बायडेन : आव्हानांची वाट... (निळू दामले)

biden
biden

लोकशाहीत काळाच्या ओघात निर्माण झालेल्या त्रुटी आणि राहून गेलेले दोष दूर करणं, हेही आव्हान आज ज्यो बायडेन यांच्यासमोर उभं आहे. बायडेन कंठाळी घोषणा करणाऱ्यांपैकी नाहीत, ते विरोधकांशीही जुळवून घेतात. ते टोकाची भूमिका घेत नाहीत, व्यावहारिक रीतीनं निर्णय घेतात. कठीण स्थितीवर मात करण्याची बायडेन यांची तयारी दिसते. स्थितीवर ते मात करतात, की स्थिती त्यांच्यावर मात करते, ते आता लवकरच कळेल.

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत, म्हणजे अत्यंत अटीतटीच्या प्रचार मोहिमेनंतर डेमॉक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी अनुक्रमे निवडून आले. अमेरिकेच्या इतिहासात प्रतिस्पर्ध्यापेक्षा इतकी जास्त मतं - ५१ लाख, कोणालाही मिळालेली नाहीत.

इंटरनेट आणि सोशल मीडियानं बाजार आणि राजकारणाचा ताबा घेतल्याचा परिणाम अमेरिकेतल्या या निवडणुकीच्या प्रचारात दिसला. अत्यंत खोटी, कोणताही आधार नसलेली माहिती लोकांच्या माथ्यावर मारण्याचा उद्योग डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. हजारो फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप करून त्यावर माहिती पेरली जात होती. पार्सकेल नावाचा एक माणूस आणि त्याची कंपनी हा उद्योग करत होती. माहितीचा मारा एका बाजूनं इतका झाला, की लोकांचा मेंदू बधिर झाला आणि अनेकांनी विचार न करता मतदान केलं; आपण काय करतोय याचा विचार न करता.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

डेमॉक्रॅटिक पक्षामध्ये आभासी जगाचा अभ्यास असलेले; पण ओबामा यांच्यासारखे शहाणे असे नेते होते. त्यांनी माणसांशी जिवंत संपर्क साधत या असत्यावर आधारलेल्या सोशल मीडियाला उत्तर दिलं. डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे निरलस, काही विचार बाळगणारे तरुण कार्यकर्ते, लाखोंच्या संख्येनं घरोघरी पोचले आणि त्यांनी सोशल मीडियातही सत्य मांडलं. पारंपरिक माध्यमं - साप्ताहिकं आणि दैनिकं पारंपरिक पद्धतीनं माहिती पुरवत राहिली. सोशल मीडियातल्या निर्बुद्ध, कर्कश्श प्रचाराचं खोटेपण न्यूयॉर्क टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्कर, न्यूयॉर्क रिव्ह्यू, इकॉनॉमिस्ट इत्यादी जुन्या काळात वाढलेल्या पेपरांनी उघडं पाडलं.

अमेरिकन नागरिकांसमोर तीन मोठ्या समस्या उभ्या आहेत - कोरोनाची साथ, रोजगार आणि सामाजिक तणाव. कोरोनाची साथ हे प्रकरण नेमकं काय आहे, हे अजूनही जगाला समजलेलं नाही. जोवर लस आणि उपाय सापडत नाहीत, तोवर मास्क आणि अंतर ठेवणं हे दोनच उपाय आहेत. ते उपाय, ती काळजी, योग्य आहे असं वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी सिद्ध केलंय. अमेरिकेत दुर्दैवानं या वैज्ञानिक सत्यालाही ट्रम्प यांनी सत्तेच्या राजकारणात खेचलं.

