संतत्व-कवित्व संगमाचं लोभस "दर्शन' (निरंजन आगाशे)

book review
book review

माणसाच्या भावविश्‍वाची जडणघडण ज्या गोष्टींमुळे झाली आहे, त्यात संतांच्या कार्याचा वाटा नि:संशय मोठा आहे. काही शतकं उलटून गेल्यानंतरही हा प्रभाव कमी तर झालेला नाहीच; उलट त्याचे काही पैलू नव्यानं जाणवताहेत. त्यामुळेच संतांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या साहित्याचा सतत अभ्यास करणं आणि वर्तमानकालीन परिस्थितीच्या संदर्भात त्याचं मर्म न्याहाळणं ही आवश्‍यक गोष्ट ठरते. डॉ. सदानंद मोरे आणि अभय टिळक यांनी संपादित केलेली आणि "गंधर्व-वेद'नं प्रकाशित केलेली "संतदर्शन चरित्रमाला' हे अशा प्रयत्नाचं एक उत्तम उदाहरण.

निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंतच्या संतपरंपरेचं दर्शन घडवताना त्यातल्या प्रत्येकाचं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्वही विविध अभ्यासकांनी डोळ्यापुढे उभं केलं आहे. त्यामुळे या प्रत्येक पुस्तकाची स्वतंत्ररीत्या समीक्षा होणं गरजेचं आहे;पण तत्पूर्वी या एकूण प्रकल्पाचा परिचय करून देणं हे अप्रस्तुत ठरणार नाही. ही "माला' वाचताना पहिला ठसा उमटतो, तो संतत्व-कवित्व अभिन्नतेचा. कविता किंवा ललित लेखनाच्या आधारानं साहित्यिकाच्या व्यक्तित्वाचा वेध घ्यावा किंवा नाही, याविषयी आधुनिक समीक्षेच्या प्रांतात भलेही वाद झडत असोत; पण संतसाहित्य समजावून घेण्यासाठी अभंगासारखं उपयुक्त साधन नाही. याचं मुख्य कारण संतांची नितळ अभिव्यक्ती. "बोले तैसा चाले' आणि "चाले तैसा बोले', ही त्यांची जगण्याची शैली आहे. त्यांच्या काव्यातून त्यांची जीवनदृष्टी कळते. भक्तिपरंपरेची ही दिंडी केवढी विविधतेनं समृद्ध आहे! त्यात चोखामेळा, सोयराबाई, कर्ममेळा, बंका, निर्मळा, कान्होपात्रा, दामाजीपंत (मंगळवेढ्यातील मांदियाळी : डॉ. अप्पासाहेब पुजारी) आहेत. त्याचप्रमाणं "जनीं वनीं अवघा देव' असं म्हणणारे संत शेख महंमद महाराज आहेत. (चरित्र लेखक : डॉ. अनिल सहस्रबुद्धे) संत नामदेवांच्या परिवारातील एक-दोन नव्हे, तर पंधरा जण या मांदियाळीत सहभागी झाले होते. (नामयाचे ठेवणे परिवारास लाधले : डॉ. ओम्‌श्रीश श्रीदत्तोपासक.) या प्रत्येकाची कहाणी या "माले'मुळे एकत्रित स्वरूपात वाचायला मिळते.
डॉ. सदानंद मोरे यांनी ज्ञानदेव आणि त्यांची भावंडं यांच्याविषयी लिहिलं आहे.
""निवृत्तीदेव म्हणे सांगतो या वाचे।
राहाणे चौघांचे एकरूप।।
त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठायी।
तैसी मुक्ताबाई आम्हांमध्ये।।

निवृत्तीनाथांच्या ओळींचा उल्लेख करीत हे "एकरूपपण' डॉ. मोरे विशद करून सांगतात. चरित्रलेखनाच्या निमित्तानं कोणत्या वैचारिक दृष्टिकोनातून या चरित्रांकडे पाहता येतं हेही स्पष्ट करतात. व्यापक भारतीय परंपरेत झालेली घुसळण या अर्थानं ज्ञानेश्‍वरीतल्या विचारांकडे पाहता येईल, हे त्यांचं निरीक्षण महत्त्वाचं. ते नोंदवतानाच या घुसळणीची नेमकी कल्पना ते वाचकाला आणून देतात.
"भाग्य आम्ही तुका देखियेला' या तुकोबांच्या चरित्रातही असाच व्यापक वैचारिक आलोक प्रतीत होतो. त्यामुळेच तुकोबांवरच्या साहित्यात मोलाची भर घालणारं असं हे पुस्तक झालं आहे. "काय करुं जी दातारा। काही न पुरे संसारा।।' या ओळींमध्ये दिसणाऱ्या संसारी तुकोबांपासून "संकोचोनि काय जालासी लहान। घेई अपोशण ब्रह्मांडाचे।।' अशी उत्तुंग झेप घेणाऱ्या तुकोबांपर्यंचा प्रवास टिळक यांनी मर्मग्राही आणि विवेचक पद्धतीनं उलगडून दाखवला आहे.

