मिमी होतो.

घाट-पायथ्याचा भाग असलेल्या नेरळ-कर्जतकडे ३४०० मिमी होतो आणि लोणावळ्याकडे ४५०० मिमी. मग त्यानुसार आपल्याला स्थानिक पातळीवरील प्रत्येक भागाला अनुसरून हवामानाचे अंदाज तयार करावे लागतात आणि त्यानंतर पाऊस जोरदार की अतिमुसळधार होईल, याचा अंदाज हवामान अभ्यासक मांडतात. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे बऱ्याच महापालिका स्वयंचलित हवामान केंद्रही बसवत आहेत. जेणेकरून प्रत्येक पंधरा मिनिटांचा पाऊस आपण ताबडतोब मिळवू शकतो आणि नागरिकांना अलर्ट करून त्यांच्या दैनंदिन कामकाजात अडथळा कमी कसा होईल, हेही पाहतो.

पुरातही अनेक पैलू

शहरी भागात कमी वेळेत जास्त पाऊस पडला तर सखल भागांत पाणी तुंबते. रहिवाशांना वाटते की दोन तासांच्या पावसात पाणी भरले. मग आम्ही इथे त्यांना सांगतो की, एक-दोन किंवा तीन तासांत १०० ते १५० मिमी पाऊस झाला तर तात्पुरते पाणी तुंबणे सामान्य असते. कारण पाण्याचा निचरा करण्यासाठी मलनिस्सारण वाहिनीची भक्कम व्यवस्था नसते. हाच १०० ते १५० मिमी पाऊस २४ तासांत झाला तर ही समस्या उद्‍भवत नाही.

सलग चार ते पाच दिवस पाऊस सुरू राहिला तर अंतर्गत कोकणात नद्या पाण्याची पातळी ओलांडतात. नदीकिनारी गावात किंवा शहरात पूर येतो. म्हणून एकंदरीत आठवडाभर कसा पाऊस राहील, पुराची शक्यता आहे की नाही इत्यादीची माहिती प्रत्येक वेळी आपण सोशल मीडियावर देत राहतो.

प्रत्येक वेळी किती पाऊस झाला, उन्हाळ्यात तापमान किती, हिवाळ्यात किती थंडी पडली इत्यादीची नोंद आपण बदलापूरमधील खासगी हवामान केंद्रात करतो. गेल्या दहा वर्षांतील आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. इतर ठिकाणी किती पाऊस झाला किंवा तापमान किती याचीही नोंद ठेवतो.

त्याप्रमाणे मुंबई शहर, कोकण, घाटमाथा इत्यादी ठिकाणच्या पावसाची आकडेवारी आपण नकाशा स्वरूपात ट्विटर व ब्लॉगवर प्रकाशित करतो. जेणेकरून दर वर्षी उन्हाळा, पावसाळा आणि थंडी कशी राहिली, याचे विश्लेषण करणे सोपे जाते. आजकालच्या मोबाईल युगात चटकन माहिती प्राप्त करता येते. सर्वसामान्यांना आपल्या भागात किती पाऊस झाला, याची माहिती तातडीने हवी असते.

मग मुसळधार पाऊस असेल तर तासाला, दर तीन तासांना आणि १२ किंवा २४ तासांतील पावसाची आकडेवारी आम्ही प्रसिद्ध करत असतो. कारण हेच अधिकृत आकडे संकेतस्थळावर उपलब्ध होण्यासाठी वेळ लागतो. पुन्हा त्यातही काही ठराविक शहरे किवा तालुका ठिकाणची माहिती दिली जाते. एक हवामानप्रेमी आणि अभ्यासकाचे एक महत्त्व असते. जे हवामान बदलाची प्रत्येक माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात. सामान्यांपर्यंत हवामान अंदाज आणि माहिती पुरवत असतात.

abhijitmodak86@gmail.com

(लेखक हवामान अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com