बायडेन यांना लोकांना वैज्ञानिक सत्य समजून द्यायचं आहे. मास्क आणि अंतर ठेवणं याचा अर्थ उद्योगावर परिणाम. माणसं एकत्र येऊ शकत नसतील, तर उत्पादन-वितरण कसं होणार? त्यामुळं अर्थव्यवस्थाही कोसळलीय, करोडो नागरिकांचं आयुष्य अडचणींत सापडलंय. यथावकाश लस येईल, अर्थव्यवहार सुरळीत होतील; पण त्याला वेळ लागेल, तेवढा काळ लोकांना जगवण्याचं आव्हान बायडेन यांच्यासमोर आहे. बायडेन ती मदत देण्याच्या विचाराचे आहेत, त्यापोटी देशाची तिजोरी बरीचशी रिकामी झाली तरी त्यांची तयारी आहे. (काही लोकांना असा पैसा खर्च करणं म्हणजे समाजवाद असं वाटतं!)

रोजगार ही मोठीच समस्या आहे. ट्रम्प सत्तेवर येण्याच्या आधी आठ वर्षं अनेक कारणांमुळं अमेरिकेतील रोजगारांची संख्या हेलकावे खात होती. बिल क्लिंटन यांच्या काळापासून जागतिकीकरणानं वेग घेतला होता, अनेक अमेरिकी उद्योग बंद पडले होते, त्यामुळं रोजगार कमी झाला होता. ट्रम्प यांच्या मते रोजगार जाण्याचं कारण जागतिकीकरण असल्यानं, ते अमेरिका फर्स्ट म्हणजे आत्मनिर्भर अमेरिका, असं धोरण अवलंबत होते. ते धोरण अनेक अमेरिकन बेकार कामगारांना पटलं होतं. पण त्या धोरणामुळं रोजगार मात्र अपेक्षेप्रमाणे वाढले नाहीत.

बंद पडलेले उद्योग चालवणं हे आव्हान किचकट आहे. अमेरिकेची उत्पादनपद्धती खर्चीक असल्यानं काही अमेरिकन माल जगाच्या बाजारात टिकत नाही आणि जगातला स्वस्त माल अमेरिकेत येऊन अमेरिकन उद्योग बंद पडतात. ही समस्या सोडवायची म्हणजे, तंत्रज्ञान आणि उत्पादन पद्धतीत बदल करावे लागतील, किंवा नवे उद्योग सुरू करून, त्यात बंद पडलेल्या उद्योगांतल्या बेकारांना सामावून घ्यावं लागेल. दोन्ही गोष्टी कठीण आणि वेळ घेणाऱ्या आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बायडेन हे गृहस्थ धीमेपणानं काम करणारे आहेत. त्यामुळं ते अमेरिकेतला रोजगार वाढवू शकतील, स्थिरावू शकतील. त्यासाठी वेळ पडल्यास सार्वजनिक क्षेत्रातून मदत करावी लागली तर तेही करतील. (यालाही काही लोक समाजवाद असं म्हणतात.) ट्रम्प यांनी अमेरिकन समाजाची शकलं करताना वांशिक द्वेष आणि पूर्वग्रह यांना प्रोत्साहन दिलं होतं. गोऱ्या ख्रिस्ती समाजातील अतिरेकी गटांना त्यांनी उचकवलं होतं, अमेरिकेतील न्यायव्यवस्था आणि पोलिस व्यवस्था गोरेतरांना आणि स्थलांतरितांना दुय्यम नागरिकासारखं वागवते, त्यांचे मानवी अधिकारही हिरावून घेते. यावर असंख्य अभ्यास, सर्वेक्षणं झालेली आहेत. अमेरिकेनंच हे मान्य केलं आहे, की न्यायव्यवस्था आणि पोलिस व्यवस्था सदोष आहे. ट्रम्प या सदोष व्यवस्थेचा फायदा स्वतःचं राजकारण करण्यासाठी करून घेत होते.

अमेरिकेतले काळे, लॅटिन, आफ्रिकन लोक आणि गोऱ्यांतलाही मोठ्ठा समाज ट्रम्प यांच्या घातक कारवायांच्या विरोधात उभा राहिला होता. (भारतीय माणसं मात्र या लढ्यात उतरली नव्हती.) ब्लॅक लाइव्ज मॅटर या आंदोलनात, उदा. ओरेगनमध्ये झालेल्या घनघोर आंदोलनात, गोऱ्या तरुणांचा सहभाग फार मोठा होता. त्यामुळं वंशद्वेष अमेरिकेत आहे; पण तो आता काही एका आततायी वर्गापुरता मर्यादित झाला आहे, हे सिद्ध झालं.

