बंडखोर आणि सर्जनशील योद्धा

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी हे वैचारिकांच्या अशा दुर्मीळ प्रकारातील नाव.
sharad joshi
sharad joshisakal
Summary

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी हे वैचारिकांच्या अशा दुर्मीळ प्रकारातील नाव.

स्वतंत्र भारताच्या वाटचालीची योग्य दिशा शोधण्यासाठी धडपडणाऱ्या विचारवंत, अभ्यासकांची देशात उणीव नाही. पण त्यांपैकी क्वचितच कोणी आपला विचार वास्तवाच्या भट्टीवर कसाला लावतो. एवढंच नव्हे, तर त्यासाठी मैदानात उतरतो. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी हे वैचारिकांच्या अशा दुर्मीळ प्रकारातील नाव. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी चळवळ उभारणाऱ्या जोशी यांचं भानू काळे यांनी लिहिलेलं इंग्रजी चरित्र वाचताना मनावर ठसा उमटतो तो या वेगळेपणाचा. प्रस्थापित विचारव्यूह असोत अथवा संस्था, प्रत्येक ठिकाणी शरद जोशी मर्मभेदी प्रश्‍न उपस्थित करीत. प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन अभ्यास केल्याने सर्वच व्यासपीठांवर ते छाप पाडत; मग तो लाखालाखाचा शेतकऱ्यांचा मेळावा असो, शासकीय अधिकाऱ्यांशी वाटाघाटी असोत, वा ‘किसान समन्वय समिती’च्या बैठकी असोत.

स्वतंत्र विचार असल्यानेच जोरदार प्रवाहाच्या विरोधातही त्यांची मशाल डौलाने तेवत राहिलेली असे. त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक लढ्याच्या बाबतीत त्यांचं हे वैशिष्ट्य कसं झळाळून उठलं, हे भानू काळे दाखवून देतात. लेखकाने त्यासाठी केवळ शेतकरी संघटनेचं वाङ्‌मय, पुस्तिका, नियतकालिकं एवढ्यावर भिस्त न ठेवता शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. स्वतः लेखकालाही चरित्रनायकाशी बोलण्याची अनेकदा संधी मिळाली. या मेहनतीमुळे विवेचन प्रत्ययकारी झालं आहे.

परिवर्तन घडवायचं असेल, तर त्यासाठी पुरेशी वैचारिक मशागत करावी लागते, त्यातून घडणारा बदल अधिक अर्थपूर्ण असतो. जोशींच्या प्रत्येक चळवळीमागे आपल्याला हा प्रयत्न दिसतो. बंदिस्त अर्थव्यवस्था खुली झाली पाहिजे, हा विचार आपल्याकडे स्वीकारला गेला तो परिस्थितीचे दणके बसल्यानंतर; पण त्याची आवश्‍यकता पटवून देण्याचा प्रयत्न शरद जोशी खूप आधीपासून करीत होते. इतर जे कोणी हा विचार मांडत होते, तो अकादमिक वर्तुळापुरता सीमित होता. शरद जोशी त्या वर्तुळातही आणि लाखो शेतकऱ्यांच्या समोरही तेवढ्याच प्रभावीपणे खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करीत होते.

‘डंकेल प्रस्तावा’वरील देशात झालेली चर्चा हे जोशींच्या या बंडखोरीचं एक ठळक उदाहरण होतं. देशातील तमाम राजकीय पक्ष, माध्यमं, कामगार संघटना, तज्ज्ञ, विचारवंत ‘डंकेल’च्या विरोधात हाकारे पिटत असताना ही ‘शेतकरी स्वातंत्र्याची सनद’ असल्याची भूमिका मांडणारे जोशीच होते. कांदा, ऊस, तंबाखू, कापूस अशा आंदोलनांची इत्थंभूत माहिती इथं सलग वाचायला मिळतेच; पण त्यातील मानवी भावभावना आणि नाट्यही काळे यांनी अचूक पकडलं आहे. ‘लक्ष्मीमुक्ती’च्या निमित्ताने चांदवडच्या आणि अमरावतीच्या लाखा-लाखाच्या महिला मेळाव्यांचं वर्णन करताना लेखकाचं भारावलेपण जाणवतं. त्याचं सामाजिक नि ऐतिहासिक महत्त्व ते लक्षात आणून देतात.

आंदोलनाची रणनीती प्रत्येकवेळी यशस्वी ठरली असं नाही; पण त्यात जोशी जी कल्पकता दाखवत, ती खास त्यांची शैली होती. काळे यांनी तो तपशील रंजक पद्धतीने मांडला आहे. विशेषतः ‘लक्ष्मीमुक्ती’चा संपूर्ण कार्यक्रम, त्याचा आराखडा आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हा जोशींच्या संपूर्ण प्रवासातील एक लखलखीत अध्याय, तो या चरित्रात तपशीलवार वाचायला मिळतो. कोणतीही व्यक्ती म्हणजे सद्‌गुणांचा पूर्णाकृती पुतळा नसते; गुण-दोषांनीच ती घडत असते, याचं भान चरित्र लिहिताना लेखकाने सोडलेलं नाही. स्वित्झर्लंडमधील एका सहकाऱ्याबरोबर बुद्धिबळ खेळणं आणि नंतर टाळणं, हा प्रसंग उद्‌धृत करताना काळे यांनी ती जाण दाखविली. राजकारणाच्या बाबतीत धोरण ठरवताना शरद जोशींनी घेतलेले हेलकावे आणि अंतर्विरोध दाखवून देतानाही त्यांनी काही हातचं राखून ठेवलेलं नाही, त्यामुळेच या चरित्राचं मोल वाढतं. समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत मराठी माणसं विलक्षण कर्तृत्व गाजवत असूनही राष्ट्रीय पातळीवर त्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही, हे दुखणं जुनंच आहे. इंग्रजीतून अशा प्रकारच्या चरित्रलेखनाची त्यादृष्टीने फार आवश्‍यकता होती. आर्थिक स्वातंत्र्याचा विचार आपल्याकडे कधीकाळी केंद्रस्थानी आला, तर त्याच्या आद्यपुरस्कर्त्यांमध्ये शरद जोशींचं नाव ठळकपणे समोर येईल, याची जाणीव हे पुस्तक वाचताना सतत होत राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com