संत एकनाथांनी मराठी जनमानसाला अद्वैतभक्तीचं वळण कसं लावलं आणि कोणती सांस्कृतिक, सामाजिक कामगिरी पार पाडली, याचा वेध डॉ. मुकुंद दातार यांनी घेतला आहे. अभंग, भारुड, आख्यान, भाष्य अशी चौफेर, लखलखीत साहित्यिक कामगिरी करणाऱ्या संत एकनाथांचं "समन्वयकार' हे रूप या लेखनातून प्रभावीपणे समोर येतं. संत बहिणाबाई सिऊरकर या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या. त्यांच्या अभंगरचनेतून त्यांचं चरित्र साकारलं आहे प्रा. रूपाली शिंदे यांनी. जगताना वाट्याला आलेले सर्व भाव आणि अभाव समाजासमोर मांडण्याचं धाडस वारकरी संप्रदायातल्या संत स्त्रियांनी केले, असं नमूद करून प्रा. शिंदे बहिणाबाईंच्या त्यातल्या योगदानाकडे लक्ष वेधतात.

कबीर हे उत्तरेकडचे संत; पण त्यांचं जीवन, कार्य नि काव्यदेखील या परंपरेत शोभणारं. संत कबीरांच्या कितीतरी रचना आपल्या संवाद व्यवहारातही मुरलेल्या आहेत. डॉ. अंशुमती दुनाखे यांच्या "कालजयी कबीर' या पुस्तकामुळे कबीरांच्या रचनामधलं सौंदर्य आणि मार्मिक विचार यांचं दर्शन घडतं.
राजस्थानच्या वाळवंटात भक्तीचा निर्मळ झरा प्रकटला तो संत मीराबाईंच्या रूपात. राजवाड्यातल्या सुखासीन आयुष्याचा त्याग करून नि:सीम कृष्णभक्ती करणाऱ्या मीराबाईंची पदं, त्यांच्या आयुष्यातली उलथापालथ याची कहाणी सांगताना सुरेखा मोरे यांनी ("प्रेमयोगिनी मीरा') आपल्या विचारस्वातंत्र्याचा बळी जाऊ न देणाऱ्या मीरेचं तेजस्वी रूपही प्रभावीपणे रेखाटलं आहे.

संत नामदेवांच्या अभंगवाणीतून त्यांचं क्रांतदर्शित्व कसं प्रत्ययाला येतं हे डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी दाखवून दिलं आहे. नामदेवरायांच्या प्रभावळीतले संत सावता, नरहरी सोनार, संत गोरोबा, परिसा भागवत, जगन्मित्र नागा, संत जोगा परमानंद, राका कुंभार, संत सेना महाराज यांच्या कार्याची ओळखही करून दिली आहे. डॉ. शोभा घोलप यांनी निळोबारायांसह तुकोबांच्या शिष्य परिवारातले कान्होबा, नारायण महाराज, कचेश्‍वर ब्रह्मे, रामेश्‍वर भट्ट, संताजी महाराज जगनाडे या संतांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे.
संत नामदेवांचं जीवनकार्य आणि अभंग याविषयी डॉ. निवृत्तीनाथ रेळेकर यांनी सिद्ध केलेला ग्रंथ संत नामदेव नावाच्या एका "लोकविद्यापीठा'ची ओळख करून देतो.
नामा म्हणे सिवी विठोबाची अंगी।
म्हणोनिया जगीं धन्य जालो।।

या संत नामदेवांच्या ओळी वाचताना सर्वच संतांची वृत्ती आणि दृष्टी जाणून घेण्यास त्या उपयोगी आहेत, असं वाटून जातं.

पुस्तकसंचाचं नाव : संतदर्शन चरित्रग्रंथ (एकूण 13 पुस्तकं)
संपादक : डॉ. सदानंद मोरे, अभय टिळक
प्रकाशक : श्रीगंधर्ववेद प्रकाशन, पुणे (020-24493502)
संच मूल्य : 4,000 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com