बायडेन यांनी प्रचारात आणि निवडून आल्यावर जाहीरपणे सांगितलं, की अमेरिकेत उभी दुफळी माजली आहे, अमेरिकेतली न्याय-पोलिस व्यवस्था सदोष आहे. बायडेन यांनी ही व्यवस्था आपण सुधारू, असं निवडून आल्यावर जाहीरपणे सांगितलं आहे. वरील तीनही समस्यांच्या मुळात आहे अमेरिकेतली राज्यव्यवस्था. अमेरिकेनं जन्मापासूनच अध्यक्षीय-संसदीय लोकशाही स्वीकारली. अध्यक्षाला खूप अधिकार आणि जवळपास असीम स्वातंत्र्य दिलं. परंतु अमेरिकन राज्यघटनेनं संसद, न्यायव्यवस्था आणि माध्यमं या तीन व्यवस्थांनाही स्वातंत्र्य आणि अधिकार दिले. अध्यक्षाच्या हातून गैरवर्तन घडू नये यासाठी त्याच्यावर वरील तीन संस्थांनी लक्ष ठेवावं, अशी अमेरिकन राज्यव्यवस्थेची रचना आहे.

ही रचना करत असताना माणसं शहाणपणानं वागतील असं गृहीत होतं. अध्यक्षही शहाणा असेल आणि संसद - न्यायव्यवस्थेतली माणसंही शहाणी असतील असं घटनाकारांनी गृहीत धरलं होतं. वरील संस्था आणि त्यातली माणसं हे घाटातल्या रस्त्यांना लावलेले कठडे आहेत, अशी कल्पना होती. संस्था आणि अध्यक्षाला वळणावर ठेवण्यासाठी हे संरक्षक कठडे होते. ट्रम्प आणि त्यांचे होयबा यांनी कठडे मोडून टाकले. ट्रम्प यांनी प्रयत्नपूर्वक सर्व सरकारी संस्थांमध्ये आपले होयबा पेरले. घातक विचार आणि आचार असणारे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात पेरले. जो कोणी स्वतंत्र विचार करेल, त्याला अध्यक्षीय अधिकार वापरून ट्रम्प यांनी बाहेर काढलं. सीआयए, एफबीआय या अमेरिकेतल्या सुरक्षा संस्थाही त्यांनी होयबांनी भरून टाकल्या. ट्रम्पना खरं म्हणजे कशातलंच काहीही कळत नव्हतं, तरीही ते म्हणत, की त्यांना सर्व कळतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणंच देश चालला पाहिजे. ट्रम्प यांनी अमेरिका ही स्वतःची खासगी संस्था करून टाकली होती. इतकी, की त्यांच्या पक्षातले लोकंही हैराण झाले होते.

या घडीला निवडणूक होऊन आठवडा उलटला असला, तरीही ट्रम्प सत्तेची सूत्रं निर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या हातात सोपवायला तयार नाहीत. त्यांना वाटतं, की त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नेमलेली मंडळी त्यांच्या बाजूनं निर्णय देतील. लोकशाहीत काळाच्या ओघात निर्माण झालेल्या त्रुटी आणि राहून गेलेले दोष दूर करणं, हेही आव्हान आज बायडेन यांच्यासमोर उभं आहे. बायडेन कंठाळी घोषणा करणाऱ्यांपैकी नाहीत. ते विरोधकांशीही जुळवून घेतात. ते टोकाची भूमिका घेत नाहीत, व्यावहारिक रीतीनं निर्णय घेतात. कठीण स्थितीवर मात करण्याची बायडेन यांची तयारी दिसते. स्थितीवर ते मात करतात, की स्थिती त्यांच्यावर मात करते, ते लवकरच कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com