मला भेटलेली माणसे : आनंददायी शेजार

त्या स्वतःचा नातवंडांप्रमाणेच माझ्याही मुलांना जपायच्या त्यामुळे माझी घरातली कामे होत असत.
grandmother
grandmotherSakal

आमच्या शेजारच्याचं नाव आहे रुक्मिणीबाई मोहोळ आणि परिवार… नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर रुपयांएवढ्या आकाराचा बुक्क्याचा टिळा, गोरापान चेहरा. अशा व्यक्तिमत्वाची व्यक्ती आमच्या घराची बेल वाजवून दारात उभी. "मी ज्ञानोबाची आई. कालच आम्ही इथे रहायला आलो. आमचे आडनाव मोहोळ." असे बोलून त्या एकापाठोपाठ एक गोष्ट सांगत होत्या. आधी कुठे राहत होतो? घरात कोण कोण राहतं? अशी प्रश्न उत्तरांची देवाण घेवाण झाली. खरे म्हणजे बोलावस सर्वांनाच वाटत असते…पण सुरुवात कोणी करायची? असे म्हणत आपण आपला प्रवास व्यतीत करत असतो. मग तो बसप्रवास असो की जीवनाचा….!

तर या मोहोळ आजी मोहोळ बाई नावानेच ओळखू जाऊ लागल्या. त्या स्वतःचा नातवंडांप्रमाणेच माझ्याही मुलांना जपायच्या त्यामुळे माझी घरातली कामे होत असत. सोसायटीतील सगळ्यांच्याच मुलांवर आजी प्रमाणे प्रेम करायचा आणि तितक्याच अधिकार वाणीने बोलायच्या देखील. आता कळत नातवंड सांभाळताना किती ऊठबस होते ती….किती सहज पणे करायच्या… अंगणातल्या विहीरी शेजारी थांबून मला आवर्जून आवाज द्यायच्या. म्हणायच्या, "मीना भाजीची पेंडी दे, निवडून देते." आम्हा मोठ्या वडीलधाऱ्या लोकांची मैत्री झाली. जिथे विचार - सुर जुळतात तिथेच मैत्री होते. तद्वतच माझ्या मुलांची आणि मोहोळ आजीच्या नातवंडांची मैत्री झाली. इतका शेजारधर्म त्यांनी निभावला की आम्ही बाहेर गेलो आणि यायला उशीर झाला तर आमच्या मुलांना जेऊ घालत असत, त्यांच्यावर लक्ष ठेवत, अभ्यासाला बसवत…. स्वतःची माणसें असल्याप्रमाणेच आम्हाला वागणूक दिली… प्रेम दिले…! त्यामुळेच सासर माहेर दोन्ही माणसे जवळ नसली.. तरी आम्हाला काहीही फरक पडला नाही.

कालांतराने त्या आजी देवाघरी गेल्या...पण त्यांच्या सुनबाई प्रभावती मोहोळ यांनी हा वसा तसाच चालू ठेवला… मला जीना चढू लागू नये म्हणून भाजीच्या पिशव्या, दळण आधीचं ठेवायच्या. त्यांनी फिलिप्स मधून निवृत्ती घेतल्या नंतर त्यांचा बाल्कनीत बसून त्या घरातल्या सर्वांची वाट पाहायच्या.

त्यामुळे त्यांच्याशी बोलणे रोजचेच व्हायचे. आजारी पडले तर वहिनी स्वतः चहा करून देत. माझ्या मुलीच्या बाळंतपणात माझ्याबरोबर त्या होत्या म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबर मी होते असं म्हणण्यात काही गैर नाही. इतकी वहिनींनी मदत केली. इतकं सुदृढ नातं तयार झालं होतं.

दररोज पोटभर गप्पा मारल्याशिवाय चैन पडत नसे. आमच्या अथवा त्यांच्या घरात कोणतेही शुभ कार्य असू दे.. आम्ही सर्वजण भरपूर आनंद घेत असू. आमचं घरातलंच कार्य असे दोन्ही परिवाराला वाटत असे. माझं इथं कोणीच नाही, असं त्यांनी कधी वाटून दिलं नाही.. पैशांची अडचण म्हणू नका की उसनेपासने… आम्ही वेळ भागवून नेत असू… सणवार सुद्धा आपुलकीने साजरे करीत असू. पुढे मुले मोठी झाली, छान शिकली, आपापल्या पायावर उभी राहिली. 1999 साली पुराचे पाणी वहिनींच्या घरात घुसले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाने (श्री.महेशने) नोकरी लागल्यावर नवं मोठं घर घेतलं आणि आमचा शेजार दूर रहायला गेला.

आजही आम्ही मनाने व फोनवर बोलून एकमेकांसोबत असलो तरी वयोमानाप्रमाणे आणि धावपळीच्या काळात गाठीभेटी जमत नाही. म्हणतात ना, माणूस आलेला खपतो पण गेलेला खपत नाही. अनंत आठवणींचा मळा घेऊन जरी दूर राहत असलं.. तरी जेव्हा भेटतो तेव्हा आठवणींची फुले फुलतात... त्याचा सुगंध मनात दरवळत राहतो समाधान लाभते… आमचा पहिला शेजार हा मी कधीच विसरणार नाही. आम्ही देवाला धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो, की असाच लाभावा प्रत्येकाला शेजार.

-सौ. मीना मेढेकर, गुरुराज सोसायटी, पद्मावती , पुणे 43.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com